हनुमंत पाईक
बहिष्कृत भारत : पुनश्च हरी:ॐ !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक लढ्यामधे वृत्तपत्रांचे अनन्य साधारण महत्व आहे. अस्पृश्य वर्गाच्या सामाजिक-राजकीय समस्यांना वाचा फूटावी, अस्पृश्य समाजात सामाजिक, संस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक वृत्तपत्रे सुरु केले. त्यात प्रामुख्याने मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०) आणि प्रबुद्ध भारत (१९५६) इत्यादि वृतपत्र सुरु केले. वृतपत्राच्या माध्यमातून त्यांनी बहिष्कृत वर्ग अर्थात अस्पृश्य वर्गाच्या समस्यांना वाचा फोडली. वृत्तपत्राच्या माध्यमातूंन मूक्याना आवाज दिला तर बहिष्कृतांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक वृतपत्र सुरु करण्याचा उद्देश स्पष्ट करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “आमच्या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविन्यास तसेच त्यांची भावी उन्नति व तिचे मार्ग याच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमान पत्रासारखी अन्य भूमीच नाही” हे महत्व ओळखून त्यांनी उपरोक्त वृतपत्रे सुरु केली.
मूकनायक आणि बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहलेले मराठी भाषेतील ऐतेहासीक दस्तावेज आहेत. त्यातल्या त्यात ‘बहिष्कृत भारत’ हे वृतपत्र तर पूर्णांशाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कृति आहे. मूकनायक वृतपत्र बंद पडल्यानंतर ३ एप्रिल १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे वृतपत्र सुरु केले. बहिष्कृत भारताचा पहिला अंक ३ एप्रिल १९२७ या दिवशी प्रकाशित झाला. ‘पुनश्च हरी : ॐ !’ या आग्रलेखात मूकनायकच्या अपयशाची चर्चा करीत बहिष्कृत भारतासारख्या वृतपत्रासारखी आवश्यकता डॉ. बाबासाहेबांनी स्पष्ट केली. “जातिभेद व जातीमत्सर यांनी ग्रस्त झालेल्या या देशात खरे स्वराज्य नांदन्यास या बहिष्कृत वर्गास त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधितर्फे राजकीय सत्तेत पुरेसा भाग मिळावा.” असे रोखठोक निवेदन त्यांनी केले व नव्या जोमाने आणि उमेदिने बहिष्कृत भारताच्या माध्यमातूंन बहिष्कृत लोकांवर अर्थात अस्पॄश्यांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक हक्का च्या जागृति संदर्भात लिखाण केले.
‘पुनश्च हरी : ॐ !’ या शीर्षकाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नव्या उमेदीने परत एकदा वृत्तपात्राच्या माध्यमातून काम करण्याचे संकेत दिले. याच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्वी टिळक यांनी केसरी या वृत्तपत्रातून ‘पुनश्च हरी : ओम !’ नावाचा अग्रलेख लिहला होता. केसरीत प्रसिध्द झालेल्या ब्रिटिशांविरुध्दच्या लेखांबाबत टिळकांना तीन वेळा राजद्रोहाच्या खटल्याला सामोर जावे लागले. प्लेगच्या प्रतिबंधासाठी नेमलेल्या कमीशनर रँड याच्या हाताखालील गोऱ्या आधीकाऱ्यांनी पुण्यात धुमाकूळ घातला त्यामुळे २२ जून १८९७ रोजी चाफेकर बंधुनी रँडचा खून केला. त्या संदर्भात टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ आणि ‘राज्य करने म्हणजे सूड उगवणे नव्हे’. असे अग्रलेख लिहून ब्रिटिश सरकारवर टीका केली. