ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू- भाग ५

प्रश्न असा की कोणत्या पक्षात तुम्ही सामील व्हावे? अनेक पर्यायी पक्ष आहेत. काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेसमध्ये तुम्ही सामील व्हावे काय? कामगारांच्या उद्दिष्टांना ती मदत करील काय? काँग्रेसपासून स्वतंत्र असा स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही. या माझ्या मताला कामगार पुढाऱ्यांचा विरोध आहे, हे मला माहीत आहे. काँग्रेस सोशियालीस्टांचे प्रतिनिधित्व करणारा एक गट असून समाजवादाच्या पूर्तीसाठी त्यांना कामगार संघटन हवे आहे. परंतु ही संघटना काँग्रेसच्या अंतर्गतच राहिली पाहिजे, असे त्यांना वाटते. श्री. रॉय त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला व स्वतःला कम्युनिस्ट जोरदार विरोध आहे, मग ती संघटना काँग्रेसच्या अंतर्गत असो की बाह्यगत असो. या दोन्ही गटांशी मी पूर्णतः असहमत आहे. श्री. रॉय हे मला जसे एक कोडे वाटते तसे पुष्कळांना वाटत असले पाहिजे. एक कम्युनिस्ट आणि स्वतंत्र कामगार संघटनेला विरोध! भयानकपणे विरोधी शब्द आहेत हे! हा असा दृष्टिकोन आहे की, आपल्या थडग्यामध्ये लेनिननेही तडफडत करावा. या विलक्षण दृष्टिकोनाचे स्पष्टीकरण एकच होऊ शकते. ते हे की, भारतीय राजकारणाचे सर्वात महत्वाचे ध्येय साम्राज्यशाहीचा नाश करणे हे आहे, असे रॉय यांना वाटत असले पाहिजे. श्री.रॉय यांनी जे मत स्वीकारले आहे त्याचा दुसरा कोणताही अर्थ निघत नाही. जर साम्राज्यशाही नष्ट झाल्याबरोबर भारतातील सर्व भांडवलदारांचे हितसंबंध नष्ट होणार असतील तरच हे मत बरोबर ठरू शकेल. परंतु इंग्रज या देशातून निघून गेले तरी या देशात जमीनदार, मिल मालक व सावकार कायम राहून लोकांची पिळवणूक चालूच राहणार आहे आणि साम्राज्यशाही नष्ट झाल्यावरही आजच्याप्रमाणेच कामगारांना या भांडवलदारांशी संघर्ष करावा लागणारच आहे, हे समजण्यास फार मोठ्या बौद्धिक चातुर्याची गरज आहे, असे नाही. असे असल्यामुळे कामगारांनी आतापासूनच संघटित का होऊ नये? संघटनेची वाढ करण्यामध्ये त्यांनी खोळंबून का राहावे? मला तर याचे कोणतेच उत्तर दिसत नाही. काँग्रेस समाजवाद्यांना हे पूर्णपणे माहित आहे की, कामगारांना साम्राज्यशाहीप्रमाणेच भांडवलशाहीशीही संघर्ष करावा लागणार आहे व म्हणून कामगारांनी संघटित झाले पाहिजे, हे त्यांना मान्य आहे. परंतु त्यांची अशी अट आहे की, कोणतीही कामगार संघटना काँग्रेसच्या अंतर्गतच असली पाहिजे. काँग्रेस आणि कामगार यांच्या या जबरदस्तीच्या समझोत्याची आवश्यकता किंवा मूल्य मला तरी काहीच दिसत नाही.

