‘दलित ठोकळीकरणाचे’ ब्राह्मणी राजकारण!

गौरव सोमवंशी

(सुरुवातीलाच सांगुन देतो की “ठोकळीकरण” असा कोणता शब्द मराठीत नाही हे मला माहित आहे. पण reification या शब्दाला मला दुसरा कोणता पर्याय सापडला नाही.हे सगळं काय आहे ते पुढे बघू, कोणाला अजून चांगला शब्द सुचला की तो वापरू)

काही विशिष्ट घटनांकडे एकदा पाहूया:

1.केरळमध्ये दोन वर्षांपूर्वी एक अतिशय क्रूर घटना घडली. एका ‘खालच्या’ जातीच्या ख्रिश्चन मुलाने आपल्या मुलीसोबत लग्न केले म्हणून एक उच्च जातीच्या सीरियन ख्रिश्चन मंडळींनी त्या मुलाची घरात घुसून अपहरण करून हत्या केली.

आता त्या मुलीचे आईवडील हे स्वतः एक मुस्लिम-ख्रिश्चन जोडपं होत, पण दोन्ही उच्च जातीतील. अपराधी आणि मृत मुलगा हे सगळे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते. (ही माहिती कम्युनिस्ट वर टीका करायला नाही देत आहे).

  1. म्यानमारमध्ये बुद्धिस्ट लोकांकडून काही मुसलमानांवर हल्ले झाले, आणि इकडे सोशल मीडियावर लगेच मराठी बौद्धांना त्याचा जाब विचारणारे पोस्ट सुरू झाले.
  2. तिसरं उदाहरण तर सर्वश्रुत आहेच.की तिकडे दुसऱ्या देशात कोणता अतिरेकी हल्ला झाला की त्याचे स्पष्टीकरण जगभरातील मुसलमानांना देण्यास भाग पडले जाते.

ह्यावरून आपण काय अर्थ लावू शकतो, की धर्म/जात /समूह म्हणजे नक्की काय? उद्या जर मी स्वतःला ज्यू घोषित केलं, तर मला ईजरायलचा व्हिसा मिळेल का? कींवा कोणी आज इकडे मुसलमान धर्म स्विकारला, तर त्याला तो अरब शेख आपली तेलाची विहीर देईल काय?

गोष्ट खूप साधी आहे.की जर आपण म्हणालो की “तो त्या अमुक तमुक धर्माचा आहे”, तर यावरून तुम्हाला त्याच्या आर्थिक, सामाजिक स्थितीबद्दल किती अचूक ओळखता येईल? (What does it signify? What does it corelate with?)

कोणत्या एका विशिष्ट मार्करवरून त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या जवळील समूहाचा काही बोध लागत असेल तर तो मार्कर अर्थपूर्ण ठरतो.पण जर तो मार्कर आभाळाईतका व्यापक असेल, तर त्याला बाजूला फेकून दिलेलं बरं.

असं न केल्याने काय होतं?असं न केल्याने अस्तित्वात नसलेल्या वस्तूंचे कडक “ठोकळे” तयार होतात. असे ठोकळे की ज्यामध्ये सामील असलेल्या प्रत्येक समूहाचे स्वतःचे वेगळे अस्तित्व, त्यांचे विशिष्ट संघर्ष, त्यांचे वेगळ्या जाणिवा, हा सगळा फरक नष्ट होईल.याचे परिणाम शेवटी समूहापासून व्यक्तीपर्यंत जाऊन पोचतातच.

जर्मन भाषेत याला ‘Verdinglichung’ म्हणतात ज्यावरून पुढे इंग्रजीमध्ये Reification हा शब्द आला, आणि यांचा अर्थ असा होतो की “अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना सोबत जोडून त्याची कडक वस्तू बनवणे”.

असे होऊ नये म्हणून आजकाल अभ्यासक आणि लेखक नुसतं धर्माचं नाव लिहितांना सुद्धा एकवचनी न लिहिता अनेकवचनी वापरायला लागले आहेत (Christianities, Islams, Buddhisms, etc)

बरं मग आपण काय करावे? फक्त व्यक्ती-व्यक्ती कडे पाहावे का, आणि कोणत्याच सामूहिक पातळीवर कसलेच विश्लेषण करू नये? नाही.

