ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग २

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

…रेल्वेचे उदाहरण घ्या. रेल्वेतील दलित वर्गाच्या कामगारांची स्थिती कशी आहे? त्यांच्या नशिबात गॅंगमान म्हणूनच काम करणे आहे, हे कोेणीही नाकबूल करू शकत नाही. दिवसेन् दिवस तो जन्मभर गॅंगमन म्हणून काम करीत राहतो आणि बढती होण्याची त्याला काही आशा नसते. त्याच्यासाठी वरच्या दर्जाची कोणतीच जागा खुली नाही. क्वचित प्रसंगीच त्याला पोर्टर नेमण्यात येते. त्याचे कारण असे की पोर्टर असल्यामुळे त्याला स्टेशन मास्तरच्या घरची घरकामेही आपल्या नोकरीचा एक भाग म्हणूनच करावयाची असतात. स्टेशनमास्तर हा बहुधा उच्च वर्गाचा हिंदू असतो व पोर्टर अस्पृश्य असल्यास या उच्चवर्णाच्या स्टेशन मास्तरच्या घरची घरेलू कामे करण्यास तो चालू शकत नसल्यामुळे दलित वर्गपैकी असलेला पोर्टर निरुपयोगी ठरतो, हे त्याचे कारण आहे. म्हणूनच हा स्टेशन मास्तर दलित वर्गातील माणसाला पोर्टर नेमण्याचे सुद्धा टाळतो. रेल्वेमध्ये कारकुनाची पात्रता ठरविणारी एखादी परीक्षा घेण्यात येत नसून मॅट्रिक परीक्षा पास नासलेलेलच बहुधा या जागी नेमण्यात येतात. भारतातील खिश्चन, अँग्लो-इंडियन आणि उच्च वर्णाच्या हिंदूंपैकी शेकडो नॉनमॅट्रिक कारकून रेल्वेमध्ये नेमण्यात आलेले आहेत. परंतु दलित वर्गापैकी शेकडो मुलांना या जागेसाठी पद्धतशीरपणे डावलण्यात आले असून कोणाला क्वचितच तशी संधी मिळेते. अशीच स्थिती रेल्वे वर्कशॉपमध्येही आहे. मेकॅनिकच्या जागी दलित वर्गाच्या माणसाला क्वचितच नेमण्यात येते. मिस्त्रीची जागा दलित वर्गाच्या माणसाला देण्यात आली, असे उदाहरण मुश्किलीने आढळेल. त्याला वर्कशॉपमध्ये फोरमन किंवा चार्जमन क्वचितच करण्यात येते. तो फक्त हमाल आहे आणि हमालच राहतो. दलित वर्गाची रेल्वेतील अवस्था अशी आहे. ज्या उद्योगात त्याच्या पात्रतेनुसार काम मिळण्याची आशा असते तेथे त्याला खालच्या जागेवर नेमण्यात तर येतेच परंतु तो रिटायर होईपर्यंत त्याला तेथेच ठेवण्यात येते. त्याच्यासाठी उत्कर्ष नाही, त्याला प्रगतीची आशा नाही आणि बहुधा त्याच्यासाठी बढतीही नाही ! कामगारांची मागणी जर कमी झाली असेल तर सर्वप्रथम त्याला खडसावण्यात येते की नोकरी मिळण्यासाठी त्याचा आखरी क्रमांक आहे.

ज्या टीकाकारांनी तुमच्यावर व माझ्यावर दृष्ट हेतू असल्याबद्दल टीका केली, त्यांना मी दोन अगदी साधे प्रश्न असा की, हे गाऱ्हाणे खरे असेल तर त्या पासून ज्यांना यातना भोगाव्या लागत आहेत त्यांनी त्या पासून मुक्त होण्यासाठी संघटित होऊ नये काय? या दोन प्रश्नांचे उत्तर जर होकारार्थी असेल-कोणीही प्रामाणिक माणूस याला दुसरे उत्तर देऊ शकेल असे मला वाटत नाही-तर आमचा हा प्रयत्न पुरेसा न्याय्य आहे. आम्हाला दोष देणाऱ्या कामगार पुढाऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा भ्रम झालेला आहे. कार्ल मार्क्स वाचल्यामुळे त्यांना एवढेच माहित आहे की समाजात फक्त कामगार आणि मालक असे दोनच वर्ग असतात. मार्क्स वाचून ते असे गृहीत धरतात की भारतात मालक आणि नोकर असे दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम सुरू करतात. या दृष्टीत दोन ढोबळ चूका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे तीला वास्तविक समजण्याची पहिली चूक ते करतात. कोणत्याही समाजात नोकर आणि मालक असे केवळ दोनच स्पष्ट वर्ग असतात, असे मार्क्सने कोठेही म्हटलेले नाही. सर्व समाजातील माणसे अर्थप्रवृत्तीचे किंवा बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय असतात हे म्हणणे जसे खोटे आहे. मानवाची अर्थप्रवृत्ती ही मूलभूत बाब समजून निष्कर्ष काढताना अर्थशास्त्रज्ञ नेहमीच एक शहाणपणाही सूचना देत असतात. ती ही की, जर इतर सर्व परिस्थिती समान राहिली तर माणसाची अर्थप्रवृत्ती स्पष्टपणे अस्तित्वात असते. कामगार पुढारी ही मूलभूत बाब विसरून गेले.

