पाश्चात्य नास्तिक-विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या मर्यादा, एक वैयक्तिक अनुभव…

गौरव सोमवंशी

रिचर्ड डॉकिंस, क्रिस्तोफर हीचन्स, सॅम हॅरीस, आणि स्टीव्हन पिंकर..

मी तेव्हा अकरावीत होतो.. २००६ साली इंग्लंडमधील वैज्ञानिक, रिचर्ड डॉकिन्स, यांचं ‘द गॉड डिल्यूजन’ बाजारात आलं आणि एकच खळबळ माजली.. त्याअगोदर त्यांचं ‘द सेल्फीश जीन’ वाचलं होतं (जे आजसुद्धा उत्क्रांतीवादावर एक अजरामर पुस्तक आहे, आपला “मीम” शब्द त्याच पुस्तकात १९७६ साली त्यांनी जन्माला आणला). पण एक विख्यात वैज्ञानिक असा समोर येऊन धर्मावर कडाडून टीका करतोय हे पाहिलं की तेव्हा एक वेगळाच रोमांच वाटायचा. मग ओर्कुटवर जाउन मिळेल त्याच्याशी वाद-प्रतिवाद घालायचा, घरच्यांशी-मित्रांशी तेच गप्पा.. त्यांचं पोस्टर मिळत नाही म्हणून कलर-प्रिंटरमध्ये प्रिंट घेऊन लावलं होतं घरच्या भिंतीवर..

असच काही सॅम हॅरीसचं. रूढी-प्रथांवर टीका करून धर्मावर धारधार टीका करणारच.. २००४ मधेच ‘एन्ड ऑफ फेथ’ लिहून यांनी हा ट्रेंड सुरू केलेला. याला २००१ साली झालेल्या ९/११ या हल्ल्याची पार्श्वभूमी होती, आणि त्यांनी सरळसरळ धर्मावरच याचे खापर फोडले होते.

ख्रिस्तोफर हिचन्स हे या सगळ्यांमधील सर्वात प्रखर, आणि इतरांप्रमाणे वैज्ञानिक नसून एक राजकीय अभ्यासक म्हणून समोर आले होते. माझ्या दहा वर्षे जुन्या प्रोफाइल फोटो/कव्हर फोटो मध्ये अजून तेच दिसतील. इंग्रजीवर त्यांच्या इतकं प्रभुत्व दुसऱ्या कोणाचं क्वचितच मी पाहिलं असेल. त्यांचं जवळपास लिहिलेलं सगळं वाचले, वरून त्यांना फक्त जॉर्ज ऑरवेल आवडतो म्हणून जबरदस्ती त्यांना देखील वाचून काढलं. कँसर झाल्यावर मरण्याच्या जस्ट अगोदर लिहिलेलं त्यांचं पुस्तक वाचून कितीतरी रडायचो. त्यांचं ८००-९०० पानांचं ‘आर्ग्युएबली’ हे त्यांच्या अनेक वर्षात लिहिलेल्या लेखांचं कलेक्शन तर झपाटून वाचायचो. त्यामध्ये ते कुठेतरी नमूद देखील करतात की भारतात खरा इतिहास घडविणाऱ्यांपैकी गांधींपेक्षा लोकांनी बाबसाहेबांकडे बघायला हवं. ते अचानक वाचलेलं पाहून अजून जोश यायचा.

या तिघांमध्ये डॅनियल डेनेटचं नाव टाकलं, तर त्याकाळी प्रसिद्ध झालेले “नवीन नास्तिकतेचे चार घोडेस्वार” म्हणून त्यांना ओळखलं जायचं (बायबलचा रेफेरन्स). त्यांच्यावर जास्त बोलत नाही कारण इकडे प्रेम अजून अबाधित आहे.

पण स्टीव्हन पिंकर यांना जोडुया. स्टीव्हन पिंकर हे हार्वर्डचे प्रोफेसर आणि त्यांचं ‘द लँग्वेज इन्स्टिक्ट’ या पुस्तकाने त्यांना भरपूर प्रसिद्धी दिली.. त्यांनी पुढे येउन मग ‘द ब्लॅंक स्लेट’ पासून थोडं सामाजिक भाष्य सुरू केलं, पण प्रत्येक वेळी वाटायचं की वैज्ञानिक माहितीची बरीच ओढाताण करून निष्कर्ष काढले जात आहेत. त्यांचं आता आलेलं ‘द एज ऑफ एनलायटेन्मेंट’ यावरून तर कळलंच की पिंकर साहेबांनी इकडे थोडं अभ्यास करून उतरायला हवं होतं..