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेऊन खटला चालवण्यात आला. त्यात टिळकांना १८ महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यावर ४ जुलै १८९९ रोजी ‘पुनश्च हरी : ओम !’ हा अग्रलेख लिहून टिळकांनी पुन्हा नव्या जोमाने स्वराज्यप्राप्तिच्या कामाला सुरुवात केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत मधे ‘पुनश्च हरी : ॐ !’ अशा प्रकारचा अग्रलेख लिहून नव्याने पुन्हा एकदा वृतपत्राच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक रुढीवर हल्ले करणार असे जाहीर केले. त्यावेळेस बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरु करण्याचे तत्कालीन प्रमुख कारण म्हणजे ‘१९ व २० मार्च १९२७ रोजी घडलेला महाडचा धर्मसंगर होय’. महाडच्या धर्मसंगराचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. महाड येथे ज्या तळ्यावर अस्पृश्य लोक गेले होते तेथे उच्चवर्णीयांनी गाईचे शेण व मूत्र घालून त्यांनी तळ्याची शुद्धी केली. तलावातील पाणी जनावरांनी प्यायले असता ते अशुद्ध होत नाही. परंतु अस्पॄश्यांनी स्पर्श केला असता अशुद्ध होते. यावरून अस्पॄश्यांचे मानवी मूल्य काय याची प्रचिती स्पृश्य हिंदूनी आणून दिली. महाड येथे झालेल्या रक्तपाताकरीता स्पॄश्यांच्या (उच्चवर्णीयांच्या) वृतपत्रांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. भाऊसाहेब भोपटकर यांनी ‘भाला’ या वृत्तपत्रातून महाडच्या घटनेला “अस्पॄश्यांच्या उतावीळ कैवाऱ्यांची घिसाड घाई” म्हणून संबोधले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना “फाजील उतावीळ समाजसुधारक” अशी हिणकस विशेषणे लावून त्या घटनेकरीता बाबासाहेबांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. या सर्व घड़ामोडी लक्षात आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’ या वृतपत्रास जन्म दिला.
३ एप्रिल १९२७ ला नमूना अंक प्रकाशित झाल्या नंतर दुसऱ्या अंकातून ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओवीचे ब्रीदवाक्य
‘आता कोदंड घेउनी हाती । आरूढ पां इथे रथी । देई आलिंगन वरिवृत्ती । समाधाने.
जगी कीर्ति रूढ़वी । स्वधर्माचा मानु वाढवी । इया भारा पासोनि सोडवी । मेदिनी हे.
आतां पार्था नि:शंकु होई । या संग्रामा चित्त देई । ऐथ हे वाचूनि कांही । बोलो नये.
घेऊन बहिष्कृत भारतातूंन अनेक ‘अग्रलेख’ त्याचबरोबर ‘आजकालचे’ प्रश्न’ या सदरातून अस्पॄश्यांचे प्रश्न, समस्यां मांडल्या. ‘आजकालचे प्रश्न’ या स्तंभातून ब्राह्मणी वृतपत्रांना सडेतोड उत्तर देताना बाबासाहेबांनी जालीम भाषा वापरली. लोकमान्य पंथीय भोपटकरांची हजेरी घेताना डॉ. बाबासाहेब लिहतात “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणायला तुम्हाला शरम वाटत नाही. जणूकाय, स्वराज्य हा तुमचाच जन्मसिद्ध हक्क आहे आणि महार-चांभारांना कसलेच हक्क नाहीत !”…..”या लोकांना स्वराज्य शब्द उच्चारायला खरे म्हटले असता शरम वाटली पाहिजे.. स्पॄश्यांच्या (उच्चवर्णीयांच्या), ब्राह्मणांच्या कुटील कारवायांवर बाबासाहेबांनी कूत्सित विचारावंर कडक व कठोर ताशेरे ओढले.
