हाथरस घटनेचे क्रौर्य आणि जातीव्यवस्थेचे कलाकृतीतून केलेलं विच्छेदन

डॉ सुनील अभिमान अवचार

एक संवेदनशील कवी-चित्रकार आणि माणूस म्हणून गांधीजींच्या तीन माकडांसारखा बहिरा, मूका आणि डोळे मिटलेला मी कसा असू शकतो? मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून सातत्याने माझा भवताल न्याहळत असतो, त्याला प्रतिक्रिया देत असतो.मग्रूर आणि अन्यायीव्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे माध्यम म्हणून माझ्या चित्रांचा उपयोग करीत असतो. शतका मागून शतके आणि युगांमागून युगे उलटत चालली आहेत. अशा स्थित्यंतराच्या काळाला अखंडपणे भिडतांना Nina Simone ही माझी जैविकदृष्ट्या नातं सांगणारी काळी भगिनी सर्वच संवेदनशील कलावंताना उद्देशून म्हणते, ‘How can you be an artist and not reflect the current time?’१ आजचा समकाळ आणि त्यामध्ये घडणारे क्रौर्य आपल्याला दूर्लक्ष कसे करता येईल. तिला पडणारा हा प्रश्न माझाही सतत पाठलाग करीत राहतो.

अलीकडेच हाथरस मध्ये घडलेली घटना ही भारत देशात किंबहुना जगात घडलेली काही एकमेव घटना नाहीये. हिंसेचे विद्रूप आणि किळसवाणे रूप दाखविणा-या अशा असंख्य घटनांची मालिका सातत्याने दिन-दलितांच्या वाटयाला आल्या आहेत आणि येतच राहणार आहेत. त्या थांबण्याचे मात्र नाव नाही. म्हणूनच दलितांच्या वाटयाला खरेच स्वातंत्र्य आले आहे का? हा प्रश्न सतत विचारत राहावे लागते.


‘पंधरा आगस्ट एक संशयास्पद महाकाय भगोष्ठ
स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे

रामराज्य च्या कितव्या घरात आपण -हातोत
उद्गम विकास उंची संस्कार संस्कृती
कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा’२

ढसाळांच्या कवितेत शब्दबद्ध झालेली ही स्थिति अजूनही बदललेलीच नाही. हाथरस मध्ये झालेल्या हत्याकांडाने भारतीय समाज व्यवस्थेचा एक क्रूर आरसा पुन्हा एकदा समाजालाच दाखवला आहे. ह्या हत्याकांडाचीघटना १४ सप्टेबर २०२० ला उत्तरप्रदेश मधील हाथरस जिल्हयामध्ये असलेल्या चंदपा पोलिस स्टेशन हद्दीतील बुलगाडी या गावात घडली. वय वर्ष वीस असलेली मनिषा आपल्या आई सोबत जनावरे चारायला शेतात गेलेली होती तेव्हा वेळ साधून चार सवर्ण मुलांनी तिच्या आई देखत तिच्यावर बलात्कार केला. इतकेच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी तिची मान तोडली आणि जीभही कापली. काही वेळा नंतर बेशुद्ध अवस्थेत आईला ती सापडली. वेळीच उपचार न मिळाल्यामुळे तिचा करुण अंत झाला. पोलिस आणि प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणात पक्षपाती भूमिका घेतली. रात्रीच्या अंधारात मनीषाच्या कुटुंबाला विश्वासत न घेता तिचा मृतदेह परस्पररीत्या जाळून टाकला. सवर्ण आणि भांडवलदाराच्या ताटाखालचे मांजर झालेल्या मिडियाने या प्रकरणाकडे दूर्लक्ष केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही घटना आणि त्या मागचे सत्य उघड झाले तेव्हा कुठे मेनस्ट्रिम मिडीया आणि लोकांना जाग आली. आज न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या मनीषाची फाईल न्याय व्यवस्थेचे उंबरठे झिजवत आहे. सजग पत्रकार असलेल्या पूनम कौशल यांनी गावातील संपूर्ण घटनेचा केलेला रिपोर्ट खूपच धक्कादायक आहे त्यात त्या म्हणतात की ,‘हाथरस गैंगरेप आरोपियों के परिवार का घमंड देखिए, कहा- हम इनके साथ बैठना-बोलना भी पसंद नहीं करते, हमारे बच्चे इनकी बेटी को छुएंगे क्या?’३हे असे सवर्णांनी म्हणणे या एकूण प्रकरणाची गंभीरता दाखविणारे आहे.

