भावे मावशींनी कोणाला निर्दोष दाखवण्याचा अट्टाहास केला?

पूजा वसंत ढवळे

भावे मावशीचा ‘कासव’ आणि त्यातील विकृत करून दाखवला गेलेला रोहित वेमुलाचा चुकीचा संदर्भ…

सुमित्रा मावशींचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कासव सिनेमा अगदी अलीकडेच पाहण्यात आला. तो यासाठी पहिला की भावे मावशीचं हिरो-वर्शीप माझ्या डोक्यावर फार पूर्वी पासून गारूड घालून होतं…
म्हणून परवा मावशी गेल्याची बातमी वाचून हळहळ वाटली आणि महत्वाची व्यक्ती समाजाने गमावल्याच दुःखही झालं.

पण माझ्या त्यांच्या विषयीच्या भावना इतक्या तात्पुरत्या असतील अशी स्वतः ला सुद्धा कल्पना नव्हती इतकं हे कटू सत्य. कासव पाहून मावशीची माझ्या मनात असलेली प्रतिमा पार उतरून तर गेलीच शिवाय मलिनही झाली.

कासव पाहण्याच्या आधी भावे बाई म्हणजे फार पुरोगामी वगैरे वाटायच्या, आपल्याच काय एकूणच समाजातील प्रत्येक घटकांबद्दल त्यांना विशेष कळवळा आहे असं त्यांचे चित्रपट पाहून वाटायचं. शोषित, उपेक्षित, गरीब लोकाच्या जाणिवा- नेणीवांची अचूक नाडी त्यांना माहीत असते आणि त्या आपल्या सिनेमाच्या माध्यमातून त्यावर अचूक आणि प्रामाणिक भाष्य करतात ही माझी कासव पाहण्यापूर्वीची समज..

पण समजच ती .. तिला तडे जायला कितीसा वेळ लागतो..?

मावशीच्या पुरोगामी विचारांचा बुरखा ओळखायला मला फारसा वेळ लागला नाही हे महत्वाचं.
त्यांनी त्यांच्या कासव सिनेमात अवघ्या काही सेकंदाच्या सीन मधे जे रोहित वेमुलाच विकृतीकरण करून दाखवलंय ते पाहिल्यावर समाजातील कुठल्याही स्तरातील वैचारिक माणसाचा माथा गरगरल्या शिवाय राहणार नाही.

एकूणच सिनेमाचा आशय ज्या मानसिक, नैराश्यग्रस्त तरुणावर केंद्रित केलेला आहे, त्याचा आणि रोहितच्या स्थितीचा अप्रत्यक्षपणे सहसंबंध भावे मावशी पुरोगामीपणाचा बुरखा लपेटून प्रेक्षकांना दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. पण त्यांचा हा खोटारडेपणा जागरूक लोकांच्या बारीक अभ्यासू नजरा लगेच उघडा पाडतात.

सिनेमात दाखवलं आहे की मानव/निश ( आलोक राजवाडे) हा प्रचंड नैराश्यग्रस्त आणि मानसिक दडपणाखाली आहे की ज्याने एक वेळ अयशस्वी सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे, ज्यातून तो इच्छा नसतानाही वाचतो.
सिनेमातील या नटाला त्याच्या जिवंत असण्यामागील कारण माहित नाही, त्याला त्याने जिवंत का असलं पाहिजे याबद्दलचा उद्देश माहिती नाही, तो धेय्यहीन आणि कसल्याही इच्छा, आकांक्षा नसलेला हा तरुण जीवनास कंटाळलेल्या आवस्थेत दाखवला आहे, प्रचंड रागीट, असंयमी, निराशावादी आणि ज्याने आपलं शिक्षण अर्धवट सोडलेले आहे.
काही वर्षांपूर्वी तो नशेच्याही आहारी गेला होता असं तो स्वतः सिनेमात सांगतो. आणि त्याचं अंतिम धेय्य म्हणजे मृत्यु त्याला जीवनापेक्षा मृत्यू जवळचा वाटतो, त्याला कोणाशीच काही देणे घेणे नाही, असा हा मृत्युपंथाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या निराश तरुणाभोवती चित्रपटाचा आशय रिंगण घालत पुढे जातो. सिनेमात तो तरुण आपल्या हाताची नस कापून घेण्यापूर्वी त्याची डायरी चाळत असतो, त्यात एका इंग्लिश न्यूज पेपरच कात्रण त्याने घडी घालून ठेवलेलं असतं ज्यावर रोहितचा प्रचंड आशावादी फोटो आणि स्पष्ट शब्दातील बातमीचा भाग असलेलं त्याचं पत्र दिसतंं ज्याची headline “No one is responsible for my death” अशी असते. म्हणजे सिनेमातील तो सीन अप्रत्यक्षपणे असं भाष्य करतो की.. मानव/निश ला रोहित कुठे तरी त्याच्या जवळचा वाटतो म्हणजे ज्या मानसिक नैराश्यग्रस्त स्थितीमध्ये मानव आहे त्याच स्थितीत पूर्वी रोहित होता आणि म्हणूनच त्याने आत्महत्या केली म्हणून तो मानवला जवळचा वाटतो..