मार्क्सने जे सांगितले ते युरोपच्या बाबतीत बरोबर होते, असे समजनेही चूक आहे, “जर्मनीमध्ये गरीब व पिळवणूक झालेला माणूस आहे काय? ते एकाच वंशाचे, एकाच देशातले, समान भूतकाळ व वर्तमानकाळ असलेले आहेत व त्यांचे भवितव्यही सारखेच राहणार आहे. तर त्यांनी संघटित व्हावे,” हा उपदेश मार्क्सच्या काळापासून भाषणातून देण्यात येत आहे. जर्मनीतील गरीब नडलेला माणूस आणि फ्रान्समधील लुबाडलेला शेतकरी मग संघटित झाला काय? १०० वर्षे लोटून गेली तरी ते संघटित होण्याचे शिकले नाहीत आणि मागील महायुद्धात ते उघडपणे परस्परांशी निर्दय शत्रूप्रमाणे लढले. भारताच्या बाबतीत तर हा विचार स्पष्टपणे चुकीचा आहे. भारतामध्ये असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत. सर्व कामगार एक असून त्यांचा एक वर्ग आहे, ही घोषणा आदर्शरूप असून ती प्रत्यक्षात उतरावयाची आहे म्हणून ती वस्तुस्थिती आहे असे समजून चालणे, ही एक फार मोठी चूक आहे. कामगारांचे सैन्य अधिक मजबूत कसे करू शकू? कामगारांमध्ये आपण ऐक्य कसे प्रस्थापित करणार आहोत? कामगारांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर अन्याय करून निश्चित नव्हे, अन्याय झालेल्या गटाला संघटित होण्यास अडथळा करूनही नव्हे किंवा ज्याच्यावर अन्याय झाला त्यांनी त्या अन्यायाविरुद्ध चळवळ उभारण्यास आडकठी करूनही नव्हे! वंश आणि धर्मामुळे एक कामगार दुसऱ्याचा शत्रू बनत असल्यामुळे कामगारांच्या ऐक्यामध्ये आड येणारी ही करणे नष्ट करणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय. एक कामगार दुसऱ्या कामगाराला हक्क देऊ शकत नाही, ते स्वतःसाठी मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही, हे त्यांना सांगणे हाच खरा कामगारांच्या एकीचा उपाय होय. सामाजिक दृष्टीने उच्च- नीच भेदभाव मानणे व पाळणे हे तत्वतः चूक असून कामगारांच्या संघटनेला ते फार घातक आहे, हे कामगारांना सांगणे हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे आपण ब्राह्मणशाही- असंनतेची कल्पना कामागरातून समूळ नष्ट केली पाहिजे. परंतु कागारांमध्ये अशा प्रकारची स्फूर्ती निर्माण करणारे कामगार पुढारी कोठे आहेत? भांडवलशाही विरुद्ध जोरजोराने भाषण देताना कामगार पुढाऱ्यांना मी ऐकले आहे. परंतु कामगारांमध्ये असलेल्या ब्राह्मणशाहीविरुद्ध बोलताना मी कोणत्याही कामगार पुढाऱ्याला ऐकलेले नाही. या उलट या मुद्यावरील त्यांचे मौन स्पष्टपणे दिसून येत आहे. ब्राह्मणशाहीवर श्रद्धा असल्यामुळे व कामगारांच्या ऐक्याशी त्यांचे काही कर्तव्य असो की नसो, ब्राह्मणशाहीचा कामगारांच्या बेकीशी काही संबंध आहे असे त्यांना वाटत नसल्यामुळे त्यांचे हे मौन असो की नसो, किंवा केवळ कामगारांचे पुढारीपण मिरविण्याची हौस असल्यामुळे कामगारांच्या भावना दुखविल्या जाऊ नये म्हणून त्यांचे हे मौन असो की नसो, याची चौकशी करण्यासाठी मी खोळंबून राहत नाही. तथापि, मला हे सांगितलेच पाहिजे की ब्राह्मणशाही ही कामगारातील फुटीचे जर मूलभूत कारण असेल तर ती कामगारांमधून काढून टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न झाला पाहिजे. हा साथीचा रोग केवळ दुर्लक्ष केल्यामुळे जाणारा नाही किंवा त्याबद्दल मौन राहिल्यानेही जाणार नाही. त्याचा पाठपुरावा केला पाहिजे व त्याची मुळे खोदून काढली पाहिजेत. तरच कामगारांच्या ऐक्याचा मार्ग मोकळा होईल.

