सुरेखा पैठणे

मानवीय सुखदुःख भोगून, करूणेच्या परमसीमा स्पर्शून ज्या महामानवांचे आयुष्य आज आदर्शवत झाले त्यात माता रमाई ही येते. पोटच्या चारही लेकरांना मातीआड लोटून जी साऱ्या उपेक्षितांची माय झाली, जिने संसार नावाचा गड खऱ्या अर्थाने एकटीने राखला अन मूर्तिमंत त्यागाचं लेणं लेऊन जी आपल्यातून निघून गेली ती आमची माता रमाई … अवघे ३७ वर्षाच्या आयुष्यात एकामागोमाग एक आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मरणात खचलेली रमाई स्वतः मात्र बाबासाहेबांचे ऊर्जास्रोत होती. त्यांची ती प्रिय रामू होती. बाबासाहेबांचे एक वाक्य आहे ,’ पतिपत्नीचे नाते हे घनिष्ठ मित्रांप्रमाणे असायला हवे’, हे वाक्य कुठून आले असेल याचा विचार केला असता ते त्यांच्या आणि माता रमाईच्या सहजीवनाचाच तर सार नसावा ना इतकं गहिर त्यांचं नात होत..बाबासाहेबांनी रमाईला लिहिलेली पत्रे वाचली असता त्यांचा सहजीवनाचा हा पैलू सहज उजेडात येतो..
बाबासाहेबांना रमाईच्या त्यागाची, कष्टाची पूर्ण जाणीव होती… कित्येकदा ते हतबल होत की आपला फाटका संसार आपली पत्नी एकहाती टाके घालून शिवत आहे..आणि म्हणून आपण परदेशी शिक्षण घेऊ शकतो याची जाणीव ठेवत त्यांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’, आपला हा ग्रंथ ,’प्रिय रामूस, माता रमाईस अर्पण केला.
त्यातील अर्पणपत्रिका अशी –
जिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा, त्याचप्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता, आणि आमच्या पोटापाण्याच्या विवंचनेचा काळ होता. असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता. जिने ते दिवस मूकपणाने सहन केले व माझ्याबरोबर ते दुःख सहन केले. आणि मजबरोबर तसलेही दिवस कंठले, म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण ठेवण्यासाठी हा ग्रंथ तिच्या (रामूच्या) स्मृतीस अर्पण करीत आहे’.
धारवाडच्या वसतिगृहात मुले २ दिवसापासून उपाशी आहे हे समजल्यावर आपल्या बांगड्या काढून देणारी रमाई बाबासाहेबांच्या सावलीत राहूनही दुसऱ्याना आधार द्यायचं धाडस करीत होती… बाबासाहेबांचे बाहेरच्या जगाशी युद्ध सुरू असताना रमाई भूक, दारिद्र्य ह्या संकटाचा मुकाबला एकटी करत होती.. रमाबाई तिचे युद्ध तिच्या साऱ्या शक्तीनिशी लढत राहिली.. तिचा हाच त्याग, हे वात्सल्य, हे असीम कारुण्य तिला आदर्शरूप करून गेले… तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढायला बाबासाहेबांना बरीच वर्षे लागली. तिच्या असीम त्यागाने ती त्यागमूर्ती झाली… तिच्या अंगभूत वात्सल्याने ती रमाई झाली.
सुरेखा पैठणे
लेखिका कल्याण – उल्हासनगर येथे वास्तव्यास असून त्या कवयित्री /वक्ता /निवेदिकाआहेत.

Leave a Reply