हा लढा इंडिया विरुद्ध भारत नसून ब्राह्मण – सवर्णांचा भारत विरुद्ध एससी-एसटी-ओबीसी यांचा भारत असा आहे

राहुल पगारे

आज प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस. आजच्या दिवशी बाकी काही घडो ना घडो पण दिल्लीत तीन्ही सुरक्षा दलांची शक्ती प्रदर्शन होतील. शस्त्र,अस्र व सैन्यांची अतुल्य शिस्त दाखवली जाईल. परकीयांना आक्रमणाचा इशारा व भारतीयांना सुरक्षित असल्याचा संदेश या परेड मधून द्यायचं असतं. सुरक्षित ? आणि आम्ही ? हे हास्यास्पद आहे.

असा भारताचा एक ही दिवस नाही ज्या दिवशी दलित आदिवासी जातीच्या कारणाने मारला जात नाही किंवा त्यांची अब्रु लुटली जात नाही. जल, जमीन, जंगल हिरावून घेणारे पाकिस्तानी चीनी नाहीत आमचेच सरकार असते. मग हा प्रजासत्ताक दिनी हा शौर्याचा डामडौल कशासाठी ? हाथरस घटनेत पिडीत मुलीला, व तिच्या परिवाराला खरंच हा शक्ती प्रदर्शन सुरक्षित करत असेल काय ? जातीयवादी हल्ल्यातले कित्येक खटले भारताच्या विविध न्यायालयात कित्येक वर्षांपासून खितपत पडले. चुकुन कोर्टाचा निकाल दलित आदिवासी यांच्या बाजुने लागला तरी बदला म्हणुन त्यांच्या घरात जाऊन तुकडे करणारी घटना तर नुकतीच मागच्या वर्षी बीड मधे घडली होती. आमच्या साठी कोणती परेड असेल जी आम्हाला सुरक्षित भासवील ?

भारत माझा देश आहे पण माझा देश जातीच्या उतरंडीनुसार नागरी तत्वांची विभागणी करतो. इथली दरी ही भारत व इंडिया अशी नाही, तर ही दरी ब्राह्मण सवर्ण भारत विरूद्ध दलित- आदिवासी- ओबीसी- इतर अल्पसंख्याक भारत असा आहे.

आपल्याला आपल्या caste location वरून अटेंशन केलं जातं. फडकणाऱ्या त्या राष्ट्रीय ध्वजाला आमचं सामाजिक स्थान व आमचा ऐतिहासिक सामाजिक व स्वतंत्र लढा माहीत तर सोडा मान्य देखील नसेल. या राष्ट्र उभारणीत आमच्या पुर्वजाचं योगदान त्याला मान्य नसणार. भारत माझा देश आहे हे कल्पित विधान वाटतं, वाटत राहील जोपर्यंत समान प्रतिनिधित्व, सामाजिक लोकशाही अस्तित्वात येत नाही. जोपर्यंत सत्तेत येत नाही व जोपर्यंत आमची भाषा, स्थानिक संस्कृती, खानपान व्यवहाराला सन्मानाने बघितले जाणार नाही. आणि जोपर्यंत आमच्या मताला राष्ट्रीय निर्णयात स्थान येणार नाही तोपर्यंत. नाही तर ब्राह्मण सवर्णांनी ब्राह्मण सवर्णांद्वारे ब्राह्मण सवर्णासाठी चालवलेली व्यवस्थेत आम्हाला काडीचा इंटरेस्ट नसणार.

प्रजासत्ताक दिन साजरा करायचा असेल तर तिन्ही सैन्य दलाच्या परेडाऐवजी सोशल आॅडिट जाहीर करावा. ज्यात जातीयवादी घटना किती होत्या व कितीने कमी करण्यात यश आले ?, सामाजिक राजकीय प्रक्रियेत दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक व स्त्रियांना किती प्रतिनिधित्वाच्या समान संधी मिळाल्या ? अट्रोसिटी प्रकरणात न्यायलयिन प्रक्रिया किती कार्यशील झाली ? रोजगार व उत्पन्न कितीने वाढले ? रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधे काय प्रगती झाली ?, किती भारतीयांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाली ? पाणी वीज शिक्षण किती मुबलक वितरीत झाले ? स्री सुरक्षा व शिक्षण किती पटीने वाढलीय ? शेती, स्वयंरोजगार समस्या अडचणी व काय त्यावर मात केली ? इत्यादी सामाजिक राजकीय आर्थिक प्रगतीच्या विविध घटकाचा लेखाजोखा नियत साफ ठेऊन मांडला तर राष्ट्रीय भावना सगळ्यांच्या जोडल्या जातील व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जगातलं सर्वात मोठं शक्ती प्रदर्शन तर हेच ठरेल !!. तसंही आतापर्यंत कधीही इतरावर आक्रमण न केलेला व बुद्धाचा देश अशी ओळख सांगत फिरणाऱ्या देशाला शस्र अस्रासहित सैन्य दलाची परेड कुठेच कुठल्याच तर्कात बसत नाही.

राहुल पगारे

लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*