करुणामय प्रियदर्शी सम्राट अशोक

आदिती गांजापुरकर

चक्रवर्ती सम्राट अशोक अर्ध्या आशिया खंडावर मगध साम्राज्याचे राज्य प्रस्थापित करत सम्राटांचा सम्राट बनला होता. या जगज्येत्या सम्राटाच्या साम्राज्याचा विस्तार भारतासह पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, इराण, तुर्की इत्यादी प्रदेशात झालेला होता. या अखंड प्रदेशाला जंबुद्विप म्हणुन संबोधित केले जात असे. सम्राट अशोकाच्या मगध साम्राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विस्तार जास्त असल्याने या साम्राज्याला सहा राजधान्या लाभल्या असा भलामोठा विस्तार लाभलेल्या मगध साम्राज्याची कल्पना सुद्धा विलोभनीय वाटते.

शक्तिशाली व बलवान साम्राज्य निर्माण करण्याऱ्या सम्राट अशोकाचे कलिंगचे युद्ध झाले आणि या युद्धातील नरसंहार, मृत्यमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या सैनिकांचे रक्त, विधवा झालेल्या बायकांचे व त्यांच्या मुलांचे अश्रू आणि प्रचंड असा आक्रोश ज्यावेळी अशोकाने पाहिला त्यावेळी खऱ्या अर्थाने या जगज्येत्या सम्राटाचं अंतःकरण पिळवटून आलं आणि त्याच्या मनात करुणा निर्माण झाली. कलिंग युद्धानंतर या सम्राटांच्या सम्राटाने शस्त्राचा त्याग करून जगाला शांतीचा व करुणेचा संदेश देणाऱ्या बुद्ध धम्माचा स्वीकार केला. ज्याच्या नावानेच शत्रू राष्ट्रांना घाम फुटत होता, ज्याच्या साम्राज्याचा विस्तार अर्ध्या जगात होता अशा महाकाय साम्राज्याचा सम्राट बुद्धांना व त्यांच्या विचारांना शरण गेला ही अलौकिक घटना ‘अशोक विजयादशमी’ म्हणुन जगात नावारूपाला आली.

याचंच महत्व जाणुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही अशोक विजयादशमीच्या दिवशीच आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारून धम्मचक्र पुनर्जीवित केले. या ऐतिहासिक धम्मक्रांतीमुळे सम्राट अशोक खऱ्या अर्थाने चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक म्हणुन अजरामर झाले. यामुळे बौद्ध धम्माला राजाश्रय प्राप्त झालेला होता परंतु असे असले तरीही सम्राट अशोक हा कायम सार्वभौम बनुन राहिला. लोकांवर कधीही या सम्राटाने बौद्ध धम्माची जबरदस्ती केली नाही याउलट आताच्या काळासारखेही अनेक पंथ, धर्म अस्तित्वात असतानाही प्रत्येकाला ज्याचं त्याचं धर्म व श्रद्धा जोपासण्याचं स्वातंत्र्य या सम्राटाने दिलं होतं. यामुळेच एवढे महाकाय साम्राज्य असतानाही या साम्राज्यातील लोकांत द्वेष नव्हता किंवा हिंसाचार झाला नाही. बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर सम्राट अशोकाने स्वतःला पूर्णतः धम्मकार्यात व लोकोपयोगी कार्यात वाहुन घेतले. लोकांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी विविध पदांवर सेवकांची नियुक्ती केली आणि “जनतेच्या प्रश्नांसाठी मला झोपेतून उठविले तरी चालेल अशा सूचना सेवकांना देऊन खऱ्या अर्थाने लोकसेवेसाठी समर्पित होणारा सम्राट म्हणुन अशोकाचा गौरव झाला”. साम्राज्यातील व्यापाराचा विस्तार व्हावा यासाठी परदेशात माल आयात व निर्यातीचे धोरण सम्राट अशोकाने अवलंबिले. यासाठी वाहतुकीची सुविधा निर्माण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजुस झाडे लावणे, वाटसरूंसाठी आमराई उभारणे, पाणी पिण्यासाठीची सोय करणे अशा सोईसुविधा सम्राट अशोकाने निर्मिल्या. लोकांच्या बरोबरच प्राण्यांचीही काळजी करणारा सम्राट म्हणुन सम्राट अशोक एकमेवद्वितीय ठरतो. आज आपल्या देशात प्राण्यांसाठीची जी सरकारी दवाखान्याची सोय दिसते ही देणं सम्राट अशोकाची आहे याबरोबरच वन्य प्राण्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी जलाशय निर्माण करणारा सम्राट अशोक इतिहासात एकमेव सम्राट ठरतो.

