क्रांतीबा फुले : ब्राह्मणी व्यवस्थेवर आसूड ओढणारा मानवतेचा तत्वेत्ता

डॉ.भूषण अमोल दरकासे

ऐतिहासिक पटलावर प्रतेय्क काळासाठी विशिष्ठ विचारांचा एक साचा आणि वर्चस्व असते. या विचारांच्या पाठीमागे त्या काळातील राजकीय ,धार्मिक आणि आर्थिक विशेषाधिकार प्राप्त असलेल्या वर्चस्वी जात/वर्गसमूहाचा स्वार्थ असतो. म्हणजे काय तर ज्ञान निर्मितीच्या परिघाच्या शक्यतेवर मर्यादा असते, या मर्यादा त्या कालावधीसाठी ज्ञानाचे कायदेशीर स्वरूप तयार करतात आणि सामान्य माणसाचे विश्वास किंवा मत नियंत्रित करतात. एकप्रकारे त्या कालावधीतील मनुष्यसमूहात विशिष्ठ साचाची अनकॉनशियस वैचारिक संरचना ठसते आणि त्यामुळे ज्ञान अथवा विचार निर्मितीच खुंटते. म्हणून संपूर्ण परिवर्तनासाठी या परिघाच्या मर्यादांचा नाश करणे आवश्यक असते.
काही महापुरुष ह्या परिघाला संकुचित न ठेवता अनंत अशा ज्ञाननिर्मितीच्या आणि विचारांच्या शक्यता दाखवून देतात आणि दाखवून च नव्हे तर त्या प्रत्यक्ष व्यवहारात कशा आणल्या जाऊ शकतात याचे मार्गदर्शन देखील करतात.
महात्मा फुले हे हि अशाच महापुरुषाचे उदाहरण असून त्यांनी धार्मिक रूढी परंपरेत खितपत पडलेल्या लोकांना अंधारातून बाहेरून काढून दाखवून दिले कि तत्कालीन कालबाह्य विचारांच्या पलीकडे ज्ञानाचा एक खरा महासागर आहे.
शिक्षण (ज्ञान) हे स्वउद्धारासाठी कसे महत्वाचे आहे आणि ती शक्ती/सामर्थ्याची जननी आहे हे सांगणारे फुले फौकल्ट(1) च्या तर खूप आधीच आहेत पण त्याचबरोबर मॅक्स वेबेरच्याही आधी त्यांनी भारतीय द्रिष्टीकोनातून सामाजिक दर्जा [Social status] आणि वर्चस्व [Hegemony] यांचा असलेला संबंध विश्लेतीत केला. विशिष्ठ वर्गनिर्मीत खोट्या इतिहासाला त्याच्याच भाषेत ज्ञानाच्या शस्त्राने उत्तर देणारे महात्मा फुले हे खऱ्या आणि नव्या सत्यशोधक भारतीय व्यवस्थेचे निर्माते आहेत.

त्या काळी आर्यन रस थेअरी हि खूप प्रसिद्ध होती, तिला तिच्याच डोक्यावर उलटे पाडण्याचे काम फुले यांनी केले आणि तिचा येथेच्छ समाचार घेतला. मनू ने जातीउत्पत्तीची निर्मिती सांगताना ब्राह्मणी वर्चस्व टिकून राहावे या एका हेतुस्तव वेड्याप्रमाणे वर्णसंकराचा असा सिद्धांत पुढे केला कि तो करताना तो हे हि विसरला कि अशाने तो सवर्ण स्त्रियांचे हि नैतिक अधःपतन करत आहे.
मनूच्याच वारसदारांनी पुढे जाऊन आर्यन रेस थेअरी ला फक्त ब्राह्मणी आणि सवर्ण वर्चस्व टिकून राहावे या स्वार्थपोटी पूर्णतः पाठींबा दिला. परंतु या वेळी हा खेळ महात्मा फुलेंनी त्यांच्याच डोक्यावर उलथा पडला. फुलेंनी आर्यन रेस थेअरी नुसार असे निष्कर्षिले कि मुस्लिम आणि ब्रिटिश यांच्यासारखेच इराणी आर्यभट्ट लोक हि एकप्रकारे एलियन च आहेत ज्यांनी कि मूळ रहिवाशांना [ज्यांना वेदात दस्यु, राक्षस, नाग असे संबोधले आहे] हिंसा, विश्वासघात आणि धार्मिक प्रचार करून बंदिस्त केले आणि स्वतःचे थोतांड पोथीपुराण इथल्या समतापूर्ण अहिंसावादी बळी राज्यावर लादले. विष्णूचे नऊ अवतार हे आर्यन लोकांनी केलेल्या स्वारीचे टप्पे आहेत असं त्यांचं मत होत. त्यानुसार, विष्णूच्या नऊ अवतारां मध्येही त्यांना आर्य भटब्राह्मणांच्या आक्रमणाचे टप्पे दिसतात: आधी समुद्रमार्गे हल्ला (कच्छ/कासव), मग जमिनीवरून (वराह), त्यानंतर लांडीलबाडी व त्यानंतर संहार (परशुरामाने केलेला क्षत्रियांचा संहार). (2)

