वाघिणीचे दूध आणि कुलकर्णी

स्वप्नील गायकवाड

शिक्षण का घ्यावं आणि त्याचा तुम्हाला फायदा काय? ही मात्र खूप वेगवेगळ्या उत्तराची प्रश्न आहे . माझ्यासाठी मूलभूत जगण आणि  सन्मानासाठी पेटून उठणं हा प्रवास म्हणजे शिक्षण आहे. माझ्या या प्रवासात बरंच काही घडलं आणि अजून काही बरंच add होईल पण तूर्तास एक गोष्टी इथं लिहावी वाटली. वर जो सन्मानाचा उल्लेख मी केला तो फ़क्त माझा नाही माझ्या कुटुंबाचा पण प्रश्न होता . या सन्मानाची जाणीव आणि गरज माझ्या भीमाच्या दिलेल्या शिक्षणाने निर्माण केली.

साधारण 2 वर्षांपूर्वी माझी आई तिची धुनी भांड्याची कामं उरकून आली. मी माझ्या  कॉलेजच्या नाटकाचं लेखन करत होतो. तेवढ्यात मम्मी म्हणाली ‘अरे तो माझ्या कामावरचा पोरगा नाही का, विजय .त्याला M2 आणि M1 शिकवतो का?’ (हे पहिल्या वर्षाचे engineering चे गणिताचे विषय आहेत .जे प्रचंड अवघड आहेत आणि मी तेव्हा second year ला होतो.) त्याच आधीच M1 back आहे आता परत M2 पण आहे या सेमिस्टरला .जाऊन शिकव त्याला. मी तिला म्हणालो वेळ नाही पण परत तिनं convince केलं आणि मी जाऊ लागलो . पहिल्यांदा मी त्यांच्या घरी जाणार होतो . आपल्या झोपडपट्टीच्या घरातून डायरेक्ट फ्लॅट वाल्या पोराला शिकवायला . आणि माझ्यासाठी ते विषय खूप सोप्पे होते कारण गणित विषय मला आवडतो आणि त्यात मार्क पण चांगले पडतात हे विजय च्या आईला माहीत होतं. मी त्यांच्या उंच इमारतीत 6 व्या मजल्यावर पोहचलो . दारावर भल्या मोठ्या पाटीवर कुलकर्णी नाव अगदी मस्त कोरल होत. त्याच्या आईनं दार उघडलं ती मला ओळखत होती . तिने घरात बोलावलं मला सोफ्यावर बसवलं नंतर विजयला भेटून आम्ही त्याच्या खोलीमध्ये गेलो . ( त्याला सेपरेट खोली होती कारण डिस्टर्ब होऊ नये त्याला अभ्यास करताना म्हणून) आमचा अभ्यास सुरू असताना मधून मधून सारखं काही ना काही खायला येत होतं ज्यूस ,ड्रायफ्रूट इ. शेवटी सगळं उरकून मी वस्तीकडे चालू लागलो . माझ्या डोक्यात फक्त ती सेपरेट रूम आणि ते खाणं चालू होतं . अस एक दोन आठवडे गेलो असेल मी ,आणि त्यानंतर माझा NSS चा कॅम्प होता त्याला गेलो. वापस आल्यावर त्याचा पेपर अजून एक आठवडे लांब होता. म्हणून त्याच्या आईने परत मम्मी कडे मला बोलावणं पाठवलं. मीही तयार झालो पण यावेळेस आईने मला विचारलं की ते तुला कुठं बसवतात तुम्ही कुठं अभ्यास करता? मी म्हंटल सोफ्यावर नंतर त्याच्या रूम मध्ये मम्मी तोंडाकडे बघत राहीली .  मी विचारलं का ग?

मग तिने तिचा अनुभव सांगितला. या विजय च्या आजीनं म्हणजे त्याच्या आईच्या आईने माझी आई त्यांच्या घरी कामाला सुरवातीला जायची तेव्हा तिला सोफ्यावर बसु दिल नाही, पुढं तिच्या लेकीने पण हाच कित्ता गिरवला . माझ्या आईला फक्त काम करायचं आणि जायचं एवढंच. साधा 20 वर्षात चहा नाही दिला कधी . मला प्रचंड राग आला मी तिच्यावरच रागावलो . तुला आधी नाही सांगता येत. म्हणजे एक खालच्या जातीच्या बाईला जी तुमच्या घरात काम करते तिला साधं बसू देत नाही चहा देत नाही का तर तुम्हाला विटाळ होतो आमचा आणि आता मात्र तिचा मुलगा त्यांच्या घरात येतो त्यांच्या मठ्ठ मुलाला शिकवतो . त्याच्यासाठी ना ना ते पदार्थ येतात. तेव्हा चालतं . मी मम्मीला म्हणलो सांग त्यांना माझ्या ज्ञानाचा पण विटाळ होईल म्हणून मी येत नाही आता..

नंतर काही दिवसांनी माझ्या आईने कुलकर्णी च काम सोडलं .पण ती बाकी ज्यांच्याकडे काम करते ते सगळं बामन आणि बामनवादी. वरच्या प्रसंगावरून माझ्या आईने पण धडा घेतला आता असा अपमान कुठं झाला तर ती तिथेच त्यांना धडा शिकवते. मलापण ते लोकं शेवटी काम होत म्हणून, नाहीतर त्यांच्यासाठी मी नोकर म्हणूनच आवडलो असतो. माझं शिक्षण बुद्दीमत्ता ही त्यांच्यासाठी खुपणारी गोष्ट. तेव्हापासून ठरवलं सन्मान महत्वाचा, उत्तम शिक्षण महत्वाचं . पुढं विजयच्या आईनं फोन केला “हवं तर पैसे घे पण विजय चा अभ्यास घे, त्याचा यावेळेस विषय निघाला नाही तर वर्ष वाया जाईल.”  मी फक्त एवढंच बोललो ” तुमच्या सोफ्याला सांगा तो घेईल चांगला अभ्यास” आणि फोन ठेवला. माझ्यासाठी ती लढाई होती, ती मी आणि आईनं जिंकली, अजून मोठं युद्ध आहे आजच्या काळात अश्या बामनवादी विचारला हरवण्यासाठी. त्यासाठी आमच्याकडे ते शिक्षण-वाघीणीच दूध आहे .

स्वप्नील गायकवाड

लेखक Mechanical Engineering चे पदवीधर असून माध्यम आणि कला श्रेत्रात उच्च शिक्षणाची तयारी करत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*