तुषार राजेश्री दीपक मांडवकर
'गेल एक घास घे' असं म्हणत कॉ. भारत पाटणकर सरांनी डॉ. गेल ओम्व्हेट यांना घास भरवला तेव्हा मी आणि गुणवंत त्यांच्या समोरच उभे होतो. दोन उतरत्या वयातील दाम्पत्यांमधील हे प्रेमाचे नाते नवे प्रेम आभाळ विणू पाहते आहे ज्यांचा परिचय तेव्हा आम्हाला झाला. तसा मी सम्यक साहित्यसंमेलनामध्ये पहिल्यांदा डॉ. गेल ओम्व्हेट आणि कॉ.भारत पाटणकर सर यांना भेटलो. डॉ. गेल ओम्व्हेट यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने डॉ. गेल ओम्व्हेट आणि कॉ. भारत पाटणकर सर आले होते. इतकीच भेट. डॉ. गेल ओम्व्हेट यांनी अनेक चळवळीत सहभाग घातलेला आहे. त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळी मध्ये त्यांनी झपाटल्या सारखे काम केले. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले, पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हीण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली. पुढे त्यांनी स्रि-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. वेगवेगळ्या चळवळीत पुढाकारात आणि सहभागात राहिल्या आणि चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून भारतभर मांडणी करू लागल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. तत्कालीन खानापूर जि. सांगली तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच पुढाकारात राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या त्या वर्षभरा पूर्वीपर्यंत पुढाकारात आणि आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या आहेत. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्यांनी मानवतावादी मूल्यांसाठी लढा उभारला आणि त्यातूनच इथल्या शोषित, पीडित माणसांसाठी संघर्ष सुरू केला.
डॉ. गेल ओम्व्हेट यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले- आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वास मध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे. FAO, UNDP, NOVIB च्या सल्लागार राहिल्या आहेत. ICSSR च्या वतीने भक्ती या विषयावर संशोधन केले आहे. दि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली या प्रतिष्ठित अंकामध्ये व द हिंदू या देशभरात जात असलेल्या इंग्रजी वर्तमान पत्रामध्ये यांचे विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ. गेल ओम्व्हेट आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक, भारतीय समाज, जातीव्यवस्था, इथले लोकजीवन, मौखिक परंपरा, संत साहित्याच्या गाढया अभ्यासक, स्त्री वादाची नवी मांडणी करीत ग्रामीण स्त्रियांचे शोषण केंद्रस्थानी आणणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या, फुले आंबेडकर तत्वज्ञान त्याच्या सामर्थ्यासह पुन्हा नव्याने अधोरेखित करणाऱ्या डॉ. गेल ओम्व्हेट या आज आपल्यात नाही. त्यांचं जाणं आणि डोळे पाणावले इतके जोडलो जातो आपण.
सम्यक साहित्यसंमेलनात मी स्वयंसेवक म्हणून मान्यवरांच्या स्वागत कक्षात होतो. कॉ. भारत पाटणकर आणि डॉ. गेल ओम्व्हेट त्या कक्षात आले तेव्हा खूप सारे लोक त्यांना भेटायला येत होते. काही स्त्रिया त्यांच्याशी बोलत असताना कॉ. भारत पाटणकर सर यांनी डॉ. गेल ओम्व्हेट यांच्या खांद्याला पकडलं आणि वॉशरुम ला घेऊन जायला निघाले तेव्हढ्यात शेजारच्या स्रिया म्हणाल्या 'आम्ही घेऊन जातो' त्यावर कॉ. भारत पाटणकर सर म्हणाले ते अतिशय महत्वाचं वाटतं, ते म्हणाले - 'त्या तुमच्यासोबत जाणार नाहीत.' या त्यांच्या शब्दांत प्रेमाची नवीच व्याख्या आणि पारंपरिक चौकटीला छेद देणारे आहे. इथल्या तथाकथित स्त्री पुरुषांच्या नात्याला झुगारून सहजीवनाचे, एकरूपतेचे तत्व माणसाला मानवतेच्या जवळ नेणारे आहे असे वाटत होते. त्यांच्या शब्दांत महात्मा फुलेंचे शब्द आज मला ऐकायला येतात महात्मा फुले दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाले - 'माझं दुसरं लग्न लावणार असाल तर सावित्रीचं पण दुसरं लग्न लावा.' या शब्दातील असणारे एकमेकांविषयी प्रेम मानवतेला अधिक अधोरेखित करणारे आहे. सहजीवन जगण्याची नवी व्याख्या करणाऱ्या या दाम्पत्याविषयी आपण नेहमी कुतूहलपणे पाहतो.असही जगता येते... त्यात स्वातंत्र्य आणि प्रेम या मूल्यांवर उभी राहणारी क्षितिज समांतर माणसं मनाला भावतात. मग आपण त्यांना शोधू लागतो, वाचू लागतो. आमच्या डॉ. वंदना महाजन मॅडम आणि मी महात्मा फुले यांच्या विषयी बोलत असताना.... 'तुषार डॉ. गेल ओम्व्हेट यांची मांडणी तू वाचायला हवी.' असं नेहमी सांगत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नंतर सहजीवनाची, सहसंघर्षाची चळवळ उभारणारे डॉ. गेल ओम्व्हेट आणि कॉ. भारत पाटणकर असं मॅडम नेहमी सांगायच्या. त्यातूनच मी डॉ. गेल ओम्व्हेट यांनी फुलेंच्या बाबती जी मांडणी केली आहे ती वाचायला सुरुवात केली. नुकतेच त्यांचं 'जोतिबा फुले आणि स्त्री - मुक्तीचा विचार' हे पुस्तक वाचून काढलं होतं.
