सागर कांबळे
त्यांनी विद्यापीठाबाहेर रिंगण आखून घेतलं
आणि रिंगणाबाहेर राहणं भाग पाडलं आम्हाला
आत येण्यासाठी जो धडका मारेल तो रक्तबंबाळ होईल
आम्ही फूटपाथवर गप्पा मारत बसलो चारजण
चाराचे चौथ्या दिवशी वीस झालो
वीसाचे पन्नास.
फूटपाथवर जागा पुरेना
आम्ही रस्त्यावर उतरलो
विद्यापीठाभोवती रिंगण
आणि रिंगणाभोवती कडक बंदोबस्त असल्यामुळे
आम्हाला असं करणं अटळ होतं
आमच्यामुळे ट्रॅफिक वाढत असल्याच्या चर्चा
रंगत राहिल्या रिंगणा आत
या चर्चेतून कितीजणांना तरी पुरस्कार, सन्मान मिळाले
रिंगणाबाहेरच्या लोकांनी
विद्यापीठाचा अपमान सुरु केला आहे
तेव्हा या ट्रॅफिक वाढवणाऱ्या गर्दीचा निकाल लावला पाहिजे
हे ठरत गेलं
आम्ही त्यांना कितीदा निमंत्रण दिलं आहे
‘आत आम्हाला नाही घ्यायचं तर
निदान तुम्ही तरी या रिंगणाबाहेर —–
बोलू.’
त्यांनी एकदिलाने ठराव केला आहे —-
हे विद्यापीठ शाबूत राखायचं तर
रिंगण अधिक बंदोबस्तात आणि
बाहेरचे लोक अधिक निष्क्रियतेत राहिले पाहिजेत
त्यांनी अंशतः प्रवेश खुला केला आहे
अटींसह
त्यांचा आराखडा रिंगणाबाहेर पोहचवणं
हे त्यांचं ध्येय आहे
सागर कांबळे
लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.

Leave a Reply