काँग्रेस सोशिऑलिस्ट लोकांच्या म्हणण्याप्रमाणे देशात समाजवाद आणणे हे त्यांचे ध्येय आहे. ते हा समाजवाद कसा आणणार आहेत? काँग्रेसचा उजवा हात होऊन! काँग्रेसच्या बाहेर न पडण्याचे ते हे कारण देतात. त्यांचे मानवी स्वभावाविषयीचे ज्ञान ही इतकी कीव करण्यासारखी बाब आहे की त्याची कल्पनाही करणे कठीण आहे. जर त्यांचे उद्दिष्ट समाजवाद आणणे हे असेल तर त्याचा उपदेश लोकांना करून अपेक्षित कार्यासाठी त्यांना संघटित करणे गरजेचे आहे. उच्च वर्णियांची मनधरणी करून समाजवाद येणार नाही. काँग्रेसची उजवी बाजू समजणाऱ्या लोकांना समाजवादाची लहानशी मात्राही सहन होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती असून दिवसेंदिवस ती अधिकाधिक स्पष्ट होत आहे. पंडित नेहरूंनी मागील वर्षी समाजवादाचे वादळी आंदोलन उभारले होते. परंतु या गरीब बिचाऱ्या इसमाला लवकरच ताळ्यावर आणण्यात येऊन एखाद्या उनाड मुलाला लाड्डूपेढ्यावर ताव मारण्यास घरी परत पाठवावे, त्या प्रमाणे केवळ यापुढे चांगले वागण्याच्या करारावर घरात घेण्यात आले. आता हा पंडित पूर्णपणे पालटलेला असून आता इतका गरीब झाला आहे की, त्याने एकदा घुमविलेल्या व सध्या काँग्रेसचा उजवा हात म्हणून शापित असलेल्या लाल निशाणालाही तो विरोध करतो. बिहारमधील या उजव्या बाजूने आपले खरे दात दाखविले आहेत. किसान पुढारी स्वामी सहजानंदांनी काँग्रेस सोडलेली असून त्यांचा सहकारी जयप्रकाश नारायण हे ही तिचा त्याग करण्याच्या मार्गावर आहे. मला असे कळले की, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मुंबई येथील सभेत काँग्रेसच्या या उजव्या बाजूकडील लोकांनी सोशियालिस्टांच्या गैरशिस्त वर्तनाबद्दल निंदा केली आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरून समाजवादाचा प्रचार करण्याचा आरोप लादून इंडियन पिनल कोडप्रमाणे प्रथम गुन्हा करणाऱ्याला जशी ताकीद देण्यात येते त्या प्रमाणे ताकीद देण्यात आली. काँग्रेसमधील समाजवाद्यांची अशी पोकळ दशा आहे.

साम्राज्यवादाचा प्रतिक्रियेमुळे भारतीय राजकारण झाकाळून गेले आहे. कामगारांना त्यांच्या खऱ्या शत्रूंचा म्हणजे अधिकार बळकावून बसणाऱ्यांचा विसर पाडण्यात आला. रॉयवादी व काँग्रेसवादी हे दोन्ही प्रकारचे समाजवादी लोक विचारातील गोंधळामुळे दलदलीत रुतून बसलेले आहेत. एक सामान्य शत्रू म्हणून या साम्राज्यशाहीविरुद्ध संघर्ष करावयाचा असेल तरी सर्व वर्गांनी आपापल्या वर्गाच्या हिताकडे दुर्लक्ष केले पाहिजे व एका संघटनेत विलीन झाले पाहिजे, असा त्याचा अर्थ होत नाही. वेगवेगळ्या वर्गाच्या संघटनांची एक फळी उभारूनही या साम्राज्यशाहीशी लढाई करता आली असती. या हेतूसाठी सर्व संघटना बरखास्त करण्याची काहीच गरज नाही. सर्व संघटनांचा समावेश करून घेणाऱ्या संस्थेचीही काही आवश्यकता नाही. त्यासाठी सर्वांची मिळून एकच एक फळी उभारली म्हणजे पुरे झाले. काँग्रेसची ही उजवी बाजू साम्राज्यवादाच्या नावाने कोणतीही स्वतंत्र व वेगळी संघटना उभारण्याच्या आड येत आहे, हे पुष्कळांनी अजून ओळखलेले नाही, याची जाणीव करून देताना मला खेद वाटतो आणि ही चूक तुम्हीही कराल, अशी मी तुम्हास धोक्याची सूचना देतच आहे. राजकारण हे वर्गहिताच्या जाणिवेवर उभारल्या जावयास पाहिजे. जे राजकारण वर्गहिताच्या पायावर उभे नसेल ते एक ढोंग आहे.

