मिलिंद महाविद्यालय : आयुष्याचा अनमोल ठेवा

नारायण बनसोडे

स्त्रोत – इंटरनेट

औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय म्हणजे आंबेडकरी चळवळीचं केंद्र. तिथं शिक्षणाचं बीज रोवलं तर लाखो अस्पृश्य बांधवांचा सहज उत्कर्ष होईल म्हणून पीईएस चं सर्वात मोठं जाळं औरंगाबादेतच बाबासाहेबांनी उभारलं. आंबेडकरी चळवळीतील पहिली पिढी घडविली ती याच बाबासाहेबांच्या अपत्याने.. पुढे अनेक विद्यार्थ्यांनी या क्रांतीदालनात शिक्षण घेतलं.. त्यापैकी अनेकांनी आपलं नातं चळवळीशी जोडलं. मिलिंद च्या महती बद्दल बोलायचे झाले तर महाविद्यालयातून बाहेर पडलेला प्रत्येकजण मी मिलिंदचा विद्यार्थी आहे असं अभिमानानं सांगतो.

मी गडचिरोली सारख्या दुर्गम व जंगली भागातून येथे १९७२ साली आलो होतो .मी १९७२ साली औरंगाबाद ला प्रथम मिलिंद विज्ञान महाविद्यालय परिसराची माती कपाळाला लावली आणि महाविद्यालयात प्रवेश घेतला. जुने जाणते विद्यार्थी बाबासाहेबांची एक प्रेरणादायी आठवण सांगायचे .‌ खेड्यातून आलेल्या मुलांना सिनेमाचे आणि शहरी चैनीचे फार आकर्षण असते . यामुळे ते शिक्षण अर्धवट सोडतात . त्यावेळी जागृती नावाचा सिनेमा चालू होता. त्या सिनेमात एक मिस्किल मुलगा काहीतरी गंमती करून आपल्या सोबत्यांना हसवीत असे. सिनेमातील या मुलाचे अनुकरण म्हणून एक मुलगा गाढवावर बसून तो काॅलेजच्या वसतिगृहाच्या व्हरांड्यात फिरला. बाबासाहेबांना हे कळल्यावर त्यांचा तोल गेला आणि ते रागारागातच काठी घेऊन त्या मुलाला मारू लागले. प्रा.म.भि.चिटणीस व वराळे यांनी त्यांना सावरले, तेव्हा ते रडू लागले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. उद्वेगाने ते म्हणाले – “अरे ! तुमच्या आयुष्यातला हा शिमगा संपावा. तुम्ही चांगले सुसंस्कारीत व्हावे म्हणून मी हे काॅलेज काढले. वसतिगृहात तुम्हांला चांगल्या सोयी करून दिल्या. आमच्या बालपणी आम्हांला जे सोसावे लागले ते तुम्हांला सोसावे लागू नये म्हणून मी जीवाचा आटापिटा करतो. पण तुम्ही अजूनही त्याच घाणीत राहू इच्छिता का? हे वसतिगृह मी तुमचे संस्कारकेंद्र बनवतो.” या घटनेचा आमच्या मनावर खुप परीणाम झाला आणि आम्ही अगदी सुरुवातीपासूनच एक ही क्षण व्यर्थ न दवडता अभ्यासात दंग झालो.

हा महाविद्यालयाचा परिसर (नागसेन वन) १५५ एकर मध्ये पसरला आहे . मी १९७६ साली बी.एस्सी.(भौतिकशास्त्र स्पेशल) पास झालो. त्यावेळी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम्. ए. शिंदे होते . पूर्वीचे प्राचार्य डॉ एम्. एल्. शहारे युपीएससी चे चेअरमन झाले . पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष बाबासाहेबाचे निष्ठावंत श्री आर. आर. भोळे होते . येथे नामांकित विद्वान विषयतज्ज्ञ प्राध्यापक गुरूजन ज्ञानदान करीत . # भौतिकशास्त्र – डॉ व्ही.डब्लु. कुलकर्णी , पटवर्धन , निरंजने , रानडे इ. # रसायनशास्त्र – डॉ अग्नी, डॉ वावरे, पाटील, इंचेकर, वानखेडे इ. # गणित – डॉ लिमये , पीटके , माढेकर इ.# प्राणीशास्त्र – डॉ नरवाडे , पुरी , तागडे इ # वनस्पतीशास्त्र – डॉ ईनामदार , जाधव इ. # इंग्रजी- डॉ मांजरमकर # मराठी – डॉ गंगाधर पानतावणे # हिंदी – डॉ जगताप #

