खरंच ही पृथ्वी गोल आहे?

श्रावणी बोलगे

मला सांगत राहिले सगळे की
पृथ्वी गोल आहे,स्वतःभोवती फिरते.
आणि सगळ्यांच्याच वाट्याला येत असतो,
सूर्य,चंद्र इत्यादी इत्यादी..
.
पण हल्ली मला जाणवत आहे,
ह्या तथ्यामागचा भोंदूपणा. दिसत राहते ही पृथ्वी
एका उंच उंच पर्वतासारखी.
ज्यावर आहेत अनेक स्तर..
जे ठरवले आहेत जुन्या माणसांनी आणि मी कधीही न पाहिलेल्या धर्मग्रंथांनी…
.
माझ्या पृथ्वीवर मिळत नाही सर्वांनाच,
समान सूर्य ,चंद्र इत्यादी इत्यादी..
टोकावर आहे म्हणे झाडं,झुडपं,वेली पक्षी प्राणी तलाव..
काही रोज पर्वत चढतात थोडा थोडा,
काहींना त्याचाही हक्क नाही
ते राहतात पायथ्याशी, माहीत नाही त्यांना प्रकाश.
टोकावरचे लोक तिथेच राहतात वर्षानुवर्षे,
ज्यांना नाही गाळावा लागत घाम.
.
आणि समजा नेटाने कोणी पोहोचलेच ना टोकावर
तरी विचारली जातात त्यांना नावं,आडनावं आणि मग
काढला जातो निष्कर्ष त्यांच्या ‘त्या ‘डोंगरावरील स्तराचा…
आणि ढकलून दिले जाते खाली…
.
पायथ्यावरच्याला दिलीच एखादी शिडी आणि त्याने केलाच प्रयत्न वर चढण्याचा
तर खिळे काढले जातात आणि कोसल जातं शिडीला,
ती बांधणाऱ्याला.. जन्मोजन्मी दिल्या जातात डागण्या..
.
मी ही चढते आहे हा डोंगर
मलाही विचारलं जातं नाव,गाव.
जेव्हा हे वरचे लोक,
पेटवत आहेत पायथ्यावरच्यांच्या वस्त्या
आणि लोक पळत आहेत सैरभैर…
.
पण आता पायथ्यावरच्यांनीच करावे बंड,
सुरुंग लावावा मुळाला,
फोडावा पर्वत.
आणि वसवावी एक नवी पृथ्वी,
जिथे नसेल कुठलही टोक,
कुठलाही तळ.
आणि मग खुशाल छापू आम्ही
आमच्या पुस्तकांमध्ये,
‘ आमची पृथ्वी गोल आहे ‘ म्हणून.. !

श्रावणी बोलगे

लेखिका/कवयित्री अहमदनगर येथील रहिवासी आहेत.

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*