या कथित स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही…

शुभम अहाके

या कथित स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही

४७ च्या सत्तांतराला आजादीचं नावं दिलं
आपल्या जनतेच्या पाठीवर बघा कसलं घाव दिलं
दिलं जुल, दिला दगा, स्वातंत्र्याचा नावावर
बघा मुठभर रक्तपिपासू बसले आपल्या छातीवर
विकुन-विकुन देश‌ खाऊन, पोट यांचं भरत नाही
या असल्या स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही.

भांडवलशाहीच्याही जोरावर साम्राज्य हा ऊभा केला
सामंतांच्या जोडीने संसार सुखाचा सुरू केला
आजादीचं दिवास्वप्न दाखवत
नवीन समयाची आस दाखवली
ते गेले भव्य महालात
आणि आम्हाला गरीबी,बेकारी आणि दारिद्रयाची वाट दाखवली.
तुमच्या खोट्या थापांना मर्यादा कधी पुरत नाही,
आणि या स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही

जालियनवाला बागेला समोर करून
खरसावाचा इतिहास लपवला जातो,
कधी ग्रीन हंट, कधी सलवा जुडूम
तर कधी सिलगेरचा नरसंहार घडवला जातो
जिवलग नातं, जिवापाड प्रेम आता ज्यांना मिळत नाही,
त्या आदिवासी माऊलींचा आक्रोश काही सरत नाही
मला या स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही.

रमाबाई नगर,खैरलांजी, लक्ष्मणपुर बाथे
मराठवाडा, उन्नाव, मिर्चपूर की सहमी राते
हत्याकांड , बलात्कारांची प्रथा त्यांची अखंडित आहे
राज्य- न्यायव्यवस्थेचे डोळे कसे बंद आहे
दलितांच्या रक्तांचा सडा हा कधी सुकत नाही
मला या स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही

ऑनलाईन एज्युकेशनच्या नावावर प्रिविलेज आमचं लहान पडलं
भांडवलदारीच्या दारावर शिक्षण आमचं गहाण पडलं
रोहित झाला, पायल झाली, झाली पोलखोल व्यवस्थेची,
साम्राज्यवादी गठजोडीच्या या ब्राह्मणी षडयंत्राची
शिक्षणातल्या मनुवादाच भूतदेखिल मरत नाही
मला या स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही.

समता, स्वतंत्रता आणि बंधुता
आता मिळते फक्त पानांवर
कल्पनेच्या आकाशातील
इंद्रधनूच्या धानांवर
विषम पोकळी खोल आहे, जात-वर्गाच्या नावावर
स्त्रीविरोधी , पुरूषवादी पितृसत्तेच्या नावावर
वंचित जात-वर्ग आणि लिंगाला हक्क सुद्धा मिळत नाही
या असल्या स्वातंत्र्याचा अर्थ काही कळत नाही

शुभम अहाके

लेखक गोंदिया येथील रहिवासी असून त्यांनी BA (Hons) हे पदवीचं शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठ येथून पूर्ण केले आहे, सध्या ते समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण आंबेडकर स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, लखनऊ येथून पूर्ण करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*