राहुल पगारे
तंगलान (Thangalaan) बघताना फक्त दोनच शक्यता, एक तर तो तुम्हाला काहीच कळाला नसेल किंवा कळाला असेल तर तुम्ही बघुन stunned व्हाल. स्टोरीची फिल्मिग अशी असु शकते हे बघणं प्रचंड सुखद आहे. मनोरंजन आणि film experience या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. फक्त मनोरंजन शोधणाऱ्यांना यात काहीच समजणार नाही की काय सुरु आहे. पण ज्यांना कथानकात phenomenal इंटरेस्ट आहे आणि ज्यांना film experience घ्यायचा त्यांच्या साठी मात्र हा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त चित्रपट आहे. मी मागे लिहिलं होतं की पा रंजितची स्वताशी स्पर्धा आहे आणि म्हणून कबाली, काला, सारिपट्टा च्या कितीतरी पुढचा हा मुवी बनवला गेला. इतकच नाही तर तंगलान बघताना तुम्हाला पाठीमागचा पा रंजित विसरावा लागेल.
ही फिल्म बघताना आपण KGF (kollar gold field) वर बघतो, आणि स्टोरीचा object सोने आहे असं ज्यांना वाटतं त्यांचा गोंधळ होऊन जाण्याची शक्यता जास्त आहे. बुद्धाचा संदेश तिथे direct object आहे तर गोल्ड तिथे फक्त खरं तर metaphor एक मिथक म्हणून वापरलं आहे.
या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की एखाद्या छुप्या खजान्या भोवती ज्या पारंपरिक लोक कथा आहे, ज्या आपल्या ऐकण्यात आहे, जसं की कोणीतरी त्याचं रहस्यमय पद्धतीने रक्षण करतो, विशेषतः सापा विषयी अशा लोककथेत सर्रास ऐकायला मिळतात, त्याच लोककथेला, धारणेला mystic पद्धतीने सादरीकरण आहे. पण या सादरीकरणात ऐतिहासिक संदर्भ आहे. ज्यांना बौद्ध साहित्य माहीत आहे, ज्यांना क्रांती प्रतिक्रांतीची ओळख आहे त्यांना कथानका सोबत पुढं जाताना समजुन घेतांना अडचण ठरत नाही. इथे दोन उकल आहे, एक वैयक्तिक व्यक्तीगत व एक सामाजिक. वैयक्तिक पातळीवर तुमच्या मनाचा संघर्ष कसा सुरु असतो आणि सामाजिक विषमता कशी एका बाजूला निर्माण होऊन माणुस degrade केला जातो याचं चित्रण आहे. ऐतिहासिक बाजु मांडताना एका नायकाच्या तोंडुन सांगितलेल्या कथेत ब्राह्मण invader आक्रमणकर्ता दाखवला तर नंतर तशीच घटना ब्रिटिश आल्यावर दाखवली तेव्हा ब्रिटिश अर्थात आक्रमणकर्ता दाखवला. सोन्यासाठी पहिल्या आक्रमनात ब्राह्मणांच्या सांगण्या वरून एका राजा जेव्हा बुद्धाला सैतान अपशकून ठरवुन बुद्धची मुर्ती धडा वेगळी करतो, आणि नागवंशी रक्षकाचं रक्त जमीनीवर सांडुंन जेव्हा त्याचं सोनं बनताना दाखवलं याचा अर्थ बुद्धाच्या समतावादी विचारा पासुन लोकांची फारकत होऊन आणि विषमतावादी समाजाने वर्णव्यवस्था निर्माण करुन बहुजनांच्या कष्टावर, रक्तावर धनाची रास रोवली आपली श्रीमंती बनवली असा आहे. सोन्याची खान ही या फिल्मचा object नाही फक्त metaphor एक मिथक आहे वापरलेला. नंतर बुद्ध मुर्तीचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी दफन करुन त्या भोवती अपशकून, सैतान आहे असं लोकांच्या मनात भरवलं जातं आणि लोक तेच समजतात. आणि कालांतराने जेव्हा ब्रिटिश भारतात येतात तेव्हा याच धनाच्या सोन्याच्या खाणींच्या लालसेने अस्पृश्यांना कामांवर लावतात तेव्हा तंगलानचा मुलगा ज्याचं नाव अशोक दाखवलं, तो ही धनाच्या लालसेने पछाडलेलो असतो मात्र तिथे दफन बुद्ध मुर्ती सोबत त्याचा भावनिक संबंध दाखवला. (हा ब्रिटिश संदर्भ ब्रिटिश