महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे, चैत्य स्तूपांचे संवर्धन आणि संरक्षण ही बहुजनांची जबाबदारी

ॲड विशाल शाम वाघमारे

महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे, चैत्य स्तूपांचे संवर्धन आणि संरक्षण करणे हे महाराष्ट्रातील SC ST OBC समूहातील जनतेचे आद्य कर्तव्य आहे.

वरील शीर्षक म्हणजे बामनवाद्यांच्या डोक्यात शिरशिरी आणणारे आहे, त्याची अनेक कारणे आहेत, येथील SC ST OBC समूहातील जनतेचा मूळचा धर्म हा बौद्ध धम्मच आहे. इथला समृद्ध बौद्ध वारसा हा बौद्ध धर्माचा असूनही त्यांनी म्हणजेच विषमतावादी लोकांनी कावेबाजपणे इथल्या SC ST OBC मधील लोकांना मुद्दामहून पूर्णपणे planning ने कटकारस्थान करून त्यांच्या मूळ धर्म आणि संस्कृतीपासून दूर ठेवले.

सह्याद्री पर्वतरांगा आणि महाराष्ट्र पुरते बोलायचे झाले तरी सह्याद्रीच्या कोणाकपाऱ्यात प्रत्येक ठिकाणी शोधाल तर तुम्हाला लेण्या पाहायला मिळतील, महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास हा मुळात बौद्ध संस्कृतीचा इतिहास आहे हे आपणाला समजेल. ही संस्कृती आज आपल्याला जपावी लागेल, त्यासाठी लेणी संवर्धन महत्त्वाचे आहे, त्यासाठी आपणा प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीला तनमनधन देऊन काम करावे लागेल. महाराष्ट्र हे मुख्य व्यापारी केंद्र होते, याचे सर्व श्रेय येथील बौद्ध राजांना, त्यांच्या व्यापारी योजना, त्यांचे भव्य काम याला जाते, याचे पुरावे लेण्यांवर आणि इतर ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या शिलालेखांमुळे मिळते, इथल्या सर्व जनतेचा मूळचा धर्म हा बौद्ध धम्म आहे याचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, आपल्याला SC ST OBC समूहाला या कामाकरिता उद्युक्त करावे लागेल, त्यांना प्रेमाने, आपुलकीने त्यांच्या मूळ धर्माची आठवण करून द्यावी लागेल, जाणिवा निर्माण कराव्या लागतील, आजच्या सर्व बौद्धांचे हे आद्य कर्तव्य आहे. सह्याद्री पर्वतरांगा या सर्व इतिहासाच्या साक्षीदार आहेत. महाराष्ट्रातील सर्वच पर्वतरांगा मध्ये लेणी पाहायला मिळते, ते ही महाराष्ट्राच्या सहा ही भौगोलिक भागांमध्ये. 

आपल्याला या सांस्कृतिक वारसा संबंधी कमालीची आस्था, श्रद्धा असायला हवी. कारण श्रद्धेनेच हा धर्म एके काळी फळत फुलत होता, इथल्या राजे, महाराजांनी या धर्माला अगदी राजाश्रय दिला. या भारतातील बौद्ध राजवट असणारा काळ हाच सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातोय, हा वारसा आज अत्यंत हलाखीच्या अवस्थेत आहे, त्याला जपणे हे खूप गरजेचे आहे. हा वारसा अतिशय समृद्ध आहे त्याविषयी आपल्या मनात नितांत आदर असायला हवा, याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगावासा वाटतोय तो असा,

‘१९२७ साली चवदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर डॉ. आंबेडकरांनी महाड शहराजवळील बौद्ध लेणी पाहिली. तेथे बौद्धकालीन बांधलेली जी आसने होती त्यावर बसण्यास त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मनाई केलेली होती. या आसनांवर तत्कालीन बौद्ध भिक्षु बसलेले होते. ‘आपण त्यावर बसून त्यांचे पावित्र्य नष्ट करू नये’ असे त्यांनी सहकाऱ्यांना बजावले. बुद्ध धर्माबद्दल त्यांचा आदर या घटनेतून प्रतिबिंबित होतो’

या सदीचा, संपूर्ण युगाचा महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध वारसा, लेणी, ऐतिहासिक बौद्ध स्थळे यांविषयी इतका प्रचंड आदर दर्शवतात तर आपण तर त्यांचे अनुयायी आहोत, बाबासाहेब यांचे पुत्र म्हणवून घेतो मग आपण स्वता तर किती मनापासून आदरयुक्त भावनेने हा वारसा, संवर्धित आणि संरक्षित करायला हवा, हे प्रत्येकाने समजून घेऊन, प्रत्यक्ष कृती कार्यक्रम हाती घ्यायला हवा. 

महाराष्ट्राचा सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक वारसा सांभाळणाऱ्या सह्याद्रीवर अशीच एक नवलाई पाहायला मिळते. ही नवलाई म्हणजे लेणी! सह्याद्रीच्या काळ्याकभिन्न पत्थरात माणसाच्या हातून निर्मिली गेलेली सुंदर कलाकृती म्हणजे या लेणी. अगदी निसर्गानेही या निर्मितीचे कौतुक करावे अशीच.

