कोकणातील माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या आठवणी…

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह. राजापूरच्या बऱ्यापैकी लोकांना हे ठिकाण माहीत असेल. नाव वसतिगृह असलं तरी ते जवळपास बारा वर्षांसाठी आमचं घर होतं. बौद्धजन पंचायत समिती, राजापूर तालुक्याच्या सभा इकडेच होत असत. वर्षभर अधून मधून सभा असायच्या तेव्हा मम्मी सर्वांसाठी चहासोबत कधी पोहे तर कधी भजी असे वेगवेगळे पदार्थ बनवायची. तिथला हॉल मोठा होता. व्यवस्थित चटया टाकून सर्वजण पंचशीलने सभेची सुरुवात करायचे.

आंबेडकर जयंती जवळ आल्यावर आमचं घर सभासदांनी आणि राजापूरच्या बौद्धवाडीतील बांधवांनी गजबजून जायचं. जयंतीसाठीची आमंत्रण पत्रिका छापून घेतल्या जायच्या. त्याचे गठ्ठेच्या गठ्ठे घरी असायचे. ते मग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लावले जायचे आणि गावागावांमध्ये वाटण्यात यायचे. दोन दिवस आधी स्टेजला मंडप घालण्याची तयारी सुरू व्हायची. घराला रोषणाई केली जायची. आदल्या दिवशी खुर्च्यांची व्यवस्था व्हायची. त्याच रात्री राजापूरच्या बौद्धवाडीतील बांधव तयारीसाठी यायचे. पुतळ्यासमोर आणि हॉलमध्ये रंगीबेरंगी पताका लावल्या जायच्या.

१३ तारखेला संध्याकाळपासूनच स्पीकरवर बुद्धगीत आणि भीमगीत असायची. १४ ला सकाळपासूनच तिथे बाबासाहेबांचा पुतळा असल्याने पोलीस काका हजर असायचे. पप्पा सकाळी जाऊन हार आणि फुलं आणायचे. कार्यकर्ते येण्यापूर्वी सकाळी लवकर उठून आम्ही आमचं आवरून घ्यायचो. सकाळ झाली की हळू हळू लोकं यायला सुरुवात व्हायची. ते येऊन प्रथम बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायचे आणि पुतळ्यासमोर एकटे किंवा कुटुंबासमवेत नतमस्तक व्हायचे. पुतळा हारांनी आणि मेणबत्तीने अगदी भरून जायचा. सगळे जमले की मग पंचशीलने सभेची सुरुवात करण्यात यायची. मम्मी चहा बनवायची. जयंतीच्या दिवशी जास्त लोक असल्याने नाश्ता बाहेरून आणला जायचा. त्याच दिवशी पाण्याचा टँकरसुद्धा आंब्याच्या झाडापाशी असायचा. सर्वांना शुभ्र कपड्यात पाहून छान वाटायचं. खूपच रोमांचित करणार वातावरण होतं ते.

सभा झाल्यावर मिरवणुकीची लगबग सुरू व्हायची. मिरवणुकीची सुरुवात राजापूर बौद्धवाडीतून सुरू व्हायची, तिथून मग बाजारपेठ, राजापूर हायस्कूलमार्गे वसतिगृहात येऊन थांबायची. मिरवणुकीतले बांधव घरी येईपर्यंत मग त्यांच्यासाठी आम्ही थंड पाणी किंवा रसनाची व्यवस्था करून ठेवायचो. तेव्हा फ्रिज नसल्याने बर्फाच्या लाद्या आणाव्या लागत. दुसरीकडे मैदानात खुर्च्या रांगेत लावल्या जायच्या. लहान मुलांसाठी पुढे सतरंज्या असायच्या. स्टेजवर टेबल, खुर्च्या आणि पाण्याच्या बाटल्या हे सर्व व्यवस्थित मांडलं जायचं. माईक-स्पीकरची टेस्ट व्हायची.

चौथीला असताना १४ एप्रिल याच दिवशी मला चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेत राज्यस्तरावर नंबर आल्याबद्दल २ मेडल्स मिळाली होती. याची पूर्वकल्पना काहीच नव्हती. जयंतीपूर्वी २ दिवस घेतलेला नवीन फ्रॉक घालून मी शाळेत गेलेले आणि अजूनही आठवतंय, मी मेडल्स गळ्यात घालूनच घरी आलेले. पहिल्यांदाच माझं नाव शाळेच्या फळ्यावर आलं होतं. मुख्याध्यापकांनी मेडल्स आणि प्रमाणपत्रासोबत एक फोटो द्यायला सांगितला होता. घरी आल्यावर ती मेडल्स पाहून मम्मी पप्पा खुश झालेले. यापूर्वी माझा नगर वाचनालयाच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये दुसरा नंबर आलेला, तेव्हा पेपरमध्ये नावही आलेलं, त्यामुळे माझं विशेष कौतुक माझ्या पालकांना होतं. घरी आल्यावर मम्मीने माझी तयारी करून दिली मग मी आणि पप्पा फोटो काढण्यासाठी नवयुग फोटो स्टुडिओकडे रवाना झालो. अजूनही आठवतंय, रस्त्यात नगर परिषदेजवळ पप्पांना कोणीतरी ओळखीचे काका भेटलेले, तेव्हा त्यांनी बॅगेतून काढून माझी मेडल्स दाखवलेली त्यांना. केवढं ते कौतुक! फोटो काढून झाला आणि तो नंतर शाळेच्या ऑफिसमध्ये बॅनरवर लावण्यात आला.

इकडे संध्याकाळी मिरवणुकीमधले बांधव येण्याची त्यांच्या घोषणांच्या आवाजाने कल्पना यायची. गावागावांमधून कार्यकर्ते कुटुंबासोबत गाड्या करून यायचे. हळू हळू सर्व जमू लागले की संध्याकाळी मान्यवरांच्या भाषणाला सुरुवात व्हायची. दहावी, बारावी, पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिली जायची. घरामागे दुपारपासूनच जेवणाची तयारी सुरू व्हायची. भाषणं झाली की हॉलमध्ये जेवणाची सोय असायची. हॉल मोठा होता त्यामुळे एका बैठकीमध्ये बरीच लोक जेवायची. जेवणं झाली की मग कलाकार बांधवांचे गाण्याचे आणि नृत्याचे कार्यक्रम असायचे.
सर्व कार्यक्रम संपला की राजापूरच्या भावकीतले लोक आवर्जून सर्व आवरण्यासाठी थांबायचे. गाड्या करून आलेले बहुतेक लोक आणि जवळचे लोक रात्रीच परतायचे. काहीजण मग रात्री हॉलमध्ये मुक्काम करून सकाळी निघून जायचे. असा हा दिवस ज्याची वर्षभर वाट बघितली जायची मार्गी लागायचा.

मी १२ वर्षांची होईपर्यंत तिकडे होते.वसतिगृहात त्याकाळी शेकडो लोकं येऊन गेली. प्रत्येकाचे आपापले अनुभव आहेत. वसतिगृहाकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन आहे. पण तिथे राहत असल्यामुळे माणसं बघायला मिळाली. अजूनही बरीच लोक मम्मी पप्पांच्या संपर्कात आहेत.
जास्त काही आठवत नाही पण तो बाबासाहेबांचा पुतळा आमच्या बालपणाचा साक्षीदार होता. ❤️

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव

लेखिका नवी मुंबई येथील रहिवासी असून MNC मध्ये Senior Analyst ह्या पदावर कार्यरत आहेत.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*