बुद्ध पौर्णिमेचा चंद्र: काळाचे चक्र की सरळ रेष?

गौरव सोमवंशी

बुद्ध पौर्णिमा..

अनेक वर्षांअगोदर आलेली पौर्णिमा, तोच चंद्र, तसाच दिवस. या गोष्टींचा आज आपण अनुभव घेत असतांना, एक विचार येतो की हा तोच अनुभव आहे का जो अगोदर देखील असाच्या असाच येऊन गेला आहे? आज आणि आजसारख्या काही दिवसांचा उत्सव साजरा करतांना, आपण पुन्हा एक चक्र फिरल्याप्रमाणे परत तिथेच येऊन स्थिरावतो का? हा काहीसा साधा आणि काहीसा विक्षिप्त विचार मला महत्वाचा वाटतो. यावरून काळाकडे कसं पाहायचं हे ठरतं.

पुनरावृत्ती होणं, काळाचं चक्र गरगर फिरून परत अगोदरच्या जागेवर येणं, हे सगळे विचार करणं आपल्यासाठी साहजिकच म्हणावं लागेल कारण ही पृथ्वी फिरतेच तशी (म्हणजे वरवर तस वाटत आपल्याला, पुढे बघू)… स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरुन आपल्याला दिवस-रात्र आणि ऋतूंचा अनुभव मिळतो. आता जसा दिवस सुरू आहे, तसंच २४ तासांनी दिसेल कारण पृथ्वी गोल फिरून पुन्हा तशीच दिसेल. आणि आज जो ऋतू किंवा हवामान आहे आहे, तोच परत येणार जेव्हा आपण सूर्याभोवती चक्कर मारून वापस जागेवर येणार. या चक्रामुळे आपण पण तसंच शिकतो, की जितकं मागे नजर टाकता येईल तितकी टाकून आपण पुढे काय करायचं ठरवतो.

पण मग..खरच असं आहे का? सर्वप्रथम, पृथ्वीचंच पाहिलं तर दिसतं की पृथ्वी स्वतः परत कधी त्याच “जागेवर” येते का? जसं आपण सूर्याभोवती गिरक्या घालतो, तसंच हा सूर्य देखील तर आकाशगंगेच्या केंद्रबिंदूभोवती फिरतोच की. आणि हे सगळं काही “संथ गतीने” वगैरे होत नाही. तासाला ८ लाख किलोमीटर या वेगाने सूर्य परिभ्रमण करतो, आणि आपल्या सोबत अख्ख्याच्या-अख्ख्या सौर्यमालेला ओढत नेतो. आणि आपली ही आकाशगंगा, म्हणजे आपल्या सुर्यासारख्या करोडो ताऱ्यांचा समूह, ही देखील कुठे स्थिरावली आहे? ती स्वतः शेजारच्या ‘अँड्रॉमेडा’ नामक आपल्या आकाशगंगे सारख्याच तारकामंडळाला धडकण्यासाठी प्रचंड वेगाने मार्गक्रमण करतीये. आपली अख्खी आकाशगंगाच आपल्या सूर्याला आणि आपल्याला घेऊन दर तासाला जवळपास १० लाख किलोमीटर या वेगाने घोडदौड करतीये. धडकण्यासाठी अब्जावधी वर्ष बाकी आहेत म्हणून लगेच ती तिसरीच चिंता नको. पण आकाशगंगा आणि अँड्रॉमेडा हे तर दोनच तारकामंडळ झाले, अश्या “लोकल ग्रुप” मधील आजूबाजूचे समूह मिळून देखील या विश्वात एकत्र मिळून स्वतंत्र दिशेने सगळ्यांना घेऊन जात आहे.

म्हणजे? म्हणजे की मानवजातीच्या उगमापासून आजपर्यंत आपण एकदा का विश्वात एका जागेवर जेव्हा येऊन पोचतो, तेव्हा वैश्विक पातळीवर पाहिलं तर आपण परत त्याच जागेवर कधीही परत जात नाही. या मार्गातील प्रत्येक क्षण, जागा, आणि परिस्थिती ही अद्वितीयच आहे. आयुष्याने तुम्हाला काहीही नसेल दिलं तरीदेखील विना-तिकीट तुम्हाला अंतरिक्षाची अद्वितीय सहल घडवून दिली आहे, हे मात्र नक्की.

मग.. आजचा हा बुद्ध पौर्णिमेचा चंद्र हा देखील नवीन जागेवरून आपल्याला भेटतोय. आपण पण प्रत्येक क्षणी विश्वातील नवीन जागा पादाक्रांत करतो जी आपल्या अगोदर कोणीही केली नाही, आणि इथून पुढे कोणी नेमकी तीच जागा व्यापणार नाहीच.

मग मी नेमका हाच विचार करतो, की हा काळ आणि हे अस्तित्व एका चक्राप्रमाणे असावं की एका अविरत चालणाऱ्या रेषेप्रमाणे जी कधीच मागे वळून पाहत नाही?

इथे मार्क ट्वेन यांचं एक वाक्य मनात घर करून बसलंय, की, इतिहासाची कधीच पुनरावृत्ती होत नसली पण इतिहासाला एक “रिदम” म्हणजेच एक ताल अधूनमधून येत राहते. यमक जुळत असतांना जसं शब्दांची पुनरावृत्ती करायची गरज नाही, फक्त ताल जुळायला हवी, तसंच. हे एकदा कळू लागलं की आपण ठरवू शकतो की नेमकं इतिहासातून काय, कसं आणि किती शिकायचं. गोष्टी जसाच्या तश्या कॉपी-पेस्ट करायच्या का? की हे बघायचं की नेमकं त्यांची अद्वितीय परिस्थिती अगोदर येऊन गेलेल्यानी कशी हाताळली, आणि हे सोबत घेऊन, सोबत स्वतः नवीन शिकायची जागा मोकळी ठेऊन, आपल्या आजच्या परिस्थितीला सामोरे जायचं कसं..

यावरून हे देखील कळतं की मी जे शिकलोय आणि शिकणार आहे, त्याला नंतर येणाऱ्या पिढीसमोर कश्या प्रकारे सोपवायचं… जेणेकरून सोपवायच रूपांतर हे “थोपवण्यात” होणार नाही.

हाच विचार आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मनात घर करून असेल… हेच माझं बुद्धांना अभिवादन.

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

1 Comment

  1. सूक्ष्म कणाने केलेला विचार अती सूक्ष्म मांडणी पण खूप कठीण वाटते… समजायला

Leave a Reply

Your email address will not be published.


*