आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे

महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनामध्ये आंबेडकरी चळवळीचे अग्रस्थान आहे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अतिशय निष्ठेने आणि कुठलाही लवाजमा न घेता जगभर आंबेडकरी चळवळीचे वैचारिक वारस निर्माण झाले आहेत.या सम्यक क्रांतीमध्ये आंबेडकरी गायक गीतकार आणि संगीतकरांचे अमूल्य योगदान आहे.अल्पशिक्षित समाजाची सांस्कृतिक भूक मिटवून त्यांच्या मस्तकात आंबेडकरी विचारधारेचा प्रवाह त्यांनी निर्माण केला. हा वैचारिक जीवनपप्रवास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून आजतागायत अतिशय डौलाने तग धरून आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत भिमराव कर्डक, केरुबुवा गायकवाड, राजानंद गडपायले,नागोराव पाटणकर,गोविंद म्हशीलकर,वामनदादा कर्डक तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर त्यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कला महाविद्यालय नागसेनवन,औरंगाबाद येथून 70 च्या काळातील नवशिक्षित तरुण पिढीने आपल्या शिक्षकांच्या प्रोत्साहनपर सहकार्याने सशक्त सांस्कृतिक चळवळ उभी केली. त्यात साहित्य संमेलन, नाट्य संमेलन आदींचे भारतातील मुख्य सांस्कृतिक प्रवाहात वेगळे स्थान निर्माण केले आहे.साहित्यामध्ये आपल्या विशिष्ट लेखन शैलीमुळे डॉ गंगाधर पानतावणे, डॉ यशवंत मनोहर, डॉ रावसाहेब कसबे, हरिष खंडेराव,प्रा अविनाश डोळस आदींनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. याच बरोबर आंबेडकरी गायक गीतकार संगीतकार यांचे चळवळीला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी मोठे योगदान मिळाले आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख केल्याशिवाय आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही असे मी आग्रहाने इथे विशद करतो. एकीकडे साहित्यिक आंबेडकरी प्रेरणेने साहित्यातील विविध प्रयोग करत होते. त्याचक्षणी आंबेडकरी चळवळीतील गायक गीतकार आणि संगीतकार मुकनायकाचा सांस्कृतिक आवाज होऊन जनसामान्यांच्या घराघरात आंबेडकरी विचारधारा पोहचवत होते. प्रचंड निष्ठेने आणि निर्मळ अंतःकरणाने परिवर्तनाचा साज हिमतीने सादर करत होते. आंबेडकरी चळवळीची ज्ञानभूमी असलेल्या औरंगाबाद शहराने अनेक प्रयोग यशस्वी केले.यात महाकवी वामनदादा कर्डक यांचे सांगीतिक प्रयोगाने अनेकांना आंबेडकरी चळवळीत सहभागी होण्याचे स्फुरण मिळाले. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांच्या जवळ राहून आंबेडकरी गीतरचनेची आणि गायन संगीताची शैली समजून उमजून घेण्याचे धारिष्ट्य प्रतापसिंगदादा बोदडे यांना मिळाले.उंच,पहाडी आवाज आणि नीटनेटके राहणीमान तसेच प्रभावी वक्तृत्व शैली या विविध गुणांचे धनी असलेले प्रतापसिंगदादा वामनदादांचे पटशिष्य होऊन गेले.त्यांच्या मूळगावी आधीचे एदलाबाद आणि आताचे मुक्ताईनगर अतिशय हालाखीच्या परिस्थिती मध्ये राहून नंतर मिलिंद कला महाविद्यालयात नागसेनवन औरंगाबाद मध्ये आपले उच्च शिक्षण मिळवून महाकवी वामनदादांच्या अनेक सांगीतिक कार्यक्रमात प्रतापसिंग दादा संगायन करायचे. तथागत गौतम बुद्धांचे उपस्थापक भिक्खु आनंद होते तसेच माझ्या मते महाकवी वामनदादांचे उपस्थापक प्रतापसिंगदादा बोदडे आहेत, यात कुठलीही अतिशयोक्ती नाही.महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अनेक सांस्कृतिक उपक्रमात प्रतापसिंगदादा हिरीरीने सहभाही असायचे. त्यांनी प्रा.विजयकुमार गवई यांच्या यंग मुझिकल सर्कल मध्ये सर्वात प्रथम गायनाची सुरुवात केली. दरमान्यान महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संपर्कात आल्याने त्यांच्यातील सांगीतिक प्रतिभेला झळाळी मिळाली.वामनदादांचा सांगीतिक वारसा प्रतापसिंग दादांनी नेटाने पुढे नेला.प्रतापसिंग दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जवळपास सात हजार गीतं लिहिली.त्यांच्या लिखाणाची शैली कोणतेही गीतं लिहायचा अगोदर पानाच्या सगळयात वर जयभीम लिहून पुढील गीत प्रवासाला दादा सुरुवात करायचे.आंबेडकरी विचाराने भारलेले व्यक्तिमत्त्व त्यांच्या संपूर्ण कार्यातून दिसून येते.त्यांपैकी भिमराज की बेटी, थांबा हो थांबा,दोनच राजे इथे गाजले, तुझ्या पाऊल खुणा भिमराया,मेरा भिम जबरदस्त है आदी गीतं जनसामान्यांच्या घराघरात पोहचले आहेत.