नामांतर हा आंबेडकरी स्वाभिमानाचा लढा

गुणवंत सरपाते

नामांतर. आंबेडकरी चळवळीतला एक धगधगता कालखंड. सामुहीक संघर्षाचा तीव्र इतिहास. शेकडो झोपड्यांची राख. पेटललेले देह. कुऱ्हाडीने तोडलेले हातपाय. आसवं. किंकाळ्या. जय भीमचा गगनभेदी घोष. नक्की कुठून सुरुवात करावी ह्यावर लिहायला. मी जन्मलो वाढलो नांदेड जिल्ह्यात. आंदोलनात सर्वात जास्त पेटलेला भाग. बाबा,त्यांचे मित्र आणी बरेच नातेवाई सक्रीय सहभागी होते नामांतर लढ्यात. त्यामुळं अगदी लहानपणापासूनचं नामांतरात राख झालेल्या झोपड्यांची दाहकता जाणवत होती. त्या विषय बोललं जायचं. सर्व ज्ञात अज्ञात शहीदांना अभिवादन केलं जायचं. हरएक वस्त्यांमधुन ‘लय सहन केलं आजवर, आता कुणाच्या बापाला बी भीयाचं नाही’ म्हणत क्रांतीच्या मशाली पेटवल्या जायच्या.

मराठवाड्यात तीव्र जातीयवाद आहे. नामांतरच्या काळात कुठल्याचं सवर्णांच्या पाणवठ्यावर दलितांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. हे कृत्य करणं म्हणजे नुसतं स्वतःवर संकट ओढवून घेणं नव्हे तर संबंध वस्तीलाचं मारहाण व्हायची. त्यांना औकातीत राहण्याची धमकी दिली जायची. ही पाण्याची अस्पृश्यता मागच्या दहा वर्षांपर्यंत पण काही प्रमाणात होती. ठळकपणे होती. कुठं पाणी बाटलं तर वस्ती वाळीत टाकली जायची. सामूहिक बहिष्कार केला जायचा. सर्व व्यवहार बंद. वाटा बंद. नुसतं पीठ दळून आणायला महिलांना पायपीट करून दहावीस मैलावर दुसऱ्या गावी मोक्याच्या गावी जायला लागायचं. शेवटचं पेप्रात एका कोपऱ्यात आलेली घटना आहे दोन वर्षा पूर्वीची. परभणी जिल्ह्यातली. ती काय शेवटची घटना नसणार आहे. अजूनही घडतचं आहेत.

एखादा शिकलेला तरुण, कुठं शिपाई वैगरे म्हणून काम करणारा व्यक्ती कधी चांगले स्वच्छ कपडे घालून वावरत असला. समाजला एकत्र करून काही उपक्रम राबवत असला तर अश्या नजरेत येणाऱ्या प्रत्येकाला कसलं तरी निमित्त काढून अथवा विनाकारण भांडणं व्हायची, मारहाण व्हायची. वर ‘एकरभर गेलं तं गेलं बघतोच तुमचा कायदा काय शेट्ट उपटतो आमचे’ अस्सल सरंजामी माजात हा डायलॉग हाणल्या जातो आजही.

हे सगळं पाहत की 2000’s च्या दशकात वाढलोय. 80’s आणी 90’s मध्ये काय भयंकर परिस्थिती असेल ह्या बद्दल फक्त वस्तीतल्या म्हाताऱ्यांकडूनच ऐकलं की डोकं सुन्न होतं. ते सांगतात की, ‘तवा लई जुलूम होता.. लोकं गप राहायचे. सहन करायचे, आपण गरीब लोकं कुठं पुरणार ह्यांना. पण नामांतरापासून लोकायला आपली ताकद कळायला लागली.. आरे ला कारे म्हणायची हिंमत आलीय आजच्या पोरात. पोरं थेट भिडायला लागली. शाळा कोलेजात जायला लागली.’ खरंय नामांतरच्या आगीतून क्रांतीच्या आगणित मशाली पेटल्यात.