भारतात आल्यावरच सम्राट अशोक व बुद्ध स्तुपाचा नामशेष झालेल्या इतिहास त्यांनी व त्यांच्या मुळे समोर आला अशा अर्थाने दाखवला जाण्याची शक्यता आहे) आणि तो अशोक त्या मुर्तीच्या सानिध्यात येऊन त्या मुर्तीसाठी तो धनाची लालसा सोडतो. हे प्रासंगिक सम्राट अशोकाला अधोरेखित करणारी एक रेष आहे. बुद्ध मना पर्यंत पोहचण्यासाठी आपल्या मनाची संभ्रम अवस्था, आपलं अज्ञान, आपली द्विधा, दर्शवण्यासाठी बौद्ध साहित्यात “मारा” म्हणून एक कल्पना आहे. याच कल्पनेला इथे mystic पद्धतीने वापरलं. अत्यंता सोन्याची खाण जी मिळते ती सोने नाही तर अस्पृश्यांना जगण्याला मिळालेला उद्देश, स्वाभिमानाची जागृती व मिळालेलं बळ दर्शवलं आहे. अन्याया विरूद्ध लढणं, विषमतेतुन मुक्तीची आस हे त्यांना गवसलेलं सोनं आहे. जेव्हा तंगलान त्याच्या लोकात उभा राहुन भाषण करतो तेव्हा सोनेरी चमक आलेला दाखवला ती त्याची enlightened प्रबुद्ध अवस्था दाखवली.
सर्व संघर्षाचं मुळ आसक्तीत आहे, लोभात आहे. याच आसक्तीपायी विषमता लादली गेली, माणूसपण हिरावलं गेले, आणि जेव्हा माणुसपण हिरावलं जातं तेव्हा ते परत मिळवण्यासाठी तुमच्यासाठी अत्त दीप भवं हाच बुद्धाचा प्रेरक संदेश असतो. हीच कथा आहे चित्रपटाची.
हिंदी किंवा इतर चित्रपटात बुद्ध खुप आधीपासूनच दाखवतात. अर्थात फक्त मुर्तीच दाखवतात. ते ही एक सौंदर्यशास्त्राचा नमुना म्हणून. बाकी बुद्धाशी फार काही सामाजिक देणंघेणं नसतं. पा रंजितने हा उच्चवर्णीयांच्या टेबलावरचा शोभेतील बुद्ध बाहेर काढला आणि शोषितांच्या आंगणात आणि प्रांगणात मांडला. काला, नच्चाथिरम नगरगिराद्दु, सरपट्टा परंबराई, धम्मम आणि आता थंगलान.. आणि इथे पा रंजितने बुद्ध फक्त अंगणात प्रांगणात आणला नाही तर बुद्ध मुर्ती समोर सर्व शोषित आनंद साजरा करताना, गाताना दाखवलं. बाबासाहेबांनी चार आर्य सत्य खोडुन काढलं होतं. कारण हे प्रचलित झालेले चार आर्य सत्य बुद्धाचं तत्वज्ञान नाही तर फक्त बुद्धानंतर कोणीतरी केलेली अनुक्रमणिका आहे. पण या अनुक्रमणिका मधे आधी दुःखच सांगितले गेल्यामुळे बुद्ध व दुःख एकच करुन बघतात किंवा हा निराशाजनक धम्म आहे असा विचार केला जातो. बाबासाहेब याला म्हणूनच नाकारतात. कारण बुद्ध दुःखदायक नाही तर जे जे जगात दुःख आहे ते कशाने आहे आणि ते शमावण्यासाठी जो मार्ग दिला ज्याला अष्टांग मार्ग म्हटलं गेलं, तो मार्ग देऊन आपल्याला दुःख मुक्त करणारा व आनंद देणारा आहे, म्हणून बुद्ध निराश नाही तर संघर्षशील, आशावादी, आंनदीच आहे. बुद्धाला धीरगंभीर बघण्या ऐवजी त्याला विषमते विरुद्ध संघर्ष करताना व आपल्या आंनदाचे कारण म्हणुन बघितलं पाहिजे. आपण आपल्या भाषणात पण “अखिल जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध ” म्हणतो पण त्या ऐवजी “सामाजिक विषमतेविरूद्ध बंड करणारे बुद्ध” म्हटलं पाहिजे. कारण कोणता शाब्दिक अन्वयार्थ तुम्हाला शांत करेल की संघर्षाला प्रवृत्त करेल हे बघितलं पाहिजे. मला वाटतं पा रंजित ही narrative, interpretation ची कमी भरुन काढतो. आणि बुद्धाला सामाजिक विषमतेविरुद्धच्या संघर्षात प्रतिक बनवुन, बुद्धाच्या विचाराला, लोक तत्वज्ञानाला आपल्या आंनदाचं कारण बनवतो. पा रंजित फक्त एक फिल्म मेकर नाही तर एक Philosophical-Cultural Thinker आहे.