म्हणून जो पक्ष वर्गहिताच्या, वर्गजाणिवेच्या पायावर आधारलेला असेल अशा पक्षामध्ये तुम्ही सामील व्हावे. ही कसोटी लावून पाहिल्यास तुमच्या हिताच्या विरोधी नसलेला, मला माहीत असलेला पक्ष म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष हा होय. स्पष्ट कार्यक्रम असलेला तो एकच पक्ष असून कामगारांच्या हिताला तो सर्वोच्च स्थान देतो. त्याचे धोरण सुनिश्चित आहे. तो सामान्य परिस्थितीत कधीही असनदशीर मार्गाचा अवलंब करणार नाही; परंतु तशी पाळी आणल्यास मागेपुढेही राहणार नाही. वर्गयुद्ध टाळण्याची त्याची इच्छा असली तरी वर्ग संघटनेच्या तत्वाचा त्याग करवायास तो तयार नाही. आज हा स्वतंत्र मजूर पक्ष (इन्डिपेन्डन्ट लेबर पार्टी) बालवयात आहे आणि तो केवळ मुंबई इलाख्यापुरताच मर्यादित आहे, हे खरे. परंतु हा काही त्याच्याविरोधी युक्तीवाद नव्हे. प्रत्येक पक्ष एकेकाळी बालवयात असतोच. एखादा पक्ष किती वयाचा आहे, हा प्रश्न महत्वाचा नाही तर त्याची तत्वे काय आहेत, तो काय साध्य करू इच्छितो आणि त्याची सुप्त शक्ती काय आहे, या बाबीच महत्वाच्या आहेत. स्वतंत्र मजूर पक्षाचे घोषणापत्र वाचून पाहण्याची जो तसदी घेईल त्याला त्याची तत्वे काय आहेत व तो काय साध्य करू इच्छितो हे कळून येईल. या पक्षात फार मोठी सुप्त शक्ती आहे, हे स्पष्ट आहे. हा पक्ष मर्यादित नाही. जात आणि पंथ याचा विचार न करता सर्वांना तो खुला आहे. त्याचा कार्यक्रम काहीसा दलित वर्गाच्या गरजांवर भर देत असला तरी संपूर्ण कामगार वर्गाच्या गरजांचा समावेश होण्या इतका तो विस्तृत आहे. या स्वतंत्र मजूर पक्षाच्या भरभराटीच्या आड येणारी एक अडचण राजकीय नव्हे तर सामाजिक आहे. दलित वर्गासारख्या कमी दर्जाच्या लोकांबरोबर सहकार्य करावयाचे नाही, अशी सर्वसाधारण भावना आहे. तिने उच्च वर्गाच्या हिंदुना स्वतंत्र मजूर पक्षामध्ये भाग घेण्यापासून वंचित केले आहे आणि जे लोक या पक्षाच्या उण्यावर आहेत ते या भावनेचा दुरुपयोग करून घेऊन अडाणी व धर्मभोळ्या लोकांना या पक्षात सामील होण्यापासून परावृत्त करीत आहेत. परंतु स्वतंत्र मजूर पक्षाचे स्वच्छ व प्रामाणिक राजकारण सर्व कामगार वर्गाला आपल्या ध्वजाखाली खेचून आणण्यास लोहचुंबकाप्रमाणे उपयुक्त ठरेल आणि हिंदू समाज रचनेमुळे निर्माण झालेल्या विरोधी शक्तीला प्रतिकारक शक्ती ठरेल, अशी माझी खात्री आहे. आतापर्यंत ठाणा, कुलाबा आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांमध्ये या पक्षाची पूर्णतः स्थापना झाली असून शेतकरी व कामगारात आपला पाया तिने रचलेला आहे. या प्रांताच्या अन्य भागातही त्याचा जोरदार प्रसार सुरु आहे. मध्य प्रांत आणि वऱ्हाडातही हा पक्ष कार्यरत असून भारताच्या अन्य प्रांतातही तो आपली जागा पटकावील, अशी मला आशा वाटते. म्हणून कामगार वर्गाचा न्याय्य पाठिंबा मिळण्यास स्वतंत्र मजूर पक्ष हाच एकमेव पक्ष पात्र आहे.