मिथक हे ब्राम्हणांच्या हातातील सर्वात बलवान शस्त्र त्यांच्यावरच फिरवले गेले. फुलेंनी ब्राह्मणी इतिहासाचे निर्जंतुकीकरण त्यांच्याच मिथकातुन अशा प्रकारे केले कि मूळ रहिवाशी हे प्रबुद्ध राजे आणि योद्धे होते ज्यांना परकीय आर्यांनी केवळ हिंसाचारानेच नव्हे तर विश्वासघात आणि कपटाने हरवले होते.
परंतु यापाठीमागे फुलेंचा उद्देश हा भारतीय इतिहासाचा उलगडा करण्यापेक्षा उच्चवर्णीयांव्यतिरिक्त इतर शूद्र-अतिशूद्र समाजाला एका सांस्कृतिक एकीत एकत्र आणणे असाच होता.

फुले यांनी समाजाचे चित्रण करताना फक्त धार्मिक विचारधारा आणि सांस्कृतिक वर्चस्व यावरच भर दिला नाही तर आर्थिक पिळवणूक, राजकीय सत्ता आणि हिंसा यांच्या हि नव्याने व्याख्या केल्या.
जेंव्हा त्याकाळातील सर्व उच्चशिक्षित सवर्ण देशातील गरिबीचे खापर ब्रिटिश वसाहतवादावर फोडून मोकळे झाले तेंव्हा फुलेंनी दाखवून दिले कि फक्त ब्रिटिशच नव्हे तर या देशातील ब्रिटिशांच्या हाताखाली काम करणारा (त्याकाळातील) नोकरशाही वर्ग जो मुख्यतः ब्राम्हणांनी भरलेला होता तो हि इथल्या शेतकऱ्यांचं आणि समाजाचं शोषण करत आहे. ते त्यांना मुख्यतः भटजी आणि शेटजी असे संबोधित. त्यांनी ब्रिटिश वसाहतवाद आणि भारतीय भटजी-शेटजी अशी ‘डबल एक्सप्लॉयटेशन’ थेअरी मांडली.

फुले यांनी विचार फक्त सांगितले नाहीत तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी हि केली. अस्प्रश्य समाजासाठी आणि मुलींसाठी शाळा काढल्या, सावित्रीबाई याना शिक्षण दिले, त्यांना शिक्षिका बनण्यासाठी प्रोत्साहित केले तेवढेच नाही तर त्यांना दाम्पत्य नसताना समाजाचे सर्व दबाव झेलून दुसऱ्या विवाहास नकार दिला(3). त्या काळात पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे यांच्यावर होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देऊन पितृसत्ता हि एकप्रकारे पिळवणुकीचाच प्रकार आहे असे निर्देशित हि केले(3). हंटर कंमिशन समोर शैक्षणिक बदलांसाठी दिलेली साक्ष तर अजूनही सध्यस्थितीला लागू पाडण्यासारखीच आहे.

शूद्रांना आणि अतिशुद्रांना इतर समतावादी धर्माची गरज आहे अशी जाणीव झाल्याने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना हि केली. त्यांच्या मते धर्मात अंधश्रद्धेला जागा नसावी आणि हिंदुधर्म हा अंधश्रद्धेचे माहेरघर आहे असे त्यांचे मत बनले होते. त्यामुळे ते त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात म्हणतात कि, “एक आदर्श कुटुंब ते असेल जिथे वडील बौद्ध होतात, आई ख्रिस्ती, मुलगी मुस्लिम, आणि मुलगा सत्यधर्मिस्ट होतो – जिथे जागा नसेल हिंदूं असण्याला.”(1)

“बुद्ध आणि त्याचा धम्म हे जसे आबेंडकरांचे अखेरचे आणि अतिशय महत्त्वाचे पुस्तक होते, त्याच प्रमाणे फुल्यांचे अखेरचे पुस्तकही धर्माशीच संबंधित होते. द सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच प्रकाशित झाले. त्यात त्यांनी वेद, रामायण, महाभारत इत्यादींवर भयंकर टीका करत, पर्यायी धर्मव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला आहे.”(2) यावरून असे स्पष्ट होते कि या महापुरुषांना एक मात्र स्पष्ट झाले होते कि हिंदुधर्मात शूद्र-अतिशूद्रांचा उद्धार होणे शक्य नाही. त्यांच्या अनुयायांनी हि बाब लक्षात घेणे गरजेचे आहे.