सह्याद्रीत अशा लेणी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. या लेण्यांच्या निर्मितीचा इतिहासही मोठा रंजक आढळतो. बहुतेक लेणी या प्राचीन घाटवाटांवर खोदलेल्या आढळतात. महाराष्ट्राचे सह्याद्रीमुळे प्रामुख्याने दोन भौगोलिक भाग पडतात. एक म्हणजे कोकण आणि दुसरा देश म्हणजेच घाटमाथ्यावरील सर्व भाग. प्राचीन काळी या दोन भागांमधूनच दळणवळण आणि व्यापार चालत असे. अनेक राजसत्तांचे व्यापारी मार्ग या सह्याद्रीच्या पोटातूनच जास असे. परंतु हा मार्ग आणि प्रवास म्हणावा तसा सोपा नसे. सह्याद्रीची आडवी प्रचंड भिंतीची चढाई, किर्रर्र जंगल, वाटमारीचे भय, भरपूर पाऊस यामुळे या प्रवासात आश्रयाची किंवा विश्रांतीच्या ठिकाणांची गरज या लेणींच्या निर्मितीने पूर्ण झाली. कालांतराने या लेणींमध्ये उपासनेचेही व्यवस्था निर्माण करण्यात आली. या लेणी निर्माण करण्यात जसा कलावंतांचा हात होता तसाच तो राजसत्तेचाही होता. विविध राजसत्तांनी त्यांच्या प्रमुख दळणवळणाच्या मार्गावरच या लेणी निर्मिल्या.

आज आधुनिक काळात हा वारसा जपणे हे आव्हान आपण स्वीकारलेच पाहिजे. काळाच्या ओघात भलेही या लेणींचे महत्त्व आपल्या दृष्टीने कमी असेल, पण या साऱ्या कलाकृती म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवाच आहे. तो आपण जपला पाहिजे. भारतामध्ये जवळपास १४०० हुन अधिक लेण्या आहेत. यातील जवळपास बहुसंख्य लेण्या या बौद्ध लेण्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व लेण्या या बौद्ध लेण्या आहेत, लेणी बांधण्याच्या काळानंतर त्यावर इतर संस्कृतीच्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे, आजही तुम्ही ते पाहू शकता, या अतिक्रमण विरोधात आपण सर्वांनी मिळून एकसूत्री कार्यक्रम हाती घ्यायला हवा. पुरातत्व खाते, इतर सरकारी यंत्रणा यांच्याशी पत्रव्यवहार, आंदोलने करून पाठपुरावा करायला हवा, वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढावी लागली तरी आम्ही त्यास तयार आहोत, मी स्वता आणि माझे सहकारी आम्ही जर या मंगल कामासाठी न्यायालयात लढा द्यावा लागला तर एक वकील म्हणून यासाठी नक्किच लढू अशी ग्वाही देतो. लेण्यांवर भिक्खू संघाच्या परिषदा, बौद्ध धम्माच्या परिषदा, उपोसथ व्हायला हवेत यासाठी उपासक उपासिका यांनी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक पौर्णिमा, बौद्ध संस्कृतीचे सण उत्सव हे बौद्ध लेण्यांवर साजरे व्हायला हवेत. लहान मुलांना लहानपणीपासूनच बौद्ध धम्माची व त्याच्याशी संबंधित वारसा, लेण्या, चैत्यगृहे, स्तूप, भिक्खू निवास, संघाराम, Buddhist Art and Architecture, भिक्खू संघ, बुद्ध विहारे यांच्याविषयी आस्था, आदर निर्माण करण्यासाठी उपक्रम हाती घेणे अत्यावश्यक आहे. आज भारतात बौद्ध धर्मात सर्व जाती धर्माचे लोक येत आहेत, त्यांच्यासाठी आदर्श बौद्ध म्हणून आपण एक उदाहरण असणे धम्माच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचे आहे.

इथल्या समस्त SC ST OBC समूहातील लोकांचा मूळ धर्म हा बौद्ध धम्म आहे, हा सबंध महाराष्ट्र बौद्ध राज्य होता याची ओळख आपण इथल्या SC ST OBC समूहाला करून देणे क्रमप्राप्त आहे. या कामी प्रत्येक बौध्द व्यक्तिने स्वताला वाहून घेणे गरजेचे आहे तरच हा समृद्ध वारसा टिकू शकेल. एक संस्कृती टिकवायची असेल तर त्याग आणि प्रचंड Dedication देणे अगत्याचे आहे. आज अनेक संस्था, संघटना याकामी स्वताला वाहून घेऊन काम करीत आहेत, त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. आपण सर्व या मंगल कामी स्वताला वाहून घेऊया आणि हा समृद्ध वारसा जपुया हीच प्रतिज्ञा आज करावी लागेल आणि त्यानुसार प्रत्यक्ष कृतिकार्यक्रम आखून मार्गक्रमण करावे लागेल. इथली संस्कृती, इथला समृद्ध बौद्ध वारसा जपणे हेच आता आपले महत्त्वाचे आद्य कर्तव्य आहे, चला तर मग प्रतिज्ञा करूया हा समृद्ध बौद्ध वारसा जपण्याची आणि संवर्धित करण्याची.

नमो बुध्दाय जय भीम जय संविधान जय भारत

ॲड विशाल शाम वाघमारे

लेखक आंबेडकरी चळवळीतील वैचारिक विद्यार्थी, मुंबई उच्च न्यायालयात वकील आणि Constitutional Law विषयात मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर पदवी चे शिक्षण घेत आहेत



1 Comment

  1. Adv Vishal Sir, I admire your article. I believe that those who have accepted Buddhism have left mental slavery long time ago. But, I hold an opinion that Bahujan word is kind of Political and does not exist in reality. In my opinion, within 5 or 10 years from now Bahujan & Mulnivasi terms will be vanished really. Other than that it’s a good read.

Leave a Reply

Your email address will not be published.


*