कसला इतिहास? कसले नायक?

सागर अ. कांबळे

भारताचा इतिहास, त्यातही आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं की काय आठवतं? ब्रिटिशांनी भारत कसा काबीज केला… ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरोधात लढा देवून भारताने कसे स्वातंत्र्य मिळवले.

लोकस्मृतीमध्ये दोन गोष्टी साठवल्या गेल्या. लोकस्मृतीपेक्षा शिक्षण- सांस्कृतिक धोरणातून राज्याने (सत्ताधारी वर्गाने) लोकांची घडवलेली सार्वजनिक स्मृती असेही म्हणता येईल. त्या दोन गोष्टी होत्या : भारत स्वातंत्र्य झाला, आपण ब्रिटीशांशी लढून स्वातंत्र्य मिळवले ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे, कॉंग्रेसने भारत देश स्वातंत्र्य केला. दोन्ही गोष्टी अर्थातच सत्य आहेत. पण त्या ‘निरपेक्ष सत्य’ आहेत का? किंवा एखादी गोष्ट सत्य असते, तर ती सत्य म्हणून स्वीकारले पाहिजे म्हणजे नेमके काय?

भारत स्वतंत्र झाला म्हणजे काय झालं असं इथल्या सामान्य लोकांना वाटलं असेल? तर भारत जिंकला असं वाटलं. भारत ब्रिटीशांविरोधात जिंकला. का जिंकला? तर सत्यमेव जयते!…. पुराणकथांमधून, धर्म समजुतींतून लोकांची ही ठाम समज झाली आहे की नेहमी सत्याचाच विजय होतो. उदाहरणार्थ, रामाचा विजय (?)                          

महायुद्धे, ब्रिटनची आर्थिक डबघाई, संयुक्त राष्ट्र संघटना, ‘लोकशाही’ तत्वाचा दबाव, ब्रिटनमधील मजूर पक्षाचे धोरण या गोष्टी सामान्य भारतीयांना फार उमगल्या होत्या असे म्हणता येणार नाही. यातून भारतीय लोकांच्या, स्वातंत्र्यसैनिकांच्या लढाऊ वृत्तीला नाकारलं जातंय असं अजिबात नाही. ‘कर्मवाद’ हाच लढणाऱ्या भारतीयांचे प्रेरणास्थान होता. शिवाय पुराणाचे निकष लावायचे म्हटले तर, ब्रिटिश हे भारतीयांचे शोषक होते, छळ करणारे होते, पीडणारे होते हे सत्यच. आपण पांडव आणि ते कौरव, आपण राम ते रावण अशी विभागणी सुलभच झाली.

पुराणाच्या प्रभावातून, धर्माच्या गारुडातून तयार झालेली अशी दृष्टी एखाद्य समुदायाला बाह्य शत्रूविरोधात लढायला कायमच मदतगीर होत असते. पण काळाच्य ओघात तिच्या मर्यादाही उघड्या पडतात. शत्रू, राक्षस, शोषक असलेले ब्रिटिश निघून गेले. आता पुढे काय? त्यांची जाण्याने या प्रदेशातली सगळी दुरावस्था संपली काय? अशा अवस्थेसाठी आपण किती काळ, वर्ष भूतकाळातील शत्रूला जबाबदार धरणे योग्य, साहजिक मानता येईल? मग शिल्लक असलेल्या पीडनाची, दुःखाची, शोषणाची जबाबदारी कुणाची? ब्रिटिश निघून गेल्यांनतर शत्रू, दुष्ट, अन्यायी कुणाला म्हणायचं? याचं उत्तर देव-राक्षस अशा बायनरीवाल्या पौराणिक मानसिकतेने देता येणार नाही. या बायनरीत आदिवासी, अस्पृश्य, मागास जाती, स्त्रिया यांच्या पीडनाला कसं बसवायचं? ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षादरम्यान हे प्रश्न मागे राहिले होते. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे प्रश्न अग्रक्रमाने सुटले पाहिजेत ही अपेक्षा होती. पण हे प्रश्न सोडवणार कोण? ज्यांच्याकडून हे प्रश्न सोडवण्याची अपेक्षा होती, किंवा आहे (ज्यांनी ब्रिटीशांकडून सत्ता संपादन केली), त्यांच्याकडे काय उपाययोजना आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी? इथं आपण आधुनिक भारताच्या इतिहासाविषयीच्या लोकस्मृतीतील दुसऱ्या गोष्टीकडे आलो आहोत.

