भावेंचा ‘कासव’ आन आंबेडकरी चळवळीचा ‘पँथर’ रोहित वेमुला

प्रशांत उषा विजयकुमार

कासव हा 2017 मध्ये प्रदर्शित झालेला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा चित्रपट ज्याला केंद्र शासनाचा सुवर्णकमळ विजेता पुरस्कार मिळाला आहे. असो मला इथं पूर्ण चित्रपटावर चर्चा करायची नाहीये ती चर्चा अनेक ठिकाणी केली आहे ती जाऊन वाचू शकता. इथे मी फक्त कासव मधल्या रोहित वेमुलाच्या Visual वर आणि फेसबुकवर झालेल्या चर्चेवर चर्चा करतोय.

कासवमध्ये दोन वेळा रोहित वेमुलाचं Visual दिसलं आहे. पहिले जेव्हा निष/मानव (अलोक राजवाडे) डायरी उलगडतो तेव्हा आणि दुसरं जानकी (इरावती हर्षे) डायरी उलगडतात तेव्हा त्यात रोहितच्या इंग्लिश मधील पत्राचा भाग दिसतो की ”No one is responsible for my death’ म्हणजे माझ्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही. अर्ध्या तासाच्या आत एक वेळा नसून दोन वेळा रोहितचं हे Visual आपल्याला दिसून येतं म्हणजे भावेंचे Symbols काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. फ्रेम मध्ये कळत नकळत आलेल्या एक किंवा अनेक Visuals चा वापर करूनच पूर्ण सीनचा अर्थ तयार होतो हे आपल्याला ही माहीत आहे. जर त्यातून काही ठराविक विशिष्ट अर्थच तयार होत नाही तर ते चार-पाच सेकंदासाठीचे visual तिथं काय करत आहेत. निषच्या (अलोक राजवाडे) सामाजिक भावनिक परिघाचा भाग रोहित ने असणं हे त्याच्या नैराश्याशी रोहितची तुलना करण्यासारखं नाही तर काय आहे ? आता रोहितची संस्थात्मक हत्या झाली आहे हे देखील आपण मान्य करणार नाहीत का ? रोहीत वेमुला हे मुळातच एक खूप पॉवरफुल Visual आहे आणि ते तिथं त्याच्या सामाजिक भावनिक परिघाचा भाग असणं हे निषच्या (अलोक राजवाडे) नैराश्येशी रोहीत ला जोडणार आहे हा साधा सरळ त्या फ्रेमचा अर्थ आहे.

आता हा मुद्दा चित्रपटापुरता राहिला नसून तो फेसबुकवर चर्चेचा भाग बनला त्यातील ठरावीक मुद्द्यावर इथं बोलत आहे. एक कुणीतरी चित्रपट समीक्षक आहे ज्याने फेसबुकवरील ह्या चर्चेत उडी घेतली. माझं काय म्हणणं आहे आपण मत मांडा ना पण पोस्टवर कमेंट करायलाच सुरुवात कुठून केली की ‘ह्यांना सिनेमाची भाषा कळते का’ आता मला सांगा की लोक चित्रसाक्षर व्हावेत ह्या दृष्टीने समीक्षक हा प्रेक्षक आणि चित्रपट ह्यांच्यातील दुवा म्हणून काम करतो ना मग त्याने ती भाषा समजावून सांगत असताना डायरेक ‘ह्यांना सिनेमाची भाषा कळते का’ हे बोलणं पटण्यासारखं नाही ना. मला इथं एक किस्सा आठवतोय पुण्यातील पुरोगामी साहित्यवरील डिबेटमधला, महात्मा फुले साहित्य लिखाण करत असताना विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी महात्मा फुल्यांवर टीका केली होती ”आपण जे साहित्य लिहलं आहे त्याच्या व्याकरणाचा अभ्यास करा मग आमच्यावर टीका करा” आता ह्या चित्रपट समीक्षकांच म्हणणं चिपळूणकर यांच्यासारख ऐकू येत मग असं म्हणल तर चालेल का ? मुद्दा हा आहे की प्रत्येक जण चित्रपटाची भाषा शिकण्यासाठी पुण्यातल्या पेठेत भावे, कुलकर्णी यांच्या चित्रपटाची ‘रसस्वाद’ कार्यशाळा नाही करत तो त्याच्या त्याच्या समजेनुसार चित्रपटाची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आंबेडकरी तरुणांना कासव ही फिल्म जशी समजली तसे ते व्यक्त होणार ना आता त्यांनी चित्रपट कसा पाहावा ह्या स्वानुभवात पण आपण लुडबुड करणार असाल तर ते कितपत बरोबर आहे बघा बॉ.

रोहित वेमुला हे आंबेडकरी चळवळीचा खूप पॉवरफुल जिवंत Visual आहे आणि ते प्रत्येक आंबेडकरवाद्याला प्रेरणा देणारं आहे. ज्यांना रोहित समजणार नाही त्यांना तोपर्यंत कासवमधील ते Visual रोहितचं विकृतीकरण करणार आहे हे समजणार नाही. ह्याच्या थोडसं खोलात गेल्यावर हेच समजून येऊ शकतं की ह्या सवर्ण पुरोगामी फिल्ममेकर्स ने अशी हजारो Visuals त्यांच्या चित्रपटांमध्ये Data म्हणून उघडी, नागडी, कळकट, मळकट, नेहमी तोंडात शिव्या असणारे दलित म्हणून मोफत वापरून बामनी सौन्दर्यशास्त्र उभा केलं आहे त्याला जर आंबेडकरी तरुणांनी चॅलेंज केलं तर हे सवर्ण पुरोगामी फिल्ममेकरच्या अनैसर्गिक अमानवीय कृत्यासाठी चॅलेंज करणं हे नैसर्गिकचं आहे. यासाठी पोटात का दुखाव ?

शेवटी हा विषय रोहितच्या चार पाच सेकंदाच्या Visual पुरता मर्यादित नसून “ब्राह्मणी सौन्दर्यशास्त्र आणि नवायना आंबेडकरी सौन्दर्यशास्त्राचा” एक गंभीर तात्विक प्रश्न आहे. आता जोपर्यंत कासवाच्या चालीला पँथरच्या छलांगी चा आवाका समजणार नाय तोपर्यंत चर्चा तर होतच राहील नाय का ?

प्रशांत उषा विजयकुमार

लेखक आयआयटी मुंबई येथील चित्रपट संशोधक विद्यार्थी आहेत, तसेच TISS चे येथील मीडिया आणि कल्चरल चे पदवीधर आहेत. भारतीय सिनेमातील शोषित वर्गाचे चित्रण हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*