जो पर्यंत ब्राह्मणशाही ही एक प्रचलित जिवंत शक्ती आहे आणि जो पर्यंत लोक तिला आपापल्या अधिकाराच्या स्वार्थामुळे चिकटून आहेत व इतरांवर बंधने लादत आहेत तो पर्यंत या पासून ज्यांना यातना होतात त्यांना या विरुद्ध संघटित होणे भाग आहे, अशी मला भीती वाटते आणि ते जर अशा प्रकारे संघटित झाले तर त्याने काय नुकसन होणार आहे? या संघटनेवर जर मालक लोकांचे नियंत्रण असते तर या संघटनेविरुद्धच्या कंगव्याला काही अर्थ आहे, असे मला वाटू शकेल असते.या आम्ही मालक लोकांच्या हातातील बाहुले आहोत किंवा आम्ही त्यांच्या कलाने वागत आहोत किंवा कामागारात फूट पाडण्यासाठी आम्ही मुद्दाम हे संघटन उभारीत आहेत, असे जर सिद्ध करण्यात आले असते तर या परिषदेची निंदा बरीचशी न्याय्य ठरली असती. निश्चितच, अशा प्रकारचे वर्तन म्हणजे विश्वासघातच ठरला असता. परंतु आमच्या या चळवळीवर मालक लिकांचे नियंत्रण असून ती मालकांना मदत करण्यासाठी आहे किंवा कामगारांच्या हिताचा नाश करण्यासाठी ती आहे, असे कोणी तरी म्हणू शकेल काय? आमच्या कोणत्याही टिकाकाराला हे सिद्ध करण्याचे मी आव्हान देत आहे.

त्यामुळे ही परिषद भरविल्याबद्दल खजील होण्याचे किंवा कोणाची माफी मागण्याचे काही कारण नाही. आपला हेतू व त्या मागील करणे पुरेशी न्याय्य आहेत. ही परिषद ज्यांना पसंत नाही अशा दलित वर्गांपैकीही एक-दोन व्यक्ती आहेत. परंतु त्यात नवीन असे काहीही नाही. त्यांच्यापैकी काही दुसऱ्याच्या हातातील बाहुले असून, पैसे चारून विरोधासाठी मुद्दाम तयार केलेले आहेत. तर काहींना पाठभ्रष्ट करण्यात आले आहे. दलित वर्ग हा स्वतः इतका दुर्बल आहे आणि कामगारांचे ऐक्य हा शब्दच इतका आकर्षक आहे की आणि त्यातही एखाद्या प्रभावकारी प्रचारकाच्या तोंडून तो ऐकण्यात आल्यामुळे आपल्या लोकांना त्याची भुरळ पडल्यास नवल नाही. परंतु असे लोक हे विसरतात की ज्या गटांमध्ये इतक्या परस्परविरोधी भावना व वृत्ती प्रत्येक बाबतीत आहेत आणि त्यातील एक गट दुसऱ्याच्या हिताविरोधी होईल अशा हक्कांचा व अधिकारांचा स्वतःसाठी जेथे दावा करीत आहेत तेथे कामगारांचे खरेखुरे ऐक्य राहूच शकत नाही. यातील ऐक्य म्हणजे दुर्बल व पिळलेल्या लोकांना फसविण्यासाठी केलेले केवळ एक ढोंग- देखावा आहे. त्याची या भोंदू लोकांकडून फुटपाड्या म्हणून निंदा काण्यात येते. फूट, खरेच! ती फूट असेलही. परंतु ती फूट अशी असेल जेथे खराखुरा विरोध व मतभेद अस्तित्वात आहे! हा विरोध निर्माण होण्याचे साधे कारण असे की कामगारांचा एक गट दुसऱ्या कामगारांच्या म्हणजे दलितवर्ग कामगारांच्या विरोधात आपणाला खास हक्क आहेत, असा दावा करतो. कोणालाही केवळ मातभेदासाठी मतभेद निर्माण करण्याची खुषी नसते. आम्ही केवळ आधीच असलेली फूट नजरेस आणून देण्याचा प्रयत्न करीत असून आमच्यावर सुरु असलेल्या अन्यायाला आळा घालून या फुटीला पायाबंध घालण्याचा आमचा प्रयत्न आहे

~~~

क्रमशः

येथून https://roundtableindia.co.in/Marathi/?p=1699

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे आपले संविधान-2 “ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू!” पृष्ठ क्र.७-९, कौशल्य प्रकाशन



Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*