बाबासाहेबांच्या कल्पनेतील सामाजिक लोकशाहीच्या उभारणी करिता बहुजनांची जबाबदारी

आकाश अनित्य

संविधान सभेमध्ये बाबासाहेब

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची दहा वर्ष झाल्यानंतर बाबसाहेबाना ज्या गोष्टीची भीती होती किंवा त्यांनी जी भीती व्यक्त केली होती ती म्हणजे “नेहमी करिता सर्वकाळ एकाच पक्षाचे म्हणजे एकपक्षीय कारभार नको कारण एकपक्षीय कारभार म्हणजे निव्वळ हुकुमशाहीच” भारतीय लोक ही व्यक्तिपूजक आहेत आणि व्यक्तिपूजेचा त्यांनी नेहमी विरोधच केला…


काँग्रेसच्या त्याकाळातील कारभाराने बाबासाहेबानी देशाला प्रबळ विरोधी पक्षाची गरज असून सत्ताधारी पक्षाच्या कार्यप्रणालीवर अंकुश ठेवणे, त्यांच्या चूका जनतेच्या नजरेस आणून देणे, हे विरोधी पक्षाचे महत्वाचे कार्य असते असे प्रतिपादन केले. परंतु आपल्या देशातील बहुतेक विरोधी पक्ष धर्माधिष्टीत व जातीयवादाचा पुरस्कार करणारे असल्यामुळे ते अल्पसंख्याक लोकांचे हित साधू शकत नाहीत असे त्यांचे म्हणणे होते.
वरील बाबासाहेबांच्या काळातील तत्कालीन सत्ताधारी पक्षाचा कारभार पाहिला तर आजही परिस्थिती जैसे थे अशीच म्हणावी लागेल… आशा परिस्थितीत बाबासाहेबानी त्यावेळेस लोकशाही यशस्वीतेसाठी सांगितलेल्या गोष्टी आजही किती मार्गदर्शक ठरतात ते कळेल.


लोकशाही यशस्वी करायची असेल तर बाबासाहेबानी सांगितलेल्या काही गोष्टी पैकी पहिली गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली ती म्हणजे
 “समाजव्यवस्थेत विषमता नसली पाहिजे, पीडीत दडपलेला वर्ग समाजात नसला पाहिजे, हक्क व सत्ताकेंद्रीकरण ज्यांच्या ठायी झाले आहे असा एक वर्ग एका बाजूला व सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग दुसऱ्या बाजूला अशी विभागणी असू नये. अशी विषमता अशी अन्यायकारक विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यामध्ये हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि मग त्याचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते.”
आजच्या परिस्थितीत जर आपण पाहिले तर आज विषमतेणे जो स्तर गाठला आहे तो कोणत्याही दृष्टिकोनातून या देशाच्या विकासाला अडथळा आणणारा असाच आहे. जातीवाद, धर्मांधपणा, श्रीमंती-गरिबीतुन अनेक पीडित या देशात निर्माण झाले. सत्तेची सर्व सूत्र आपल्या हातात ठेवून जातीवाद, धर्मांधपणा राष्ट्रवाद-देशभक्तीच्या नावाखाली रुजवला जात आहे. सतेच्या आधारे अनेक आर्थिक धोरण ही भांडवलधारी लोकांच्या बाजूने तयार केली जात आहेत ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अजून गरीबीच्या खड्ड्यात रुतला जात आहे. 


उपस्थित सत्ताधारी पक्ष हा बाबासाहेबांनी सांगितलेल्या लोकशाही यशस्वी होण्यास आवश्यक असणाऱ्या पहिल्या गोष्टीच्या पुरेपूर उलट पद्धतीने आपली धोरण राबवत आहे…यावरून यांना लोकशाही संपवून हुकुमशाही आणायची आहे हे स्पष्ट आहे. यासाठी संघ आणि तत्सम विचाराचे लेखक पत्रकार नेते जोरदार पद्धतीने आपला अजेंडा रेटत आहेत. नथुराम गोडसेला देशभक्त सिद्ध करणे त्याचे मंदिर बांधण्याची घोषणा करणे, पत्रकार मिडियाहाऊस यांनी जनतेच्या विरोधी धोरणांची बाजू मांडणे व त्यांना विरोध करणाऱ्या लोकांना देहशद्रोही घोषित करणे त्यांचा आवाज बंद करण्यासाठी सत्तेचा वापर करून खोटे खटले टाकून त्यांना जेरबंद करणे…असे प्रकार सर्रास चालू आहेत.


