मानसी एन.
२०१९ च्या डिसेंबरात नागपूरला जाणं झालं. यशवंत मनोहर सरांची भेट घेता आली. त्यादरम्यान, सरांचं लिखाण नव्यानंच वाचायला सुरुवात केली होती. त्यांच्या उजेडाच्या शब्दांनी खूप अंतर्मुख झाले होते मी. सर खूप गहिरं बोलत गेले. त्यांच्या जन्मापासून आजपर्यंतचा प्रवास सांगत गेले. आईबद्दल भरभरून बोलले. ऐकताना जिवाचे कान करुन शब्दन् शब्द कानात साठवत होते मी.आपल्या सगळ्या आंबेडकरी बांधवांच्या आयुष्यात माणूस म्हणून सन्मानाने जगण्याच्या उर्मींचा उजेड निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी जे रक्ताचं पाणी केलं, त्या प्रक्रियेचं, संघर्षाचं सौंदर्यशास्त्र एका दार्शनिकाच्या नजरेतून उलगडत जाताना प्रत्यक्ष पाहाणं, ऐकणं हा एक आतून हलवणारा अनुभव होता. इतकं स्वच्छ आणि स्पष्ट आकलन.
इथल्या ब्राह्मणी मेंदूनं ”दलितत्व’ नावाच्या माथी मारलेल्या, जाणूनबुजून गळ्यात अडकवलेल्या ओळखवजा लोढण्याला फेकून देऊन ‘मी कुणाच्या बापाला भीत नाही. मी निरुपाधिक् आहे. मला कुठलंही लेबल नको. मी एकटा दिसत असेन, ते मला लोकांनी एकटं केलंय म्हणून नव्हे.तर मी स्वतःहून हे एकटेपण स्वीकारलंय. मला माझा सन्मान, आत्मप्रतिष्ठा उसनवारीवर नकोय. भीक म्हणून नकोय. वर उपचारी म्हणून नकोय. मी ती माझ्या कर्तृत्वाच्या, जीवनमूल्यांच्या जोरावर मिळवीन. जगभरात समतेसाठी लढणारा, प्रयत्न करणारा प्रत्येक माणूस सुंदर आहे, तो लढा सुंदर आहे. शोषण करणारी माणसंच नव्हे,तर मी शोषकांचं तत्वज्ञान नाकारतो, त्यांची प्रतीकं नाकारतो. मला त्यांच्या पावतीची गरज नाही.मी दलित नाही, दलित ही माझी ओळख नाही. मी आंबेडकरी. माझ्या जगण्याचं तत्त्वज्ञान आंबेडकर. आंबेडकर माझा उजेड. माझा बाप, माझी आई…… असं पापणी न लवता एकसलग बोलणारे यशवंत मनोहर सर! त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारं स्मितहास्य, डोळ्यातली निर्भय चमक.
“तुम्हा मुलांवर आता जबाबदारी. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला. जे नको, ज्याची चर्चा अनावश्यक ते ते पाखडून बाजूला केलं. दैवी, आध्यात्मिक फोलपाटं फेकून देऊन निव्वळ माणसासारखा माणसांचा विचार करणारा एक माणूस आपल्यात होऊन गेला, हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं.
तुम्ही मुलांनी बाबासाहेबांना समजून घेणं, पुढच्या पिढीला तो समजून सांगणं, अनावश्यक चर्चांमध्ये वेळ न दवडता पुनर्निर्माण करीत राहाणं गरजेचं आहे.
पण एक गोष्ट आवर्जून करावी. बुद्ध आणि बाबासाहेब कुणावरही लादू नये. तो पटवून द्यावा. आता वेळच अशी आहे की माणसं स्वतःहून बुद्ध आणि बाबासाहेब शोधत येतील. नव्हे, येतायंत. माणसाला माणसाशी जोडणाऱ्या विचाराकडे येतायत.
या पृथ्वीवर अंतिम सत्य नावाच्या गोष्टीचा सातत्याने शोध घेणारं घटित म्हणजे माणूस! तो शोधतोय अनादी काळापासून काहीतरी. म्हणूनच तर स्वातंत्र्य,समता, बंधुत्व आपल्याला हवंय. ते नांदावं, आकाराला यावंसं वाटतं. प्रत्येक प्रमाणिक माणसाची ही इच्छा आहे.माणसालाच कल्पना सुचतात.कल्पना पुढे धावतात शब्द मागे रेंगाळतात.नवनवे शब्द शोधा. असे शब्द जे तुमच्या विचारांतला, शब्दांतला उजेड शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतील………..” असं काय काय नि किती बोलत राहिले सर!
