माणसांचा कोळसा…

प्रकाश रणसिंग

महाड मधे उतरल्याबरोबर उन्हाने डोक्यावर थयथयाट मांडला होता. महाड च्या एका कार्यकर्त्याला घेऊन महाड मधील एका कातकरी वस्तीवर भाषेच्या अभ्यासासाठी भेट द्यायची होती. कार्यकर्ता उत्साही होता. त्यानं झपदिशी गाडीची सोय केली. महाडपासून एक तीस-चाळीस किलोमीटर सणाऱ्या गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. रस्ता जेमतेम होता. खाण्यासाठी काही फळे सोबत घेतली होती. मधली चार पाच रस्त्यावरची गावे मागे टाकली. गावं संपली की जंगल सुरु व्हयाचं. काही जंगल काही ओसाड माणसांचा प्रदेश असं करत करत मुख्य गावात पोहचलो. गाव मुस्लिम बहुल होतं. चौकात उर्दु माध्यमाची शाळा होती. शाळेसमोरच्या झाडाखाली आम्ही थांबलो होतो. आम्हाला कातकरी वस्तीचा पत्ता विचारायचा होता. रस्त्याने एक म्हातारा आपल्या शेळ्या रानात घेऊन निघाला होता.
मी थोडं पुढे झालो नि विचारलं, ”गाव मे कातकरी लोग किधर रहते हैं ,उनकी वस्ती किधर हैं?”
म्हातारा घोगऱ्या आवाजात मराठीत उत्तरला, “कातकऱ्याची वस्ती त्या डोंगरच्या शेजारी, तुम्ही परत मागे जा, मागच्या फाट्यापासुन वरती जा.. “
म्हाताऱ्याने सांगितल्या प्रमाणे परत मागे गेलो. फाट्यापासून वरती जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने वर चढत गेलो. वस्तीत येऊन थांबलो. मोजून सहासात घरं. घरं कुडाची, मातीची, कौलं किंवा गवताने शेकारलेली. काही घरांच्या समोर सागाच्या पानाची गळकी सावली केलेली. वस्तीच्या मध्यभागी गाडी थांबवली. गाडीतुन उतरायची हिम्मत होयना. वस्तीत शुकशुकाट होता. माणसं असण्याच्या खुना होत्या. पण माणसं दिसत नव्हती. गाडीतून आम्ही खाली उतरलो. एका घराच्या चांदीला चारपाच बाया एकमेकीच्या केसांत बघत होत्या, त्यांचं काम चालु होतं. मला बघताच सगळ्याच एकदम उठून झपकन घरात घुसल्या. त्यांना काही सांगायच्या आत सगळ्या गायब झाल्या. दुसऱ्या घरात डोकावलो तर एक साठ सत्तर वर्षांचा म्हातारा उंबऱ्याला डोकं ठेउन उघडाच पडलेला होता. चार पाच उघडी मुलं त्याच्या अवतीभवती खेळत होती. ते दार ओलांडुन पलीकडच्या घरात जाणार तोच एक चाळीस-पन्नास वर्षांचा हाप चड्डी, बंडी आणि डोक्याला एक पटकुर बांधलेला माणूस पुढे आला. ह्यो निघून जायच्या आत मी त्याच्याशी बोलणं सुरु केलं

मी- आम्हाला तुमच्या भाषेचा अभ्यास करायचाय. तुम्ही बोलता कस ते बघायचय. तुम्ही इकडे कोणती भाषा वापरता ते जाणून घ्यायचय. त्याने बराच वेळ तोंडात धरून ठेवलेली तंबाखू थुंकली आणि म्हणाला
आम्ही काथोडी बोलतो.

मी – हो मग तीच जाणुन घ्यायची आहे.
तो – आम्हला काही मिळनार का त्या बदल्यात..
मी – ……..
आपण या ठिकाणी बसुया का….

दारातल्या सागाच्या पानाने घातलेल्या गळक्या सावलीत बसलो. तो माझ्या समोर दोन पायावर बसला होता. मी प्रश्न विचारायला सुरवात केली.