याचा असा अर्थ होतो की पुढील दोन गोष्टींमध्ये द्वंद्व निर्माण न होऊ देता त्यांना पूर्णपणे समजून घेणे:

  1. जर कोणता समूह आपल्या स्वतःची नुसती ओळख समूहापासून न घेता, त्या व्यक्तीची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक , राजकीय परिस्थिती त्या एका ओळखीमुळेच मुख्यतः होत असेल (शोषक किंवा शोषित, दोन्ही) तर ती गोष्ट नेमकी काय आहे ती ओळखावी (भारतीय उपखंडात ती गोष्ट म्हणजे ‘जात’.म्हणून मी त्या बालिश युक्तिवादाला मानत नाही की “डावे हे आर्थिक स्थिती पाहतात म्हणून 50% पास, आंबेडकरवादी जात पाहतात म्हणून 50% पास, आणि दोघे मिळून टॉपर”. कारण जात यालाच मार्कर धरून चाललं की खरी स्थिती पूर्णतः समजते आणि आर्थिक स्थिती हा त्याचा अविभाज्य भाग आहेच, अन्यतः अंधारात बाण मारल्या सारखं परिस्थिती होते.) अश्या वेळेस केलेले जातीचे विश्लेषण हे नेमके ठोकळीकरणाच्या एकदम उलटे होते, कारण आपण वास्तविक परिस्थितीच्या उगमस्थानात हात घालीत आहोत.
  2. व्यक्तीशी शेवटी वागतांना व्यक्ती म्हणून पाहावे, कारण असं न केल्याने आपलीच मानवता कमी होते, बाकी काही नाही.पण , त्याच सोबत हे लक्षात घ्यावे की ठोकळीकरणाचे सर्वात भीषण पीडित हे शोषित समाजातील असतात. कारण त्यांच्यावर लादलेला ठोकळा हा त्यांचे “स्वत्व” गिळून टाकतो.म्हणजे की फुले-बाबासाहेब जेव्हा ब्राह्मण-सवर्णांची टीका करायचे तेव्हा त्यांच्या शब्दाने ते कोणास व्यक्तिशः दुष्ट म्हणत नव्हते.त्यांची टीका लागायची या जातींच्या भोवती असलेल्या त्या पिळवणूक आणि शोषण करून मिळवलेल्या संपत्ती, जमिनी, नोकऱ्या, शिक्षण, आणि गर्वावर. पण शोषित समाजाला यापैकी काहीच नसते, स्वतःचे अस्तित्व सोडून, म्हणून ठोकळ्यावर जसा हातोडा मारला जाईल तो थेट यांच्या मनावर, अस्तित्वावर लागेल.

“ठोकळीकरण” भारतात कसे आणि कोणावर केले जाते हे लक्षात आल्यास खूप कोडे उलगडतील.

जसे, मागे तो अरुण शौरी बोलला की भारतामध्ये सेक्युलरवाद संपत आलाय, आणि त्याने लिहिलेल्या “worshipping false gods” ला विसरून लोकं डोक्यावर घेऊ लागली. त्याला असे कसं जमते? सेक्युलर म्हणजे सर्वधर्म-समभाव पण पडद्याआड सर्वजाती-भेदभाव अशी व्याख्या आपण कसे पाळीत आलो आहोत?

आणि “अमर, अकबर, अँथनी ” हा सुपरहिट सिनेमा. अमर कुलकर्णी की कांबळे, अकबर सईद की कुरेशी, अँथनी सीरियन की दलित ख्रिश्चन, यावर कोणता उल्लेख सुद्धा नाहीच.

आणि बरेच लोकं यावर बोलले आहेत की आपण आजकाल जिकडेतिकडे “दलित कवी”, “दलित मंत्री” , “दलित स्पीकर” असं का बोलतो आणि ते ब्राह्मण-सवर्ण एक “व्यक्ती” म्हणून मिरावण्यास मोकळा असतो? प्रश्न बरोबर आहेच पण याने नेमके काय साध्य होते?