A must watch!
योगेश भागवतकर
मला माहित नाही हा चित्रपट किती लोकांना समजेल या चित्रपटाला जी लांबी, रुंदी,उंची आणि खोली आहे ती समजण्यासाठी आणि फिल करण्यासाठी ऐतिहासीक समज असणे येथल्या व्यवस्थेचं समाजशास्त्रीय आकलन असणे फार फार महत्त्वाचे आहे. हा केवळ एक चित्रपट नाही तर एखाद्या झंझावता सारखा काळाचे भयानक आवर्तन घेत तुमच्या मनमस्तिक्षात आरपार घुसून घोंगावत राहणारा एक अद्वितीय अनुभव आहे.
काळ लोटत राहतो गोष्टी जुन्या होत जातात, जशा जशा त्या विस्मृतीत जायला लागतात तस तस् त्यावर गुढतेची पुटं चढत जातात, त्या स्मृतीत जतन करून ठेवण्यासाठी त्यांना अलौकिकतेच, अतींद्रिय कल्पनांच वलय देऊन त्यातील रोमांचकता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशीच एक गोष्ट म्हणजे “थगलान” son of gold जो प्रतिकांमधून उलगडत जातो.
थगलानचा पूर्वज एका ब्राम्हणाला उद्देशून बोलतो की, “तुझे इतिहास को गाढकर ही खुशहालीभरा जीवन मिला है”.
तेव्हा वाटतय की, “हा चित्रपट किती थेटपणे भाष्य करतोय!” आता तो इतिहास कुठला आहे जो मतीत गाढला गेलाय हे वेगळं सांगण्याची गरज पडत नाही.
ही गोष्ट यादेशात दडवल्या गेलेल्या खऱ्या सोन्याची आहे. ज्याने या देशातील लोकजीवनाला आपल्या सोन्यासारख्या जीवनमूल्यांनी मढवले, ज्यांनी आपल्या पदपावलांनी या भूमीला दुःखमुक्तीची वाट दाखविली , ज्याने येथील मानवी जीवनाला विवेकाच्या,समतेच्या, अहिंसेच्या , शोषणमुक्तीच्या करुणेच्या उजेडाने प्रकाशित केले ज्यातून या मातीला मानवी विचारांची उन्नत अवस्था प्राप्त करून दिली त्या क्रांतिकारी तथागत बुद्धाची आणि एका संपन्न अशा मानवी मूल्य असलेल्या सभ्यतेच्या विध्वंसतेची, त्याच्या ऱ्हासाची दलीत आदिवासी पिछाड अशा बहुसंख्य मोठ्या लोकसमुहाची ब्राम्हणी व्यवस्थेत झालेल्या सामाजिक अध्यपतनाची, त्यांच्या लुटीची, शोषणाची ही गोष्ट आहे. वेळोवेळी या भूमीत आलेल्या परकीयांनी आपल्या स्वर्थासाठी, संसाधनांच्या मालकी हक्कासाठी कशाप्रकारे या भूमीतील सुखी संपन्न सभ्यता नासवली, कशाप्रकारे उच्चनीच्छतेचे, विद्वेषाचे बीजे पेरून या भूमीला शोषणाची अन्यायाची कंगाल अवस्था प्राप्त करून दिली हा असा मोठा काळाचा विस्तृत पट चित्रपट बघताना डोळ्यापुढे तरळून लागतो.