एका बाजूला सिनेमात सुखासुखी नैराश्यात लोटला गेलेला तरुण चित्रित केला गेला आहे ज्याच्याकडे पैसा,सुखसोयी सगळं काही आहे आणि दुसऱ्या बाजूला रोहित वेमुला जो गरिबीत शिक्षण घेत, विद्यापीठाच्या प्रशासनाविरुद्ध आंबेडकरी विचारधारेच्या साह्याने संघर्ष करत असताना संस्थात्मक हत्येचा बळी ठरला त्याचा संदर्भ जोडला आहे.
जो की हा संदर्भ कुठल्याच अँगल ने चित्रपटाच्या आशयाशी मॅच होत नाही.
एक तर ही जुळवाजुळव करून भावे मावशी आणि टीम असं सिद्ध करू पाहताहेत की रोहितची हत्या म्हणजे त्याने नैराश्याच्या सावटाखाली उचललेलं चुकीचं पाऊल आहे.. आणि याला जबाबदार कोणीच नाही. म्हणजे कोणालातरी यातून निर्दोष दाखवण्याचा त्यांचा अट्टाहास.

दुसरी गोष्ट म्हणजे त्या असं बिंबवू पाहताहेत की आत्महत्या करणाऱ्यांना पण आदर्श असतात आणि ते त्यांच्या सारख्याच मानसिक स्थितीतून जीव गमावलेल्या व्यक्तींना आपले आदर्श मानतात आणि पुढे तेही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.
किती चुकीचा पायंडा बिंबावण्याचा प्रयत्न केला मावशीने पण अनेकांच्या लक्षात ते आलचं शेवटी.

आता आपण दुसरी बाजू म्हणजेच रोहितचा वास्तव संदर्भ पडताळून पाहू.
रोहित गरिबीतून उच्च शिक्षणापर्यंत पोहचलेला विद्यार्थी, त्याची काही धेय्य होती. तो एक अतिशय हुशार,होतकरू, स्कॉलर संशोधक स्टुडंट् होता.
त्याला अन्यायाबद्दल चिड होती आणि त्याच्याच विरुद्ध तो गुरगुरत होता. पण भावे मावशीने जो रोहित आणि मानवचा संबंध जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतो त्यात कुठेही दोघांच्या तऱ्हा,स्वभाव मॅच होत नाहीत. उलट दोघामधील विरोधाभासच प्रकर्षाने ठळक लक्षात येतो. त्यामुळे भावे मावशी सिद्ध करू पाहताहेत ती फसवी विचारधारा जागरूक लोकांच्या नजरा लवकर हेरतात. त्यातूनच प्रस्थापित नकली पुरोगामी वर्गाची आंबेडकरी विचार विरोधी मानसिकता चटकन दिसते. मुळात भावे मावशींना काय सिद्ध करायचंय आणि ते कशासाठी ? हे आपण स्पष्टपणे जाणतोच. त्यांचा सुशांत आत्महत्या करतो तेंव्हा तो म्हणजे घराणेशाहीचा बळी असतो आणि दुसऱ्याचा रोहित मरतो तेंव्हा तो म्हणजे नैराश्याच्या सावटाखाली आत्महत्येसारख्या वाटेने चुकीचं उचललेलं पाऊल.
त्यांच्या abnormal बाब्याचं ते हवं तेवढं उद्दातिकरण करतात आणि दुसऱ्यांच्या कार्ट्याचं विकृतीकरण.

वाह! रे तुमचं फसवं पुरोगामी असणं …

आपला समाज ह्या अश्या फसव्या पुरोगामी ideology ला
चटकन डोक्यावर घेतो.. त्यापेक्षा डोक्याने घेतलं तर डोळ्यावरील झापड लवकर दूर सरता येईल आणि कासव च्या माध्यमातून आपल्यावर नकळत कुठलीही विचारधारा ध्रुवीकरण करून पेरली जाणार नाही हे नि:शंक.

शेवटी वास्तव ते वास्तवच असतं.

पूजा वसंत ढवळे

लेखिका नांदेड येथील रहिवासी असून वाणिज्य शाखेच्या स्टुडंट असून कवियित्री आहेत.

1 Comment

  1. या पाखंडी लोकांना उघडं कसं करायचं ही तुझी लेखणी बरोबर जाणते.खरं आणि वास्तविक यावर योग्य तो समाचार घेतलाय तू,यांचा कासव असू दे नाहीतर ससा कि आणखी काही असूदे तू लिहिल्याप्रमाणे शेवटी वास्तव ते वास्तवच असतं.👍

Leave a Reply

Your email address will not be published.


*