बोलीभाषेला डिग्नीटी मिळवून देणारा नागराज अण्णा!

निलेश खंडाळे

स्रोत – इंटरनेट

एखाद्या चित्रपटाचा प्रभाव हा समाजमनावर किती होऊ शकतो याबद्दल सर्वाधिक चर्चा झालेलं वर्ष म्हणजे २०१६. अनेक मतप्रवाह यातून समोर आले. ही घुसळण भूतो न भविष्यती अशीच होती. इतकी टोकदार चर्चा इथून पुढे कधी होईल की नाही माहिती नाही. निमित्त होतं सैराट !

त्या दरम्यान एक सतत वापरलं गेलेलं वाक्य म्हणजे
” एका चित्रपटाने काही समाज सुधारत अथवा बिघडत नसतो ! ” ( किंवा समाजावर काही परिणाम होत नसतो )
खरं तर हे प्रचंड पोलिटिकल वाक्य होतं. निर्माण झालेले सामाजिक वाद अजून वाढू नयेत म्हणून पण ते वापरलं जायचं. पण हे म्हणणं कितपत खरं होतं ?

अण्णाभाऊ साठे म्हणतात की , “इथं पाच कोसावर गेलं तरी भाषा बदलते, भाषेच्या उसनवारीने कोणाला कमी लेखू नका ! “
अण्णाभाऊंना हे बोलण्याची गरज का पडते ? कारण एक मूठभर लोकांचा , एका विशिष्ट पट्यात राहणारा घोळका इतर सगळ्या घोळक्यांना फक्त त्याच्या बोली भाषेवरून कॅन्सल करत होता.
इतर घोळके कॅन्सल झाल्यामुळे या मुठभरांचीच भाषा, संस्कृती म्हणजे समस्त महाराष्ट्राची संस्कृती.
हा खरं तर सांस्कृतिक दहशतवाद होता.
याला कुठेच लगाम नव्हता. एखाद्या वंचिताची किंवा समजा एखाद्या काळ्या व्यक्तीची भूमिका जरी करायची म्हटली तरी त्या गोऱ्या प्रस्थापिताला काळा मेक अप लावून ते कार्य पार पाडलं जायचं.
मात्र नागराज ने फँड्री मधून दिलेला जब्या ट्रेंड सेटर होता. फँड्री ने पाया रचला तर सैराट ने कळस चढविला.

मुळात सैराट ने जे केलं ते करायला हजारो वर्षांच्या यशस्वी चळवळी लागतात. लोकं त्या साठी बलिदान देतात, रस्त्यावर च्या चळवळी होतात, जीव जातात.
एखाद्या बोलीभाषेला डिग्नीटी मिळवून देणं ही साधी गोष्ट नव्हे. तिला मेन्स्ट्रीम मध्ये जागा मिळवून देणं तिची दखल घ्यायला भाग पाडणं आणि तिच्या ताकदीची जाणीव करून देणं हे सैराट चं सगळ्यात मोठं यश होतं.

बोलीभाषेत कलाकृती येऊ लागल्या. मातीतल्या कलाकारांचा मार्ग सुकर झाला. बदलत्या मॅट्रिक्स च्या पाऊल खुणा ओळखत मेट्रो सिटी चे कलाकार कोल्हापूर , सोलापूर, साताऱ्यात जाऊन मुक्काम ठोकू लागले. तिकडे शूट होऊ लागले. एका रात्रीत इंडस्ट्री ची मुख्यालयं विकेंद्रित झाली.ती करमाळा झाली, बार्शी झाली, सातारा झाली, कोल्हापूर झाली.

कोल्हापूर वरून आठवलं.प्रचलित माहिती नसली तरी देशातली पहिली फिल्म इंडस्ट्री चालू करायचं श्रेय हे बाबुराव पेंटर यांना जातं, आणि ते कोल्हापुरात.
त्या इंडस्ट्री ला नुसतं आर्थिक पाठबळ नव्हे तर पाहिजे ती मदत देण्याचं काम कलाप्रेमी राजर्षी शाहू महाराज यांनी केलं आहे.
आता ही गोष्ट लोकांना माहिती नसल्या कारणाने डिजरव्हिंग व्यक्तींना श्रेय काही मिळालं नाहीये.
पण परत एकदा कोल्हापूर आपलं गतवैभव मिळवताना दिसतं आहे.

सैराट ने सगळं कसं एका लेव्हल ला आणून ठेवलं आहे. आणि याची जाणीव इंडस्ट्री मधल्या प्रत्येकाला आहे.
प्रामाणिकपणे सांगायचं तर कुणाला हीनवायचं नाहीये.
उलट मराठी सिनेमा revolutionalise व्हावा ही मनोमन इच्छा आहे. रिजनल सिनेमा मध्ये ती ताकद आहे. मल्याळम आणि तामिळ सिनेमा ची यशस्वी उदाहरणं आहेत. सगळ्या घटकातून सामूहिक प्रयत्न झाले तर आपल्याकडे देखील हे सहज शक्य आहे.
हे होईल अशी अपेक्षा करूया.
चांगभलं !

निलेश खंडाळे

लेखक पुणे येथे वास्तव्यास असून ते शॉर्ट फिल्ममेकर तसेच Kiaro Films चे संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*