नर्मदेकाठी आदिवासी पाड्यातील एक अनुभव

सागर धनेधर

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या युगात असंख्य सुख सुविधांनी संपन्न जीवन आपण जगत आहोत. पण आजही अनेक असे गाव, पाडे आहेत ज्या ठिकाणी मोबाईल तर सोडाच साधं रस्त्याची सुविधा नाही. दळणवळण, आरोग्य, रोजगार, टेलिव्हिजन, नेटवर्क, रेशन, बाजार आदी सर्व सुविधांचा अभाव असणाऱ्या गावाला भेट देण्याची संधी मिळाली.

पिंपळचौक हे सातपुडा पर्वत रांगेत वसलेले महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले नर्मदा नदीच्या तीरावरील गाव. या गावातील परिस्थितीचा अनुभव घेण्यासाठी आम्ही प्रवास सुरु केला. धडगाव तालुक्यापासून २ तास बाइक वर आल्यानंतर शेलदा या गावापर्यंत पोचलो. पुढील प्रवास पायी असल्याने डोंगर – दरे, नदी- नाले, शेत ओलांडत जवळपास २-३ तासानंतर पिंपळचौक या गावी गेलो. या ठिकाणी विखुरलेली वस्ती असल्याने घरे दूरवर पसरली. अचानक कोणी आजारी पडलं तर दवाखान्यात जाण्याचे दुसरे साधन नाही. पेशंट ला घेऊन जायचे असेल तर बोटीमार्गे किंवा झोपण्याच्या बाजेवर टाकून ४ ते ५ लोकांनी शेजारच्या गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी जवळपास २ तासांचा पायी प्रवास. त्यातही जो काही पायी प्रवास करायचा तो दिवसाच.रात्री जाणे म्हणजे जंगली प्राण्यांचा आहार होण्यासारखे आहे, अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्यात. शिक्षणाचा विचार केला तर शिक्षकांना येणे म्हणजे जीव मुठीत घालून येणे आहे
शिक्षकांच्या मते, आम्ही या रस्त्याने पायी जातोय खरं पण पुन्हा कधी माघारी येऊ शकू याचा भरवसा नाही. ऊन, वारा, पाऊस ह्या मध्ये संपर्क करण्याचे कोणतेही साधन नसल्याने शिक्षक काही दिवस याच ठिकाणी मुक्काम करून अध्यापनाचे काम करत असतात.

याठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या घरी देखील जाता आलं. अतिशय निरागस निरागस बालपण अनुभवलं, लाजाळू स्वभाव हे या
ठिकाणच्या मुलांची जन्मजात सवय आहे, बाहेर गावाहून कोणी व्यक्ती आले, तर खूप आशेने त्यांच्याकडे बघत कारण याठिकाणी अशा व्यक्तींची संख्या खूपच कमी. या पाड्यावरील मुला-मुलींमध्ये संघर्ष करण्याची वृत्ती बालपणापासूनच तयार होते. संपूर्ण डोंगर-दर्‍या, नदी अनवाणी पायाने चालणारे हे बालके. खेळण्याची साहित्य उपलब्ध नसल्याने जंगलातील संसाधनांचा वापर करून स्वतः साहित्य तयार करून खेळतात. यात दगडी गोट्या, बांबूची रिंग आदी.

एक महिला तर उंच डोंगरावरून दोन पाण्याचे हंडे घेऊन घराकडे येत होती. रस्ता असा होता की, आपण काठी घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही. शेजारी मोठी दरी थोडा जरी तोल गेला तर खाली जाण्याची दाट शक्यता. इतकी काटकता या बालक, आणि इतर लोकांमध्ये आहे. हाच संघर्ष या लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा देते.

या ठिकाणी काही पालकांसोबत देखील चर्चा केली. रोजगारचा विचार केला तर शेती, नदीवरील मासेमारी यावर आपले जीवन जगतात. याठिकाणी दवाखाने, मेडिकल, बाजार, किराणा दुकान हे काहीच नाही.तरीही हे लोक मिळेल त्या साहित्यातून समायोजन करून आपली उपजीविका भागवत असतात.

असा दिवसभरात एकंदरीत परिस्थितीचा अनुभव घेऊन आम्ही पुन्हा पायी परतण्याचा प्रवास केला. मनात अनेक विचारांची कालवाकालव होत होती की, आजही असंख्य अडचणीने
समृद्ध हा परिसर येथील लोक कसलीही अपेक्षा न करता आपली संस्कृती जपत जंगलामध्ये वास्तव्य करत आहेत.

या सर्वांच्या जीवन जगण्याच्या जिद्दीला सलाम

सागर धनेधर

लेखक मूळचे मु.पो. हरेगाव ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर. येथील रहिवासी असून त्यांचं शिक्षण MSW झाले आहे. रायगड, औरंगाबाद व नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात वेगवेगळ्या संस्थेत काम केले आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात तालुका समन्वयक म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. दुर्बल वंचित आदिवासी पाड्यावर नेमकेपणाने शिक्षणाच्या अडचणी समजून घेऊन काम करण्याचे प्रयत्न करत आहेत.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*