किरण चव्हाण
मुंबई नागपूर बुलेट ट्रेनची चर्चा चालू आहे. चाचपणी चालू आहे. या प्रकल्पाला महाआघाडी अनुकूल आहे.
मुंबई अहमदाबाद ही बुलेट ट्रेन ज्या कारणासाठी नको होती त्यातली कोणती कारणे या प्रकल्पाला लागू होत नाहीत ? मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पैसा हा चुराडा आहे हे मान्य असल्याने या भूमिकेला भाजप सोडून सर्वांनी पाठिंबा दिला होता. राज ठाकरेंचा विरोध उधळपट्टीला नव्हता. त्यांचे एक भलतेच चालू असते. त्यांनी बुलेट ट्रेन हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान असल्याचे सांगितले होते.
मुद्दा हा हवा कि बुलेट ट्रेनचा खर्च आणि तिच्या फे-या पाहता ती किफायतशीर ठरेल का ? जगभरातला अनुभव असा आहे कि लांबच्या अंतरांसाठी बुलेट ट्रेनपेक्षा स्वस्त विमानसेवा ही किफायतशीर ठरते. भारतात स्वस्तातली विमानसेवा सुरू होऊ शकते. कॅप्टन गोपीनाथ हे यांनी ते दाखवून दिले होते. दक्षिण आफ्रिकेत एअर टॅक्सीज असतात. कमी आकाराची, स्वस्तातली विमाने एकामागोमाग एक सोडली जातात. जोहान्सबर्ग ते केपटाऊन या मार्गावर अर्ध्या अर्ध्या तासाला विमान होते.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे किमान तिकीट ३००० रूपये इतके आहे. प्रत्यक्षात ते जास्त होऊ शकते. ही ट्रेन मॅग्लेव्ह असू शकत नाही. ती हायस्पीड डिझेल ट्रेनच असेल. इंधनाच्या दरांचा तिकीटावर परिणाम होईल. प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होईपर्यंत ते जास्त होईल. पण सध्या आपण आताचा दर पकडूयात.
मुंबई अहमदाबाद या ५६६ किमी अंतरासाठी सुमारे ९८००० कोटी रू इतका खर्च येणार आहे. त्यासाठी कर्ज काढले गेले आहे. हा खर्च भरून निघायचा असेल तर व्याज + खर्च + प्रकल्प चालवण्याचा खर्च किती वर्षात भरून काढायचा हे ठरवावे लागेल. कर्जाचा कालावधी किती वर्षे आहे तो ब्रेक इव्हन पॉईण्ट धरला तर या काळातच हा खर्च भरून निघावा लागेल. ३००० रूपये हे तिकीट गृहीत धरताना या ट्रेनच्या फे-या आणि एकूण खर्च हे गणित लक्षात घेतले असावे असे गृहीत धरूयात.
मुंबई नागपूर हाय स्पीड ट्रेन अंतर ७४१ किमी आहे. या मार्गावर सध्या एक लोहमार्ग आहे. या लोहमार्गाचे मजबुतीकरण करायला किती खर्च येईल हा विचार झाला आहे का ? हे अंतर ४ तासात कापण्यासाठी १ लाख ५० हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. (हा खर्च मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रति किमी या हिशेबाने गृहीत धरला आहे. मुंबई अहमदाबादचा खर्च आजपासून सहा ते सात वर्षांपूर्वी निश्चित केला होता. आजच्या दराने हा खर्च निश्चित वाढेल. तसेच प्रत्यक्षात काम कधी होईल याप्रमाणे तो आणखी वाढेल ). राजधानी एक्सप्रेससाठी असणारे इंजिन हे सुमारे १७० किमीच्या वेगाने जाऊ शकते. पण लोहमार्गाची स्थिती आणि रेल्वेमार्गांची सुरक्षा याचा विचार करता रेल्वेने १४० पेक्षा जास्त वेगाने ही ट्रेन नेता येणार नाही असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र राजधानी एक्स्प्रेस १६० किमी वेगाने सहज नेता येऊ शकते असा अहवाल तांत्रिक कमिटीने सर्व्हे दरम्यान दिला होता. त्यासाठी लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंना संरक्षणात्मक कुंपण उभारावे लागेल.
मुंबई नागपूर हे अंतर चार तासात म्हणजे १८५ किमी वेगाने ट्रेन न्यावी लागेल. यासाठी नव्या ट्रेन्स खरेदी केल्या जाणार. नवा लोहमार्ग. त्यासाठी भूसंपादन. भूसंपादनातला भ्रष्टाचार हे पाहता सध्याचा १,५०,००० कोटी रूपयांचा अंदाज वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या मार्गावर अहमदाबाद मुंबई च्या दराने ५००० रूपये तिकीट राहील ही शक्यता नाही. ते जास्तच असेल. या दराने कोण तिकीट घेईल ?