सम्राट अशोकाच्या काळात मगध साम्राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वात जास्त असल्याने भारतीय इतिहासात मगध साम्राज्याच्या काळात भारत “सोने की चिडीया” होता असे गौरवउद्धार आजही काढले जातात आणि तत्कालीन परिस्थितीच्या अभ्यासावरून सम्राट अशोकाचा कालखंड हा देशाचा सुवर्णकाळ होता असे आपल्याला दिसुन येते. यासंबंधी बाबासाहेब म्हणतात, “भारताच्या इतिहासात एकच असा एकमेव म्हणण्यासारखा कालखंड आहे जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय” याच भरभराटीच्या काळात परकीय व्यापारी भारतात येऊन व्यापार करू लागले. याचवेळी सम्राट अशोकाने तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला यासारख्या २३ जगविख्यात विश्वविद्यालयांची निर्मिती केली. परकीय देशातील विद्यार्थी याठिकाणी येऊन प्रमुख विषयांसह योग, आयुर्वेद याचे शिक्षण घेत व आपल्या मायदेशी परतून त्याठिकाणी त्याचा प्रचार व प्रसार करीत असत. शिक्षणाच्या या क्रांतीमुळेच बौद्धिक क्षमता विकासासाठी मदत केली. खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाने शिक्षणाची पाळेमुळे या देशात रोवली व यामुळे त्याकाळात सम्राट अशोकाच्या नेतृत्वाखाली भारत एक जबाबदार जागतिक महाशक्ती बनला होता. प्रचंड असं भव्यदिव्य साम्राज्य असणाऱ्या व सम्राटांचाही सम्राट असणाऱ्या मगध साम्राज्याकडे बघण्याचीही हिंमत शत्रू करू शकत नव्हता हा दरारा सम्राट अशोकाच्या नंतरही मगध साम्राज्याचा होता. सम्राट अशोकाच्या हयातीतच जंबुद्विप बौद्धमय होता. याचबरोबर सम्राट अशोकाने बौद्ध धम्मकार्याचे व प्रसाराचे कार्य हाती घेतले होते. त्यांनी साम्राज्यभर धम्मप्रसाराचे कार्य हाती घेतले. धम्माचा प्रसार करण्यासाठी स्वतःचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंका याठिकानी पाठविले. धम्मातील ग्लानी बाहेर काढण्यासाठी चुकीच्या गोष्टी करणाऱ्या भिख्खूना बाहेर काढत भिख्खूसंघालाही शिस्त लावली. धम्माचा प्रसार व्हावा यासाठी धम्मसंगतीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे बुद्धांचे विचार अबाधित राहावे यासाठी ८४००० स्तुपांची, शिलालेखांची व लेण्यांची निर्मिती सम्राट अशोकाने केली. वर्षानुवर्षे विचार अबाधित राहण्यासाठी शिल्पकलेचा अविष्कार सम्राट अशोकाने करून जगाला याची देणगी दिली. भारतासह पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, इराण, तुर्की इत्यादी प्रदेशात धम्म कार्य घडून धम्म प्रसारीत झाला होता. सम्राट अशोकाने लेणी, स्तूप, स्तंभ, विहारे, चैत्य, शिलालेख यांची निर्मिती केली त्यामुळे या सांस्कृतिक वारसातुन सम्राट अशोकाच्या कार्याचा पाऊलखुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही देशाचा इतिहास हा त्या देशाच्या गर्भात शोधला जातो. आजही उत्खनन केल्यास आपल्याला सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या बुद्धमूर्ती, शिलालेख, स्तंभ या मातीच्या गर्भात आढळून येतात आणि त्यामुळेच जगात बुद्धांचा देश म्हणुन भारताची ओळख आहे ही चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या कार्याची महती आहे. आजही मेकर्स ऑफ युनिव्हर्स मध्ये बुद्ध, महावीर यांच्यानंतर सम्राट अशोकाचे नाव येते ही खऱ्या अर्थाने देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
म्हणुनच प्रियदर्शी सम्राट अशोक भारतवर्षाच्या इतिहासातील दिवसेंदिवस तेज वाढत असलेला महान तेजस्वी तारा आहे.

आदिती गांजापुरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*