हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा नव्हे तर जिजाऊंनी पाहिलेले ज्वलंत स्वप्न

सुरेखा पैठणे

13 व्या शतकात यादवांचा पराभव करून अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता दक्खन म्हणजेच महाराष्ट्र प्रांतावरही झाली आणि तिच्यात ही बंड होऊन बहामनी अर्थात हसन गंगू ह्या पूर्वी ब्राम्हणाच्या पदरी गुलाम असलेल्या आणि तत्कालीन सुल्तानाविरोधात बंड केलेल्या अमिराचे शासन सत्तेत आले। ह्या बहामनी शासकांनी यादवांच्या काळात थोडी सैल असलेली धर्मसत्ता अधिक बळकट करण्याचेच काम केले। उचचवर्णीयांच्या बाजूने असलेली सामाजिकता, स्पृश्यास्पृश्या भेद याच तमोयुगात आणखी मजबूत झाले। ह्या अंधाऱ्या निबिड महाराष्ट्रात समतेची पायवाट दाखवायला संत एकनाथपासून ते तुकोबारायांच्या समतेच्या मशाली पेटलेल्या होत्या। ह्याच मशालींच्या उजेडात जिजाऊ सारखी पणती महाराष्ट्राच्या उंबऱ्यात उजळून निघाली अन शिवबासारखा तेजपुंज तारा ह्या महाराष्ट्राच्या आसमंतावर प्रकाशला।

१६ व्या शतकावर आपला अमिट ठसा उमटविणारी स्त्री म्हणजे राजमाता जिजाऊ, भारत ही सातत्याने आक्रमणकारींचीच भूमि राहिली आहे शक, हुन, मोगल , निजाम, आदिलशाही यांच्या आक्रमणाला दबुन येथील राज्ये माण्डलिकत्व प्राप्त करून राज्यकारभार करीत होती, अश्यातच लखोबा जाधवाची ही लेक स्वतंत्रांचे स्वप्न उराशी बाळगुन बसली आणि आपल्या मुलाच्या रूपाने हिंदवी स्वराज्याचा अंकुर तिने जन्मास घातला.

स्वातंत्र्याची आस आणि स्वराज्याचा ध्यास यातून उभे राहिले एक मराठी सुराज्य असे सुराज्य की ज्यात रयतेच्या भाजीच्या काडिलाही कोणी हात लावणारा नाही. जिजाऊनी केवळ मोगलाइ च वाकविली नाही तर तत्कालीन प्रचलित असलेल्या धर्मसत्तेलाही आवाहन दिले, शाहजी राजे निर्वतल्यानंतर सती न जाता त्यानी राज्यकारभारत सक्रीय सहभाग घेतला, कित्येक निर्णय मनुवादी परम्परेला छेद देत घेतले…..

मधल्या काळात भवानी आई, दादोजी कोंडदेव आणि स्वामी रामदास समर्थाच्या कचाट्यात सापडलेले शिवाजी महाराज नव्या दमाच्या संशोधकानीं महत्प्रयासाने सोडऊन त्यांना पुन्हा जिजाऊ मासाहेबांच्या ओटीत घातले। आणि महाराष्ट्रातील जनतेला ‘गोब्राम्हणप्रतिपालक छत्रपती’ नव्हे तर “कुळवाडी भूषण” शिवाजी महाराज दिसू लागले।

हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा नव्हे तर जिजाऊंनी पाहिलेले ज्वलंत धगधगते स्वप्न होते।
आडात असेल तर पोहऱ्यात येते ह्या उक्तीनुसार ह्या महाराष्ट्राला गुलामगिरीतुन मुक्त करून स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या शिवबाची पायाभरणी जिजाऊंनी गर्भातच केली होती।

त्या जिजाऊंना मानाचा मुजरा।

हे राज्य व्हावे ही श्रींची नव्हे तर जिजाऊची इच्छा होती
काळाला पुरुन उरलेल्या ह्या युगस्त्रिला मानाचा मुजरा।।।

सुरेखा पैठणे

लेखिका कल्याण – उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्या कवयित्री/वक्ता/निवेदिक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*