माता रमाईंचे कर्तृत्व आणि विचारांची प्रासंगिकता

अदिती गांजापूरकर

माता रमाई आणि बाबासाहेबांच्या कौटुंबिक जीवनाविषयी वाचन केलं की आपसूकच डोळ्यात करुणाभाव निर्माण होतो आणि रमाईंच्या त्यागाचं, संयमाचं उदाहरण डोळ्यासमोर उभं राहत आयुष्यात खंबीरपणे लढण्याचं बळ आपोआप निर्माण होतं. माता रमाई वयाच्या केवळ नवव्या वर्षी बाबासाहेबांसोबत लग्न करून नांदायला आल्या होत्या त्यावेळी बाबासाहेबांचे वय १७ वर्षे होते. बाबासाहेबांच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते आणि या फाटक्या संसाराचा गाडा ओढायचं सामर्थ्यं माता रमाईंनी फक्त पूर्णच केलं नाही तर भीमराव यांना बाबासाहेब बनविण्याचं ऐतिहासिक कार्य केलं. त्यामुळेच बाबासाहेब नावाचं वर्तुळ हे माता रमाईंशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

तत्कालिन परिस्थितीचा विचार केला की माता रमाईंचं कर्तृत्व आपल्याला समजुन येतं. मुंबईसारख्या ठिकाणी राहावयास असुनही माता रमाईने बाबासाहेबांकडे कधी हौसमौस केली नाही. याऊलट बाबासाहेबांच्या शिक्षणाला मदत व्हावी यासाठी पतीची इज्जत सांभाळण्यासाठी रात्री शेण गोळा करायच्या व पहाटे त्याच्या गौऱ्या थापून बाबासाहेबांना मदत करायच्या. त्यातूनच उरलेल्या पैशातून घर सांभाळणारी व प्रसंगी अर्धपोटी झोपणारी परंतु बाबासाहेबांकडे एका शब्दानेही कशाची मागणी न करणारी माता रमाई आहे. कधी बाबासाहेब दारिद्र्यामुळे एवढ्याच तेल-मिठात महिना काढावा लागेल असे उद्विग्नतेने बोलत तेव्हा एक शब्दही न उच्चारता बाबासाहेबांना आडकाठी नको यासाठी हालाखीने संसार कुंटणारी माता रमाई आहे. समाजाच्या व्यथा, मानसिक व धार्मिक गुलामीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांची सुरू असलेली तळमळ माता रमाईला बाबासाहेबांच्या बोलण्यातून जाणवायची. ज्यावेळी बाबासाहेबांना जवळच कोणी नव्हतं त्यावेळी बाबासाहेबांच्या आयुष्यातील सर्वात जवळची रमाई होती.

बाबासाहेब रमाईला प्रेमाने रामू म्हणत. बाबासाहेब मनातल्या भावना, त्यांची समाजाप्रती असणारी तळमळ माता रमाईजवळ व्यक्त करीत असत. बाबासाहेबांच्या चळवळीची माता रमाईला जाणीव होती आणि या जाणिवेनेचं माता रमाईंनी कधी गरिबीच्या संसाराबद्दल बाबासाहेबांकडे ब्र देखील केला नाही. याऊलट बाबासाहेबांना कशापद्धतीने मदत होईल यासाठी बाबासाहेबांची इज्जत कायम ठेवत धडपडणारी माता रमाई आहे. दारिद्र्याच्या संसारात अनेक अडीअडचणींना माता रमाईला तोंड द्यावे लागले. बाबासाहेब परदेशी असताना पोटच्या पोरांना मांडीवर गमवावं लागलं यासारखं मातेचं दुःख जगात कोणतंही नसेल पण स्वतःच्या दुःखाची जाणीव माता रमाईने कधी बाबासाहेबांना होऊ दिली नाही. बाबासाहेबांनी जे कार्य आरंभिले आहे त्यात खंड पडू नये, बाबासाहेबांनी उराशी बाळगलेलं ध्येय यापासून त्यांचं मन डळमळीत होऊ नये यासाठी माता रमाई कधी मनमोकळी व्यक्त झाल्या नाहीत, “त्यांच्या तोंडापर्यंत शब्द यायचे आणि बाबासाहेबांचा लढा पाहुन तिथंच अडकत अशावेळी डोळ्यातील करुणा त्यांच्या मदतीला येत होती असा करुणेचा महासागर माता रमाई आहे”.