या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर गेल लिहितात - 'स्थापाया अधिकार मी झटतसे...' म्हणजेच महात्मा फुले ज्या अधिकारांसाठी झटले. लढले. ज्यांनी स्वातंत्र्य, समानता आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला त्या फुलेवादी मार्गावर चालण्याचा ध्यास घेणाऱ्या डॉ. गेल ओम्व्हेट या स्वतःच्या अधिकारांविषयी झटलं पाहिजे असं सांगतात. यातूनच महात्मा फुले यांच्या विचारांचा त्यांच्या लिखाणात असणारा प्रभाव आणि लढण्यासाठीची तयारी लक्षात येण्यासारखी आहे.
मूळच्या अमेरिकेतल्या पण इथल्या मातीवर प्रेम व्हावं आणि इथल्या माणसांसाठी लढा उभा करावा हे इथल्या सामाजिक चळवळीला अधिक बळ देणारे आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात - "मार्क्सच्याच काळात जगाच्या दुसऱ्या बाजूला जोतिबा फुले नावाचा शेतकरी समाजातील माणूस 'जग बदलण्याच्या' स्वतःच्या मोहिमेत सामील झाला होता." म्हणजेच महात्मा फुले यांचे विचार जागतिक स्तरावर मांडताना महात्मा फुले यांच्या वैश्विक विचारातील वैश्विक स्वरूप अधिक गडद करण्याचा प्रयत्न डॉ. गेल ओम्व्हेट करतात. जागतिक स्तरावर मानवमुक्तीच्या मार्गाचा विचार करताना अनेक लेखकांचा विचार आपण करतो. मानवमुक्तीचा मार्ग शोधताना जेव्हा मार्क्स, लेनिन, माओ यांच्या बरोबरीनेच महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा देखील विचार करायला हवा असं म्हणताना डॉ. गेल ओम्व्हेट यांनी महात्मा फुले यांची मानवतावादी चळवळ ही वैश्विक कशी आहे हे सांगितले आहे. या पुस्तकाच्या सुरवातीला 'फुल्यांचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन' हा लेख आहे. प्रश्न विचारत उत्तरे शोधण्याची चिकित्सक वृत्ती महात्मा फुले यांच्याकडे होतीच आणि त्यातून त्यांनी इतिहासाला प्रश्न विचारत सत्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यातूनच शूद्र - अतिशूद्र व स्त्रिया यांच्या गुलामीचा इतिहास रेखाटताना महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या इतिहासाविषयी जी मांडणी केली आहे त्याविषयी बोलताना डॉ. गेल ओम्व्हेट म्हणतात. 'जोतिबांच्या लेखनात स्त्रियांची गुलामगिरी लुटीच्या व्यवस्थेच्या सुरुवातीपासून होती आणि या व्यवस्थेशी संबंधित रीतीने तिचा उगम झाला असा समज दिसतो. स्वाऱ्या, लुटालूट हे प्रकार सुरू झाले. लुटारूनमध्ये स्त्रिया नव्हत्या. आणि जेव्हा जिंकणाऱ्या पुरुषांनी मूळ पराभूत लोकांना दास म्हणून ठेवण्यासाठी धर्मग्रंथ लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यांच्यापैकी स्त्रियांना आणखी दुय्यम स्थान ठरवून दिले. पुरुष व ब्राह्मणांची सेवा करायला सांगितले.' हा फुलेंच्या लिखाणातील असणारा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय मार्मिकपणे व स्त्रियांच्या गुलामीचा इतिहास डॉ. गेल ओम्व्हेट यांनी अधोरेखित केला आहे.