या मातीत दफन बुद्धाच्या खंडित मुर्त्या, त्यांचे छोटे मोठे अवशेष एका मोठ्या दीर्घकाल चाललेल्या संघर्षाची गाथा अबोलपणे आपल्या पुढे प्रस्तुत करतात. आणि म्हणूनच बुद्धाच दगडी खंडित शरीर मातीतून बाहेर खणून काढताना थंगलान म्हणतो ” इस मिट्टी के अंदर जो कबर है अंदर से किसी के हाडबडाने की आवाज आ रही है, ये शरीर नही है सोना! सोना है!. ” त्याच्या नेनिवेतून तो हे बोलत असतो. खऱ्या सोन्याची गोष्ट सांगत असतो.
येथील नैसर्गिक संसाधनांवर जल, जंगल, जमीनवर येथील भूमिपुत्रांच जिवापाड प्रेम असणारच, म्हणून ते त्याचं प्राणपणाने रक्षण करताना दिसतात. त्यांचं येतील जिवाजिव गोष्टींशी ऋणानुबंध ते परकियांच्ये कसे असणार सुरुवातीला आलेल्यांनी नंतर अलेल्यांच स्वागत करत , त्यांच्या पुढे लोटांगण घालत येतील मानवी समूहाची हर संभव पिळवणूक करत त्यांच्याच वाट्याला गुलामीच जीवन आणलं जमीनदारी जहागीरदारी मुघलदारी मिळवत जिमिनी लाटल्या मुळ जमीन मालकांना भूमिहीन केलं, त्यांना अन्यायी जातिव्यवस्थेच्या खालच्या स्थारत ढकलून दिलं. हे एव्हढ उघड उघड वास्तव हा चित्रपट बिनदिक्कतपणे मांडतो.
भारतीय चित्रपट कलासृष्टीत आणि वास्तविक भारतीय लोकजीवनात जी प्रचंड दरी या क्षेत्रातील प्रस्थापित वर्गाने करून ठेवलीय ती कुठेतरी भरून काढण्याचा एका मोठा प्रयत्न पा रणजित या दिग्दर्शकाने “थंगलान” या चित्रपटाच्या माध्यमातून केलाय तो वाखाणण्याजोगा आहे. कौतुक करण्यासारखा आहे. हॅट्स ऑफ पा रणजित!
चित्रपटात चियान विक्रम ने कमाल काम केलंय , त्याचबरोबर त्याची सहयोगी पार्वतीने आपल्या एक्टिंने चित्रपटात जीव ओतलाय. त्यांच्यात नवराबायकोची केमिस्ट्री भारी जुळून आलीय ज्यांना चित्रपटाला खुमासदार बनविले. मालविका मोहनन , डैनियल कैल्टागिरोन आणि इतर सहयोगी कलाकारांनी सुद्धा उत्तम काम केलंय, गाणी विनाकारण उगाच घुसवलेली नाहीत त्याचा ही उपयोग स्टोरी टेलिंग साठी केलाय, बॅकग्राऊंड म्युझिक त्या काळाला साजेस असे असून त्याचा दृष्यांशी मिलाफ होऊन रोमांच उभा करतात. सिनेमेटोग्राफी मला थोडी डल वाटली. चित्रपट बघताना एक धुसरपणा जाणवतो तो मनाला खटकत राहतो. बाकी मेकअप आर्टिस्ट, कॉस्टयुम डिझायनर , व्हीएफक्स वैगरे ओव्हरॉल सगळ्या तांत्रिक बाबी भारी जमून आल्याय. पा. रणजित कडून असलेल्या अपेक्षा आता आणखी जास्त उंचावल्या आहेत.
