पूजा वसंत ढवळे

‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ गौरव सोमवंशी सरांचं हे पुस्तक अलीकडेच अधाश्यासारख वाचून पूर्ण केलं. मुळात साखळी ही बंधन आणि पारतंत्र्याचं प्रतिक मानली जात असताना पुस्तकाच्या नावातील कोडं ‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ याची उकल सुरुवातीलाच सरांनी अगदी सुटसुटीत प्रकारे पुस्तकात केलेली आहे. एखादं पुस्तक वाचनासाठी हाती घेताना वाचक आधी पुस्तकाची प्रस्तावना वाचून काढतो. मग, जर का त्याला त्या प्रस्तावनेतील पुस्तकाचा सार, पुस्तक लेखणामागील लेखकाची भूमिका आवडली आणि वाचकाला ते पुस्तक त्याला समजेल अश्या भाषेत आहे असं वाटलं तरच वाचक, वाचन continue करण्याचा निर्णय घेतो.

या पुस्तकाची प्रस्तावना लेखकाने अगदी नेमकेपणाने, कुठेही अनावश्यक शब्दांची गर्दी टाळून लिहलेली आहे. खरं तर, एक लेखक म्हणून लिखाण करताना हे कौशल्य प्रत्येकालाच अवगत असतं असं नाही, त्यातही हे पुस्तक एका विशिष्ट तंत्रज्ञान विषयक माहितीवर प्रकाश टाकणारं असल्यामुळे, मुळातील इंग्रजी भाषेतील शब्दांना समर्पक असे मराठीतील शब्द घेताना लेखकाला किती अभ्यासपूर्ण कसरत करावी लागली असेल ह्याचीही कल्पना आपसूकच एक वाचक म्हणून डोक्यात येऊन जाते.
पुस्तक हाती घेतलं तेच, सुरुवातीच्या पानावर एका सुंदर भावनिक कवितेच्या माध्यमातून लेखक आपल्या आजपर्यंतच्या यशस्वीतेच क्रेडिट आपल्या ह्यात नसलेल्या वडलांना देऊन भावनिकदृष्या व्यक्त होऊ पहातो. तसं पाहता सुरुवातीला दिलेली कविता हिच, ह्या पुस्तकाचं वेगळेपण म्हणायला हवं. कारण हे काही साहित्यिक पुस्तक नसतानाही, तंत्रज्ञान विषयक पुस्तकाच्या पहिल्या पानावर कविता हा नवा पॅटर्न मराठीतील नवीनच प्रयोग असावा. बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी, ब्लॉकचेन हे आता सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या वाचनातील शब्द झालेले असतानाही याच्या खोलात जाऊन त्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न संबंधित क्षेत्र वगळता फारसा कोणी करताना दिसत नाही. बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरून आपण आपली प्रगती साधायला हवी त्यामुळे ही माहिती सामान्य माणसाला मराठीत पुस्तकाच्या रुपात एकत्रित करून दिलेली आहे.
कुण्या एका तंत्रज्ञानाच्या माहितीवर केवळ इंग्रजी भाषेच्या अवगत असण्यामुळे, कुण्या एका भाषिक समुदायाची मक्तेदारी निर्माण होता कामा नये म्हणून. हा ज्ञानाचा साठा मराठी लोकांसाठी लेखकाने उपलब्ध केला असावा. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची माहिती देताना लेखक इतिहास, भुगोलापासून सुरुवात करून त्या विषयाच्या माहितीची रंजकता वाचकांमध्ये कुतूहल निर्माण करून प्रकरण पुढे – पुढे घेऊन जातो. पुस्तक वाचल्यानंतर कळलं की, बिटकॉइन मागे जे तंत्रज्ञान आहे ते म्हणजे ब्लॉकचेन. हे अगदी बेसिक ज्ञान जाणून घेण्याचा मीही कधीच प्रयत्न केला नव्हता. ते आज या पुस्तकाच्या माध्यमातून कळालं. वेगवेगळ्या तंत्रचळवळींची माहितीही असो की, encrypted, हॅशिंग, हॅशकॅश सारख्या concept या सगळ्यांचा उगम, अस्तित्व आणि महत्व लेखक खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगतो. डिजिटल चावी हरवली की आपण आपले बिटकॉइन नेहमीसाठीच हरवून बसतो ही गोष्ट मलाच कितीतरी वेळ रंजक आणि मजेशीर वाटत राहिली😀 एरवी फक्त वाणिज्य, तंत्रशास्त्र,गणित, व्यवस्थापन क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांच्या परिचयाचे असलेले शब्द वाचताना आपल्यालाही यातलं कळू शकतं हा वेगळाच आनंद फिल होतो. अर्थकारण, राजकारण,समाजकारण इत्यादीच्या बॅकग्राऊंडला असलेली तंत्रशास्त्राची भूमिकाही पुस्तक वाचून स्पष्ट दिसून येते. असो, पुस्तकाविषयी जास्त Spoiler Point देण्यापेक्षा मी असं सुचवेल की, वाचता येणाऱ्या प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक आहे.
धन्यवाद गौरव सर, तुम्ही पुस्तक लिखाणाच्या माध्यमातून सामान्य माणसांना तंत्रमाहिती साक्षर करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल.
पूजा वसंत ढवळे
लेखिका नांदेड येथील रहिवासी असून स्टुडंट आहेत.

Leave a Reply