
राहुल पगारे :

नामदेव ढसाळाचं स्मरण करत लxx, झxx keywords असलेले टुकार कविता लिहिणे बंद झाले पाहिजे. विद्रोही कविता या अशा शब्दांच्या कधीच मौताज नसतात. विद्रोह म्हणजे अक्राळविक्राळ कपडे व केशभूषा करुन व कवितेच्या नावाखाली शिव्या लिहणे नसतो. विद्रोह म्हणजे तुमचं जे systematic oppression होत आहे ते उमगले पाहिजे आणि त्या लादलेल्या socio-cultural, socio-political hegemony वर्चस्ववादी व्यवस्थेतुन बाहेर पडलं पाहिजे. जी गोष्ट आपल्याला dehumanised करेल, आपल्याला अमानवी बनवेल ती नाकरली पाहिजे. व या साचेबद्ध पद्धतीने होत असलेल्या शोषणाविरुद्ध एक एक पाऊल टाकलं पाहिजे. हे विद्रोहाचं पाऊल व्यसन न करणे पण असु शकतं, शिक्षण अभ्यास स्पर्धा करुन यश मिळवणं पण असु शकतं, पंचशील, २२ प्रतिज्ञाचं पालन करणे, बौद्ध विचारधारेला स्वीकारणे व तसेच आपल्या गरजुवंताना शिक्षण नौकरी व्यवसायात मदत करणे पण असु शकतं. शोषित वर्ग हा सर्व समान संधी व संसाधने असण्यापासुन वंचित असतो तेव्हा यावर मात करुन mutual aid आपसी सहकार्यातुन शिक्षण रोजगार सहित आपल्यातलं मनुष्यत्व आपल्या सोबत इतरांना पण जगायची संधी निर्माण करणं हा विद्रोह आहे. हातात सिगारेट, लxx लसुनवाल्या कविता शिव्या हे खरं तर विद्रोहाचं विपर्यास आहे.एकटा माणुस व्यवस्थेला कशा जर्राट शिव्या घालतो यावरून व्यवस्था थर घाबरते हा भ्रम आहे. व्यवस्थेची आईमाई काढत शिव्या देणाऱ्याला व्यवस्था काहीच करत नाही, याचा अर्थ त्याच्या शिव्यांना व्यवस्था घाबरते, असं नाही तर याच्या अशा वागण्याने व्यवस्थेचं काहीच वाकडं होत नाही व व्यवस्था त्यांना परिणाम शुन्य वस्तु समजतात म्हणून सोडुन देतात. व्यवस्था एकट्याला व त्यांच्या शिव्यांना घाबरत नाही तर ती तुमच्यातल्या संघटित प्रयत्नाला घाबरते, तुम्ही जे शिक्षण घेऊन प्रगती साधतात त्याला घाबरते, तुम्ही जे स्वातंत्र्य विचार करतात व मांडतात त्याला घाबरते, तुमच्या बौद्ध होण्याला, व तुमच्यात संविधानप्रति जागृती होण्याला घाबरते. कृपया विद्रोह कसा असतो तो समजुन घ्या मित्रांनो, उगाच ढसाळांच्या नावावर अनुनय म्हणून काहीतरी बडबड कामाची नाही.
सिध्दांत बोकेफोडे :

पोस्ट वरुन आठवलं की, मध्यंतरी चारेक जणांनी मिळून गोलपिठ्याचे रंडीबाज नावाचा कविता संग्रह लिहला होता. बाकी लिहण्याबद्दल हरकत नाही, रंडीबाज असण्यावर सुद्धा नाही. संबंधितांनी मुखपृष्ठावर नामदेव ढसाळ यांचा फोटो चिटकवला होता, आता यामुळे भविष्यात नामदेव ढसाळ स्वतः रंडीबाज वगैरे टाइपचे व्यक्ती होते, असा गैरसमज होऊ शकतो. हे ढसाळांना बदनाम करणाऱ्या बदमाशांना आयत कोलीत दिल्या प्रमाणे दिसतं, ढसाळांची परंपरा फक्त गोलपिठ्याच्या चौकटीत बसते. रंडीबाज असण्यात आणि वेश्यांच जगणं मांडण्यात त्यांच्या सोबत काम करण्यात फरक असतो. राहिला प्रश्न गोलपिठ्याचा तर त्या कवींमधील एकही जण गोलपिठ्याचा नाही. जरी असला तरी ढसाळांनी स्वतः गोलपिठा आजच्या मुंबई नामशेष झाला आहे, अस आपल्या मुलाखतींमध्ये वारंवार सांगितल आहे.