औरंगाबाद आणि प्रतापसिंग दादा यांचा विशेष मैत्रीपूर्ण स्नेह होता.ते म्हणायचे औरंगाबादनेच मला गायक म्हणून मान्यता दिली. मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने दादांचा मुक्काम औरंगाबाद मध्ये वाढला होता.दादा शहरात आले असता माजी पोलीस अधिकारी दौलत मोरे यांच्या मौर्य हॉटेल मध्ये मुक्कामी असायचे.शहरात त्यांचा मोठा गोतावळा आहे. पण कोणाच्याही घरी दादा मुक्कामी थांबत नसत.त्यांची देखभाल करण्यासाठी नागसेन सावदेकर,डॉ किशोर वाघ, कुणाल वराळे,राजाभाऊ शिरसाट,सचिन निकम, गुणरत्न सोनवणे आदी मंडळी विशेष काळजी घ्यायचे.मागील एप्रिल महिन्यात नागसेन फेस्टिवलसाठी दादा तीन दिवस मुक्कामी होते. त्यांच्या हस्ते काही पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच त्यांच्यावर दवाखान्यात उपचारासाठी काही दिवस त्यांनी राखीव ठेवले होते. या दरम्यान दादांचा एक दिवसाचा दिर्घ संवाद माझ्यासोबत झाला.माझी नुकतीच पिएच डी मिळाल्याची बातमी दादांनी दैनिक सम्राट मध्ये वाचली होती. दादांनी खूप कौतुक केले.ते म्हणाले की तुझा मोठा भाऊ आनंद माझा चांगला मित्र आहे.नागसेनदादा सावदेकर कडून तुझं नावं ऐकून आहे.माझ्या पेक्षा जास्त आनंद त्यांना झाला होता.त्यांच्या चेहऱ्यावर तो झळकत होता.थोडी औपचारिक चर्चा झाल्यानंतर त्यांना आराम करण्यासाठी मी काही वेळाने बाहेर आलो. परत दोन तासाने कुणाल वराळे दादांना भेटण्यासाठी आले.दादांनी लिहिलेली नवीन गीतं कुणाल यांना गाऊन दाखवली.दोघांनी मिळून जवळपास दहा गीतं गुणगुणली असतील.त्यानंतर दिल्ली येथील प्राध्यापिकेच्या सोबत आंबेडकरी जलसे या संशोधन प्रकल्पावर काम करणाऱ्या सोनाली म्हस्के यांनी दादांचा इंटरविवं घेतला.दादांनी या संदर्भातील काही टिपणं स्वतः लिहून दिली.त्यांनतर कार्यक्रमाला वेळ असल्याने दादांनी चहा घायची ईच्छा व्यक्त केली. छावणी येथील राजस्थानी हॉटेल मध्ये चहा आणि सांगीतिक चर्चा मनसोक्त झाली. त्यावेळी त्यांनी थांबा हो थांबा गाडीवान दादा या गीताचा हृदयस्पर्शी प्रसंग सांगितला. मी पैठण येथे कार्यक्रमासाठी गेलो असता,तब्बेत खराब होती. तरीही दिलेला शब्द खाली जाऊ न देता कार्यक्रम करण्याचे ठरले. हजारो संख्येने लोक सहभागी झाले होते. त्यावेळी बेनाम चित्रपटातील शिर्षक गीताच्या चालीवर माझं नवीनच गाणं आलं होतं, “थांबा हो थांबा गाडीवान दादा बाळ एकटा मी भीमा माझे नाव राहिले दुरवरी माझे गाव गाडीत घ्या हो मला” या गीतांचा शब्दांत आणि आर्त स्वराने संपूर्ण जनसमुदाय हमसून हमसून रडत होता. त्यात महिलांनी संख्या जास्त होती. त्यांचं बघून मलाही रडणे आवरणे कठीण झाले. मीही गायन करतानाच स्टेजवर रडत होतो.” पुढे या गीताने महाराष्ट्रभर घराघरात स्थान मिळविले. हे गीत अनेक गायकांनी गायले. त्यात आजच्या आघाडीचे सिने पार्श्व गायक संगीतकार शंकर महादेवन यांनीही साज चढविला.आजच्या तरूण पिढी बद्दल दादा प्रचंड विश्वास होता.उच्च शिक्षित होऊन आंबेडकरी विचारधारा गायनाद्वारे अधिक वृद्धिंगत करावी. निर्व्यसनी निस्वार्थी, शीलवान होऊन आंबेडकरी चळवळ नव्याने माध्यम उपयोगात आणून तिची जोपासना करावी.असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला.रेल्वे खात्यातून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते.उच्च शिक्षित गीतकार गायक संगीतकार अशी त्यांची वेगळी ओळख होती.त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत आंबेडकरी चळवळ आपल्या गीत गायनाद्वारे जोमाने गतिमान केली.भारतभर प्रतापसिंग दादांचा मोठा शिष्य परिवारांपैकी त्यांचा मुलगा कुणाल बोदडे,नागसेनदादा सावदेकर,डॉ किशोर वाघ,कुणाल वराळे,रागिनी बोदडे सांगीतिक वारसा पुढे नेत आहेत.प्रतापसिंगदादा यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक आधारवड हरपले अशी भावना समाजमानातून येतेय.त्यांच्या सांगीतिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांसाठी शासनाकडे विनंती आणि समाजाला आवाहन करतो की,पुरस्कार तसेच आर्थिक पाठबळ देऊन सन्मानित करावे.त्यांच्या अप्रकाशित गीतांचा पुस्तकरूपी ग्रंथ विद्यापीठांसाठी,संशोधकांसाठी,समाजासाठी उपलब्ध करावा जेणेकरून प्रतापसिंगदादा शरीराने जरी आपल्यात हयात नसतील पण गीतांद्वारे अजरामर होतील.हीच या लेखाद्वारे आदरांजली अर्पण करतो.

~~~

डॉ सागर दिवाकर चक्रनारायण

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*