महात्मा फुलें बौद्ध धम्मविषयी त्यांच्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथात नमूद करतात कि, “त्यानंतर, धूर्त शंकराचार्य, जो आर्यांचा मुख्य पंडित होता, त्याने बौद्ध जनांबरोबर जोरदार वादविवाद करत त्यांना हिंदुस्तानातून समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न चालविला. तथापि, त्याच्या या प्रयत्नांमुळे बौद्धधम्माला यत्किंचितही तोशिस लागणे तर दूरच, पण तो दिवसेंदिवस अधिकच जोमाने वाढत राहिला. सरतेशेवटी शंकराचार्याने तुर्कांना मराठांच्यात सामावून घेतले व त्यांच्या मदतीने तलवारीच्या बळावर बौद्धधम्माचा नाश केला”(2) यावरून असे जाणवते कि त्यांच्या मनातील बौद्धधम्माची प्रतिमा सकारात्मकच होती आणि वर नमूद केल्याप्रमाणे ते त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म मधे असेही म्हणतात कि आदर्श कुटुंबातील वडील बौद्ध असावेत.

आंबेडकरांच्या मते बौद्ध धम्मात ‘अविद्या’ म्हणजे यातनांच्या अस्तित्वाविषयी अनभिज्ञ असणे आणि धम्म यातनांचे अस्तित्व मान्य तर करतोच पण त्याच्या नाशावरही भर देतो कारण धम्माचा उद्देश हा ‘अविद्या’ दूर करणे आहे(2). फुल्यांची कार्यकारणमीमांसासुद्धा ‘विद्ये’ पासूनच सुरू होते [विद्येविण मती गेली, मतीविण गती गेली, गतीविण वित्त गेले, वित्ताविण शूद्र खचले], याच धम्म तत्वज्ञावर भर देणाऱ्या परंपरेचे एकोणिसाव्या शतकातील अग्रदूत हे महात्मा फुले होत कारण त्यांनीच शूद्र-अतिशुद्रांना विद्येविना होणाऱ्या यातनांच्या अस्तित्वाविषयी पुनश्च जाणीव करून दिली.
महात्मा फुले हे इतिहासाचा तर्क देणारे पहिले भारतीय रचनाकार (1) तर होतेच पण त्याच बरोबर त्या काळातील खुंटीत विचारांच्या ओसाड जमिनीचे खरे माळी होते, जिथे त्यांनी नवज्ञानाची बीजे पेरली आणि क्रांतीची फुले फुलवली.
सद्सद्विवेकबुद्धी आणि ज्ञानाच्या शस्त्राने जग/समाज बदलण्याच्या गौतम बुद्धांच्या परंपरेतील एक योद्धा असे हि महात्मा फुले याना संबोधिले तर वावगे ठरणार नाही.

मार्क्स म्हणतो कि, “तत्वज्ञानी जग कसे आहे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगितले आहे; पण मुद्दा जग बदल्याणाचा आहे.” महात्मा फुले यांनी नक्कीच जग बदलण्यात वाटा दिला आहे.
आंबेडकर महापुरुषांची लक्षणे सांगताना म्हणतात कि, “प्रामाणिकपणा आणि बुद्धी: एखाद्या व्यक्तीला त्याच्या सहकाऱ्यांच्या तुलनेत प्रतिष्ठित म्हणून चिन्हांकित करण्यासाठी पुरेसे आहे. पण ते त्याला एका महापुरुषाच्या प्रतिष्ठेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसे नाहीत. एखाद्या महान व्यक्तीकडे केवळ प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा अधिक काहीतरी असले पाहिजे.
ती गोष्ट काय असावी? एक महान माणूस हा सामाजिक गतिशीलतेच्या/समाजप्रवर्तनाच्या उद्देशाच्या प्रेरित असतो आणि त्याने समाजउत्थानाचे काम केले पाहिजे.”(4)
म्हणजे काय तर प्रामाणिकपणा आणि बुद्धी असून भागणार नाही तर त्या व्यक्तीने समाजाच्या गतिशीलतेमध्ये स्वतःचा वाट दिला पाहिजे तरच त्या व्यक्तीला महापुरुष असे संबोधता येईल आणि इतिहास जर हे महान पुरुषांचे चरित्र असेल तर त्यात महात्मा फुलेंचा बुद्धिप्रामाण्यवाद आणि त्यांनी समाजाला दिलेली नैतिक गती हे नक्कीच त्यांना महापुरुष बनवत.

डॉ.भूषण अमोल दरकासे

लेखक सहायक प्राध्यापक (व्हीडीजीएमसी हॉस्पिटल) पदावर कार्यरत आहेत.

संदर्भ

1) अंडरस्टॅण्डिंग कास्ट- फ्रॉम बुद्ध टू आंबेडकर अँड बियॉंड- गेल ऑम्वेत

2)भारतातील बौद्धधम्म-ब्राह्मणीधर्म व जातीयतेच्या आव्हान बाय गेल ऑम्वेत

3)ज्योतिराव फुले अँड द आयडिओलॉजि ऑफ सोशल रेव्होल्यूशन इन इंडिया- गेल ऑम्वेत

4)रानडे, गांधी & जिन्हाः – डॉ. आंबेडकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*