१ जुलै १९२७ रोजी बाबासाहेब ‘दुःखात सुख’ या अग्रलेखात म्हणतात “आमच्या मते आंगलाई व ब्राम्हणाई या हिंदी जनतेच्या अंगाला लागलेल्या दोन जळवा आहेत व त्या एकसारख्या हिंदू लोकांच्या रक्त शोष करीत आहेत. तसेच “आप घरी बाटा, बाप घरीही बाटा !” या अग्रलेखात अस्पॄश्यांच्या शैक्षणिक अवस्थेविषयी लिहतात “उपासमारीने शरिराचे पोषण कमी झाल्यास माणूस हीनबल होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाचे अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो.” २२ एप्रिल ते २० मे १९२७ दरम्यान प्रसिध्द झालेल्या ‘महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदुची जबाबदारी’ ‘महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी’ आणि ‘महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची कर्तव्य’ या अग्रलेखा मधून महाडच्या धर्मसंगराच्या सर्व बाजू स्पष्ट केल्या. तत्कालीन सरकार, स्पृश्य हिंदु, अस्पृश्य जनता आदिंना उद्देशून लिहलेल्या या अग्रलेखातूंन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय विषमतेची कारणमीमांसा तसेच जातीव्यवस्थेची मुळे समूळ नष्ट करवयाच्या उपाययोजनांची चर्चा केली.
‘आजवरी होतो तूझे सत्तेखाली ! तोवरि तो केली विटंबना’, ‘हिंदुचे धर्मशास्त्र त्याचे क्षेत्र आणि त्याचे अधिकार’, ‘समतेसाठीच ही विषमता’, ‘बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकीक ऋण नव्हे काय’, ‘अस्पृश्यता निवारणचा पोरखेळ’, ‘आमचे टीकाकार’, ‘हिंदुधर्माला नोटिस’, ‘नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ते असे’ !, ‘आमची कैफीयत’, ‘महार आणि त्यांचे वतन’ अश्या अनेक महत्वपूर्ण विषयावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्रातून अग्रलेख लिहून सडेतोड भूमिका मांडल्या.
३ एप्रिल १९२७ ते १५ नोव्हेंबर १९२९ या बहिष्कृत भारताच्या सुमारे अडीच वर्षाच्या कालावधित ४६ अंक प्रकाशित झाले. या अंका मधून पायाभूत आंबेडकरी विचारसरणी प्रगट झालेली आहे. एकंदर बहिष्कृत भारत या वृतपत्राच्या अभ्यासाशिवाय आंबेडकरी विचारसरणी व चळवळ पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भाषेतील हे बाबासाहेबांचे अस्सल लिखाण आंबेडकरी जनतेसाठी एक देणगीच आहे.थोडक्यात ‘पुनश्च हरी ॐ !’ या अग्रलेखाने सुरु झालेल्या बहिष्कृत भारत या वृतपत्रामधुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य, दलित, वंचित वर्गाच्या समस्या, हक्क, अधिकार, त्यांच्यावर झालेल्या अन्याय-अत्याचार संबंधी आपले विचार प्रकर्षाने मांडत राहिले. तर टिळकांच्या ‘पुनश्च हरी:ओम!’ या अग्रलेखाने परत नव्याने सुरु झालेला प्रवास ब्रिटिश सरकारची दडपशाही आणि ठराविक उच्चजातीच्या स्वराज्य स्वातंत्र्य चळवळीला पोषक वातवरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरला. वृत्तपत्रीय लिखाण हे तत्कालीन असते परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारतातील लिखाण हे ऐतिहासिक दस्तऐवज आहे जो प्रत्येकाने वैचारिक खाद्य म्हणून आपल्या लाइब्ररी, वचनालयात ठेवला पाहिजे व त्याचे वाचन करून प्रबोधन केले पाहिजे. आज बहिष्कृत भारत या वृत्तपात्राला ९५ वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त हा लेखन प्रपंच…सर्व वाचकांना बहिष्कृत भारत स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा…
हनुमंत पाईक
लेखक औरंगाबाद येथील रहिवासी आहेत.
संदर्भ
- लोकपत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर-प्रा. सुखराम हिवराळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक – संपादक, प्रा.हरी नरके (महाराष्ट्र शासन)
3.मूकनायक आणि बहिष्कृत भारत – संकलन: संपादन, प्रदीप गायकवाड
4.लोकमान्य टिळक यांची पत्रकारीता – दै. सकाळ लेख
Leave a Reply