हा आमच्या पोराला नाद आहे कोटवाल्या माणसाचा!

प्रकाश रणसिंग

तसं आमच्या घरात कोणी चळवळ केली नाही. चळवळ,समाज सुधारक , वैचारिक प्रवाह आणि जातीसंस्था, विषमता हे सगळं बाहेरून ऐकलं, वाचलं, समजलं. बाबासाहेब सुद्धा सुरवातीला शाळेच्या भिंतीवर बघितलेले. नंतर चळवळीतुन जास्त समजले. नंतर वाचत गेलो आणि बाबासाहेब डोक्यात फिट्ट झाले.

एक दिवस घरातले देव काढले आणि त्या फोटोच्या फ्रेम मध्ये बाबासाहेब आणि बुध्दाचा फोटो लावून दिले. आमचे वडील म्हणाले हे काय करतोस?
आमची आई म्हणली करुद्या त्याला, शिकतोय तो. आत्ता त्याच्या पद्धतीनं चालायचं. आईला बाबासाहेब आणि बुध्दाची ओळख करून देऊन फोटो भिंतीवर लावून दिले.आत्ता कुणी विचारलं की आई म्हणते त्या कोटवाल्या माणसाने आमच्यासाठी शिक्षण काढलं. आमच्या पोराला नाद आहे त्याचा.

मागच्या निवडणूकीच्या वेळेस कोणत्या तरी पक्षाचे कार्यकर्ते मतदान मागायाला आलेले. बाबासाहेबांचा फोटो बघून दारातून घरात येऊन बसले म्हणले हे तर आपलंच घर आहे. मतदान फिक्स झालं इथं आपलं.

एकदा आमचा चुलता आलेला बाबासाहेबाचा फोटो बघून म्हनला “हे असं आपल्यात नाही चालत बर का..! आपण काय ” ते ” आहोत का?

हे झालं घरातल्या बाबासाहेबाच्या फोटोबद्दल.

आता बाबासाहेबाचा फोटो मोबाईल च्या स्क्रिन वर असतो.चार चौघात एखादी चर्चा चालली असते मग काही कामानिमित्त सहज फोन वर काढला की फोटो दिसतो मग चर्चेचा सुर बदलतो. विषय बदलतो. लय गडबड होते मग एखाद्याची. असं बऱ्याचदा झालं मग कळालं नेमकं कळ कुठाय ते.

असंच एका स्वतःला आधुनिक, उत्तर आधुनिक समजनाऱ्या मुलीच्या आईनं, म्हणजे आई पण पूर्वी शासकीय सेवेत होती बरं का! माझ्या मोबाईल वर बाबासाहेबाचा स्क्रीनवरचा फोटो बघून तिनं पोरीला विचारलं अग्ग तो तर ” त्यांचा” नाही ना, मग त्याच्या मोबाईल वर आंबेडकर चा फोटो का? मग पोरीनं उत्तर दिलं तो” त्यांचा ” नाही पण तो फोल्लो करतो आंबेडकरांच्या विचारांना.

हे “त्यांचा” “ते ” इंडीकेटरस कसे फिक्स झालेत ना. शिकलेले लोकं तर या बाबत भयानक हुशार असतात. “ते ” लक्षात नाही आलं की डोळ्याचे, हाताचे, वाईट हावभाव करतात. आपल्याला कळत असतंय पण आपण नुसती मज्जा घ्यायची पार दमछाक होते आणि मग कंटाळून विचारतात आहो तसं नाही म्हणजे तुम्ही जयभीम वाले आहेत का? आमची आई शिकलीच नाही, पण कुणाला अभिमानाने सांगते हा आमच्या पोराला नाद आहे कोटवाल्या माणसाचा. किती वेळा घर पडलं असेल तिनं कधीच बाबासाहेबाचा फोटो बाहेर टाकला नाही की परकं समजलं नाही. परत परत मी नसताना फोटो लावत गेली जागच्या जागी . ही खूप मोठी घटना आहे माझ्यासाठी.

परवा एका फ़ॉरेस्ट ऑफिसर ला भेटलो त्याची चार दिवसापूर्वी पण भेट झालेली. त्याने विचारलं सर तुमचं आडनाव काय. मी म्हंटल रणसिंग, थोडा थांबून कदाचित अंदाज लावून झाल्यानंतर विचारलं “तुम्ही बौद्ध ना?
मी काही उत्तर न देता , चला चहा घेऊ म्हणलं. त्यानंतर न राहून त्यानं पुन्हा विचारलं ते असं की मी तुमच्या मोबाईल च्या स्क्रीन वर बाबासाहेबाचा फोटो पाहिलेला. मला वाटलं तुम्ही बौद्ध आहात. मी पण बौद्ध आहे म्हणून विचारलं.

एकदा चौकात एका मित्रा ला जयभिम घातला. दुसऱ्या दिवशी पुढारी आमच्या वडिलांकडे आले म्हणे पोरगं जयभिम म्हणतंय लक्ष द्या जरा. आत्ता यात पार आख्या गावाचा मुद्दा झाला.एकदा गावात बळीमोहस्तवाला वामन दहन केलं.त्यात भाषन केलं. दुसऱ्या दिवशी सरंजामी पुढारी वडीलाना म्हणले ते तुझं पोरगं देव मानत नाही तु का डोक्याला टिळा लावतोय? पोराला समजावून सांग नाहीतर गावात काम करून देणार नाही.हा किस्सा आहे आधुनिक भारतातला.ज्या व्यवस्थेला बोलल्यालं सुद्धा सहन होत नाही.तिथं बाबासाहेबाचा फोटो लय टोचतो.

कसला भारीय ना.. बाबासाहेब लय खतरनाक आहे.

नुसता फोटो न जयभिम हे वाक्य इतकं हादरुन सोडतं ना काय सांगु..पूर्ण व्यवस्था एका वाक्यात पलटी होते .बरं एखाद्या नॉन बौद्ध, महारेत्तर माणसानं हे वाक्य म्हटलंच की झालं बाकीच्या सवर्ण,मध्यमवर्ग, सरंजामी जातीय व्यवस्था लगेच कामाला लागते. लगेच चर्चा गाजतात ते व्हय” ते जय भीम च्या नादाला लागलय, वाया गेलंय”. असं काही. नुसते बाकीचे लोकच नाही तर नातेवाईक पण लगेच दबाव टाकायाला सुरवात करतात.

जाऊद्या आपल्याला काय त्याचं..

प्रत्येक 14 एप्रिल ला आई मला फोन करून सांगते . त्या कोटवाल्या आणि डोळे झाकलेल्या माणसाला फुलं आणि हार घातलेत बरं !

प्रकाश रणसिंग

लेखक विद्रोही संघटनेचे राज्य निमंत्रक असून District Magistrate Fellowship अंतर्गत तोरणमाळ येथे कार्यरत आहेत.

5 Comments

Leave a Reply to Sandip Cancel reply

Your email address will not be published.


*