आंबेडकरवादी तत्त्वज्ञान

मयुरी मोरे

आंबेडकरवादी तत्त्वज्ञान हे आधुनिक आहे परिवर्तनशील आहे. अगदी कुठल्याही काळात, कुठल्याही परिस्थितीत मानवतावादी मुल्य न ढळू देता आंबेडकरी तत्त्वज्ञान प्रत्येक समस्येवर उपाय शोधत. काळानुरूप परिस्थिती बदलत असते, त्यामुळे एखाद्या व्यक्तिचे विचार सरसकट स्विकारण्यापेक्षा त्या व्यक्तिचे तत्त्वज्ञान, त्यांचे धोरण काळानुसार सुसंगतपणे कृतीत आणले तरच आपण स्वतःला या महामानवांचे अनुयायी म्हणून घेण्यास पात्र असतो.

“Dead Ambedkar is more dangerous than alive.”  हे कितीतरी महत्वपूर्ण वाक्य आहे. आपल्याला 1891 ते 1956 पर्यंतचे बाबासाहेब माहिती आहेत. त्यांचा संघर्ष, कार्यकाळ, इतिहास सार काही तोंडपाठ आहे. पण तरीही बाबासाहेबांना अपेक्षित असलेला देश, समाज अजूनही घडू शकला नाही. सामाजिक आणि राजकीय स्तरावर आम्ही अजूनही एकसंघ होऊ शकलो नाही, कारण 1956 नंतर जनतेने केवळ त्यांचा इतिहास सांगण्यावर भर दिला. पण, परिवर्तनाच्या वाटेवर जाऊन स्वतः मध्ये बदल घडवून आंबेडकरी विचार स्वतःच्या जगण्यात उतरवणारे अगदी मोजकी मंडळी सोडली तर, सर्वत्र पद, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी चाललेली रस्सीखेच  थांबवून “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हा मूलमंत्र जपण्या ऐवजी स्वःहित जपण्यातच अनेकांनी धन्यता मानलीय. 

जी लोक भूतकाळ विसरतात ती भविष्यकाळ कधीही निर्माण करू शकत नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही भूतकाळ विसरून जाऊ, पण त्याचबरोबर भूतकाळ बदलणही शक्य नाहिये. “आंबेडकरांनी भूतकाळातील इतिहास बदलून एक नवा भविष्यकाळ आपल्यासाठी लिहून ठेवलाय.” निदान त्या वाटेवर चालून आपण आपला वर्तमानकाळ अधिक सुखकर करू शकतो. स्वातंत्र्यानंतर ते आजतागायत झालेल्या चुका टाळून आपण आपल  जगणं  नक्कीच स्वयंप्रकाशीत करू शकतो. मुळात आंबेडकरी विचार केवळ इतिहासात अडकून न राहता एक नवा इतिहास घडवत, घडवू शकत. 

शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा पाया आहे. हा मूलमंत्र स्विकारला तर आजच्या घडीला आधुनिक क्रांती नक्किच घडू शकते. पण, जोवर शिकलेली व्यक्ति केवळ स्वःहित न जपता संघाशी बांधील होणार नाही तोवर तरी गटातटाचा संघर्ष कायम असेल. आंबेडकरी विचार संघर्ष करण्यासाठी, न्याय व हक्क मिळवण्यासाठी नक्कीच प्रेरित करत. पण त्याच बरोबर एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत. आजच्या घडीला असलेला मानसिक ताणतणाव, राग, द्वेष, मत्सर, कट्टरता, स्वतःच अस्तित्व हरवण्याची भीती या सगळ्यावर मात करून, जगण्यात खळाळून हसणं, नाचण, गाण, लिखाण, वाचन, एखाद वाद्य शिकण, छंद जोपासणं, कलेला दाद देण अस विविध रंगी जगण शिकवत. व्यसनाधीन न होता ही सम्यकतेने जगण्याची, माणुसकीची नशा चढवत.

खरतर बुद्धाला सोडून आंबेडकरी तत्त्वज्ञान स्विकारण म्हणजे बिना नेटवर्क स्मार्ट फोन वापरण्या सारख आहे. जोवर “बुद्ध आणि त्यांचा धम्म” आंबेडकरी जगण्यात, मना मनात, घरा घरात रुजणार नाही तोवर तरी निव्वळ आंबेडकरांवर भाषण देणे अर्थहीन असेल. आंबेडकरी तत्त्वज्ञान अफाट आहे, सर्वसमावेशक आहे, सर्वव्यापक आहे. माणुसकीच्या क्षेत्रातील अव्वल दर्जाच लिखाण म्हणजे आंबेडकरी साहित्य आहे. माणूस म्हणून घडण्याच्या प्रवासातील सर्वोत्तम मार्ग म्हणजे आंबेडकरवाद  होय, जो आपल्याला माणूस म्हणून अधिक समृद्ध करतो. स्वतःचा मार्ग स्वतः शोधण्याची प्रेरणा देतो आणि संघटीत व्हायला शिकवतो.

बुद्धं शरणं गच्छामी

धम्मं शरणं गच्छामी 

संघं शरणं गच्छामी

मयुरी मोरे

लेखिका नांदेड येथील रहिवासी असून त्या M.Tech.(Water Management) पदवीधारक आहेत.

1 Comment

  1. अप्रतिमच 🤩

    अगदी समजण्या सारख एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेत लिखाण केलय खरच खूपच छान ..!

    जय भिम ❣️

Leave a Reply

Your email address will not be published.


*