दुसरी लोकस्मृती आहे कॉंग्रेसबद्दलची. इथं, ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्याच्या लढ्याला महत्व देणारा व त्यापुढे धर्म-सामाजिक सुधारणा गौण मानणारा गट या अर्थाने कॉंग्रेस हा शब्द वापरला आहे. तर, दुसरी लोकस्मृती (राज्याच्या शिक्षण-सामाजिक धोरणातून तयार झालेली स्मृती) म्हणजे, गांधी, टिळक, पटेल, नेहरू, बोस, सावरकर, लाला लाजपत राय, मंगल पांडे हे भारताचे महानायक आहेत. या उल्लेख केलेल्या व्यक्ती ‘नायक नाहीत का’ हा मुद्दा नाही. त्या आहेत. मात्र, स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांना महानायकत्व देताना आपोआप (किंवा शिक्षण-सांस्कृतिक धोरणातून) धार्मिक, सामाजिक सुधारणा लढ्यातील नायक (फुले, आंबेडकर) दुर्लक्षिले गेले.  (NCERT 11 च्या पुस्तकाचं उदाहरण शेवटी*)                                                    

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशात जे पीडन, शोषण शिल्लक राहीले होते, जे ब्रिटिश येण्याच्या कितीतरी आधीपासूनचे आहे, त्याच्या निरोधासाठी सर्वाधिक गरज होती ती म्हणजे धार्मिक, सामाजिक चळवळीतून निर्माण झालेल्या नरेटिव्हची, त्या विचारांची. पण हे नरेटिव्ह भारतीय राज्याच्या, सत्ताधारी कॉंग्रेसच्या मुख्य धोरणाचा, वाटचालीचा भाग कधी होऊ शकले नाही. राज्यव्यवस्था सामाजिक परिवर्तनाच्या जबाबदारीपासून लांब राहिलीच, पण नागरी समाजही (किंवा शिक्षित वर्ग) याच राज्याच्या/कॉंग्रेसच्या सांस्कृतिक धोरणातून घडला असल्याने त्यालाही सामाजिक परिवर्तनाची लढाई तितकीशी आपली वाटली नाही. [राज्य व नागरी समाज या जोरकस शक्तींशिवायही सामाजिक परिवर्तनाच्या लढाया सुरूच राहिल्या.]

स्वातंत्र्यलढाच महत्वाचा आणि सामाजिक सुधारणा चळवळी तितक्या महत्वाच्या नाहीत, असं जे नरेटिव्ह तयार झालं त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या काळात मुलभूत सामाजिक प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी समग्र लोकरेटा तयार झाला नाही. [उलट प्रतिगामी अजेंडे रेटणारे लोकरेटे तयार झाले, होत आहेत.] ब्रिटिशांनाच शत्रू, राक्षस मानणारी पुराणदृष्टी देशी शोषकांना अभय देणारी ठरली. आणि भारतीय समाजानेही जातीसमस्या, स्त्री-दास्य, दारिद्र्य याबाबत आत्मपरीक्षण केले नाही की स्वत: कडे बोट दाखवले नाही.

सागर अ. कांबळे

लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.

*11 वी राज्यशास्त्र NCERT पुस्तकात भारतीय संविधानाचा ऐतिहासिक वारसा सांगताना केवळ स्वातंत्र्यचळवळीचा उल्लेख केला आहे किंवा मग सामाजिक लढ्याला ‘राष्ट्रीय चळवळ’ या नावाखाली चतुराईने घुसवले आहे. फुलें, पेरियार, आंबेडकर यांची ब्राह्मणवादाविरोधातील समतेची चळवळ कुठल्याच शालेय पुस्तकात नीट शिकवलेली नाही.

*’MAHAD : The March That’s Launched Every Day’ या पुस्तकात Bojja Tharakam यांनी हे राजकारण अतिशय पद्धतशीरपणे समजावून सांगितलं आहे, त्यातील फक्त एक वाक्य – “The Dandi march had a beginning and an end. The Mahad march had only a beginning.”मानवी इतिहासातला इतका मोठा सत्याग्रह, त्याला आपल्या इतिहासाच्या पुस्तकात आणि शिक्षणात काय स्थान आहे?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*