जवळपास 17 वर्ष चालला हा लढा. दोन पिढ्या अक्षरशः जळून गेल्या. हजारो घरांची राख रांगोळी झाली. कित्येक महिलांवर बलात्कार झाले. नामांतर ही कधीच भरून न निघणारी जखम आहे. माय-बाप आपल्या लेकरांना कुशीत घेऊन झोपी गेले तर रात्री नक्की कुणाची झोपडी पेटेल ह्याची खबर नसायची. कुणी मोर्चात गेलं तर तो संध्याकाळी जिवंत परत येईल का ह्याची शास्वती नसायची. ही अघोषित आणीबाणी तब्बल दीड दशकं चालली. पोलीस ब्रूट्यालिटी पासून ते मीडिया क्रिमिनलायजेशनच्या विरोधात पण तेंव्हाच आंबेडकर युवक बेभान होऊन आपल्या अस्तित्वासाठी लढत होता. आज जेंव्हा लोकं फॅसिझम, लोकशाही, सेक्युलरीझम बद्दल बोलतात तेंव्हा हसायला येतं. साला इथं एक आख्खा समूह वर्षांनूवर्षांपासनं अघोषित आणीबाणीतून जातोय, त्याचं काय?

2002 ला जसं मोदींनी गुजरात जळू दिलं अगदी तसंच पुरोगामी साहेबांनी शेवटच्या टप्प्यात मराठवाडा जळू दिला. एकीकडं नामांतर करून पुरोगामीत्वपण सिद्ध करायचं होतं आन दुसरीकडं मराठा व्होटबँक पण दूर करायची नव्हती. साहेबांच्या करामतींची खूप मोठी किमंत इथल्या दलितांना चुकवावी लागली. वर बाळ ठाकरे ‘मराठवाडाच्या महारवाडा करायचा का?’ पासून ह्यांच्या घरात ‘नाही पीठ कशाला हवंय विद्यापीठ म्हणत ह्या आगीत तेल ओतचं होता. स्थानिक सवर्ण नेते, पोलीस पाटील, गावचे सरपंच सगळ्यांनी मिळून स्थानिक पातळ्यांवर अत्याचारं घडवून आणले. एखाद्या जिनोसाईड सारखं घडत होतं सगळं. स्टेट, ब्युरॉक्रसी, मीडिया सगळी लोकं ह्या विध्वंसाला नुसतं मूक समर्थन देत नव्हते ते थेट सामील होत होते.

आजच्या सुशिक्षित तरूणांनी ह्या लढ्याची, विशेषतः ज्यांनी कधीचं इतका दाहक संघर्ष पाहिलेला नाहीय किंवा नामांतर प्रभावीत क्षेत्रात ग्राउंडवर काम केलेलं नाहीय त्यांनी समजून घेतलं पाहिजे का नामांतर हा लढा काय फक्त एका विद्यापीठाची पाटी बद्दलण्या पुरता नव्हता. नोप. आंदोलनाची सुरुवात जरी ती मुख्य मागणी म्हणून झालेली असली तरी पुढं ह्याला एक क्रांतीचं स्वरूप आलेलं होतं. तो लढा झोपड्यांतल्या अनंत यातनेतून आलेली झिंदाबादची घोषणा होता. आता बास झालं म्हणून आर या पार करत जीवन मरणाचा प्रश्न बनवून रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईचा आक्रोश होता. बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकून ज्यांच्या भुवया उंचवायच्या त्या जातीयवाद्यांच्या विरोधातला हा अस्तित्वाचा लढा होता.

असो. हे कलेक्टीव्ह रेझिस्टंस्न चालतंचं राहणार. ह्या ऐतिहासिक लढ्यातल्या तमाम शाहिदांना, कार्यकत्यांना विनम्र अभिवादन आणी जय भीम.

गुणवंत सरपाते

लेखक सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*