दिल्ली चंदीगढ नव्या शताब्दी एक्स्प्रेसचे २६६ किमी अंतरासाठीचे तिकीट ७६६ रू आहे. पुणे नागपूर शताब्दी एक्स्प्रेसला ते १५०० रूपयांच्या आसपास राहू शकते. त्यासाठी नव्याने लोहमार्ग टाकायची गरज नाही.
मुंबई कोलकाता या मार्गावर सध्याच्या विमानसेवांमधे १५०० रूपयांपासून तिकीट मिळते. ते सर्वांना मिळेल असे नाही. पण आधी बुक केल्य़ास स्वस्तात तिकीट मिळते. एका बाजूच्या तिकीटाचा दर हा २२०० रूपयांपासून ते २७०० रूपये आहे. गर्दीच्या वेळेचा दर रूपये ५००० ते ६००० इतका असतो. मुंबई कोलकाता हे अंतर रस्त्याने २०५१ तर हवाईमार्गाने १६५१ किमी आहे. मुंबई नागपूरपेक्षा जवळपास दुप्पट (हवाईमार्गे).
जर कमी आकाराची विमाने आणली तर १००० रूपयात पुणे नागपूर विमानसेवा फायद्यात राहील. ना नफा ना तोटा तत्वावर चालवल्यास हा खर्च १००० रूपयांपेक्षाही कमी येईल.
म्हणजेच वेळ वाचवणे हे उद्दीष्ट असेल तर स्वस्तातली विमानसेवा सुरू करून तिला सरसकट दर ठेवावेत. आधी बुक केले तर स्वस्त, गर्दीच्या वेळात जास्त तिकीट यावर नियंत्रण आणले पाहीजे. फार तर बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी इतकाच काय फरक असावा.
बुलेट ट्रेनच्या तंत्रज्ञानाचा अट्टाहासच असेल, वेगवान ट्रेनच हवी असेल तर आहे त्या लोहमार्गाचे मजबुतीकरण करून शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेसला चेअर कार जोडून सोडल्यास आणि जेवण खाण याला फाटा दिल्यास हे तिकीटही ९०० रूपयांच्या आसपास राहू शकेल. लोहमार्गाच्या मजबुतीकरणाला जास्त खर्च येणार नाही. शिवाय ही ट्रेन रेल्वेच्याच मालकीची राहील.
या पर्यायांचा विचार केला आहे का ? नसल्य़ास उगीचच दीड लाख कोटी रूपये खर्च करायचा का ? हे नेमके कुणासाठी चालले आहे ? ही उधळपट्टी नाही का ? राज्य शासनाकडे पैसे नसल्याचे सांगण्यात येते. मग या खर्चासाठी केंद्र शासन महाराष्ट्राच्या वाट्याला ६०% ते ७०% खर्च टाकेल तेव्हां कुठून पैसे देणार ?
राजधानी एक्स्प्रप्रेस किंवा शताब्दी १४० किमी ताशी या सध्याच्या दराने नेली तर चार तासाऐवजी पाच तास लागतील. यासाठी कोणताही वाढीव खर्च येणार नाही. एक तासाच्या बचतीसाठी एव्हढा भुर्दंड सोसणे गरजेचे आहे का ?
मुख्यमंत्री ठाकरे यांनी द्यायचीच असेल तर माझ्या महाराष्ट्रात माझ्या मुंबईपासून ते माझ्या नागपूरपर्यंत द्या असे म्हटले होते. अशी भाषा वापरली कि मराठी मन सुखावते. पण त्यामुळे एव्हढा भुर्दंड कसा काय समर्थनीय होईल ?
कि याचे कंत्राटदार आताच माहीत असल्याने कुठल्याही परिस्थितीत आजच्या अंदाजे दीड लाख कोटी खर्चाचा प्रत्यक्षात दोन अडीच लाख कोटी खर्च दाखवून नंतर तो वाढवत न्याय़चा आहे. यातला १५% नफा कंत्राटदाराला गेला तरी तो ३००० कोटी रूपये असेल. हात ओले खर्च किती असेल कल्पना नाही. हेच कारण आहे का ?
( या प्रकल्पाचा सरकारी खर्च अद्याप सांगितलेला नाही. मुंबई अहमदाबादच्या दराने खर्च गृहीत धरला आहे).
बुलेट ट्रेन पेक्षा विमानसेवा किफातयशीर कशी याच्या लिंक्स:
किरण चव्हाण
- प्रस्त्वावित बुलेट ट्रेन: किफायतशीर की उगाच भुर्दंड? - November 28, 2021
Leave a Reply