अमोल कदम
गेल्या वर्षी याच दिवशी आम्ही टू व्हिलर वरून गावी जाण्यास निघालो.मुंबईत मरु म्हणून नाही तर गावी वडील जास्त आजारी असल्यामुळे, ४०० किलोमीटरचा पल्ला पहिल्यांदाच टू व्हिलरने जाण्याचा निर्णय घेतला. कारण भाड्याची गाडी करून जाणे परवडणारे नव्हते.सगळ्यांप्रमाणे मला ही जॉबलेस चा फटका बसला होता.त्यात ते इ- पास वगैरे.आणि गावावरून वाजणारे फोन.या काळजीने आम्ही टू व्हिलरलाच किक मारली.
प्रचंड ऊन,घाट रस्ते,रस्त्याने पायी चालणारे लोकं,आम्ही पाहत होतो.त्यात चेकिंग,मग तालुक्याला रिपोर्टिंग करून आम्ही गावच्या दिशेने वळलो.
डोळ्यासमोर आपली माणसं दिसू लागली,आपल्याला गावात पहिलं कोण भेटेल..? कुणाची आई आपल्या मुबंईत असलेल्या मुलांची खुशाली विचारेल का..? कुणाचा भाऊ,कुणाचा चुलता, कुणाची बहीण असे सारे,नेहमीप्रमाणे विचारपूस करतील का.? खरतर मी कोरोनाला क्षणभरासाठी विसरून गेलो होतो. मला आपल्या माणसांची माणुसकी दिसत होती.
पण असं काही घडलं नाही.महिना दोन महिन्यांनी असं समजलं की, आम्ही गावी येणार म्हणून वाडीतील माणसं आधीच कोमात गेली होती.इतकी भीती लोकांच्या मनात घालणारे ते कोण होते..? समाजाचे प्रबोधन करण्या ऐवजी त्यांना मृत्यूचे भय दाखविणारे शिकलेले लोकं किती धन्य होते.त्यात ते स्वयंसेवक वगैरे..! चक्क माझी गाडी पार्क करण्या वरून ही थोडा कुरकुर झाली.आमचं पूर्ण लक्ष वडिलांकडे असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या. सरकारी नियमानुसार १४ दिवस आम्ही कुठल्याही माणसाला त्रास न देता विलगीकरनात राहिलो.घराचा उंबरठा ही ओलांडला नाही.१४ दिवस वडिलांकडे फक्त पाहत राहिलो.
मरणाची भीती,नियमांची दादागिरी,कोरोना विषयीच्या अफवा,उडालेला गोंधळ या सगळ्यात महत्त्वाची होती ती म्हणजे सामाजिक सलोख्याची बांधिलकी.आता ती जोपासली गेली की नाही याची खातरजमा प्रत्येकाने केलेली बरी.
आम्ही फ्री झाल्यावर दवाखाण्याच्या चक्कर सुरू झाल्या.आधी प्रायव्हेट नंतर रत्नागिरी सिव्हिल.हळूहळू थोडं वातावरण निवळत आलं होतं.या सगळ्या धावपळीत खूप काही शिकता आलं.कोकणी माणूस फणसाचा गरा वगैरे हा निव्वळ एक समज आहे हे लक्षात आले.प्रायव्हेट डॉक्टरांची लूट मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली.आणि सिव्हिल मध्ये गेल्यावर तर आमची तारे वरची कसरतच झाली.
आपण किती आंधळे आहोत याची जाणीव झाली.आरोग्यव्यवस्था किती डबघाईला आली आहे. याकडे कुणाचचं लक्ष नाहीये. कोकणच्या निसर्गावर उड्या मारणारे आम्ही किती बेफिकीर आहोत हे बघा.
आज गावचे फोन येतात,अमुक अमुक गावात इतके रुग्ण सापडले,मधेच कुणी नातेवाईक फोन करतो अरे तो मामा/काका/मावशी/आजी/भाऊ/ वारला रे..! अधिक माहिती विचारपूस केल्यावर समजते की व्हेंटिलेटर उपलब्द्ध नव्हता.गावातून गाडीच भेटली नाही,उशीर झाला वगैरे.अशी परिस्थिती खरचं पाहवत नाही आहे.सगळी कडे भयानक वातावरण अशातच काही बिनडोक करोना नाही वगैरे संभ्रम पसरवत आहेत.आज गावच्या लोकांची खुप काळजी वाटतेय. म्हणजे एखाद्याला इमरर्जन्सी असेल तर तो योग्य वेळी उपचारासाठी पोचेल की नाही..? आणि जर पोचलाच तर त्याला हव्या असणाऱ्या आरोग्यसुविधा आपल्या कडे मिळतील की नाही..? ही गोष्ट जीवाला खाते.
काही चांगल्या गोष्टी ही नक्कीच झाल्या असतील पण हातावर मोजण्या इतक्या आहेत.
स्ट्रीट लाईट लागली,आणि पानधीची पाकाडी झाली की लोकांना वाटतं किती विकास झाला आमचा.त्यात चाकरमानी खूप शहाणे असतात.मेवणीच्या लग्नाला,साडुच्या पोराच्या बारशाला,मुंबईतून थेट गोव्याला फिरायला,शिमग्याला,पालकी नाचवायला, क्रिकेटच्या मॅची भरावयला यांना बरोबर टाइम मिळतो.पण ग्रामपंचायतीत ग्रामसभेला कधीच कोणीं जात नाही.कारण काय तर वेळ नाही.लॉकडाऊन मध्ये ज्यांच्या कडे गाड्या होत्या त्यांनी ही आपली माणुसकी विसरून आवाच्या सव्वा भाडं लावलेलं मी पाहिलं आहे.मग त्याच ठिकाणी गावात एक अंबुलन्स असेल तर…?
पुढे जाऊन विचार केला तर रत्नागिरीत उपचार नाही जमला तर सरळ डेरवण किंवा मग कोल्हापूर किंवा मुंबई अशी रुग्णाची व नातेवाईकांची फरफट होते.कुणी हे जर अनुभवलं असेल तर त्यांचं दुःख तेच जाणतील. एक भव्य दिव्य सर्वसोयी युक्त मोठी हॉस्पिटल कधी निर्माण होणार..?
आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी फक्त स्ट्रीट लाईट, पाकाडी,आणि 10 वर्षातून एकदा लाल मातीवर डांबर टाकायला आहेत काय.?
तस असेल तर आपण आपल्या बोटाला शाई लावताना फक्त चांगली आरोग्यसेवा,योग्य दळणवळण आणि शिकलेला सामाजिक जाणिवेचा माणूसच निवडू ही वेळ आता आली आहे. फक्त हे दिवस आपण विसरता कामा नये.
गेल्या वर्षी याच दिवसात वडील आमची खुशाली घेण्यासाठी फोन करायचे.आज ते नाही आहेत.खूपदा मी त्यांचा नंबर लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो.त्यांच आजारपण मला खूप गोष्टी शिकवुन गेलं.
अमोल कदम
लेखक गीतकार – कवी असून खालील काही लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली आहेत.
भीमराव एकच राजा अल्बम
भीम जयंती १२५
बाबासाहेब जिंदाबाद
क्रांतिचा नारा हा जयभीम
सम्राट तू अशोका

Leave a Reply