मुलांचा प्राणवायू म्हणजे मिळणारी मासिक शिष्यवृत्ती (४० रु.) . यात प्रशासनवृंद तत्पर होता , बरोबर एक तारखेला शिष्यवृत्ती वाटप व्हायची . # श्री सुरवाडे , वाघमारे , मोरे – आफीस स्टाफ . या बहुतेकांची बाबासाहेबांच्या हयातीतच नियुक्ती झाली होती व यांना बाबासाहेबांची जवळीक लाभली होती. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या विविध क्षेत्रात अमुल्य योगदान प्रदान करून जगात देशाचा गौरव व्रृद्धींगत केला आहे व आजही करत आहेत . महाविद्यालयाची इमारत बांधण्यापूर्वी छावणीच्या मिलीटरी इमारतीत क्लासेस व्हायचे . महाविद्यालयाचे आणखी खास वैशिष्ट्ये म्हणजे क्लासेस बंद झाल्यावर ग्रंथालय रात्री ९ वाजेपर्यंत अभ्यासासाठी खूले असायचे . सुसज्ज ऑडीटोरियम मध्ये विविध क्षेत्रातील महानुभावांचे व्याख्यान होत .त्यावेळी झेराक्स, कंप्युटर , इंटरनेट इ. नसल्याने प्राध्यापकवृंद स्वत विषयावर नोट्स लिहून नोटीस बोर्डवर लावायचे . एखादा विद्यार्थी गंभीर आजारी पडला तर प्राचार्य / प्राध्यापकवृंद लक्ष्य ध्यायचे . दुर्दैवाने कोणी मरण पावला तर तशी व्यवस्था करून सर्वजन श्रद्धांजली अर्पण करायचे .

१९७५ साली महाविद्यालयाचा रौप्यमहोत्सव कार्यक्रमात तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी व मुख्यमंत्री श्री शंकराचराव चव्हाण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर , पीपल्स एज्युकेशन सोसायटी , मिलींद महाविद्यालय (विज्ञान व कला दोन्ही) चा गौरव करून मार्गदर्शक केले . महाविद्यालयाची प्रगती पाहून यावेळी प्रधानमंत्री यांनी डॉ बाबासाहेबांनी महाविद्यालयासाठी निजाम सरकार कडून घेतलेले १२ लाख रुपयांचे कर्ज माफ केले आणि १० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले . मान्यवरांना अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली . हे आमचे सौभाग्य .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पावन पदस्पर्श लाभलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, स्वाभिमान हे सर्व मला शिकता आले. संवेदना निर्माण झाली. संघर्षमय जीवनाच्या जाणिवा निर्माण झाल्या. या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी झाडीपट्टी (गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया) परिसरातून गरीब, अस्पृश्य समाजाच्या मुलांचे लोंढे च्या लोंढे येत होते. मिळणारी मासिक शिष्यवृत्तीच पुढे परिवर्तनाचे माध्यम ठरली.

गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम लहान खेडे गावातून सुरू झालेला हा माझा प्रवास पुढे स्वकष्टाने गरुड भरारी घेवुन मला एका प्रशिक्षणासाठी इंग्लंड ला सुद्धा फिरवून आला . यावेळी चंद्रावर पहिले पाऊल ठेवणा-या अंतराळवीर नील आर्मस्ट्रांगचे शब्द आठवले . (यावेळी मी नवव्या वर्गात शिकत होतो आणि रेडिओ वर बातमी ऐकली होती) . ते म्हणाले –
“हे माणसाचे पाऊल छोटे असले तरी ही पृथ्वीवरील मानवाने घेतलेली प्रचंड झेप आहे.”

मी मिलिंद विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद चा विद्यार्थी आहे , हा आयुष्याचा अनमोल ठेवा आहे. जसे परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते तसे मिलिंदच्या स्पर्शाने आमच्या आयुष्याचे सोने झाले . ही पूंजी संपता संपत नाही . मी सेवानिवृत्त झाल्यावर याच शिदोरीवर आयुष्याची सोनेरी संध्याकाळ अनुभवत आहे.

नारायण बनसोडे

लेखकाचा परिचय एम्. एस्सी . (भौतिकशास्त्र संप्रेषण) . डॉ बाबासाहेब आंबेडकर स्थापित मिलिंद महाविद्यालय , औरंगाबाद येथून शिक्षण प्राप्त . शर्ली इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मंचेस्टर , (इंग्लंड) येथे कापूस गुणवत्ता या विषयावर प्रशिक्षण प्राप्त . डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , कापूस परीक्षण प्रयोगशाळा येथे १९८७-९९ कार्यरत असतांना कापूस वाण विकसित करतांना कापूस गुणवत्ता निर्धारित केल्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विद्यापीठ संशोधन संचालक द्वारा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार . केंद्रीय कापूस प्रौद्योगिकी अनुसंधान संस्थान (भारतीय कृषी अनुसंधान परिषद – भारत सरकार) येथून सहा. मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त . बुद्ध आंबेडकरी चळवळीत सक्रिय भाग . दै. बहुजन सौरभ , नागपूर येथे नियमित डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष आणि लेख प्रकाशित . फेसबुकवर वर नियमित लेखन .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*