मग पुढे चौघांचं काय झालं? नंतर कळत गेलं की गोष्ट फक्त धर्म किंवा श्रद्धेएवढी साधिसोपी नाही. सामाजीक-आर्थिक शोषणाची एक आख्खी ग्रँड आयडीयोलॉजीच चालवली जाते, आणि त्यामध्ये फक्त नेमकं खऱ्या कारणांवर लक्ष केंद्रित न होवो म्हणून काहींना मोठं केलं जातं. नास्तिकता-विज्ञानवादी हे सगळं ठीक आहे, मी पण आहेच, पण फक्त १०० प्रश्नांच्या पेपरमध्ये २-३ उत्तरं बरोबर आली म्हणून लगेच तुम्ही टॉपर होत नाहीत. पण बाकीची प्रश्न कधी समोर येऊच नये म्हणून केलेला हा खटाटोप.

हिचन्सने जेव्हा इराक युद्धाचा पूर्णपणे पाठिंबा दिला, आणि त्यासाठी सर्वत्र बोलत सुटला, तिथेच मी दुरावलो. त्याने बाबासाहेबांवर पण किती छान लिहिलंय, असली बालिश भुरळ अरुंधती रॉयच्या वेळेसच स्वतःवर घालून घेणं मी बंद केलं होतं. युद्ध पुकारून नक्की कोणते आणि कोणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत हे अनेकांना दिसतच होतं.

डॉकिन्स आणि सॅम हॅरिस यांनी देखील धर्माचं “ठोकळीकरण” करून धर्माचा एक बाळबोध चित्र समोर आणलच, ज्यामध्ये जगातील एका कोपऱ्यात होणाऱ्या अत्याचाराला जगातील दुसऱ्या कोपऱ्यातील त्याच धर्माच्या माणसाला जाब विचारणे. यामध्ये धर्मावरचे स्थानिक पातळीवर होणारे विविध बदल, अनेक बारकावे, त्या-त्या जागेची कोणती सामाजिक-आर्थिक संरचना आहे का, हे सगळं चुलीत टाकून एक क्रूर विचार समोर आणला गेला.. नक्की शोषण कसं होतं, त्यामुळे काय काय त्रास निर्माण होतात, धर्मांधता चुकीचेच पण त्यामध्ये कोणी पैसे-बंदुका टाकून भर दिला? हे प्रश्न गायबच.

पण याच पिढीत जेव्हा सामाजिक-आर्थिक बाबींचा विचार करून नवीन पिढी त्यांना प्रश्न विचारु लागली, तेव्हा हे सगळे उघडे पडले. स्वतःलाच मला कसंतरी वाटायचं की नक्की कोणती भावना मनात ठेवू. त्यांचं विज्ञान तर चांगलंच आहे, पण त्यावरून त्यांनी समोर आणलेलं चित्र, की हे जग नक्की कोणत्या शक्तींवर किंवा संरचेनवर चालतं, इथेच कुरघोडी केली.

नवीन पिढीचे प्रश्न इतके येऊ लागले की पिंकर साहेबांनी त्यावर खास ५००-६०० पानांचं पुस्तक लिहिलं ज्यामध्ये फक्त इतकं सांगितलं आहे की अगोदरपेक्षा सगळं काही गुण्यागोविंदाने सुरू आहे, जास्त लोड नका घेऊ, वगैरे. (त्यांच्यावर जॉन ग्रे यांनी सर्वात मस्त पोलखोल केली आहे, नाव गुगल करून सगळं मिळेल).

आज चौघांना नवीन पिढी काहीच स्पॉटलाईट देत नाही. अर्थात, याला आपल्याकडील लोकांचा अपवाद आहे कारण आपण पाश्चात्य ट्रेंडच्या काही वर्षे मागेच चालतो.

शेवटी कुफिरच्या एका वाक्याने बरंच चित्र मला मोकळं झालं:

this famous rationalist posed a question to the dalit bahujans recently: ‘caste is ok, but when will you talk of ‘science’ and ‘rationalism’?’ ullu ke patte, what was phule talking about when he asked the shudras and ati-shudras to shun mantras and priestly bakwas? what was ambedkar talking about when he unraveled all the riddles in brahmanic scriptures? (2015)

म्हणजे की विज्ञानवादी चळवळ बघायला तिकडे काय नाही करावं हे शिकणं महत्वाचं. नाहीतर आपण पण घोड्यावर स्वार होऊन निघू आता तालीबानात.

काही प्रश्न वेगवेगळेच असतात, पण काही प्रश्नांना मुद्दामून वेगळं केलं जातं जेणेकरून आपण आजार सोडून फक्त तापावरच लक्ष द्यावं.

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*