नंदुरबार मधील देश नावाची डगर…

प्रकाश रणसिंग

प्रिय सागर  ……

मी  तसा  ह्या  रानाला उपरा. इथलं  जंगल माणसं  सगळं मला नवीन. पण एखादं  सागाचं  पान  हळूच  जमीनीवर  येऊन पडतं  तेव्हा आपण  उपरे  आहोत, आपण  मुळचे  नाहीत  हे  सर्व  विचार  लगेच पानासारखे गळून  पडतात.

मला जंगल  बघायचं  होतं….  दाट  जंगल अनुभवायचं  होतं. खोलवर  जंगल. ते सर्वही  अनुभवतोय. खरं तर  अजूनही  अड्जस्ट   व्हायला वेळ जातोय तसा  थोडा  फार.  इथल्या  वातावरणासोबत संघर्ष  चालूय. होईल  सवय. पण  हे धुक्यात  बुडालेले  पाडे  आणि पहाडी  कपार  झालेली  माणसं बघून माझा वैचारिक  गोंधळ उडतो. आणि  मी  फक्त  बघ्या म्हणून भूमिका बजावत  राहतो. तुला सांगतो  देशभक्ती जर  मातीवरल्या प्रेमातून  ठरवली  असती  ना तर हे सर्व  पहाडी लोक त्यात  सर्वात  वरच्या नंबरवर  आले  असते. ती देश नावाची डगर इथे नाही  ही वेगळी  गोष्ट. इथलं पोरगं लहान असताना दूध उतरू गेलेल्या  स्तनाला आणि  मोठं झालं की वनपट्ट्याच्या जमीनीला चिटकतं. जमीन मिळवण्यात आख्खी  हयात  घालवलेली  माणसं  भेटतात.  वनपट्टाचं  काय  झालं विचारतात.वनपट्टा  मिळवण्यासाठी  कागदपत्राची  गुंतवणूक  सोडवता  सोडवता  लोकांची  हयात  जाते. बापाने  जमा  केलेल्या  दाव्याची  फाईल त्याच्या पोराच्या  काळात  पूर्ण  होते. जेव्हा  कधी  ती  फाईल  अंतिम  मंजुरीला  येते  तेव्हा अधिकारी  विचारतो  तु  कोण? तं  पोरगं  सांगतो मी त्या  फाईल वाल्याचा  मुलगा. मग  बापाला  घेऊन  ये.. पोरगं  हळूच  म्हणतं  साहेब  बाप  मेला  कधीच.. मग  पुन्हा वारसा जोडण्याचे कागदपत्रे सुरु  होतात. पुन्हा  कधी  फाईल  मंजुरी ला  येईल  माहिती  नाही….

त्यावेळी वाटतं जंगल जगवून  जंगल  वाढवून उपरी झालेली ही  माणसं आणि जंगल उधवस्त  करून  प्रस्थापित  झालेली  माणसं एकाच  देशाची  कशी  असतील कदाचीत वरची  माणसं  वेगळ्या देशाची  असणार…

ओपन सिक्रेट नावाची संकल्पना  मला इथे नव्यानच  समजली.  ती  अशी  की  कागदावर शाळाबाह्य मुलांचे प्रमाण शून्य  आहे…पण  शाळा  बाह्य  मुले खुप  आहेत. हे आहे ओपन  सिक्रेट  की  जे  सर्वांना  माहितीय पण  ते सिक्रेट  आहे. खुपच गमतीशीर संकल्पना  आहे. अश्यानं जंगल जगनारी मुलं जंगलबुक  वाचनाऱ्या  मुलांच्या  स्पर्धेत  कधी  उतरनार आणि  वरून  आरक्षण  आरक्षण  ओरडनार  हे  कसं चालनार. असे खुप  सारे ओपन  सिक्रेट  आहेत. जंगल  मैं मंगल फक्त कागदावर  आहे. नौकरशाही इथल्या  माणसांच्या  मूलभूत  विकासाच्या  आड  येते. नोकरशाही  वर  जरब  बसविनारी  फळी  निर्माण  होणे  आवश्यक आहे. एखादा  अधिकारी आपली कामं करून  देण्यासाठी  आहे. त्याला त्या  कामाचे  पैसे  भेटतात. तो  आपला  सरकारी  कामाकाजाचा दुवा  असतो हे  अजूनही  समजलेलं नाही.ब्रिटिशांची “ साहेब” परंपरा खतरनाक आहे. ती  बदलली  पाहिजे.

सध्या  सगळा वैचारिक  लोचा सुरु  आहे. एखाद्या माणसाला एखाद्या  पुढे एखादा  कागदावर  सही  घेण्यासाठी दोनचार  दिवस  फिरावं  लागतं ते बघितल्यावर… एखाद्या  घरासमोर  एखादं कुपोषित बाळ  बघितल्यावर ..पोराला  छातीला  अडकून  राशन  आनन्यायसाठी  उभा  डोंगर चढून  जाणाऱ्या  एखाद्या  बाईला बघितल्यावर….. शिकलेले जगलेले  सगळे  इझम गळून  पडतात..

           मी उरतो  फक्त  बघ्या म्हणून … 

प्रकाश रणसिंग


लेखक विद्रोही संघटनेचे राज्य निमंत्रक असून District Magistrate Fellowship अंतर्गत तोरणमाळ येथे कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*