साऱ्या विश्वाला बुद्ध हवा!

राकेश अढांगळे

बऱ्याच दिवसांपासून समाजमाध्यमांवर महिलांच्या विषयी चर्चा निघाल्यास प्रतिगामी, पुरोगामी, फेमिनिस्ट, लिबरल, डाव्या विचारांच्या लोकांद्वारे महिलांना समान संधी देणाऱ्या बुध्दांविषयी व कायद्यान्वये हक्क आणि अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी गैरसमज पसरवला जातो. चुकीचे संदर्भाचा आधार घेऊन दोन्ही महापुरुषांवर टिका करण्याचा प्रयत्न केला जातो! त्या सर्वांचा समाचार घेण्यासाठी सदर खटाटोप! बाबासाहेबांच्या विषयी मी पुढील लेखात लिहिन, हा लेख केवळ बुध्दांविषयी केलेल्या आरोपांना उत्तर आहे.

तसे बुध्दाविषयी आणि बाबासाहेबांच्या विषयी असे गैरसमज पसरवणे काही नवीन नाही आणि समाचार घेणे सुद्धा नवीन नाही. जेव्हा जेव्हा प्रतिगामी-पुरोगामी लोक अश्या खोट्या मांडणी करीत होते तेव्हा तेव्हा आंबेडकरी विचारवंतानी त्यांचा हा डाव हाणून पाडला! व या बिनबुडाच्या आरोपांचे पुराव्यानिशी खंडण केले गेले. त्याच लेखकांच्या विचारवंताच्या आधारावर मला हे लिहिण्याचे सोपे झाले. मी जे काही लिहिणार आहे, ते सर्व आंबेडकरी विचारवंत, लेखकांचेच पूर्वी मांडलेले विचार आहेत. यामध्ये नवे काहीही नाही किंबहुना नवे काही घेण्याची गरज नाही. लेखकानी परिपूर्ण लिखाण केले आहे व सर्वांची बोलती बंद केली आहे. म्हणून त्या सर्वाना धन्यवाद आणि सप्रेम जयभीम!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ६ लाख अनुयायासमावेत १४ ऑक्टोबर १९५६ रोजी समतावादी बौद्ध धम्म स्वीकारला. ही घटना एक महानच नव्हे तर अभूतपूर्व क्रांती होती. ज्या भारतातून बौद्ध धम्म स्थापन होऊन जगभर पसरला आणि भारतातूनच लोप पावला तेथेच पुनरुज्जीवन त्यांनी केले. अस्पृश्यांनी समानतावादी बुद्ध स्विकारला! कर्मकांड, देव, अंधश्रद्धा झिडकारून त्यांनी त्यांची प्रगती साधली, ही अनन्यसाधारण बाब होय. या प्रगतीने भल्याभल्यांना त्रास झाला. सनातनी, ब्राम्हणी विचारांच्या लोकांना तर झालाच यात पुरोगामीही कमी नव्हते. त्यांनीही बौध्दाविषयी आकस बाळगला, तो आजही कायमच आहे.

यासाठी त्यांनी आदर्श महापुरुषांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला व अधूनमधून आजही चालच असतो, म्हणून अश्या लोकांपासून आंबेडकरी जनतेने सावध असणे गरजेचे आहे. बौध्दांच्या जीवनातील महासूर्य. बाबासाहेब आंबेडकर एका भाषणात म्हणतात “समतेचा बुध्दाइतका महान पुरस्कर्ता जगात कोणीही झाला नाही.” हे खरेच आहे. अगदी अलिकडील काळात फ्रेंच राज्यक्रांती घडते आणि तेथे स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या तीन तत्वांच्या आधारावर पुनर्स्थापना होते. परंतु ही तीन तत्वे २५०० वर्ष प्राचीन आहेत व ती बुद्धकाळात अस्तित्वात होती याची अनेक उदाहरणे सापडतात. बाबासाहेबांच्या भाषणांत आणि त्यांनी लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथात ते सापडतील.