दुसरी बाब अशी की जर कविता लिहणारा स्वतःला कवी म्हणत असेल तर त्याना दुसऱ्या कवीच्या नावावर parasite होण्याच कारण काय? स्वतःच नाव द्या स्वतःच्या कवितेला. Originality टिकवा. Originality टिकवणे हिच काय ती ढसाळांच्या वारशाची आच राखणे, पण सुमार-सद्दी लिहून ढसाळांच नाव वापरण अत्यंत दलिंदरपणाच लक्षण आहे.
लोक पण चार शिव्या दिल्या की विद्रोही कवीचा tag देऊन कोणालापण डोक्यावर घेतात. नामदेव ढसाळांनी ज्यावेळी कवितेत शिव्या वापरल्या त्यावेळानुसार ते बंडखोरीच parameter होतं, पण शेवटच अंतिम parameter कधीच नव्हतं आणि आजही नाही. यावर कबीर म्हणतात,
गांx भxx रणचढे, मर्दो के बेहाल
पतिव्रता भुकन मरे और पेढे खाए xxx
अशी अवस्था सोशल मीडियावर हळजलेल्या कवींनी कवितेच्या क्षेत्रात केली आहे.
जय :

नामदेव ढसाळांच्या ‘गोलपीठा’ या काव्यसंग्रहाने मराठी साहित्यात वादळ उठवले होते. त्यात आशय आणि अभिव्यक्ती दोन्हीही नाविन्यपूर्ण होत्या. महत्वाचं म्हणजे ढसाळ हे एका विशिष्ट जातीचे प्रतिनिधी म्हणून इथल्या सो कॉल्ड गटबाजी आणि जातीय मानसिकतेच्या समीक्षकांनी ढसाळांना दलित कवी आणि त्यांच्या कवीतेला दलित कविता ठरवून अरुण कोलटकर यांना कवितेंचा नायक म्हणून प्रेझेंट केले. वाड़्मय हे समाजजीवना मधून येते आणि सामाजजीवन फक्त एकाच प्रस्थापित वर्गाचे येत असेल तर त्याविरुद्ध बंडखोरी निश्चित आहे. कारण ढसाळांच्या वेळीही सांस्कृतिक अन्याय सुरूच होता, तत्कालीन सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा विचार करता, ढसाळांच्या अभिव्यक्तीत विद्रोहाची जळजळीत भाषा येणे साहजिकच होते. खरतर तुकारामानंतर जळजळीत विद्रोह करणारे ढसाळच होते.
ढसाळांच्या लिखाणाने नवे लिहिणाऱ्याना बळ मिळाले असले तरी, ढसाळांच्या लिखाणाचे अनुकरण करण्याची स्पर्धा सुरू झाली आणि आज ही आहे, खरतर हा दोष ढसाळांचा नव्हता कारण ते वर्तुळ तोडायचे असल्यास नवे देण्याची क्षमता आपण जोपासली नाही. (नवे आले तरी आपण त्याकडे पाठ फिरवली.) इथे एक महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी की, ढसाळांचा विद्रोह हा मानवी मूल्य स्थापित करण्यासाठी असला तरी तो, माणसात आणि समाजात दरी निर्माण करणारा तसेच विचारधारेच्याही विरोधात असतो, हे कळायला थोडा वेळ द्यावा लागतो याची कबुली स्वतः ढसाळांनी दिली आहे. वर कंसात जे लिहिले आहे त्याचा खुलासा इथे करतो की, ढसाळांचा आदर्श त्यांचा विद्रोह समोर ठेवून काही कवी घडले पण आपण त्यांना दुर्लक्षित केले, ढसाळांच्या वेळची पिढी ‘दलित’ संकल्पनेत अडकून पडली, परंतु बळवंत कांबळे,अरुण काळे, भुजंग मेश्राम आणि अविनाश गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध संस्कृतीचा कलात्मक आविष्कार केला आहे. या पिढीने फक्त हे सांस्कृतिक भान जपले नाही तर नामदेव ढसाळ यांनाही या संस्कृतीकडे वळण्यास भाग पाडले ढसाळांची ‘निर्वाण अगोदरची पीडा’ वाचली की याचा प्रत्यय येतो. बळवंत कांबळे यांचा ‘निषेध’ आणि ‘गावभोग’. अरुण काळे यांचा ‘रॉक गार्डन’ ,’सायरन चे शहर’ ‘नंतर आलेले लोक’ तर भुजंग मेश्राम यांचा ‘उलगुलान’ आणि ‘अभुज माड’ हा कविता संग्रह आवर्जून वाचायला हवा. अविनाश गायकवाड यांची ‘अजूनही अस्वस्थ रोहिणी’ ही रोहिणी नदीच्या वादातून कोलीय आणि शाक्य मधील झालेला संघर्ष.अगदी काळजाला भिडलाय.