या पुस्तकात 'जोतिबांचे स्त्री - शिक्षणाचे कार्य', 'जोतिबा, सावित्रीबाई आणि बहुजन समाज कुटुंब', 'स्त्री - मुक्तीसाठी पुढे येणाऱ्या त्या काळातील स्त्रिया', ताराबाई शिंदे : स्त्री - मुक्तीच्या क्रांतीअग्रणी', 'पितृसत्ताकतेच्या शोधात जोतिबा', 'कुटूंबसंस्थेची पुनर्रचना', 'स्थापाया अधिकार मी झटतसे', 'स्त्री - मुक्ती विचारांची पुढची झेप' असे लेख महात्मा फुले यांच्या लिखाणातील असणारा स्त्री - मुक्ती विचार अधोरेखित करतात. महात्मा फुले यांनी पितृसत्ताक व्यवस्थेला प्रश्न विचारत मानवतावादी विचारांची मांडणी केली आणि म्हणूनच महात्मा फुले तृतीयरत्न या नाटकाचा शेवट स्त्री - पुरुष यांच्या शिक्षणाने करतात. ज्या व्यवस्थेने स्त्रियांचे शिक्षण नाकारले त्या व्यवस्थेला भेदून महात्मा फुले स्त्री शिक्षणाचा विचार मांडतात ते शिक्षण मानवतावादी विचारांवर उभे असलेले दिसते. आणि म्हणुनच डॉ. गेल ओम्व्हेट महात्मा फुलेंच्या लिखाणातील असणारा सलगपणा, त्यांच्यातील टप्पे लक्षात घेऊन त्याच क्रमाने त्यांच्या साहित्याचा विचार करतात. इतिहासकडून समग्र परिवर्तनाचा विचार महात्मा फुले यांच्या लिखाणाचा जो आकृतिबंध आहे त्याच पध्दतीने डॉ. गेल ओम्व्हेट महात्मा फुले यांच्या मूळ विचाराचा शोध घेऊ पाहतात. हा शोध घेताना मार्क्स आणि महात्मा फुले यांचे यांच्या विचारातील साम्य, मतभेद अतिशय सूक्ष्मपणे अधोरेखित करताना म्हणतात - 'वर्ग ऐवजी फुल्यांनी जात संबंध हे शोषणाचे साधन म्हणून मांडले. भांडवलशाही ऐवजी भटशाही, नोकरशाही यांच्यावर हल्ला केला.'
एकूणच या पुस्तकात महात्मा फुले यांच्या स्त्रीमुक्तीचा आढावा घेताना महात्मा फुले यांच्या साहित्यातील स्त्रीविचार प्रखरपणे मांडताना आपल्याला दिसतात. स्त्रियांविषयी महात्मा फुले जी समानतेची भूमिका घेतात ती भूमिका शोधताना महात्मा फुले स्त्रियांना पुरुषांपेक्षा श्रेष्ठ स्थान देतात याचा शोध घेताना स्त्रियांचा इतिहास, शिक्षण आणि त्यातून जी स्त्रीमुक्तीची चळवळ निर्माण झाली त्याची मांडणी या पुस्तकात केली आहे. महात्मा फुले आपल्या लिखाणात स्त्रियांविषयी बोलताना 'मानव स्त्री' असा उल्लेख करतात डॉ. गेल ओम्व्हेट याच शब्दाचा शोध घेत महात्मा फुले यांच्या सबंध साहित्याचा विचार करतात. आणि महात्मा फुले यांच्या स्त्रीमुक्तीच्या लढ्यात सामील होतात. हे विचारांशी एकरुप होणं आणि आयुष्यभर त्याच मूल्यांवर जगणं याचं उदाहरण म्हणजे डॉ. गेल ओम्व्हेट.
कालच मैत्रिणीशी बोलताना डॉ. गेल ओम्व्हेट यांच्या तब्बेती विषयी चिंता व्यक्त केली... 'आपण त्यांना भेटूया' असं कालच बोललो आणि आज डॉ. गेल ओम्व्हेट आम्हाला सोडून गेल्या. तुमच्याशी खूप बोलायचं होतं महात्मा फुले समजून घेताना तुम्ही नेहमी आमच्या मार्गदर्शक आहात... आज आपसूक डोळे पाणावले.. तुमचं पहिलं पुस्तकं मिळालं तेव्हा खूप सारा आनंद झाला होता... पुस्तक वाचल्यावर भेटायची तीव्र इच्छा व्हावी इतकं जवळ केलंत आणि आता सोडून जाणं हे न पटण्यासारखे आहे. तुमच्या कामाला, तुमच्या संघर्षाला, तुमच्या विचारांना आमचा सलाम... तुम्ही लिहिलेलं प्रत्येक पुस्तक आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहील... मी आता कुठे तुमचा विद्यार्थी झालो होतो... विद्यार्थ्यास सोडून जाणं बरोबर नाही....
तुषार राजेश्री दीपक मांडवकर
लेखक मूळ रत्नागिरी येथील रहिवासी असून मुंबई विद्यापीठ येथे शिक्षण घेत आहेत.
Latest posts by तुषार राजेश्री दीपक मांडवकर (see all)
Leave a Reply