मयूरी अशोक आढाव(कारंडे)
मार्गदाता आयुष्यात असेल तर प्रश्न पडायचा अवकाश ! लगेच प्रश्न घेवून आपण त्यांच्यासमोर हजर होतो. असे गुरुवर्य आयुष्याला लाभणे हा एक आयुष्याचा सुवर्णकाळ असतो. माझ्या आयुष्यातील हा सुवर्णकाळ आहे. प्रश्न पडला की मी माझ्या गुरूंसमोर हजर. असाच एक प्रश्न घेवून मी जाधव सरांकडे गेले होते. प्रश्न होता की सहा डिसेंबर पूर्वी एक डिसेंबर हा इशारा दिन म्हणून का असावा? सरांनी मोठ्या उत्साहाने समाजावून सांगितलं. आजकाल जे प्रामुख्याने सहा डिसेंबर दिवशी बरेच लोक मोठ्या हौसेमौजेचे कार्यक्रम आयोजित करत असतात. हे करणे योग्य नाही आणि याचसाठी हा इशारा दिन असावा. यावेळी ओझरत्या भाषेत सरांनी सांगितलं की, समता सैनिक दलाचं 25 26 आणि 27 या तारखेला अधिवेशन आहे. 27 तारखेला दापोली, ‘वणंद’ रमाईचं गाव आणि आंबडवे बाबांच गाव पहायचं आहे. क्षणाचाही विलंब न करता मी अधिवेशनाला येण्याची तयारी सांगितली. येणारा खर्च विचारला आणि तिथेच जाण्याचा निर्णय घेतला. एरवी प्रत्येक निर्णय घेताना सर्वांसोबत चर्चा करून निर्णय घेणारी मी, पण त्या क्षणाची निर्णय तत्परता म्हणजेच माझी माय “रमाई” आणि माझा बाप “बाबासाहेब” यांना बिलगण्याचा क्षण होता, आणि आनंद गगनात मावत नव्हता.
पण सरांचीही तयारी जोरात सुरू होती. मीटिंग आयोजित करणं, कार्यक्रम कसा असेल सांगणं वेळोवेळी फोन करून सूचना देत राहणं हे चालूच होतं. मास्क, उबदार कपडे, सेनिटाईजर, पांढरे कपडे, औषधे घेणे यांसारख्या बर्याच सूचना सर जाण्याचा दिवस येईपर्यंत सांगतच होते. शेवटी दिवस उजाडला. 24 डिसेंबर 2021, तयारी तशी झाली पण अचानक घरगुती कारणाने माझी तारांबळ उडाली चक्क सव्वाचारपर्यन्त त्या दिवशी मी काही नातेवाईकांच्या कामासाठी बँकेत. नंतर येऊन, बॅगा घेऊन निघालो. मुलगीही घाबरलेली कारण तिला थोड अस्वस्थ वाटत होत, काय करावं सुचेना पण ठरले, होईल सगळं ठिक आणि निघालो. आई आणि बाबांच्या मुळगावी जाण्याच्या ओढीने, रमाई आणि माझ्या बाबांच्या मुळगावी जाण्याची जी ओढ होती तिने सगळ्या नकारार्थी वैचारिक मालिकेवर शेवटी मात केली. सरांच्या घरी सगळे भीम मार्शल जमले. थोड्याच वेळात आमचा प्रवास सुरू झाला. अचानक झालेल्या धावपळीने थोडा थकवा आलाच होता, प्रवास सुरू होता पण अधिवेशन तळवली तालूका गुहागर या ठिकाणी होतं. पण हे ठिकाण सहजासहजी सापडलं असतं तर हा प्रवास कदाचित अविस्मरणीय झालाच नसता. कराड मध्ये पोहचेपर्यंतच आम्हाला काळोखाने गाठलं होतं. कराडपासून चिपळूनपर्यंतचा प्रवास तसा विनासायास पार पडला अर्थात याच श्रेय आमचे भीम मार्शल आकाराम कांबळे सर यांना. घाटातून प्रवास करणं तेही रात्री, अनुभव थरारक होता आणि हे साध्य झालं ते आमच्या दोन्ही ड्रायव्हर मुळेच.