सिध्दांत :
Absolutely! दिलीप चित्रेंनी ढसाळांच्या कवितेचा शब्दशः अनुवाद केल्याने त्यांच नोबल पारितोषिक हुकलं, अस चंद्रकांत पाटील (औरंगाबाद) साठोत्तरीतले आणखी महत्त्वाचे कवी म्हणाले होते. ढसाळ स्वतःला ‘अधोविश्वातील कवी’ म्हणत, त्यांचा अभिप्रेत अर्थ विस्थापित जगातील किंवा जे जग उजेडात नाही तिथला कवी. हे अधोविश्व भाषांतरित होताना त्याच अंडरवर्ल्ड करण, शिव्यांचा शब्दांचा अनुवाद शब्दशः करणं जसं ‘गांडू बगीचा’ चा अनुवाद ‘Asshole Garden’ करण ह्या गोष्टींमुळे ढसाळांच आणि एकुण भारतीय साहित्याच वैश्विक पातळीवर नुकसान झाल आहे.
जय :
खर आहे. आता दुसरी एक गोष्ट अशी की, बाळ सीताराम मर्ढेकर आणि ढसाळ या दोघांच्याही आशय आणि अभिव्यक्ती यामध्ये फरक होता, पण त्यांच्यात काही समान दुवेही सापडतात. मर्डेकरांनी पारंपारिक मराठी भाषेची तोडमोड करून नवी भाषा घडवली तर नामदेव ढसाळ यांनी आपल्या बोलीभाषेला अभिव्यक्तीचा विषय करुन. दोघांनीही मराठीला नवी भाषा दिली, मर्ढेकरांच्या कवितेतील भाषेला परंपरावाद्यांनी तर अश्लीलतेच्या आरोपाखाली थेट न्यायालयातच उभे केले. पुढे ही लढाई मर्ढेकर जिंकले. नामदेव ढसाळांच्या कवितेवरही अश्लीलतेचे आरोप झाले असले तरी त्यांना त्यासाठी कुणी न्यायालयात खेचले नाही. म्हणजे याचा अर्थ तोपर्यंत फक्त समीक्षकीय अभिरुचीच नव्हे तर सामाजिक अभिरुचीही बदलली होती, असं ही म्हणू शकतो.
सिध्दांत :
अश्लीलता दाखवणे महत्वाचे नाही. अनुभव असतील तर ती लिखाणात अश्लीलता किंवा इतर काहीपण उपजत येते. ओढून ताणून आणल्यास कळून येतं. असो. बंडखोरीसाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे प्रतिरोध जो मर्ढेकरांच्या कवितेतून गायबच राहिला. त्यांना लोक आधुनिक कवी वगैरे म्हणत असले तर खरं पण आधुनिक मराठी कवितेचे जनक जोतिबा आणि सावित्रीमाई जे इथल्या स्ट्रक्चर वर भाष्य करतात. त्यात स्त्री, दलित, भाषा, धर्मसंस्था, अर्थकारण आणि राजकारण सगळंच समाविष्ट होतं. तेच पुढे ढसाळांना लागू होत.
सिध्दांत :
जात, संघटना, नातेसंबंध वगैरे वगैरे च्या पुढे असते ती म्हणजे आयडीयोलॉजी. कवी आणि फिलॉसॉफर मध्ये जास्त अंतर नसते. कवी आणि त्याची कविता काळाला सुध्दा बंधनकारक मानत नाही. विशेषतः कालातीत कविता आणि कवी. नामदेव ढसाळ यांनी साठोत्तरी कवी म्हणण्याची चेष्टा समीक्षक करतात, बहुधा सत्य असेल पण ढसाळांच्या समकालीन कवींमध्ये ते थोडेसे वेगळे ठरतात. मनोहर ओक आणि तुलसी परब किंवा काळसेकर यांच्या पेक्षा नामदेव ढसाळ आणि प्रकाश जाधव हे तुल्यबळ मजबूत कवी आहेत. मुंबई हे मराठी कवीतेच एपीसेंटर असेल तर तर ते नामदेव ढसाळ यांच्या मुळे. मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे आणि दादर पुलाखाली या दोन वेगवेगळ्या कविता एकच वाटतात. जर एखाद्या नवख्या व्यक्तीला प्रकाश जाधवांच्या संग्रहात ढसाळांची ‘दर्ग्याच्या वाटेवर’ नावाची कविता टाकून दिली तर तो म्हणेल अरे ही तर प्रकाशची कविता आहे. किंवा ‘अस्वस्थ आहे रोहिणी’ या अविनाश गायकवाड यांच्या संग्रहात ढसाळांची ‘या रिक्तेकेने मांडिलाहे छळ माझा’ नावाची कविता टाकून दिली तर ती अत्तरसारखी अदृश्य होईल. भुजंग मेश्राम यांची ‘नागपुत्र’ मूर्ख म्हाताऱ्याच्या डोंगराच्या गायब होईल तर अरुण काळेंच्या सायरनच्या शहरातील ‘गिधाडं’ गोलपिठ्यातल्या पाशवी अनुभवात एकरुप होतील. किंवा ढसाळांचे प्रदेश ओलांडून प्रकाश जाधवांची ‘द्रौपदी अस्लम डिकास्टा’ थोडीशी पुढे जाईल किंवा भुजंग मेश्रामांची ‘तिजनबाई’ सुध्दा… अरूण काळेंची ‘लहानीबाय’ ढसाळांना ओलांडून शकणार नाही पण जवळपास जाईल.
