क्रांतीबा

क्रांतीबा

प्रिय क्रांतीबा
तु उठवलस रान गुलामगिरी विरुद्ध
कडाडून विरोध केलास
बालविवाह आणि असंमत वैधव्याला
प्रेरित केल्यास असंख्य मुक्ता
शिक्षणासाठी
तू
उगारलास आसूड शेतकऱ्यांचा,
उघडं केलंस कसब ब्राह्मणाचं
घडवलास सत्यशोधक समाज
लिहिलेस पोवाडे, नाटके
आणि
निपजलेस आमच्यात साहित्यिक मूल्य
तू
उपटलेस कान उपटसुंभांचे
प्रिय क्रांतीबा
कळवळलास तू कुणबी, माळी आणि साळ्यांच्या
दुष्काळी दुःखात
खुली केलीस विहीर अस्पृश्यांस..
तुझी ती हंटर आयोगास शिक्षणा संबंधी साक्ष
तू हकीकत, कैफियत मांडत गेलास
अविरत
गरीबवंचित अस्पृश्य समाजाची
अतिशुद्रादिकांस शिकविलीस विद्या
उघडल्यास अनेक शाळा
तु निर्मिलास सार्वजनिक सत्य धर्म
तू विचारलेस प्रश्न सत्सारात
घेतलीस खबर प्रत्येकाची आणि दिलेस इशारे
तू थांबला नाहीस
पत्रव्यवहार करत राहिलास
अखेरपर्यंत
इंग्रजी राजवटीशी
समता प्रस्थापित करण्यासाठी
तुझं मृत्युपत्रही किती सुंदर विचार
आमचा दस्ताऐवज
क्रांतीबा
तूच आमचा लढा
तूच आमचा अक्षय्य ऊर्जास्त्रोत

पूजा ढवळे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*