बाबासाहेबांना खरे अभिवादन

सुनील कदम

चैत्यभूमी म्हणजे कुठलं देवस्थान नाही की दर्शन घेतलंच पाहिजे त्या शिवाय नवस फिटत नाही. हे दर्शन घेण्याचं ठिकाण नाही, आपण तिथे अभिवादन करायला जातो. अर्थात चैत्यभूमी वर जाऊन अभिवादन करणं वेगळंच असतं, आपण वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा घेऊन येत असतो परत. परंतु आजच हे संकट वेगळं आहे, जागतिक संकट आहे हे. संपूर्ण जगच हादरून गेलंय आणि हे दिसतंय आपल्याला. दोन महायुद्ध झाली, प्रचंड हानी झाली तरीही एवढं स्तब्ध झालेलं जग आज पर्यंत कुणी पाहिलं नाही. अशा वेळेस बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आपलं ही कर्तव्य आहे की संकटाला आपण जबाबदारीने सामोरं गेलं पाहिजे. ही अपवादात्मक परिस्थिती आहे आणि एक आंबेडकरी अनुयायी म्हणून आपल्या ती पार पाडलीच पाहिजे. अशा कठीण परिस्थितीत आपल्याला अभिवादन कुठं ही करता येतं त्या साठी चैत्यभूमी वर च गेलं पाहिजे अस नाही. तरीही अशा परिस्थितीत ज्याला चैत्यभूमीचं देवस्थान करायचं असेल तो compulsory दर्शन घ्यायला जाईल. ज्याला स्फूर्ती घ्यायची असेल तो घरात बसून एखादा volume वाचत बसेल. विशेषतः 10 वा volume ज्या मध्ये राष्ट्रनिर्मिती साठी बाबासाहेबांनी काय काय केलं यांची थोडी माहिती मिळेल…..विशेषतः पाणी संवर्धन, आर्थिक विकास, कामगार कल्याण, इत्यादी विषयावर केलेल्या कामगिरीचा अभ्यास होईल. 1942 ते 1946 पर्यंत मजूर मंत्री असतांना या देशाचा आर्थिक विकासाचा पाया रचला याच ज्ञान मिळेल, स्फूर्ती मिळेल.

काही लोक जनतेला भडकवण्याचा ही प्रयत्न करतील, फुशारक्या मारतील, आम्ही घाबरत नाही म्हणत भावनिक वातावरण करतील, जीवाला घाबरत नाही म्हणतील, पोकळ स्वाभिमान दाखवतील. अरे “जयभीम के एक नारे पर खून बहा तो बेहने दो” म्हणणारे आपण आहोत, त्या मुळे आपण मरणाला घाबरतो वगैरे म्हणणारे मूर्ख आहेत. ही आपली जबाबदारी आहे म्हणून आपण तिथं न जाता घरातच अभिवादन करणार आहोत, घाबरलो म्हणून नाही. आपण गर्दी केल्या मुळे दुसऱ्याला कोरोनाची बाधा होऊ शकते, आज पोलीस एवढे परिश्रम घेत आहेत त्यांच्या त्रासात भर पडेल, गर्दी आवरता आवरता पोलिसांना ही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असते. म्हणून जे जनतेला भडकवत आहेत त्यांना कळलं पाहिजे की हे देवस्थान नाही, अशा कोरोना सारख्या कठीण प्रसंगी तिथं गेलंच पाहिजे अस नाही, हे जर त्यांना कळत नसेल, याचा अर्थ त्यांना चैत्यभूमीचं देवस्थान करून लोकांना कर्मकांडात अडकवायच आहे, ज्या कर्मकांडातून अथक परिश्रमाने आम्हाला बाबासाहेबांनी बाहेर काढलं आहे.

मला वाटतं घरात बसून volume no 10 वाचून आपण डॉ बाबासाहेबांना अभिवादन करू….तेच बाबासाहेबांना अभिप्रेत होतं आणि तेच खरं अभिवादन ! त्यातूनच स्फूर्ती मिळेल !!

~~~

सुनील कदम हे आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक आहेत

छायाचित्र सौजन्य : Wikipedia

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*