त्या भेटीनं खूप काही दिलं. आतला आवाज आणखी बुलंद झाला.
तर आज हे सगळं आठवण्याचं विशेष कारण असं आहे की,…..
मधूनच आमचा मित्र Vruttant ने एक प्रश्न विचारला. की सर, तुम्ही सूरज येंगडेला ओळखता का? सर उत्तरले, तोच ना तो ‘दलितहूड’ वाला? आम्ही खळखळून हसलो.
सर म्हणाले, की हा पठ्ठ्या त्यांना मेसेज करुन विचारता झाला,की दलितहूड बद्दल सरांना काय वाटतं?
सर म्हणाले, मी दलितत्व नाकारतो. मी ‘दलित’ हा शब्दच नाकारतो. ही सेलिब्रेट करण्याची गोष्ट नाही!!!!
विषय संपला.
तर या असल्या ‘आयजीच्या जिवावर बाईजी उदार’ या म्हणीला सार्थ ठरवत याचं ऐक, त्याचं वाच, इकडून चोर, तिकडून चोर असले चाळे करणाऱ्या स्वयंघोषित आणि पुरोगामित्वाचं कातडं पांघरलेल्यांच्या स्क्रिप्टेड रिअॅलिटी शो मध्ये ‘दलित’ म्हणून लुटुपुटुची मानाची कट्यार घेऊन या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर, त्या लिस्टीत झळकबाजी करणाऱ्या या उरबडव्या मोअर स्मार्ट, मोअर इंटेलिजंट ब्यूटिफुल दलित म्हणवून घेणाऱ्या, आयडेंटिटीचं कमॉडिफिकेशन करणाऱ्या भाटांना आता थेट प्रश्न विचारायलाच हवेत.
नेमकं काय सेलिब्रेट करताय तुम्ही????
काय दलित? कोण दलित? कसलं दलितहूड?
हे आंबेडकरी नव्हेत. ब्राह्मणी मीडीयाकडून आपलं कौतुक व्हावं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘दलित’ म्हणून आपल्या दुःखांचा(?) बाजार मांडावा. त्या बाजारात यांच्यासारख्याच कुणी तरी ह्युमन राईट्सचं “दुकान” चालवणाऱ्यांनी ती विकत घेऊन, विकून सौदेबाजी करावी, हा नतद्रष्ट खेळ खेळणारे आंबेडकरी नसतात. हे असले कुणाचेही सगे नसतात.
असल्यांची तळी उचलणाऱ्यांची खेळी काय आहे, कशासाठी आहे हे तर स्पष्ट दिसतंय समोर.
आजकालचं नाही हे. विकले जाणारे, विकत घेणारे एकमेकांचे साडभाऊ असतात. यात कुठलंही रॉकेट सायन्स नाही.
Outlook ने प्रसिद्ध केलेल्या ५० प्रभावशाली दलितांची नावं, चेहरे….
यातल्या अनेकांनी हे मारुन मुटकून गळ्यात बांधायचा प्रयत्न केलेलं दलितत्व स्पष्टपणे नकारलंय. तरीही विनापरवाना हे असले उद्योग जाणीवपूर्वक केले जातात.
म्हणूनच आता केवळ शोषीतांबद्दल बोलून उपयोग नाही, तर शोषकांची नावं त्यांच्या जातींसकट पटावर आणली पाहिजेत. दलित अत्याचार, दलित हत्या असा मथळा जर माध्यमं वापरतात,तर मग शोषण करणाऱ्या, शोषणाचं समर्थन करणाऱ्या वर्णवर्चस्ववादी, त्रैवर्णिक युतीला कुठलाही आडपडदा न ठेवता समोर आणलं पाहिजे.
Outlook ने जातीय अत्याचारात आघाडीवर असणाऱ्या जातसमूहांची आणि जातीयवादी स्त्री-पुरुषांची, जातीय अत्याचाराच्या घटनांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करुन, न्याय आपल्याला हवा तसा विकत घेणार्या नेत्यांची, राजकीय पक्षांची नावं उघडपणे छापावीत.
मानसी एन.
लेखिका कोल्हापूर येथील रहिवासी असून त्यांचं शिक्षण M.Sc.(Microbiology), M.A.(Political Science) असे आहे, तसेच त्या विविध सामाजिक प्रश्नांच्या स्वतंत्र अभ्यासक आहेत.
- Outlook मासिकाच्या “दलित” लिस्ट मागील खरे राजकारण… - April 18, 2021
- माणगाव परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व - March 22, 2021
- प्रजासत्ताक भारताची गरिमा (?)….. - January 27, 2021
Dalit hi sankalpana babasahebani kevhsch nakarli ahe.
Nice
Nice