विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ
“तुम्ही लोक” फारचं जातीवादी बोलता राव..
अरे बाबा हो.. आम्हीच बोलणार..
ज्यांना या जातिव्यवस्थेचा फायदा आहे ते बांडगुळ कशाला बोलतील ? किंवा ही व्यवस्था संपविण्याचा प्रयत्न करतील ? कधी बघितलय का एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला लाचखोरी बद्दल आंदोलन करताना ? कधी पाहिलंय का , एखाद्या कॉर्पोरेट वाल्याला टॅक्स वाढवण्याची मागणी करताना ? नाही ना.. कसं पाहणार ?
हे नाहीत बोलणार किंवा ती व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न करणार.. कारण ते या व्यवस्थेचे बेनिफिशरी आहेत, फायदे उपभोगणारे आहेत.. ते बोलणारचं नाहीत उलट ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात..
बघत नाहीस का तू ? माजलेत “हे”. आमची बरोबरी करणार का ?जयंती ची मिरवणूक कशी काढतात तेच बघतो.. आमच्या पुढे ताठ मानेने चालतोस का ?मिश्या कश्या ठेवल्या ?आरक्षणखोर, फुकटे.. लग्नाची वरात गावाच्या बाहेरचं, गावात आले तर बघाच..लिस्ट लांबत जाते … जाईल…
आणि आम्ही बोलत राहू.. कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर सगळ्या जमिनीचे, संसाधनाचे, मालमत्तेचे मालक तुम्ही होऊन बसले.. आम्हाला देशाचे नागरिक म्हणून काय मिळालं ? आमच्या पिढ्या न पिढ्या खपल्या त्याच्या बदल्यात काय मिळालं ? त्या जिन्नाने नवीन देश घेतला.. कारण तुमच्या भिकार नियतीबद्दल त्याला विश्वास होता.. पण आम्ही देशभक्त बनून राहिलो, आम्हाला काय मिळालं.. ? आणि इथून पुढे ही काही मिळेल याची शाश्वती नाहीच.. आणि काय मागितलं आम्ही ? चांगल्या शिक्षणाचा हक्क मागितला तर सरकारी शिक्षण संस्था बंद पाडून, महागड्या खाजगी शिक्षण संस्था उभ्या करून शिक्षणाचे दरवाजे बंद केले.. त्या परिस्थितीत देखील शिकून सवरून पुढे आलो तर आमच्या कॅपॅब्लिटी वर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या स्वयंघोषित मेरीटधारी जमातीला उत्तर देण्यास बांधील झालो..
रोज देशात कुठेना कुठे तुमच्या जातीय माजाच्या द्वेषाला निरपराध माणसं बळी पडतात, पण चू . चू . चू .. बिचारे याच्या पलीकडे दुसरं काही होत नाही.. आणि आम्हाला तुमच्या कोरड्या सहानुभूतीच्या मान्यता देखील नकोत. आम्हाला आमचा माणूस म्हणून जगण्याचा हक्क हवा आहे.. जो माणूस म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मिळायलाचं हवा..
जोपर्यत हे घडत नाही तोपर्यत आम्ही बोलत राहू..प्रश्न करत राहू.. तुम्हाला.. तुमच्या भिकार व्यवस्थेला.. सडलेल्या संस्कृतीला.. विषमतावादी धर्माला.. इथल्या जात्यांध धर्माध मानसिकतेला..
विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ
लेखक व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर असून पुणे येथे कामानिमीत्ताने वास्तव्यास असतात. तसेच ते स्वतः स्वतंत्र स्तंभलेखक आहेत.

Leave a Reply