बाबासाहेबांचा हा पुतळा म्हणजे आपली मातृभूमी, हाच समग्र शोषण मुक्तीचा डिस्कोर्स

गुणवंत सरपाते

वस्तीत घरापुढचं पुतळा. दरोंटा ओलांडला का बा भीम खंबीर उभा. सगळं बालपण तिथंच घुटमळत. पहिले बोबडे बोल तिथेच बोलले. म्हातारी कडेवर घेऊन जवा खेळवत राहायची तेंव्हा पण ‘जे भीम’ म्हणत हात जोडायला शिकलो. वरच्या वस्तीतलं कुणी सरकारी नौकरी लागला का समदी माणसं तिथं जमायची. पुतळ्यापशीचं. ब्राह्मण्यला कचाकच तुडवून मुक्त केलेले बेड्याची गोळाबेरीज करायला. पोरगं शिकल. गावकुसाबाहेर पडलं. गुलामीची एक चेन ब्रेक झाली. अशे शेकडो आनंद सोहळे ह्या निर्जीव पुतळ्याच्या सावलीत पार पडले. राती बेराती कुणाला दवेखान्यात न्यायचं असेल तर सगळी वस्तीतली सगळीजण इथंच जमायचं. पुतळ्याखाली. सवर्ण हिंदूंच्या जातीय हल्ल्यात ह्या पुतळ्यावर दगड पडू नये म्हणून काठी टेकवनाऱ्या म्हाताऱ्यानी आपली डोकी फोडून घेतली. ‘काय बापू डोकं फुटलं, मरशील की मायझ्या. आम्ही तरणी पोरं व्हतो की ह्या माजोरड्यायचे दगड झेलायला आन उलटे फेकायला बी’ तर काठी टेकवत म्हातारं म्हणे ‘हा पुतळा मह्या माणूसपणाचा निशाण हाय. येणाऱ्या समद्या पिढ्यासाठी ह्याला जपलं फायजेल. आन म्या असा बी एक दिस मरलं. पण बाबासायबाचा पुतळा असाच उभा असला पाहिजेत गुणा’.

साला, आमचं सगळं इथंच येऊन थांबतं!

PC – दिपाली साळवे यांची fb wall

प्रेम, जिव्हाळा, करुणा, कंपॅशन, असर्शन, रेझिस्टन्स. काय बळ दिलंय ह्या निर्जीव पुतळ्यानं आम्हाला हे तुला कसल्याही रिसर्च पेपर, परिसंवाद, वैचारिक प्रगल्भता, JNU/TISS छाप अकॅडमीयांच्या डिस्कोर्स मधणं नाय कळायचं भावा. गाव ओलांडून बाबांचं बोट धरून जवा पहिल्यांदा नांदेडला गेलो ना तर रेल्वे स्टेशन जवळ उतरल्यावर बाबांनी पहिल्यांदा तो पुतळा दाखवला. भर रहदारीच्या चौकात उभा असलेला तो दिमाखदार पुतळा. आमचं सारं अस्तिव, आमचा हँडसम बोधीसत्व आणी ‘दी मोस्ट हेटेड मॅन इन हिंदू इंडिया’! ज्यांच्या घरात ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर’ हे नाव घेतलं की भुवया उंच होतात, पोटात मळमळ सुरू होते. आणी तेच लोकं, ज्यांनी हे नाव एका विद्यापीठाला लागू नये म्हणून दोन दशके गावकुसात माझ्या समूहाची राजरोस हत्याकांडं घडवून आणली….फक्त नावासाठी..जिथं इतका विटाळ असतो इथं हा पुतळा आमचं आभाळ व्यापून जातो. त्याच तीव्रतेनं उभं राहायचं बळ देतो.

हा पुतळा म्हणजे आपली मातृभूमी. हाच समग्र शोषण मुक्तीचा डिस्कोर्स. हाच माझ्या माणूसपणाचा दस्ताऐवज. बामण सवर्ण म्हणतील की तुम्ही बाबासाहेबांना पुतळ्यात बंद केलंय, बाबासाहेबांना अस्मिता बनवलं, त्यांना जातीत बंद केलयत, पुतळ्याचं राजकारण..ब्ला ब्ला ब्ला! त्यांना नुसतं फाट्यावर मारत पुढं जायचं. गप आपलं आयुष्य जगायचं. कारण ह्या निव्वळ दांभिक जमातीला उत्तरं देऊन तुम्ही सरळ सरळ तुमची गुलामी स्वीकारताय. ह्या डिबेट्स मध्ये सहभागी होऊन तुमच्या अस्तित्वाचे दाखले देत ‘समविचारी गप्पा’ झोडून तुम्ही तुमचं ‘सबह्युमन’, ‘वेगळं’ असणं स्वीकारताय. हे आपलं स्वतःचं माणूसपण स्वीकारायचं बेसिक समजाया लागलं की तिथून मुक्तीचा मार्ग सोपा असतोय. शोषक वर्गामध्ये पण कम्युनिस्ट, सेक्युलर, समाजवादी, गांधीवादी, पर्यावरणवादी, परिवर्तनवादी, पुरोगामी, समविचारी असले प्रकार, छटा, फ्लेवर दिसायला लागणं म्हणजे नेणिवेतल्या गुलामीची एक न्यूनतम पातळी गाठणं!

आणी हो जेवढी लोकं, ह्या सूटबूट कोटातल्या निर्जीव पुतळ्यानं मुक्त केलीयत ना त्याच्या एक अंशी ही ह्यांचे डिस्कोर्स, प्रागतिक वर्तुळ, अकॅडमीया नावाच्या बाजारपेठा जन्मात ही करू शकणार नाहीत. एवढचं ध्यानात ठेवायचं. कारण हा पुतळा थेट त्यांच्या ब्राह्मणी उच्चजातीय स्टेट्स को ला चॅलेंज करतो.

फोटू फेसबुकवरचं कुठंतरी पाहिला. ग्रामपंचायत निवडणुक विजयाचा जल्लोष साजरा करताना मायमाऊल्या. पुतळ्या बाजुलाचं उभा आहे. कारण बाबासाहेबांचा हा निर्जीव पुतळा म्हणजे आपली मातृभूमी आहे! 🙂💙

गुणवंत सरपाते

लेखक सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*