ब्राह्मण-सवर्णांचा तथाकथित फॅसिझम विरुद्ध लढा : एक ढोंग

गुणवंत सरपाते

किती पुरोगामी म्हणवणाऱ्या ब्राह्मण-सवर्णांनी आपल्या स्वतःच्या गल्लीत, कॉलनीत, सोसायटीत बाबासाहेबांचं एनहायलेशन ऑफ कास्ट्स, फिलॉसॉफी ऑफ हिंदूंइझम, मुक्ती कोण पथे अथवा फुल्यांचं ब्राह्मणांचे कसब अथवा पेरियारांच्या वगैरे अँटी-कास्ट साहित्याचं सामूहिक वाचन आणी चिंतन अथवा तसलं काही कार्यक्रम घडवून आणलायं?

आपली संस्कृती, आपले जातवर्गीय हितसंबंध, सामाजिक भांडवल, संसाधनांवरचा ताबा, सिनेमापासून ते मीडियावरचा एकहाती वर्चस्व हे इतरांचं ‘माणूसपण’ नाकारून मिळवलयं ह्यावर शोषक जातींमध्ये सामूहिक मेळावे, परिसंवाद घडवून आणले?

घरात आपल्या नव्या पिढीला, लहान मुलांना जातींची उतरंड आणी ‘शोषक जातीत’ अपघाताने जन्म घेतल्यामुळे त्यांना आयुष्यभर मिळणारे त्याचे लाभ, बेनिफिट्स, प्रीवलेज, ह्याबद्दल कधी घटकाभर बसून संवाद केलाय?

म्हणजे हे न करता देखील भीम जयंतीला एक पोस्ट आणी अधूनमधून फॅसिझम संविधान वगैर शब्द वापरले तरी समतानगरचा लाचार बाळ्या बदाम हाणतोच, समविचारी मित्र म्हणूनच हाक मारतोचं. तो विषय वेगळा.

पण मला खरंच, म्हणजे अगदी जेन्यूइनली जाणून घ्यायला आवडेल.

ह्यांचा सगळा प्रागतिक जोर कुठं तर आपल्याकडं. शोषित लोकांनी रक्त आटवून, प्रसंगी जीवित हानी पत्करून उभ्या केलेल्या चळवळीच्या स्टेजवर येऊन त्यांना मार्गदर्शन करणारी बांडगूळ इथं शेकड्यानं मिळतील. अगदी म्हणजे, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मरमर करून उभ्या केलेल्या कार्यक्रमात हा ‘पुरोगामी’ बामन मृदू भाषेत सांगणार की देशात द्वेष विखार वाढलाय. समविचारी मित्रांनी एकत्र येऊयात, संविधान वाचवूयात.

साला कम्मालं आहे!!

बामन-सवर्ण लोकं विद्रोही साहित्य संमेलनात, पुस्तक प्रकाशनात जाऊन फॅसिझम वर तोंडाला फेस येईस्तोवर बोलतील. रिचर्ड डॉकिन्स, हिचेन्स वगैरे वाचून नास्तिक मेळावे भरवतील, एवढंच कशाला गावकुसातल्या भटक्यांच्या झोपडपट्टीत जाऊन ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ करतील…

भेंडी ग्लोबल वार्मिंग, पर्यायवरण, युरोपियन सिनेमा, साहित्यिक प्रवाह ह्यावर दणादण रान हाणतील.

पण

ज्या शोषणावर आपलं संबंध आयुष्य उभयं, ज्या जातीय वर्चस्वाच्या फाउंडेशनवरतीच आजच्या सामाजिक-आर्थिक विषमतेची दरी उभी आहे, ज्या जातीय शोषणानं लोकांचा मानवी आयुष्य नागडं केलंय त्यावर कृतीकार्यक्रम करणार नाहीत.

कारण ही लोकं ह्या जातीय शोषणाचे लिटरली सर्वात मोठे आणी दुहेरी लाभार्थी आहेत.

हे बोलणं टाळून, ह्यावर कृतिकार्यक्रम टाळून केल्या जाणाऱ्या सगळ्या प्रागतिक गप्पा, चळवळी, क्रांत्या, विद्रोह वगैरे सगळं काही निव्वळ टाईमपास आहे. भलेही ते वरतून कितीही छान पुरोगामी वगैरे वाटत असलं तरीही. त्यातून काहीच हाशील नाही.

गुणवंत सरपाते

लेखक मूळचे नांदेड येथील रहिवासी असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.

2 Comments

  1. वाह.खूपच सटीक विचार आहेत. अजूनही जास्त विचार यात वाचायला मिळाले असते तर उत्तमच.
    जयभीम

  2. ब्राह्मण-सवर्ण लोक हे दलित-आदिवासी वस्तीत सहज येऊ शकतात; सर्वे,अभ्यास किंवा कोणतही कारण सांगून. पण दलित-आदिवासी घटक हेच सर्वे/अभ्यास करायला बामन-सवर्णांच्या दारात जाऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.


*