पण हेही नसे थोडके म्हणून की काय रात्र होती आणि रस्ता चुकण्याचं सत्र सुरूच होतं. शेवटी तळवलीतूनच दोन भीम मार्शल एका फाट्यावर सरांच्या सततच्या फोनवरील संवादामुळे येऊन थांबले. त्यांच्या दिशादर्शकतेखाली आम्ही निश्चित स्थळी पोहोचलो. पहाटे दोन वाजता आमचा प्रवास तळवलीत येऊन थांबला होता. गारठा मी म्हणत होता. माझी मुलगी लहान आहे पण खूप समंजस आहे. त्या गारठ्यात, अनोळखी ठिकाण, पण कसलाच त्रास नाही दिला तिने. महिला व मुलींसाठी एका बाबांच्या घरी राहण्याची सोय केली होती. उशीर खूप झाल्यामुळे फक्त झोपण्यासाठीची चर्चा त्या पहाटे दोनच्या सुमारास करता आली. आम्ही फक्त पांघरन्यासाठी एकच उबदार पांघरूण घेतलं होतं. त्या बाबांनी आपल्या घरातील आंथरून दिले. झोपमोड होऊनही बाबांनी आपल्या प्रेमाची झलक केव्हाच दाखवली. पवार बाबा अस त्यांचं नाव. पहाटे पाच वाजता भीम मार्शल मुली उठल्या, तयार झाल्या ससैदच्या नियमांनुसार. इतक्या थंडीत मैदनातील कवायत सरावासाठी. पवार बाबांनी चूल पेटवून घरचं सरपण देऊन सगळ्या मुलींसाठी गरम पाण्याची सोय केली. भीम मार्शल प्रेरणा तांबे मॅडम सर्व मुलींना तयार होण्यासाठी मार्गदर्शन करत होत्या. थोड्याच वेळात माझ्या मुलीसहित आम्ही तयार झालो. बाबासाहेबांच्या विचारांचं वादळच असं असतं की लहान, थोडं समंजस मुलही ऊर्जावान होतं. नाश्ता करून सर्व तयार होऊन विहारासमोर हजर झालो. अधिवेशनाचा पहिला दिवस होता. खूप सुंदर अशा तळवलीतील विहारासमोर भीम मार्शल संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भीम मार्शल यांनी परेड केली. मान्यवर अतिथिंना मानवंदना दिली. ध्वजारोहण आणि त्रिसरन पंचशील घेऊन चर्चा सत्र सुर केलं. खूप उत्साहाचं वातावरण होतं. शुभ्र कपड्यामध्ये, खाकी युनिफॉर्म, निळी टोपी परिधान केलेले मार्शल्स सारच नवचैतन्य निर्माण करणारं होतं. यानंतर चर्चासत्र सुरू झालं. मोहिते सरांच्या तडफदार सूत्रसंचालणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मा. गुलाब राजे सरांनी प्रस्तावनेत अधिवेशनाच्या पूर्व तयारी पासून ते प्रत्यक्षात कार्यक्रमाचा ओघ सांगितला. लक्षात आलं अधिवेशन आयोजित करण्यासाठी मागे किती लोकांची मेहनत असते. पण त्यांनी व्यक्त केलेली हळहळ जीवाला चटका लाऊन गेली. बाबासाहेब आणि येणार्या पिढ्यांमधल अंतर वाढत आहे. खरच हे अंतर दूर करण्यासाठी समाजाने सतत अशा कार्यक्रमाचं नियोजन करणं गरजेचं आहे. आदरणीय भीमराव आंबेडकर त्यांच्या उद्घाटनपर मार्गदर्शनाची चलचित्र फीत ही बाबांच जिवंत अस्तित्वाची छटा निर्माण करून गेली.
माननीय चवरे साहेबांची सदगदित करणारी बाबांविषयी तळमळ त्यांचे प्रश्न मलाही प्रश्नांकीत करत होते. बाबासाहेब जगाला मार्गदर्शक मग त्यांच्याच विषयी जागर फक्त आपल्याच जातीतून का ? हा रास्त आणि तितकाच चीड निर्माण करणारा प्रश्न मला सतत भेडसावतो. खूप सुंदर आणि चिकाटीने काम करण्याची गरज सांगणारी जागतिक वास्तवदर्शी अनेक उदाहरणे सांगितली आणि कार्यकर्ता म्हणून राहण्याचं जे समाधान त्यांनी सांगितलं ते निश्चितच अनुकरणीय!