राधाबाई बळवंतराव वराळे यांनी रमाबाई यांच्या आठवणी आपल्या एका पुस्तकात नोंदवून ठेवल्या आहेत. त्यापैकी एक हकीकत जी रमाबाई यांनी त्यांना सांगितली आहे ती या बाबासाहेब आणि रमाईच्या नात्यावर वेगळाच प्रकाश टाकते. गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब बोटीने लंडनला जाणार होते. रमाबाई यांची इच्छा होती की आपण ही त्यांना निरोप देण्यासाठी बंदरावर जावे. त्यांनी याबाबत बाबासाहेबांकडे विचारणा केली. बाबासाहेब रमाईला म्हणाले, “की तुझी तब्बेत बरी नाही आणि तिथे खूप गर्दीही असेल. त्यामुळे तू घरीच थांब. “बाबासाहेबांनी रमाईस बंदरावर येण्यास नकार दिला. त्यात रमाईला नाराज करण्याचा विचार नव्हता तर त्यांच्याविषयीची काळजीच त्यात अधिक होती. पण रमाईचे मन मानायला तयार नव्हते. त्यांनी बळवंतराव वराळे यांना ही बाब सांगितली. रमाईची बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी बंदरावर येण्याची उत्कटता त्यांना तीव्रतेने जाणवली. वराळे यांनी मग रमाईसाठी एका टॅक्सीची व्यवस्था केली. बाबासाहेबांच्या गाडी मागे ही गाडी बंदरावर गेली. बाबासाहेब त्यांच्या गाडीतून उतरले आणि चालू लागले. कार्यकर्त्याची खूप गर्दी झालेली होती. चालतांना त्यांनी सहज मागे वळून पाहिले तर रमाई त्यांच्या मागे येतांना त्यांना दिसल्या. सोबत बळवंतराव वराळे होते. क्षणभर रमाई यांना वाटले, बाबासाहेब यांनी नको म्हटले तरी आपण आलो. आता बाबासाहेब काय म्हणतील? ते रागावणार तर नाहीत ? पण बाबासाहेब म्हणाले, “अरे तुम्हीही आलात”, असे म्हटल्यावर रमाईच्या जीवात जीव आला. रमाई, बळवंतराव व पोळ यांना त्यांनी बोटीवर नेले. सबंध बोट फिरवून दाखविली. जेवण, अंघोळ , विश्रांतीची सोय कशी आहे ते दाखविले. बोटीवरच सगळ्यांसाठी खुर्च्या टाकायला सांगून चहा मागविला. आणि शेवटी परत जातांना बाबासाहेब बळवंतराव वराळे यांना म्हणाले, “ अरे हिला सांभाळून घेऊन जा. गर्दी खूप आहे”. ह्या प्रसंगातून बाबासाहेब आणि रमाई यांच्या मनात परस्पराप्रती असणारा अतीव स्नेह जसा प्रगटतो तशी परस्परांची काळजी घेणारी ओली जाणीव पाहून डोळ्यात पाणी तरळते.

बाबासाहेबांच्या बोलण्यातून आणि सहवासातून निश्चितच माता रमाई यांनाही सामाजिक लढ्याची जाणीव निर्माण झाली होती म्हणुनच बाबासाहेबांप्रमाणेच शोषित, बहिष्कृत समाजाचा कनवळा माता रमाईंच्या कार्याचा उलगडा करताना आपल्याला दिसुन येतो.