ढसाळांच्या सोबत सुरूवात किंवा शेवट होत नसेल तरीही प्रकाश जाधव, भुजंग मेश्राम, अरुण काळे आणि अविनाश गायकवाड हे त्यांच्या ब्लडलाईन मधले कवी म्हणावे लागतात. आणि महानगराला मुंबईला सोडून समष्टीचा विचार करता संतोष पद्माकर पवार सुध्दा यामध्ये सामील होतात. यापैकी नावांवर तुमची असहमती सुद्धा असू शकेल. त्यातल्यात्यात भुजंग मेश्राम आणि प्रकाश जाधव दोघेही आणखी वेगळ्या इझम मध्ये जाऊन येतात, स्वतः इझमस् बनतात. तरीही त्यांची पोएटिक ब्लडलाईन एकच. बाकी हे लोक पुढे जातात, सोबत राहतात, फाटे फोडतात पण कित्ता गिरवत नाहीत उलट ‘डी नावाच्या माणसाला’ प्रश्न करतात.
ढसाळांना जिवंतपणी नसेल तेवढा आजच्या फॅडमय जगात धोका आहे. धोका आहे तो त्यांना गोलपिठ्यात अडकून पाहणाऱ्यांच्या, त्यांच बोनसाय करू पाहणाऱ्यांच्या, ढसाळ म्हणजे शिव्या हे इक्वेशन बनवणाऱ्या लामाई बोटमोड्या नेटीझन्सचा, इंस्टाग्रामीण validation घेतलेल्या कवींचा, त्यांच्या जुन्या भाषांतरकारांचा आणि हे सगळ सेलिब्रेट करणाऱ्या पब्लिकचा. हा धोका टाळण्यासाठी सेलिब्रेशन पुढ At least सांस्कृतिक मंडळाच्या वेबसाइटवर मोफत उपलब्ध असलेला ढसाळांच्या समग्र कवितांचा गुलदस्ता पाणी लावून मेम्रीत ठेवायला पाहिजे आणि लिहणाऱ्यांनी ढसाळ म्हणत्यात तसं स्वतःच्या आत डोकावलं पाहिजे.
जय :
‘ढसाळ म्हणजे शिव्या’ हे समीकरण जुळवू पाहणाऱ्यांनी फक्त ‘जीवाचे नाव’ हे अधोरेखित करून त्यांना त्यात साचेबद्ध करण्याचा आटापीटा सतत केला आहे. परंतु त्यांनी ढसाळांच्या, ”ज्यांच आयुष्यच तुरूंग बनवलं गेलय ती तुरूंगाला घाबरतील काय? ती रोमँन्टीक रिव्होल्यूशनरी फुलपाखरं नाहीत” ह्या ओळी वाचलेल्या नसतात.
तुही यत्ता कंची या काव्यसंग्रहातील ‘गुलाबी आयाळाचा घोडा’ मधील ‘मला स्वातंत्र्य आवडतं,ते छान असतं समुद्रासारखं’ हे लिहिताना स्वातंत्र्य ही संकल्पना समुद्रासारखी विशाल आहे हे ढसाळांना दर्शवायचे आहे. तर दुसरीकडे मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले या कविता संग्रहात ते सवाल करतात की,
“या देशात समता आहे काय? इथल्या वर्गात समता आहे काय? स्त्री पुरुष समता आहे काय? कुठल्या मुशीतून समता आलीय?”