या नंतर “समता सैनिक दल निर्मितीचा उद्देश, आजची अवस्था आणि त्यावरील उपाय” या विषयाला न्याय देताना जाधव सरांनी सांगितलं की एखादी संघटना आपली वाटत नाही म्हणून तिचं असणारं महत्व कधीच कमी होत नाही. हा विचार मला खरंच खूप वेगळा वाटतो, कारण प्रत्येक गोष्ट आपण आपल्याला आपलं समजावं म्हणून करत असतो पण त्याही पलीकड जाऊन चांगलं काम करत जाणं हे महत्वाच आणि योग्य. तत्वांपेक्षा त्याची उभारणी आणि कृती महत्वाची हे नितांत परिणामकारक आहे.
“चला समजून घेऊया प्रशासकीय कारभार आणि शासकीय योजना” भास्कर कांबळे सरांनी वेगवेगळ्या सुविधांची, योजनांची माहिती दिली. सुविधांचा वर्षाव इतका आहे मग मी अशी कोणती छत्री घेऊन उभी होते की माझ्या समाजापर्यंत, समाज बांधवांपर्यंत या सुविधाच पोहचल्या नाहीत. असा प्रश्न मला पडला पण क्षणार्धात आयुक्तांच्या अर्थात मा. माळवी सरनच्या वक्तव्याने त्याची उकलही झाली. सुविधा, योजना घेणर्यांमध्ये बसण्यापेक्षा त्या काय असाव्यात हे ठरविणारे आपण असावेत आणि सगळाच सुविधांचा, योजनांचा विपर्यास लक्षात आला.
राजे सरांनी ससैदच्या संविधानाची ओझरती बांधणी लक्षात आणून दिली. 1944 ला हे तयार झालं. यांत मैदानी विभाग, नागरी विभाग , न्याय विभाग याला अनुसरून कार्य चालत. मैदानी प्रात्यक्षिके आणि रात्रीच्या संस्कृतिक कार्यक्रमाने या प्रथम दिवसाची सांगता झाली.
दिवस दूसरा, विद्यार्थांच्या परेड आणि त्रिसरन पंचशीलाने सत्राची सुरुवात झाली. चर्चासत्रातील पहिलाच विषय “भारतीय संविधान माझ्या जगण्याचा अधिकार”. या विषयानुरूप प्रा. अमित वराळे यांनी खूप अल्पावधीत संविधानाची ओळख करून दिली. संविधान समजूनच घेण्याच्या वाटेला न जाणार्या आम्हा विध्यार्थ्यांसाठी ही धावती ओळख, हे ही नसे थोडके! राजेसरांनी, तांत्रिक भाषा समजत नाही,पारायण करावं लागतं, हा जो मूलमंत्र संविधान समजून घेण्याचा दिला, तो सदोदित लक्षात ठेवू, तांत्रिक बहुजनांच्या पलीकडलं आहे नक्कीच. अॅड. जाधव यांनी कायद्यातील मोजक्याच पण महत्वपूर्ण बाबी सांगितल्या.
गौतमी पुत्र कांबळे सर सर्व गुरुवर्यांचे गुरु यांचे विचार ऐकणे म्हणजे दुर्मिळ योग. ज्यांची फक्त पुस्तके मी वाचली (वाचली फक्त पारायणे नाही केली), त्यांच्या सोबत, अर्थात राजा ढाले, ज. वि. पवार यांच्यासोबत काम केलेली व्यक्ति पाहिली. हा राजयोगच होता. सरांचे विचार “आंबेडकरी पक्ष राजकारणात प्रभावहीन का “? यावरती होते. सरांचं पाहिलंच वक्तव्य मनात रुजलं “वाईट परिस्थिति असेल तर चांगलं करायला वाव आहे”. भ्रष्ट समाजातून भ्रष्टविरहित काही उपजत नाही. “डोनेशन जितकं जास्त तितकी हुशारी कमी”, हे साधंसोपं मला कधी न कळलेल गणित त्यांनी मांडलं, व्यक्ति पूजेच स्तोम कमी व्हायला हवं. राजकारणात व्यक्तिपूजा चालत नाही. सरांचा अभ्यास गाढा आहे विचारवंत ‘ग्रामसी’, आणि त्याने मांडलेले ‘वर्चस्व वाद’ समजून घ्यायला हवे . बाबासाहेबांचं ‘Annihilation of Caste’ समजून घ्यायला हवं. उच्च जातीचे लोक आपलं नेतृत्व मान्य करत नाहीत हे कटू वास्तव त्यांनी मांडलं. स्वतंत्र अस्तित्व असेल तरच स्वाभिमान जीवंत राहतो. “स्वतंत्र राहिलात तरच प्रगति कराल” सरांनी एक प्रसंग सांगितला. “आनंद कौसल्यायन यांना एक प्रश्न विचारला होता, विद्वान, व नम्र बौद्ध भिक्खुणे राजकारणात यावं का ? यावर त्यांनी दिलेल उत्तर असं ‘यावं, राजकारणात राजनीति महत्वाची, राजनीति शिवाय राजकारण करता येत नाही.’ शासनकर्ती जमात व्हायचं म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये समावेश किंवा आपला निर्णय मान्य करून घेणे होय. नैतिकदृष्ट्या प्रज्ञेनेयुक्त माणसं असावीत. सरांचे विचार कार्यरत व्हायला भाग पाडतात.