ज्यावेळी चवदार तळ्याचं आंदोलन होतं त्यावेळी तळ्यावरील सत्याग्रहींसाठी स्वयंपाकाचे गाठोडे बांधून माता रमाई यांनी तयारी केली होती.
धारवडच्या बी.सी.मिशन वसतिगृहाची मुले उपाशी आहेत असं समजल्यावर स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या अधीक्षक वराळे काकांना देऊन मुलांच्या जेवणाची व्यवस्था माता रमाई यांनी केली.
पुढाऱ्यांनी दिलेली 200 रुपयांची पिशवी परत करून, ती रक्कम एखाद्या वसतीगृहाला द्या असे सांगणारी स्वाभिमानी माता रमाई आहे.
कामाच्या गराड्यात माता रमाईंनी पाठवलेला जेवणाचा डब्बा बाबासाहेबानी न खाता माघारी आल्यावर स्वतःही उपाशी राहणारी माता रमाई आहे.
पोयबावडी चाळीतील दलित महिलांना “राजगृहावर” बोलावून गप्पा मारणारी आणि अनाथ मुलांना सांभाळणारी माता रमाई आहे.
दारिद्र्याच्या संसारामुळे सकस व पुरेसा आहार माता रमाई व मुलांना भेटत नसायचा, अशावेळी मुले आजारी पडली तर दवाखान्यात न्यायलाही पैसे नसायचे अशा परिस्थितीत पोटच्या राजरत्न, गंगाधर व मुलीला गमवावं लागलं हे दुःख पोटात घेत पूर्ण समाजाला स्वतःचं कुटुंब मानुन कित्येक पिढ्यांचा उद्धार करणारी माता रमाई आहे.

“माता रमाई यांच्या त्यागाची आणि कार्याची जाण आपल्या प्रत्येक पिढ्यांना असलीच पाहिजे, यातुनच जगण्याचं सामर्थ्य आपल्याला लाभणार आहे”. माता रमाई यांच्या त्यागाची व कर्तृत्वाची आठवण करून देणाऱ्या गीतातील खालील ओळ खऱ्या अर्थाने माता रमाई यांचा महती अजरामर करून जातात, “भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वात होती”. खऱ्या अर्थाने माता रमाई यांनी स्वतःच्या आयुष्याला दारिद्र्याच्या अग्निमध्ये जाळत आपल्या पिढ्यांचे जीवन प्रकाशमान केले आहे.
आजच्या परिस्थितीत माता रमाई यांच्या विचारांची प्रासंगिकता खुप गरजेची वाटते. आजचा काळ पाहिला तर कौटुंबिक नात्यांमध्ये संवाद कमी होऊन दुरावा निर्माण झाला आहे आणि यामुळे समज-गैरसमज निर्माण होऊन मतभेद निर्माण होतायत. यामुळे एकमेकांबद्दलच्या अपेक्षा यांत समन्वयाचा अभाव दिसुन येतो आणि यामुळे एकमेकांना साथ देण्याची कुठेतरी पोकळी जाणवते. आजच्या युवकांना वाटते आपली पत्नी माता रमाईंसारखी असावी, एकदम समजूतदार. परंतु एकतर्फी विचार करून हे विसरले जाते की, आपण बाबासाहेबांसारखे कार्य करतो का? इथल्या ब्राह्मणवाद्यांकडून विदेशी फेमिनिजम चे धडे आयात करून शिकविले जातात परंतु बाबासाहेबांनी बुद्धकालीन स्त्रीमुक्तीची मांडणी केली असुन ती समतेवर आधारीत आहे. आज चळवळीत असताना आपण दोन्ही बाजूचे डोळसपणे विवेचन केले पाहिजे. बुद्धाची लोकशाहीवादी भूमिका, समतेची परंपरा जोपासताना अगोदर आपण बाबासाहेबांसारखे कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग आपल्या पत्नीकडुन माता रमाईसारख्या कर्तृत्वाची अपेक्षा ठेवली पाहिजे. यापद्धतीने जाताना बुद्धाचा मध्यममार्ग सोडून जमणार नाही. यामुळे खऱ्या अर्थाने कुटुंबातील वातावरण लोकशाहीवादी व समतावादी होऊन कुटुंबाचा सर्वांगीण विकास होईल, कुटुंब एकत्रित राहील. याबरोबरच सामाजिक चळवळीत काम करताना खऱ्या अर्थाने एकमेकांची वैचारीक व मैत्रेय सांगड तयार होऊन निरागस प्रेमाचे नाते तयार होईल. याद्वारेच सामाजिक लढा सुद्धा मजबुत होण्यास मदत होईल.

अदिती गांजापूरकर
नांदेड

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*