तर आता मूळ मुद्यावर येतो. बुध्दकाळात वैदिक चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध करून समानतेला पेरण्याचे काम तथागतानी केले. त्या बुध्दांवर त्यांच्या हयातीतच बरेच आरोप करण्यात आले व आजही २५०० वर्षाने केले जात आहे. परंतु “जगाला युद्ध नको बुध्द हवा” याची जाणीव आजही प्रकर्षाने होत आहे व बुध्द सुर्यासारखा सत्य असल्याने तळपत आहे. बुध्दाने जेव्हा संघ स्थापन केला तेव्हा महिला त्यात नव्हत्या! परंतु जेव्हा तथागत आपल्या कपिलवस्तूला बुध्द झाल्यानंतर पहिल्यांदा भेट देतात, तेव्हा त्यांची आई महाप्रजापती गौतमी त्यांच्यासोबत ५०० शाक्य महिलांना संघाचा प्रवेश द्यावा अशी विनंती करते यावर तथागत आणि आनंद यांची पुरेशी चर्चा झालेली आहे.

तथागत गौतमीस नकार देतात परंतु त्याचे कारण कोणतीही असमानता किंवा स्त्रीला शूद्र मानणे नसून व्यावहारिक कारण आहे असे ते आनंदास स्पष्ट करतात. या चर्चेनंतर प्रजापति गौतमीच्या संघप्रवेशाच्या मागणीला संमती देतात. तथागतांच्या मैत्रीचे स्वरूप इतके व्यापक होते कि त्यात प्राणिमात्रही शामिल होते, त्यात लिंगभेद होणे तर दुरापास्त आहे.

पण समतावादी बुध्दाने गौतमीला संघप्रवेशाकरिता खरच नकार दिला असेल काय ? यासाठी काही आणखी प्रसंगाकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

[१] महिलांच्या संघप्रवेशापुर्वी संघामध्ये तरुण रठ्ठपाल शामिल होतो. त्याच्या संघात शामिल होण्यापूर्वी तथागत त्याला “माता-पित्यांची” संमती घेऊन ये असे सांगतात. यामध्ये निर्णय घेण्यासाठी ते आईचे नाव पित्याच्या अगोदर घेतात.

[२]तथागताना भेटावयास आलेल्या वैशालीच्या नगरवधू आम्रपालीला उपदेश दिल्यानंतर तथागत तिचे भोजनाचे आमंत्रण स्विकारतात आणि तदनंतर लिच्छवीचे आमंत्रण येते ते मात्र ते नाकारतात. यातही त्यांच्या मनात स्त्री-पुरुष असा कोणताही भेद नव्हता हे स्पष्ट होते.

[३] श्रावस्ती येथे जेव्हा तथागत असे तेव्हा तथागताना भोजनासाठी विशाखा आमंत्रण देत असे व भोजनानंतर चर्चाही होत असे.

[४] श्रावस्तीयेथेच एकदा राजा पसेनदी सोबत तथागत संभाषण करीत असताना एक दूत येतो आणि राणी मल्लिका प्रस्तुत झाली असून त्याला कन्या झाल्याचे कळवतो, हे वृत्त ऐकून राजा पसेनदी खिन्न होतो. भगवंत त्याला खिन्नतेचे कारण विचारतात, तेव्हा राणी मल्लिका प्रस्तुत होऊन कन्या झाल्याचे पसेनदी सांगतो. भगवंत म्हणतात “राजा कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपमजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सदगुणी कन्या, पत्नी, माता अश्या विविध भूमिका करणारी आहे. तिला जो पुत्र होईल, तो पराक्रमी कृत्ये करील, मोठे राज्य करील. खरोखरच अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल.

[५] सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुत्तपिटकातील बुध्दवचनांबाबत बाबासाहेबांच्या सूचक इशार्याकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणे नाही. बाबासाहेब म्हणतात “खोट्या गोष्टींचे आवरण चढवून, त्यात मूळ बौद्ध विचारांशी अगदीच परकीय असलेल्या ब्राम्हणी विचारांची भर घालून, तसेच मठशाही विचारांना प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, सुत्तपिटकाला सम्पूर्णपणे विद्रुप करण्यात आलेले आहे.”