मी – तुमचा पत्ता सांगा –
तो- पत्ता….म्हाइत नाही.भट्टी वर असतोय आर्ध साल
मी – काय काम करता?
तो- मजुरी
मी – शाळा शिकलात का?
तो – शाळा… न्हाई
मी – भट्टी वर काय काय करता, कसं असतं काम.
तो – गाळ करायचा…भट्टी लावायची ………

मी त्याच्या भाषेतल्या क्रियापदावर लक्ष ठेऊन होतो त्याच्या भाषेतील नामाचा व क्रियापदाचा संबंध बघायचा होता. तो त्याच्या भाषेत भविष्यकाळ भूतकाळ कसा वापरतोय हे मला आभ्यासायचं होतं. त्याच्या भुतकाळ त्याचा भविष्य काळ या बद्दल मला काहीच घेणंदेणं नव्हतं. म्हणून मी त्याला मधीच थांबवलं आणि व्हिडिओ दाखवण्यासाठी आणि चित्रवर्णन करण्यासाठी जवळ असलेला लॅपटॉप बाहेर काढला तोच तो थोडा मागे सरला अन ताडकान उठला डोक्यावरचं पटकुर बांधलं आणि निघून गेला. काहीच समजलं नव्हतं..

मी तसाच थांबलो.त्या गळक्या सावलीच्या मेढीला पाठ टेकुन बसुन राहिलो. मला तो वस्ती उठलेली सांगत होता…..जंगल पेटलेलं सांगत होता…….जंगल संपलेलं सांगत होता……कोळसा भट्टी सांगत होता……स्थलांतर सांगत होता…..जन्म सांगत होता, मृत्यू सांगत होता…..

मी सगळं आवरुन ठेवलं होतं. तोच सोबत असणाऱ्या सहकार्यानी समोरच्या घरातून आवाज दिला चहा घेणार का? मी समोर बघितलं घराच्या कुडातुन धूर बाहेर येत होता. चहा तयार होत होता. मी हो म्हणून सांगितलं सोबतची सॅक उचलली आणि त्या धूर बाहेर येणाऱ्या घराच्या दिशेने निघालो.

दाराच्या डाव्या बाजुला काटक्यांची भिंत केलेली होती. भिंतीला खेटूनच चुलीवर चहा ठेवलेला होता. दारात बसायला चारपायाची बाज ठेवलेली होती. बाज रंगबेरंगी कापडाच्या दोऱ्यानी विणलेली होती. काहीना जोड दिलेली होती तर काही दोऱ्याना जोड द्यायची बाकी आहे असं दिसत होतं. बाजेवर बसलो. कपाचा आवाज आल्यावर चहा तयार झालाय याची खात्री झाली होती. काही वेळातच एक पस्तीशीतली बाई हातात चहाचे कप घेउन आली. तिच्या कड्यावर दोन वर्षांची टपोऱ्या डोळ्यांची मुलगी होती. चहा पिऊन झाला होता. त्या मुलीचं नाव विचारलं. तेव्हा ती बाई म्हणाली ही माझ्या भावाची पोरगी ही दोन महिन्याची होती तेव्हा तिची आई मेली औषध खाऊन. सगळे कामाला गेलेले होते. हिच्या आईकडून गोठा झाडताना ही पोरगी खाली पडली. पोरगीनं बराच वेळ डोळं उघडले नाही, तिला वाटलं पोरगी मेली. घरात येऊन विषारी औषध घेऊन आई मरून गेली आणि बेशुद्ध झालेली ही पोरगी उठली.

हे ऐकून शरीरातलं रक्त थांबलं होतं. सगळं स्तब्ध झालं होतं. मेंदूच्या सूक्ष्म भागापर्यंत झिनझिन्या आल्या होत्या.दोष कुणाचा होता. हातातला चहाचा कप बाजेच्या एका कोपऱ्यावर ठेवून चालता झालो.

चढलेला उतार उतरत असताना कातकऱ्यानं सांगितलेलेली कोळश्याची भट्टी आठवत होती.
“लाकडे त्रिकोणी आकारने रचावी लागतात. त्याच्या बाहेरील बाजूस पाला व मातीने लिपून घ्यावी लागते आणि आग सतत धुमसत ठेवावी लागते. लाकडे पूर्ण जळून पण द्यायची नसतात कारण त्यातली उष्मांकता शिल्लक ठेवून कोळसा तयार करायचा असतो.

कातकरी वस्ती त्या भट्टीप्रमाणं वाटत होती. कुणी पेटवली असंल ती माणसांची भट्टी आणि कुणाला पाहिजे असंल ह्या माणसांचा कोळसा…..

प्रकाश रणसिंग

लेखक विद्रोही संघटनेचे राज्य निमंत्रक असून District Magistrate Fellowship अंतर्गत तोरणमाळ येथे कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*