समतेचे महत्त्व आणि समरसता नावाचा शब्दछल

सुशिम कांबळे

आपण नेहमीच समानता, समता, समरसता शब्दांची गल्लत करत असतो. वा ती हेतुपुरस्कर आपल्यात पसरविली जाते. त्यामुळे भारतीय राज्यघटना, भारतीय समाजसुधारक, आणि मूलतत्व विचारसरणी हे या तीन शब्दांकडे कसे पाहतात ते आपण बघुया.

सर्वप्रथम आपण घेऊया समानता भारतीय भारतीय राज्यघटनेत भाग तीन (Part 3 ) मुलभुत हक्‍क (Fundamental Rights) कलम 14 समानतेचा हक्क यामध्ये समानतेबद्दल असे सांगितले गेले आहे की , “कायद्यापुढे समानता – राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्या पुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारनार नाही, म्हणजे कायद्या पुढे सर्व समान. पण आपल्या देशात तर अनेक धर्म जाती, पोट जाती, वंश कुळ इतकेच काय लिंग, जन्म ठिकाण इ. बाबींमध्ये विभागले गेलेले लोक राहतात. मग या कलम 14 ची अंमलबजावणी कशी करणार? कायद्यापुढे सर्व समान, सर्वाना समान संधी, सर्व एक कसे होणार ?

हि कायदेशीर समानता आणण्यासाठी आधी समता प्रस्थापित करणे गरजेचे होते. हे बाबासाहेबांना माहित होते. जोपर्यंत समता प्रस्थापित होते नाही तोपर्यंत समानतेच्या तत्वाला मदत मिळणार नाही. म्हणून घटनाकारांनी पुढचे कलम म्हणजेच कलम 15 या मध्ये अशी तरतुद केली की, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म स्थान या कारणावरुन भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली. यामुळे स्वतंत्र भारतात कुठल्याही ठिकाणी मनोरंजन, दूकाने, सार्वजनिक उपहार गृहे, हॉटेले करमणुकीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद पाळण्यास मनाई करण्यात आली. समानता आणण्यासाठी आधी समता प्रस्थापित करण्यासाठी घेतलेला हा अभुतपुर्ण निर्णय होता. परंतु धर्म,जात, लिंग, वंश,पंथ, इत्यादींच्या भेदभावापासून स्वातंत्र्यानंतरच्या काळात सरंक्षण मिळून भागणार नव्हते. कारण हजारो वर्षे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, मानवी हक्क नकारला गेला असा शोषित वर्ग भारतात मोठा प्रमाणावर होता. शोषित आणि अभिजन वर्ग यात जमीन-आसमानचा फरक होता, व तो फरक तसाच ठेवून राज्यघटनेतील समानता साध्य करणे केवळ अश्यक होते.

म्हणून राज्यघटनेत अपेक्षित अशी समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्व घटकांना समान संधी देण्याची आवश्यकता होती. म्हणून पुढच्याच म्हणजे कलम 16 मध्ये विविक्षित वर्ग / मागासवर्गीय / अनुसुचित जाती आणि जमाती यासाठी विशेष सवलती करण्याचे प्रयोजन घटनेने करुन ठेवले आहे. आर्थिक, समाजकिय, शैक्षणिक दृष्ट्या उपेक्षित वर्गाला संधीच्या रुपाने आरक्षणाचा लाभ दिला गेला. जेणे करुन समतेच्या दिशेने देशाचे पाऊल पडेल आणि घटनेला अपेक्षित समानता प्रस्थापित करता येईल. परंतु आज ज्यांना आरक्षण मिळत नाही, त्यांना फक्त कलम 14 बद्दल अर्धवट सांगुन त्यांची दिशा भुल केली जाते. समानता हा एकच शब्द चूकीच्या प्रकारे सांगून त्यांना समतेच्या विरोधात केले जाते. परंतु बांधवानो जोपर्यंत समानता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत आपण समानतेच्या मुल्याचा उपभोग कसा घेणार ? समता(Equity) प्रस्थापित झाल्या शिवाय समानता(Equality) कशी येणार ? त्‍यामुळे आपण घटनेच्या संदर्भात घटनाकारांना अभिप्रेत असलेला अर्थ समजून घेतला पाहिजे.

यात आणखी घोळ घातला आहे तो आरएसएस प्रणित ‘समरसता’ या शब्दांने अतिशय गोड वाटणारा हा शब्द जर वरील शब्दांना पर्यायी शब्द असे आपण समजले तर ना समता प्रस्थापित होणार ना समानता. कारण समरसता हि समानतेच्या पुढची स्टेप आहे. असे मी म्हणेन. जेव्हा समाजात समानता प्रस्तापीत होईल तेव्हा खऱ्या अर्थाने मग एकमेकात समरस होण्यास अर्थ आहे. समरसता म्हणजे एकमेकांत मिसळणे. समरस होणे. एक समाज म्हणून देश म्हणून ही भावना वाढीस लागणे उत्तमच. पंरतु आरएसएस नेहमी बुध्दीभेद करून शब्दछलाच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आलेला आहे. एकदा का माणसांची डोकी संभ्रमीत झाली की, ती संघीय विचाराच्या प्रचारासाठी उपयुक्त असतात. संघाच्या समरसतेचा संबंधीत व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थीतीशी काहिही देणेघेणे नाही. गरिब-शोषित तो पिढ्यान पिढ्या तसाच राहिला तरी फरक पडत नाही. श्रीमंतांनी वा उच्च जातीच्या व्यक्तीनी गरिब-शोषितांसोबत वा भीन्नधर्मियांनी त्या सोबत समरस व्हावे. ही आभासी समता देशाच्या कुठल्याही कामाची नाही. आहे त्या परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने वागा. म्हणजे चटणी भाकरी खाणारा एखाद्या दिवशी श्रीमंताच्या घरी जाऊन त्याच्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होऊ शकतो. परंतु त्याने श्रीमंतासारखे होण्याचे स्वप्न बघू नये. हीच संघीय मेख या समरसतेच्या आड आहे. समरसतेबद्दल बोलणारा संघ जातीप्रथेबद्दल अवाक्षर काढत नाही. भेदभाव वा जातीय अत्याचाराबद्दल शब्दही काढत नाही. पण त्यांना समरसता मात्र हवी आहे.

पण घटनेला हे मान्य नाही. घटनेला अभिप्रेत असलेले समानतेचे कलम प्रत्यक्षात आणण्यासाठी आधी समता प्रस्थापित करावी लागेल. आणि जेव्हा या देशात खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित होईल तेव्हा खऱ्या अर्थाने देश आपोआपच समरसतेच्या वाटेवर वाटचाल करेल. जिथे कोणीही शोषित नसेल. सर्व प्रगत असतील, सर्व समान असतील. मित्रांना यापुढेही समानता, समता, समरसता या शब्दांविषयी आपली गल्लत होणार नाही अशी आशा बाळगतो.‍

सुशिम कांबळे

लेखक fAM सदस्य असून मंत्रालय येथे कार्यरत आहेत. तसेच ते Baudhkaro टीम चे सदस्य आहेत.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*