गुणवंत सरपाते
“दलित पितृसत्ते” विरुद्ध एल्गार पुकारून पहिल्या पिढीतल्या लिहणाऱ्या बोलणाऱ्या ‘दलित पोरांवर’ चराचरा सुरी चालवणाऱ्या तमाम बामण-सवर्ण बाया आणी बापड्यांना शुभेच्छा!!
देवळीतल्या वेगळ्या कपांना पण मोक्कार शुभेच्छा बरं. पाणवठ्यावर कळशीभर पाणी घ्यायला गेलं तर,’ पाणी बाटवतो का रं म्हारड्या’ म्हणत पदर खेसनाऱ्या प्रत्येक नऊवारीला शुभेच्छा. स्कॉलरशीपचा फॉर्म भरताना वर्गात आपल्याकडं पाहत आरक्षणवाले, फुकटे म्हणत फिदीफिदी हसणाऱ्या प्रत्येक गडगडीत हास्याला शुभेच्छा. बाबासाहेबांचा फोटू पाहून नाक मुरडत तळतळ जळणाऱ्या प्रत्येक घाऱ्या डोळ्यांना शुभेच्छा. भीम जयंतीच्या दिवशी इथल्या शोषित समूहाच्या माणूसपणाच्या असर्शनला ‘शी! हलकट धांगडधिंगा करणारी लोकं’ म्हणत हिनवनाऱ्या नाजूक मनगटांना शुभेच्छा.
ब्राह्मणी जातव्यवस्थेनं सगळी संसाधनं नाकारली. जगणं विस्थापित केलं, म्हणून रानात वीळ्यानं नागरमोथा कापीत मजूरीवर पोट भरणाऱ्या प्रत्येक कपूर, रॉय, चोप्रा, गुप्ता वैगरे मायमाऊल्यांना शुभेच्छा. गुडघ्या इतक्या चिखलात केळीची झाडं डोईवर वाहत पैपे जमा करून लेकराला शिकवणाऱ्या सरदेसाई, परांजपे, मेहता ह्या माऊल्यांना शुभेच्छा. रस्त्यावर झाडू मारण्यापासून ते सार्वजनिक संडास साफ करणाऱ्या प्रत्येक कुलकर्णी, जोशी, अभ्यंकरला पण खूप शुभेच्छा!
पिढ्यानपिढ्या पासून इतरांचं सारं अवकाश हिसकावून त्यांना दुय्यम मनुष्य मानून त्यांच्या रक्ताळलेल्या शोषणावर, आयत्या भांडवलावर आपलं आयुष्य जगणाऱ्या शोषक वर्गातल्या त्या प्रत्येक स्त्री/पुरुषाला पण शुभेच्छा. आणी ह्याच शोषक वर्गातून येऊन ज्यांच्या शोषणावर आपण उभे आहोत अश्यांचं माणूसपण मोजून ठरवणाऱ्या शर्मिला रेगे, अरुंधती रॉय पासून ते तमाम विद्यापीठीय अकॅडमीक माऊल्यांना शुभेच्छा.
माझ्या वस्तीतल्या प्रत्येक स्त्री पुरुषांना रेशीयलाईज करत त्यांच्या मानवी अनुभवांना थेट ‘दलित पितृसत्ताक’ ‘सबह्युमन’ ठरवणाऱ्या प्रत्येक जेएनयूछाप रिसर्च पेपरला देखील शुभेच्छा. इथल्या प्रत्येक आंबेडकरी तरुणांच्या अभिव्यक्तीला, एक्सप्रेशन्सला आपल्या ‘प्रागतिक चेकलिस्ट’ मधून पडताळून पाहताना जर ती मुलं त्यांनी ‘आखून दिलेल्या’ नॅरेटीव मध्ये बोलत नसतील तर त्यांना थेट तुच्छतावादी, शुद्धतावादी, आयडेंटिटी पॉलटिक्स म्हणत चवताळून अंगावर येणाऱ्या प्रत्येक सवर्ण हिंदूना शुभेच्छा.
‘गावकुसातून बाहेर पडून ह्यांची मुलं लिहुच कसं शकतात’ ह्या आदिम विटाळातून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कमेंटला, ट्रोलिंगला, फिरवल्या जाणाऱ्या स्क्रीनशॉट्सला शुभेच्छा. जात , वर्ग आणी लिंग हे आयसोलेट आणी वेगवेगळयं अशी निव्वळ कातडीबचाव मांडणी करून इथल्या धर्माधिष्ठित शोषक वर्गाला थेट मोकाट सोडणाऱ्या प्रत्येक विचारवंताला शुभेच्छा. दलित पुरुष हा ब्राह्मण पुरुषाच्या इतकाचं शोषक आहे ‘कारण तो बायोलॉजीकली पुरुष आहे’ ह्या अफाट थेअरीला पण शुभेच्छा. तर ह्या सगळ्यांना आज तमाम शुभेच्छा. आता तमाम बामण-सवर्ण बाया आणि बापड्यानी मिळुन जुलुमी ‘दलित पितृसत्ते’ विरुद्ध एल्गार पुकरायचाय.
गुणवंत सरपाते
लेखक मूळचे नांदेड येथील रहिवासी असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
- ब्राह्मण-सवर्णांचा तथाकथित फॅसिझम विरुद्ध लढा : एक ढोंग - May 21, 2022
- त्याला प्रिविलेज नाही म्हणत भावड्या, शोषण असत ते! - June 8, 2021
- शुभेच्छा! शुभेच्छा!! शुभेच्छा!!! - April 29, 2021
Leave a Reply