शोषणाविरुद्धचा सचेतन लढा हाच नामदेवाचा खरा विद्रोह

राहुल पगारे

आयचा टx, छिxx, रांx, लxx इत्यादी आपल्या बोलण्यात, लिखाणात आले म्हणजे आपण विद्रोही होत नसतो. नामदेव ढसाळ सरांना या शब्दांच्या पलीकडे न बघणाऱ्यांची कीव येते.

ढसाळांच्या अब्राह्मणी भाषेच्या कवितेच्या ओळी पलीकडे ढसाळ पॅन्थर का बनले ? जहालवादी का बनले ?, चळवळ व साहित्याची पार्श्वभूमी ? त्यांची कारणमीमांसा ? तत्कालीन युवकांच्या मंद सुस्त पडलेल्या बुद्धीला चेतना स्वरूप देऊन कसं रस्तावरच्या आंदोलनाचा हिस्सा/भागीदार बनवलं ?

फक्त कधीकाळी गांधीवादी आंदोलनाने व्यापलेले रस्ते कसे आंबेडकरवादी आंदोलनाने दुमदुमले ? हे कधी त्यांना स्मरण करुन लिहीत असल्याचा आजचा तरुण दिसत नाही. त्यांच्या स्मृतिदिनी, जयंतीदिनी त्याच त्या कविता ज्यात फक्त आपल्याला ऑर्गझम मिळतो तेच शेअर, कॉपी पेस्ट, वायरल करताना, होताना दिसते. या कविता ज्या पार्श्वभूमीवर बनल्या ते मात्र आपल्याला उलगडता येत नाही.

ढसाळ फक्त कवीच नाही ते आंदोलक होते. त्यांच्यातला आंदोलक तुम्हाला बघता आला का ? मांडता आला का ? फक्त शिव्यांनी ओतप्रोत भरलेल्या ओळी पसरवुन आपण एका मोठ्या व्यक्तीमत्वाला, एका आंदोलकाला संकुचित करुन ठेवतो याच भान नाही. ठराविक उद्दिष्टांच्या आंदोलनाव्यतिरिक्त विद्रोहाच्या नावाखाली हासडल्या जाणाऱ्या शिव्या फक्त सोपं नाही तर सगळ्यात स्वस्त, cheap role आहे. विद्रोह म्हणजे प्रस्थापितांच्या systematic oppression ला आव्हान देणं असतं.

आणि म्हणूनच विद्रोह म्हणजे आंबेडकरवादी विचारांची देवाणघेवाण ही असू शकते, विपरीत परिस्थितीत तुमचं मिळवलेले शिक्षण हा पण विद्रोह आहे, तुम्ही मिळवलेली नौकरी, स्वतःच्या पायावर उभं असणं हा पण विद्रोह आहे, तुमचा व्यवसाय तुमचा उद्योग व त्यातुन आपल्या शोषित बांधवांना रोजगार निर्मिती करुन देणं, संधी मिळवून देणं हा पण विद्रोह असु शकतो, बौद्ध विचारांची बाल संस्कार केंद्र चालविणे हा पण विद्रोह आहे, आपली मुलं विज्ञानवादी दृष्टीकोनातून घडतील हा पण विद्रोह आहे, ज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात तुमची ओळख निर्माण होणं हा पण विद्रोह आहे, विद्यार्थी आंदोलन, कामगार संघटना, महिला मंडळ चालवणे हा पण विद्रोह आहे, जातपात विरहित समतेचं राजकारण उभ्या करणाऱ्या पक्षाला मत देणं हा पण विद्रोह आहे, आपल्या घरातील स्त्रियांच्या अस्मिता त्यांच्या व्यक्तीगत स्वांतत्र्याचा स्वीकार हा पण विद्रोह आहे, अगदी काही नसलं तरी प्रत्येक रविवारी तुमचं निळ्या झेंड्याखाली, बुद्ध विहारात असणं, एकत्र येणं पण विद्रोहच आहे, आपल्या बद्दलचा विद्यापीठ, सांस्कृतिक क्षेत्र, प्रसारमाध्यमात सवर्ण शोषकांचा सगळा stereotype हाणून पाडणं पण विद्रोहच आहे. सवर्ण प्रस्थापित शोषकांच्या आखुन दिलेल्या रेषा ओलांडून आपल्या फॅन्सी स्टाईल, आपल्या अटीट्युडने जगणे हा पण विद्रोहच आहे. विद्रोह म्हणजे कमरेखालच्या वापरलेल्या शब्दातच नाही, विद्रोह तर सचेतन मेंदुत आपण शोषणा विरोधात काय हर तऱ्हेचा विचार आणतो तो आहे. नवतरुण नवतरुणीनी हे समजून घ्यावं.

पॅन्थर नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

राहुल पगारे

लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*