अजित कांबळे
ओतुर जुन्नर
20 एप्रिल 1877
सत्यरुप जोतिबा स्वामी यांस
सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत
”पत्रास कारण की गेले 1876 साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागली आहेत.
माणसांना अन्न नाही, जनावरांना चारापाणी नाही, यास्तव कित्येक देशांतर करुन आपले गाव टाकून जात आहेत. कित्येक पोटची पोरे व तरण्याबांड पोरी विकून परागंदा होत आहेत.
नद्या, नाले शुष्क व कोरडे ठणठणीत होऊन मृगजलानी व्याप्त झाले आहेत. झाडाझुडपांची पाने वाळून ती भूमीवर पडली आहेत. भूमीला भेगा पडल्या असून त्यातून अंगाला झोंबणाऱ्या झळ्या बाहेर पडतात.
अनेक लोक क्षुधित व तृषाक्रांत होऊन भूमीवर पडून मरत आहेत. कित्येक निवडुंगाची बोंडे अन्न म्हणोन खातात व मूत्र पाणी म्हणोन पितात व संतोष पावतात. देहत्यागापूर्वी भूकेची व तहानेची इच्छा पुरवितात व मृत्यूच्या स्वाधीन होतात, असे इकडचे भयानक वर्तमान आहे.”
सत्यशोधक मंडळींनी या भागात लोकास, अन्य, धान्य पुरविण्यास्तव, धीर देण्यास्तव दुष्काळ निवारण समित्या स्थापल्या. भाऊ कोंडाजी व त्यांच्या उमाबाई मला जीवापलीकडे सांभाळतात. ओतुरचे शास्त्री, गणपती सखाराम, डुंबरे पाटील वगैरे आपल्या समाजाचे सत्यशोधक तुम्हास भेटण्यासाठी येणार आहेत . तुम्ही साताऱ्याहून ओतुरला येऊन नगरला गेले असते तर बरे होते. रा. ब . कृष्णाजीपंत लक्ष्मणशास्त्री हे आपणास विश्रुत आहेत.त्यांनी माझ्या समवेत दुष्काळी गावात जाऊन दुष्काळाने हैराण झालेल्या लोकांना द्रव्य रुपाने मदत केली.
दुसरी चिंतेची बाब अशी की, सावकारांनी लुटावे, त्यांची नाके कापावी अशी दृष्ट कर्मे या भागात घडत आहेत. तस्मात मोठमोठे दरोडे पडत आहते . हे श्रवण करून कलेक्टर येथे आला. त्याने मसलत केली. गोरे सार्जंट पाठवून बंदोबस्त बसविला .
50 सत्यशोधक पकडून नेले. त्याने मला बोलविले. तेव्हा मी उत्तर केले की आमच्या लोकांवर आळव कुंभाड घेऊन कैदेत ठेवले ते सोडा. कलेक्टर न्यायी आहे . तो गोऱ्या फौजदारास रागे भरून बोलला की, पाटील का दरोडे घालतात? त्यांना सोडून दे, कलेक्टर दुष्काळ पाहून कष्टी झाला व कळवळून त्यांनी आपल्या केंद्रात ज्वारीच्या चार गाड्या पाठविल्या आहेत . तुम्ही जे लोककल्याणकारी कार्य करीत आहात यास माझ्या हातून सदासर्वदा सहाय्य होत जावो व मी आपल्या दिव्य कर्तव्यकर्म, सेवाकार्यात सहाय्यभूत होवो, एवढीच माझी इच्छा आहे. अधिक उणे काय वर्णावे ही विज्ञापना.
सावित्री ज्योतिबा
ले. विद्याधर वान भिडे (1891). या छोट्या पुस्तकात पान 10 वर सावित्री माईंची इंग्रजी सही (1-9-1892). पान 21 वर स्वतः रचलेली म्हण व “सावित्री ” अशी संक्षीप्त सही, आणि रामदासांचा दुरुस्त केलेला खालील श्लोक –
रामदासांचा श्लोक
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
विचारी मना तुच शोधूनी पाहे
मना त्वांची रे पुर्रसंचित केले
तयासारखे भोगणे प्राप्त झाले
सावित्री माईंनी दुरुस्त करून खालील प्रमाणे लिहिला
जगी सर्व सुखी असा एक आहे ?
विचारी मना तुच शोधोनि पाहे
मना त्वांचि रे ज्ञान संचित केले
तयासारखे सौख्य हे प्राप्त झाले .
केवळ तीन शब्द बदलून श्लोकाच्या अर्थात व्यापकता आणून शिक्षणाचे जीवनातील महत्त्व सावित्री माईंनी पटवून दिले आहे.
संदर्भ
सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय
पान क्रमांक 114-115
अजित कांबळे
लेखक पश्चिम रेल्वे येथे ज्युनिअर इंजिनिअर या पदावर कार्यरत आहेत व ते नवी मुंबई इथे स्थायिक आहेत.
Leave a Reply