“दलित” हा ठोकळा तयार करुन एक अख्खी इंडस्ट्री उभी केली आहे, NGO funding, PhD thesis, अकॅडेमिक पेपरची रचलेली रद्दी, हे तर यावर चालतेच. शिवाय, एकदा का “दलित” हा ठोकळा मजबूत तयार झाला की त्यामध्ये तुम्हाला अडकवायला हे मोकळे. काही stereotype मध्ये तुम्हाला साचेबद्ध केले की तुमचे अस्तित्व पण त्यातच कोंडता येते. म्हणून हा इतका आग्रह शोषितांना दलित आणि शोषकांना “व्यक्ती” म्हणून संबोधण्याचा.

आणि या ठोकळीकरणाचे उदाहरण मी पण आजूबाजूला बघतोच.जसं की आज-काल फॅशन झालं आहे हे सांगायला की “ओबीसी हिंदुत्ववादा कडे झुकत आहेत?”. ओबीसी जनसंख्या ही अमेरिकेपेक्षा 20-30 कोटींनी जास्त असेल, त्यामध्ये हजारो जातीजमाती असतील, पूर्ण उपखंडात त्या पसरल्या असतील, एकमेकींच्या वास्तविकतेशी बऱ्याच जातींचा काडीमात्र संबंध नसेल, पण आपण सुद्धा त्यांना एका दमात संबोधायला मोकळेच असतो. असे का होते किंवा कोणाला नाईलाजास्तव त्या जनसंख्येला तसे का संबोधावे लागते याची जाण मला आहे, पण याचा विचार नेहमी करावा की अश्या ठोकळीकरणाने फायदा कोणाचा होतोय नेमका.

शेवटी या सगळ्या बोलबच्चनचा सारांश इतकाच:

  1. विश्लेषणाचे युनिट काय असेल यावरून सगळं ठरतं (तुमचे हेतू कितिका चांगले असेना)
  2. हे सगळे मापदंड लावतांना शेवटी समोरील व्यक्तीला फक्त व्यक्ती म्हणून बघायची आपली इतकी ऐपत हवी.
  3. स्वतःची आयडेंटिटी किंवा अस्मिता ठासून सांगण नितांत गरजेचं- पण, त्याविरोधात, कळत नकळत, केलेल्या ठोकळीकरणाचे शिकार होऊ नये. प्रत्येक जण शेवटी वेगळा आहे आणि काही अद्भुत करायची क्षमता राखतोच. म्हणून आपले जमतील तसे आणि जमतील तितके पंख पसरावे, हे कोंडीत अडकवणारे जग आपोआप सरकून जागा देईल. बाबासाहेब म्हणाले होते ते आठवते ना?

त्यांचे हे वाक्य मनावर कोरून ठेवावे:

“Unlike a drop of water which loses its identity when it joins the ocean, man does not lose his being in the society in which he lives. Man’s life is independent. He is born not for the development of the society alone, but for the development of his self.”

तळतीप: याच कारणामुळे मी स्वतः नास्तिक असलो तरी त्यास काही मोठी गोष्ट मानत नाही. कारण मी काही सौदी किंवा बांगलादेश किंवा मध्यमयुगीन युरोपात राहत नाही की या “आस्तिक-नास्तिक” वादाने मला काही फरक पडेल. माझ्या एकेकाळीचे हिरो आणि भिंतीवरील पोस्टर्स असलेले रिचर्ड डॉकिन्स, सॅम हॅरिस, या मागील दशकात नास्तिकवादाने धुमाकूळ घातलेल्याना आता कोणी सिरियसली घेत नाही कारण ते एकदम कट्टर नास्तिक असले तरी सामाजीक जाणीवेने लई फेल आहेत हे लोकांना (आणि मला) कळून चुकलंय.

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

2 Comments

  1. आपण लिहिलेला लेख स्पष्ट आहे, English RTI वरील लेख ही आपण छान लिहिले आहेत. मुळात, मी या मताचा आहे की ‘दलित’ हा शब्द आपण नाकारले पाहिजे. ज्या प्रकारे सवर्ण माणसं फक्त ‘माणसं’ असतात, आपण सुद्धा हाडा-मासाचीच माणसं आहोत. सुरज एंगडे उच्च शिक्षित आहेत याची मला जाणीव आहे, मात्र त्यांचे विचार काय आहेत हे मला कळलेलं नाही. ते सतत दलित-दलित करताहेत व दलीतत्व मंडतायेत. कदाचित एंगडे यांचे विचार येणाऱ्या काळात स्पष्ट होतील.

Leave a Reply

Your email address will not be published.


*