६] ज्यावर हा लेख आहे, त्यावर बाबासाहेबांनीही महत्वाचे मत मांडले आहे. ते लिहितात “सुत्तपिटक हे भगवान बुध्दाच्या मृत्यूनंतर चारशे वर्षानंतर लिहिले गेले, ते लिहिण्यात भिख्खू प्रमुख होते. संघातील लोकांवर सत्ता गाजवून त्यांना एकत्रित ठेवणे त्यांचे मुख्य सूत्र होते. त्यांनी बुध्दाची जी वचने लिहून ठेवली ती संघातील लोकांना बंधनकारक व्हावीत अशीच होती. या लेखकने कार्य करताना भिख्खू लोकांनी संघातील त्या वेळच्या परिस्थितीला धरून नवे वचने तथागतांच्या नावने स्वतःच्या मेंदूने निर्माण करून ती सुत्तपिटकात घुसडून दिली असावीत. कारण संघातील लोकांनी कडक ब्रम्हचर्य पाळले पाहिजे, हे आचारतत्व भिख्खूना संघाच्या दैनंदिन जीवनात रुजवण्याचे होते. तेव्हा आनंद आणि बुद्ध यांचा हा स्त्रीविषयक काल्पनिक संवाद सुत्तपिटकात भिख्खूनी घुसडवला असावा, असे समजण्यात अतिशयोक्ती अगर अशक्यता वाटत नाही.”

७] तथागत आणि आनंदाच्या संवादानंतर स्त्रीयांना आठ अटींवर संघात सामील केले गेले. त्या जर आठ अटी तपासल्यानंतर त्या अटी आनंद निमूटपणे स्विकारतोच कसा हा मोठा प्रश्न आहे? महत्त्वाचे म्हणजे या अटी बुद्धाच्या नाहीच असे सहज बुध्दवचन ओळखणारा व्यक्ती म्हणेल, द्वेष्ट्यांचे काय त्यांना केवळ टिका-द्वेष करण्यासाठी काहीतरी हवे असते.

८] “स्त्रीयांना संघात सामील केल्यानंतर धम्म १००० वर्ष टिकण्याएवजी केवळ ५०० वर्षच टीकेल” हा विनयपिटकातील संदर्भ देउन काही लोक तथागत स्त्रीविरोधी होते असे सांगतात. यावर धर्मानंद कोसंबी यांनी चांगले उत्तर दिले आहे. ते असे आहे, “विनयपिटिकापेक्षा सुत्तपिटक प्राचिनतर आहे तथापि त्यात काही सूत्रे मागवून दाखल करण्यात आली, त्यापैकी हे एक असावे असे वाटते. इसवी सनापूर्वी पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात जेव्हा महायान पंथाचा प्रसार जोराने होऊ लागला, अश्यावेळी ते लिहिले असावे. त्यात सदधर्म म्हणजे स्थविरवादी पंथ. भिक्षूंनी संघाच्या स्थापनेमुळे पाचशे वर्ष टीकेल आणि नंतर जिकडे तिकडे महायान संप्रदायाचा प्रसार होईल असा त्या सुत्तकर्त्याचा आशावाद असावा. हे सुत्त भगवान बुध्दाच्या महापरिनिर्वाणानंतर पाचशे वर्षानंतर लिहिले असे या भविष्यातून सिद्ध होते.” (संदर्भ – भगवान बुध्द)

वरील सर्व मुद्दे तथागत बुध्दांविषयी गैरसमज बाळगणाऱ्या लोकांसाठी आहे. तथागतानी सर्व प्रकारच्या भेदभावांना नाकारून समतावादी विचार समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न केले हि मोठी क्रांती होती. तथागताच्या क्रांतीला दुर्लक्षित करून काही लोक चुकीच्या संदर्भाचा आधार घेऊन तथागतावर टिका करीत आहे, या लोकांनी गैरसमजातून बाहेर पडले पाहिजे. तथागतांचे मानवतावादी विचार हे धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाला तारू शकतात. बुध्दाचा द्वेष करणाऱ्या तथाकथित विचारवंतानो तुम्हाला बुध्दाईतका मानवकल्याणाचा मार्ग कुठेही सापडणार नाही.

राकेश अढांगळे

लेखक मुंबई येथील रहिवासी असून कॉमर्स शाखेचे पदवीधर आहेत, तसेच आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत.

( संदर्भ ग्रंथ – खंड- १८/३, भगवान बुद्ध, संशोधनातील ब्राम्हण्य)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*