” अंग्रेजो जैसे पढ लिखकर , ऊसके जैसा कपडे पहनकर अपने अधिकार मागणे वाले बनो….” जेव्हा हे वाक्य थगलान बोलतो ना तेव्हा एकदम बाबासाहेब डोळ्यासमोर चमकून जातात.
“थंगलान” हा केवळ एक चित्रपट नाही मित्रानो तो काळाच्या पटलावरून उठवलेला एक पडदा आहे जेव्हढ्या लवकर होत असेल बघून घ्या! आणि हो थेटर मध्येच बघा!
राहुल गायकवाड
तंगलान
तसं पाहिलं तर चित्रपट हा समाजाचा आरसा मानला जातो, परंतु इथे ते अभावानेच होताना दिसतं कारण इथली ठराविक कथित उच्च जातींनी नियंत्रित केलेली संसाधने. अन्यथा ज्या महाराष्ट्रातून आधुनिक काळात विशेषतः फुले आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे आत्मभान मिळाल्यानंतर अन्यायाच्या विरुद्ध लढाई देणाऱ्या पँथर्स सारख्या संघटना गावोगावी उभ्या केल्या त्याच प्रतिबिंब कुठल्याही कलाकृतीतून आलेलं दिसत नाही.
अगदी अशरफ जोडगोळी सलीम जावेद मुंबईत महाराष्ट्रात बॉलिवूड मध्ये अँग्री यंग मॅन नावाखाली तोच उच्च जातीय चेहरा असंतोषाचा नायक म्हणून रेटून म्हणून सिनेमे लिहीत असताना त्यांना देखील ह्या शहरात, राज्यात त्याच दशकातील इतक्या मोठ्या बंडाची दखल घ्यावी वाटली नाही, शेवटी हा ब्राह्मण, अशरफ आणि कथित उच्च जातीच्या हित संबंधाचा प्रश्न आहे. फार फार तर बंडाला विकृत्पणे पुढे आणण्यात जब्बार पटेलांच्या मुक्ताने हातभार लावला आहे ज्यात हा नायक हिंसक, स्त्रीमुक्ती विरोधी रंगवला गेला आहे आणि ह्याच बंडाला पुढे रेगे सारखे अकडामिक बुद्धिजीवी लोकांनी हिंसक, स्त्रीविरोधी म्हणून बदनाम करून स्वजातीय वर्चस्व जपले आहे. म्हणजे थोडक्यात शोषित समूहातील आलेल्या नायकाला बदनाम करण्याची संधी ह्या लोकांनी सोडली नाहीच कधी.
ब्राह्मणी व्यवस्थेविरोधत पावलोपावली बंडखोरी होत असते, नायक गल्ली गल्लीत निर्माण होत असतात कारण ही रोजची लढाई आहे, पण हे समाजमन दाखवतील असे चित्रपट येऊच शकले नाहीत कारण त्या माध्यमावर याच लोकांचा असलेला पूर्ण कंट्रोल.
पा रंजीत या आधी देखील शोषित समूहातील नायकाची कथा सांगत मांडत आलेला आहे, पण मग थांगलान असा काय वेगळा ठरतो. तर त्याचा ह्या वेळी असलेला कॅनव्हास.
थांगलान म्हणजे बाबासाहेबांचं एक वाक्य आहे जे म्हणजे “The history of India is nothing but a history of mortal conflict between Buddhism and Brahmanism” ह्या वाक्याला सेंट्रल premise बनवून पुढे केलेली निर्मिती. हे फार जिकिरीचं काम होत ह्यात काही शंका नाही, पण हे premise केंद्रस्थानी ठेवून निर्मिती करताना सातत्याने कलेचा आविष्कार त्यासोबत ह्या सेंट्रल premise सोबत कटिबद्ध राहून पुढे जात राहणे हे मोठे आव्हान आहे आणि ते पा रंजीत ने नक्कीच पेलले असल्याचं दिसून येते.