इथे त्यांना हेच सांगायचे आहे की, ‘स्वातंत्र्य’ हे मूल्य असल्याशिवाय समता, बंधुता आणि न्याय ह्या संकल्पनाना काही अर्थ नाही.
यासोबत ढसाळ पुरुषसत्ताक व्यवस्थेवर बोट ठेवून, या व्यवस्थेतील स्त्री- पुरुष संबंध, स्त्री म्हणजे उपभोग वस्तू म्हणून पाहणाऱ्या मनुस्मृती आणि तथाकथित धर्मग्रंथ यांना चपराक मारत लिहितात,
“प्रेयसी-रांxच सोज्वळ रूप, प्रियकर-भxव्याचं, बायका पुरुषांच्या छापील रांx,पुरुष बायकांचे भxवे,स्त्री पुरुष संबध, थोड्याश्या रांx, थोडेसे भxवे, थोडेसे दातवण, जे वापरल्यानंतर थुंकून टाकायचे आणी गंगेत दात खंगाळायचे.”
शेवटी ढसाळांच्या ‘माझ्या काळ्या सावळ्या लाडक्या मादीस’ ह्या कवितेतून स्त्री-पुरुष समान भूमिका दिसते. ते शेवटी म्हणतात,
“ह्या प्रचंड विषमतेच्या देशात तू व्हिएतनामी योद्धा झालीयेस”.
स्त्री, शोषित समूह, स्वातंत्र्य आणि मानवी अस्तित्व यावर भाष्य करणारा ढसाळ आपल्या कवितेच्या रथातून ‘दलित’ असण्याच्या किंवा कथितपणे ‘श्लील-अश्लील’ असण्याच्या भरपूर पलीकडे शुभ्र निळ्याशार आकाशात जातो.
राहुल पगारे :
कविता लिहताना हेतु आणि आशय महत्वाचा असतो. जो आजच्या फॅडमय कवींकडे नाही. सध्याचे कवी अंधानुकरण करत आहेत. Self obsessed असलेली ही कवी जमात नार्सिसिझमच्या बाबतीत Rap culture कडे कलली आहे. तिथून सुध्दा अशीच गोष्ट घेतली आहे जी ढसाळांच्या भूमिकेत दिसणार नाही. संघटित साहित्यिक सर्कल नसल्याने ढसाळांच्य नावावर एकवटलेले कवी ideological bloodline सोडून self glorification करण्यात मश्गूल झाले आहेत. कबीर-तुकाराम-जोतिबा-ढसाळ जेव्हा कविता लिहितात तेव्हा self center सोडून ते collective experience उभा करतात. कवींना ढसाळांचा वारसा सांगायचा असेल तर वरकरणी विद्रोही वाटणारे चारेक शब्द, वाहवाही मिळवण्यासाठी लिहलेल्या mediocre कविता आणि आत्ममग्नता सोडून आपल्या कवितांमधून ideological वारसा समोर आणावा.

- श्र्लील – अश्लीलतेच्या पल्याड नामदेव ढसाळ – काही चर्चा - January 17, 2025
- महाड –नित रोज छेडला जात असलेला धर्मसंगर - January 8, 2025
- तंगलान (Thangalaan) – निवडक रिव्ह्यूस - September 21, 2024
खरे म्हणजे आपण जेव्हा ‘ भीमाच्या लेखण्या ‘ असे जेव्हा संबोधू पहातो तेव्हा खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे असे वाटते:-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध लढा दिला व त्यासाठी त्यांनी आपल्या तत्कालीन अस्पृश्य समाजबांधवांना जागविले व चेतविले होते. त्याकरिता आवाहन करताना आपल्या लेखनातून व भाषणांतून त्यांनी कोणत्या प्रकारे भाषेचा वापर केला होता याची कल्पना ‘ आंबेडकरी ‘ म्हणजेच भीमाच्या अनुयायांना असायला हवी, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अशा पार्श्वभूमीवर जी कोणी व्यक्ती अगदी कलात्मक पातळीवर देखील का असेना, बाबासाहेबांच्या अभिव्यक्तीच्या भाषाप्रयोगाचे गांभीर्य लक्षात घेत नसेल व एकप्रकारे असंविधानिक भाषेचा प्रयोग करीत असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीचे व त्या व्यक्तीचा कित्ता गिरवू पाहणा-या व्यक्तीचे देखील समर्थन करणे योग्य ठरणार नाही. ‘ आंबेडकरी चळवळीची ‘ ओळख कोणत्याही असभ्यतेच्या अनुकरणावर असू शकत नाही.