कामगारांच्या संघटनांमधील दलित वर्गाचे लोक भारतातील संपूर्ण कामगार वर्गाला फार मोठी चालना देऊ शकतात. इंग्लंडमधील चार्टिस्ट चळवळीचा अभ्यास करणाऱ्या गॅमेज याने म्हटले आहे, “सामाजिक प्रश्नावर आधारित असण्यावाचून एखादी राजकीय चळवळ आजतागायत कधी झाली असेल की नाही या बद्दल शंकाच आहे. मानव जातीचा मुख्य हेतू सामाजिक सुखोपभोगाची साधने हस्तगत करणे हाच आहे. या साधनांची मालकी त्यांना मिळाल्यास राजकीय भानगडीमध्ये रस घेण्याची त्यांची वृत्ती अगदीच कमी होते. सामान्य जनतेला राजकीय हक्कांचे महत्व तत्वशः पटवून देण्याचे कार्य जर कोणी करीत असतील तर ते समाजामध्ये अस्तित्वात असलेले दोषच होय.” तुमचे सामाजिक दोष मोठेही आहेत आणि वास्तवही आहेत. त्यामुळे तुमचे राजकारणही अस्सल व वास्तव राहू शकते, हे जर तुम्ही समजून घेतले तर अस्सल राजकीय पक्षाच्या बाबतीत तुम्ही भारतातील सम्पूर्ण कामगार वर्गाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठराल. संपूर्ण कामगारांची दुसरीही एक सेवा तुम्ही करू शकता. विधानसभेत तुम्हाला प्रतिनिधीचा एक निश्चित वाटा मिळालेला आहे. या सुनिश्चित जागांचा उपयोग कामगार वर्गाला किती महत्वाचा आहे, याची जाणीव काही कामगार नेत्यांना असल्याचे दिसत नाही. निवडणूक हा एक प्रकारचा जुगार आहे. कोणत्याही पार्टीला विधानसभेत अमुक इतक्या जागा मिळतीलच अशी कोणत्याही निवडणुकीच्या पद्धतीने खात्री देता येण्यासारखे नसते. इतकेच नव्हे तर मतदारांच्या एखाद्या गटाला कोणत्याही निवडणूक पद्धतीने त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळतील असेही नाही. निवडणुकीचे निकाल काही पक्षांना कधी कधी आश्चर्यकारक व विनाशकारी ठरेल, हे इंग्लंडमधील निवडणुकीच्या इतिहासावरून दिसून येईल. बऱ्याचदा अल्पसंख्यांक मतदारांनाच बहुसंख्य जागा मिळतात. आपल्या येथे निश्चित जागा ठरलेल्या असल्यामुळे तशी भीती बाळगण्याचे कारण नाही आणि दलित वर्गाच्या राखीव जागांचा विचार करता त्या केवळ दलित वर्गाच्याच उपयोगाच्या आहेत, असे नसून त्या सर्व कामगार वर्गाला उपकारक आहेत. दलित वर्गाला निश्चित प्रतिनिधित्व मिळण्याची खात्री असल्यामुळे अन्य कामगार वर्गाला मदतीची आवश्यकता वाटल्यास त्यांच्या संघटनांच्या उभारणीमध्ये तो फार मोठ्या प्रमाणात सहाय्यभूत होऊ शकतो. कामगार वर्गाला राजकीय प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी दलित वर्गाचा किती उपयोग होऊ शकतो हे मागील निवडणुकीमध्ये सिद्ध झालेले आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या तिकिटावर उभे राहणाऱ्या तीन हिंदूंना दलित वर्ग मुंबई विधानसभेसाठी निवडून आणू शकला आणि स्वतंत्र मजूर पक्षाच्या तिकिटावर उभे नसलेल्या परंतु दलित वर्गाचा पाठिंबा असलेल्या अनेक उमेदवारांना त्याने निवडून येण्यास मदत केली. ज्यांना आमच्या प्रयत्नांपासून हित साधून घ्यावयाचे असेल त्यांनी करून घ्यावे. परंतु या देशाच्या राजकारणात दलित वर्ग महत्वाची भूमिका वठवू शकतो, ही वस्तुस्थिती शिल्लक राहतेच आणि ही भूमिका त्यांच्या स्वतःसाठी व कामगार वर्गासाठीही अत्यंत सहाय्यक आहे.

तथापि, तुम्ही किती लवकर व किती उत्तम तऱ्हेने संघटित व्हाल यावर हे सर्व अवलंबून आहे. तुम्ही संघटित का व्हावे आणि संघटनेद्वारे तुम्ही काय करू शकाल हे मी तुम्हाला सांगितलेच आहे. आता तुम्हाला एवढेच सांगून मी भाषण संपवतो की, तुमची स्वतःची संघटना उभारण्याच्या कार्यात तुम्ही आता मुळीच विलंब लावता कामा नये. या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे निमंत्रण देऊन तुम्ही माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी तुम्हाला सुयश चिंतितो.”

~~~

क्रमशः

येथून https://roundtableindia.co.in/Marathi/?p=2795

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे आपले संविधान-2 “ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू!” पृष्ठ क्र.१९-२४, कौशल्य प्रकाशन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*