पा रंजीत सुरुवातीला अस वाटत इंग्रजांचे उदात्तीकरण करतो की काय पण तसे न होता इंग्रज आणि इथले ब्राह्मण, उच्च जातीय सरंजामदार सावकार यांच्या दुहेरी शोषणावर अचूक भाष्य करताना पा रंजीत ने कमालीची हातोटी दाखवली आहे आणि अचूकता दाखवली आहे. ह्या मोठ्या कॅनव्हास वर पिक्चर बनवताना तो रटाळ होण्याची शक्यता होती शिवाय आर्ट, क्राफ्ट हरवण्याचा सुद्धा धोका होताच, पण तसे न होता इतक्या वेगात हा चित्रपट पुढे जात राहतो, आणि पडद्यावर दिसणारी कथा आणि आपण आपले लावत गेलेलो ऐतिहासिक संदर्भ ह्यात आपण गुंतून जातो.
मानवी भावना, नायकाची सतत होत असणारी घालमेल दाखवताना त्या नायकापासून त्याच मानवत्व हिरावून घेतले जाणार नाही याची काळजी घेण्यासोबत तुम्हाला सतत भीमा कोरेगाव ची आठवण करून देण्यात पा रंजीत यशस्वी होतो. मागे कुफ्फिर ने २०१८ ला लिहिलेली पोस्ट शेअर केली होती ज्यात कुफ्फिर शोषित समूहाने actively शोषक ब्राह्मण वर्गाशी लढाई करताना ठरवून केलेल्या चॉईस बद्दल म्हणतो आहे तशीच active चॉईस इथे थांगलान सतत करताना दिसतो आणि त्याचा सर्व लढा हा स्वाभिमानाचा, मानवी आत्मसन्मान संबधी आहे.
एका बाजूला कलेतील सृजनशीलता जपताना विषयाशी प्रामाणिक राहून एखाद्या रस्त्यावरील कार्यकर्त्याप्रमाणे चढाई करून आत्मविश्वासाने नरेटीव मांडण्याची धमक पा रंजीत ला अंगभूत आहे असेच म्हणावे लागेल.
इथे केवळ बुद्धाचा उदो उदो केलाय असही नाही, तो फार subtly बॅकग्राऊंडला आहे, इथल्या जमिनीशी, ग्रामीण संस्कृतीशी निसर्गाशी नाते असलेले समूह, त्यांची ब्राह्मणेतर श्रद्धास्थान न नाकारता बुद्धाला बॅकग्राऊंड मध्ये ठेवणे हे वेगळंच नरेटीव मांडण्यात यशस्वी ठरला आहे आणि ते पण कुठेही सर्व समावेशक ठरण्याची धडपड न दिसता किंवा तसा आव न आणता. नाहीतर तशी धडपड कॉम्रेड शरद पाटील करतात आपल्या प्राच्य विद्या पंडितीच्या जोरावर मध्य भारतातील आदिवासींना त्यांची राणी ही रामायण कालीन असल्याचं सांगून रामायण मिथकाला ह्या समूहाच्या माथी मारतात. इथे बुद्धाच्या विशाल मूर्ती समोर इतर आदिवासी समूहाची श्रद्धास्थान चिरडली जातील असा चुकून प्रयत्नही रंजीत करताना दिसत नाही, उलट त्यांचे त्या मातीशी असलेले नाते, त्यांच्या श्रद्धा त्यांचा संसाधनावरील हक्क या दृष्टीने तिथला प्रत्येक व्यक्ती स्वतः नायक आहे हेच पटवून देतो आहे.
थांगलान पाहताना दोन प्रवाह सतत सुरू असतात डोक्यात, एक पडद्यावर सुरू असलेला चित्रपट, आणि त्यामागे त्याचा larger कॅनव्हास ज्यामुळे तुम्ही सतत पुढे मागे जात येत राहता आणि बुद्ध अशोक फुले पेरियार बाबासाहेब भीमा कोरेगाव डोळ्यासमोर तरळत राहतात.
- तंगलान (Thangalaan) – निवडक रिव्ह्यूस - September 21, 2024
- छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन. - May 18, 2023
- ब्राह्मणी माध्यम प्रायोजित “नव – दलित” नरेटिव्हची समीक्षा – खुले चर्चासत्र - April 13, 2023
Leave a Reply