खांडेकर सर यांचे “धम्मापुढील आव्हाने” यांवरचे विचार म्हणजे वर्तन आणि विचार यांची चकमक होती. महात्मा फुले समग्र वाड.मय वाचून बर्याच प्रश्नांची उकल करून घेण गरजेचं आहे याची जाणीव झाली. वैचारिक पाया मजबूत असणं खरच महत्वाचं आहे जगण्यासाठी. जाधव सरांनी केलेल्या बहुजन, महार आणि मागासवर्गीय या प्रश्नानेच प्रश्नांकीत केलय अजून. या विचारांच्या वादळातच या अधिवेशनाची सांगता झाली. मा.विलास कांबळे सरांचे विचार सतत प्रेरणा देतील.
सरतेशेवटी, या दोन दिवसात तळवलीतल्या माऊलींच्या जेवणाची सर माझ्या हाताला आजन्म येणार नाही हे मात्र निश्चित. तुम्हा सर्व भगिनींच्या मायेची मी ऋणी राहीन॰
तिसर्या दिवशी बाबांच्या आणि रमाईच्या गावी जाण्याच्या ओढीची सांगता झाली. दापोली, बाबांनी ज्या खोलीत मला, माणसासारखं जगता यावं म्हणून अभ्यास केला त्या खोलीला पाहून, अभ्यासाची बाबांची तळमळ माझ्यासाठी आनकलनीयच ठरली. रस्ता चुकण्याच, न सापडण्याचं सत्र आमच्यासाठी ठरलेलच होतं पण ओढ मात्र अभेद्य होती. “वणंद”… मनाची तगमग वाढलेली होती. रमाईचं सकाळी पहाटे गोवर्या थापायला जाणारं कष्ट, भिकुबाबाची तान्ही रमाई, जबाबदारी ने जगणारी, इंदू , रमेश, लाडक्या राजरत्नाला माती आड करणारी रमाई, सभेला साडी नाही म्हणून फेटा नेसून जाणारी रमाई, बाबांना परदेशात आमची काळजी नका करू म्हणणारी पण तुमच्या जीवाला जपा म्हणणारी रमाई अशी किती किती रूपं आठवावी! ‘वणंद’ गाव शब्दबद्ध करता येईना. वळणावळणाचा रस्ता, सुरेख निसर्ग आणि रमाईच स्मारक, काय आणि किती डोळ्यात भरून घेऊ असं झालं. जड अंतकरणाने निघालो सारेच!
‘आंबडवे’ लहानपणापासून ऐकत आले हे गाव! खूप मोठं स्वप्न साकार होणार होतं. ओढ वाढत होती. ज्ञानसागराचं मूळ गाव , पाहणं हे शब्दातीत होतं. शरीर स्तब्ध झालं, गावात पाऊल टाकलं, दाटून आलेला कंठ मोकळा झाला. किती डोळ्यात सामावून घेऊ आणि नको असं झालं. बाबांच्या अस्थिकलशाला नतमस्तक झाले. अश्रु आवरणे आमच्यापैकी कोणालाही शक्य नव्हतं. हाताने स्पर्श केला त्या पावनभूमीला, नतमस्तक होण्यापलिकडे काय करू असा प्रश्न पडला, परत जाधव सर , खांडेकर सर यांनी सदगदित मनाने प्रेरित होण्याची प्रेरणा दिली. बाबांनी दिलेला वारसा त्रिसरण पंचशील घेतलं आणि बाबांच्या स्वप्नांना वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली.
“अवघे जीवनच व्हावे बुद्धमय “ असा वसा घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.
मयूरी अशोक आढाव(कारंडे)
लेखिका टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), मुंबई येथे PhD संशोधक आहेत.
- मी अनुभवलेले समता सैनिक दल अधिवेशन.. - April 10, 2022
Leave a Reply