जातीय हिंसाचाराने इतका धुमाकुळ घातला आहे की आज विद्यार्थी, कामगार आणि महिला यांना सर्व स्तरावर जातीयतेचा सामना करावा लागत आहे. त्यातून बलात्कार खून आणि mob lynching सारखे प्रकार दररोज कुठेना कुठे घडत आहेत. सत्ता आणि सत्तेच्या दरबारी मुजरा घालणारी पत्रकारिता अशी प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण अशीच काही प्रकरण बाहेर आली की मोर्चे निदर्शने प्रसंगी हिंसा देखील घडली जाते किंवा घडवली जाते. न्यायाची अपेक्षा घेऊन गेलेल्यानाच कोठडीत टाकले जाते.


हक्कांची तर बात न केलेलीच बरी आज मागासवर्गाच्या विकासासाठी येणारा निधी अनेक कारस्थाने करून इतर गोष्टींसाठी वळवला जात आहे. शिष्यवृत्ती बंद केल्या जात आहेत. आरक्षणासारखा आदर्श मार्ग अनेक खोट्या बेबुडाच्या तर्कांवर संपवण्याचा घाट घातला जात आहे. युवकांच्या मनात देशाच्या विकासात आरक्षण हा सर्वात मोठा अडसर आहे असे रुजवले जात आहे. पण त्याखालून जातीयवाद आणखी मजबूत केला जात आहे. 


बाबासाहेबानी सांगितल्या प्रमाणे या सर्व अन्यायकरी आणि विषमतेणें भरलेल्या समाजरचनेत हिंसात्मक क्रांतीची बीजे असतात आणि ही पहिली बाबच लोकशाहीचा पाडाव करायला कशी कारणीभूत ठरते हे बाबासाहेबानी पटवून दिले आहे. 
लोकशाही मोडकळीस आल्यानंतर या देशात जो हिंसाचार माजेल त्याचे खरे लाभार्थी कोण असतील हे वेगळं सांगायला नको त्यामुळे बाबासाहेबानी सांगीतलेल्या या पहिल्या बाबीकडे लक्ष देऊन या विषम आणि अन्यायकारी परिस्थितीला एकजुटीने सामोरे जाण हाच एक उपाय आपल्यासमोर उभा आहे.

भारतीय संविधान सभेमध्ये संविधान स्वीकारताना २६ नोव्हेंबर १९४९ ला बाबासाहेबांनी आपण आज कुठल्या विरोधाभास त प्रवेश करत आहोत हे स्पष्ट केले. ते म्हणतात आज जरी आपण जे संविधान स्वीकारताना राजकीय लोकशाहीचा स्वीकार करत असू तरी ही समाजव्यवस्था मुळात लोकशाहीचा पुरस्कार करत नाही आणि विरोधाभास ह्या देशात आहे. तर बाबसाहेब म्हणतात ह्या देशामध्ये सामाजिक लोकशाही रुजवण गरजेचं आहे.

जात हे वास्तव असणाऱ्या देशामध्ये जो पर्यंत ठराविक ब्राह्मण सवर्ण जातींची संसाधनांवरच मक्तेदारी संपत नाही आणि बहुजन समाजातील जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व तसेच संसाधन मध्ये भागीदारी मिळत नाही तो पर्यंत खरीखुरी सामाजिक लोकशाही देखील प्रस्थापित होणार नाही.

ह्या करिता बहुजन समाजाने सर्वांगीण जातीनिहाय जनगणनेची सर्वप्रथम मागणी करून सुरुवात केली पाहिजे तेच पुढील समाजव्यवस्था सुधार करण्याकरिता सर्वात महत्वाचं पहिलं पाऊल असेल.

आकाश अनित्य


लेखक केंद्र सरकार च्या सेवेत Senior Clerk ह्या पदावर कार्यरत आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*