हाथरस सारखी घटना जेव्हा जेंव्हा घडते तेव्हा माझ्यातला संवेदनशील चित्रकार अधिकाधिक अस्वस्थ होतो. चित्राच्या माध्यमातून सोशल मीडियावर माझ्यातला मी बोलता होतो. शोषण व्यवस्थेच्या सर्वात खालच्या पायरीवर उभ्या असलेल्या माझ्या दलित बाईच्या प्रश्नाविषयी, तिच्या वेदने विषयी बोलता होतो. या अगोदरही स्वतःला पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रातल्या खैरलांजी मध्येही अशीच स्मशान शांतता अनुभवली होती. हाथरस प्रकरणामध्येही पुन्हा तेच घडत होते. मला प्रश्न पडत होता ‘why Dalits Daugter cannot be Indians Daughter?’ याच काळात हत्तींनीच्या पिल्ला विषयी हळहळ व्यक्त करणारा आणि ढोंगी नक्राश्रू गाळणारा समाज दलित बाई विषयी मूक का होतो? दलित बाईचा प्रश्न पशुपेक्षा खालच्या पातळीचा आहे का?.’shame on castiest media and savarna feminism ‘ ,’wheree is candle march?.’अशा प्रसंगी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुशीतून तयार झालेल्या मुक्ता साळवे यांनी आपल्या निबंधातून विचारलेल्या प्रश्नाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. समाजातील लोकांच्या ब्राम्हणी मानसिकतेविषयी त्या लिहितात “लिहीण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय? नाही. बाजीरावसाहेब तर काशीस जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय? पण तोहि मांगाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोवळे नेसून नाचत फिरणार्‍या लोकांचा एवढाच हेतु की, काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहो असे मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते. पण एका शिवण्याच्या बंदीपासून आम्हावर किती दु:खे पडतात ह्याचा ह्या निर्दयांच्या अंतःकरणात द्रव येतो की काय? ह्याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाहीत. जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार? बरे, हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात. पंडितहो, तुमचे स्वार्थी आपलपोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते ह्याजकडेस लक्षपूर्वक कान द्या. ज्या वेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छपर सुद्धा नसते म्हणून हीव पाऊस व वारा ह्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दु:ख होत असेल बरे! ह्याचा विचार स्वताच्या अनुभवावरून करा. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसे कोठून मिळणार?”४मांग महारांच्या दुःखा विषयी’ या निबधातून मुक्ता साळवे यांनी व्यक्त केलेली वेदना दलित स्त्रीच्या पाचवीलाच पुजली आहे. भारतात दरदिवशी १० स्त्रियांचा बलात्कार होतो.’ दलित स्त्रीला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा किमान हक्कही नाही का? तिच्या शरीरावर मृत्यू झाल्यानंतरही हक्क नाही का, का तिचं शरीर मध्यरात्री कचरा जळल्यासारखं dispose केलं जातं?, का तिला निर्भर्या सारखे अत्याधुनिक परदेशी दवाखान्यात उपचार मिळत नाहीत?. म्हणूनच दलित स्त्री चा stand हा वेगळा आहे. शोषणाच्या प्रत्येक संस्थेत ती receiving end ला आहे. हाथरस सारख्या घटनेनंतर फुलन देवीचीही प्रकर्षाने आठवण येते, इथल्या जातीय व अमानुष, मानवी प्रेम, मैत्री आणि करुणा या भावना मारून टाकलेल्या समाजात फुलन देवी परत व प्रत्येक स्त्रीत जन्माला यावी असंही वाटते. जेव्हा कायद्याचा धाक (rule of law) निष्प्रभ होऊ लागतो तेव्हा फुलन सारखी प्रवृत्ती निर्माण होणे साहजिकच आणि स्वाभाविकही असते. स्वातंत्र्यच्या साठ वर्षानंतरही दलित स्त्रीचं शरीर हे consumable म्हणून पाहिलं जातं. या सगळ्याचे मूळ इथल्या जातीव्यस्थेत असून ती खिळखिळी करण्यासाठीच मी माझ्या चित्रांद्वारे जात-व्यवस्थेतून निर्माण होणार शोषण दाखवत असतो. माझी आंबेडकरवादी जाणीव त्याला मुक्तीवादी राजकारणाची दिशा देते व ब्राह्मणी व्यवस्थेतून आलेल्या शोषणाला नाकारुन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सार्वत्रिक मानवी मूल्यांचा पुरस्कार करते.


तात्पर्य हेच की परंपरागत जातीय मानसिकतेतून अशा प्रकाराचे क्रौर्य जातीय व्यवस्थे मध्ये सतत घडत असतात अशा घटना मध्ये प्रचंड क्रौर्य असते, द्वेष असतो आणि रानटी मनोवृत्तीही असते.अशा घटना घडल्यानंतर संवेदनशील मने ( कवी-लेखक-कलावंत) ही जिवाच्या आकांताने प्रतीक्रिया समाजात मांडत असतात परंतू जात व्यवस्थेचे लाभार्थी आणि भांडवली वर्गव्यवस्थेचे चाहते मात्र अशा घटनांकडे अत्यंत असंवेदनशील वृत्तीने पाहतात. त्यांना अशा घटनांमधील क्रौर्य जाणवत नाही आणि जाणवले तरी राजकारण आणि व्यवहार हा त्यांचा सोयीस्कर प्राधान्यक्रम ठरलेला असतो.

संदर्भ:

  1. ‘Nina Simone on the role of the Artist’, By beyond capitalism now on 08, 8 , 2013. https://beyondcapitalismnow.wordpress.com/2013/08/08/nina-simone-on-the-role-of-the-artist/
  2. कळसेकर सतीश (प्रस्तावना) प्रज्ञा लोखंडे,’मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे!’, शब्द पब्लिकेशन,२००७पृ.,८१.
  3. https://www.bhaskar.com पूनम कौशल यांचा रिपोर्ट
  4. मुक्ता साळवे यांचा निबंध

डॉ सुनील अभिमान अवचार

लेखक हे समकालीन कवी- चित्रकार असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. ‘ग्लोबल वर्तमानाच्या कविता’, ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ’, हे त्यांचे महत्वाचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.’Our WORLD is Not for SALE ‘आणि ‘We, the Rejected People of India’ हे त्यांच्या मराठी कवितेचे इंग्रजीत अनुवाद झालेले काव्यसंग्रह आहेत. अवचार यांचे साहित्य जात, लिंग, वर्ग भेदाच्या मुक्तीदायी अवकाशासाठी उभे राहणारे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*